You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : 105 आमदार असूनही विरोधी पक्षात असलेल्यांना माझी ताकद विचारा #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 105 आमदार असूनही विरोधी पक्षात असलेल्यांना माझी ताकद विचारा - संजय राऊत
'105 आमदार असूनही विरोधी पक्षात असलेल्यांना माझी ताकद विचारा,' असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
यापूर्वी मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'सोबत केल्यानंत कंगना राणावतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख 'हरामखोर मुलगी' असा केला होता. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं भाजपनं म्हटलं. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये जाऊन बसलेल्यांना माझी ताकद काय आहे हे विचारा…जय महाराष्ट्र !"
दरम्यान, कंगना राणावत 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्यानं तिला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा पुरवणार आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी म्हटलं, "कंगनाच्या बहिणीनं काल मला फोन केला होता. तिला 9 सप्टेंबरला मुंबईला जायचं आहे. कंगनाला मुंबई दौऱ्यात सुरक्षा देण्याचा विचार सुरू आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे."
2. दाऊदच्या सात पिढ्या खाली आल्या तरी 'मातोश्री'चं वाकडं करू शकणार नाही - एकनाथ शिंदे
"मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी 'मातोश्री'चं वाकडं करु शकणार नाहीत", असं वक्तव्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
रविवारी (06 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असेलेलं 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देण्यात आली. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन केल्याची माहिती आहे.
दुबईवरून 'मातोश्री'वर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली, असं सांगण्यात आलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर आलं. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असं बातमीत म्हटलं आहे.
3. 23 सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला मंजुरी
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 23 कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खाजगीकरण करण्यात येणाऱ्या 23 सरकारी कंपन्या कोणत्या आहेत, याबाबत काही सांगितलं नव्हतं. मात्र, सरकार आपली भागीदारी 23 नव्हे तर 26 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील विकत असल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
या आरटीआय अर्जात संबंधित कंपन्यांची नावेही विचारण्यात आली होती. त्यानुसार सर्व 26 कंपन्यांच्या नावांसह, विकल्या गेलेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार निश्चित केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
4. भारतात 2019मध्ये दरतासाला एका विद्यार्थ्याची आत्महत्या
2019 मध्ये साधारणपणे दरतासाला एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे.
2019मध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक म्हणजेच 10,335 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
1 जानेवारी 1995 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान देशातील 1 लाख 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे. यापैकी 52 % आत्महत्या गेल्या दशकातील असून 85,824 आत्महत्या 1995 ते 2008 या कालावधीतील आहे.
NCRBनं ही आकडेवारी जारी केली आहे.
5. यंदा रब्बी क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ - कृषीमंत्री
राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात 60 लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"राज्याचे रब्बी पिकाखालील क्षेत्र सुमारे 52 लाख हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा व भाजीपाले ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरणे, बंधारे भरले आहेत. यामुळे राज्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्रात वाढ अपेक्षित असून ते 60 लाख हेक्टरपेक्षा असण्याची शक्यता आहे.
"रब्बी हंगामासाठी एकूण 9.14 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून 9.25 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियेाजन करण्यात येत आहे," असंही दादा भुसे यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)