You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिलिंडर भरायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पत्नीच्या हत्येतील आरोपी कसा सापडला?
- Author, नवज्योत कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या चार वर्षांपासून पत्नीच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांनी अटक केलीय. संदीप तोमर असं या आरोपीचं नाव असून, तो भारतीय सैन्य दलातील माजी कॅप्टन आहे.
संदीप तोमरच्या अटकेची कारवाई काहीशी नाट्यमयरित्या घडून आलीय. झालं असं की, आरोपी संदीप तोमरने LPG सिलिंडर भरताना पैशांचा व्यवहार करण्यासाठी बँक खातं आणि पॅन कार्ड यांचा उपयोग केला आणि तो पंजाबच्या फाजिल्का पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
फाजिल्काचे एसएसपी गुरमीत सिंग यांनी बीबीसी पंजाबीला ही माहिती दिली.
सैन्य दलात माजी कॅप्टन असलेल्या संदीप तोमरविरोधात पत्नीला मारहाण करणे, हुंड्याची मागणी करणे आणि तिच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आरोप ठेवून आयपीसी कलम 304-ब नुसार 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही तक्रार संदीप तोमरच्या पत्नीच्या वडिलांनी केली होती, अशी माहिती एसएसपी गुरमीत सिंग यांनी दिली.
संदीप तोमरने पत्नी श्वेता सिंगची हत्या केली होती आणि ती आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता, असं गुरमीत सिंग यांनी सांगितलं.
परंतु, संदीप तोमरनेच पत्नीची हत्या केली होती, हे पोलीस तपासात सिद्ध झाले. घटनेच्या दिवशीच त्याला अटक करण्यात आली होती.
पत्नीच्या हत्येप्रकरणी संदीप तोमरने 5 वर्षे तुरुंगवास भोगला होता. मात्र, 2019 मध्ये पंजाब-हरियाणा हायकोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली होती.
2022 मध्ये उच्च न्यायालयाने संदीप तोमरला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. पण त्याने आत्मसमर्पण केले नाही आणि तो तेव्हापासून फरार होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप तोमरचा शोध सातत्याने सुरू होता. अखेर फाजिल्का पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने 28 मार्च रोजी त्याला अटक केली.
संदीप तोमर याला मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय आहे?
संदीप तोमर हा मूळचा उत्तर प्रदेशामधील कानपूरचा रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो पंजाबमधील अबोहर येथे 12 बिहार रेजिमेंटमध्ये कॅप्टन म्हणून तैनात होता. त्याची पत्नीही उत्तर प्रदेश मधीलच होती.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार दोघांचे फेब्रुवारी 2013 मध्ये लग्न झाले होते आणि 8 जुलै 2013 रोजी संदीप तोमरच्या पत्नीचा मृत्यू झाला.
फिर्यादीच्या (संदीप तोमरच्या पत्नीचे वडील) म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच संदीप तोमर आणि त्याच्या कुटुंबाने हुंड्यासाठी मुलीचा छळ सुरू केला होता. मुलीने याबाबत आपल्या आईला सांगितलं होतं.
8 जुलै रोजी त्यांना आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी जावई संदीप तोमरविरोधात एफआयआर दाखल केला.
आरोपीने सुरुवातीला पत्नीने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. परंतु, पोलीस तपासात हा खून असल्याचे सिद्ध झाले, असं एसएसपी गुरमीत सिंग यांनी सांगितलं.
2014 मध्ये स्थानिक न्यायालयाने संदीप तोमरला हत्येप्रकरणी दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
यानंतर त्याला फिरोजपूर तुरुंगात पाठवण्यात आलं आणि लष्करानेही त्याला बडतर्फ केलं.
संदीप तोमरने सुमारे 5 वर्षे तुरुंगात घालवली आणि नंतर त्याने उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला आव्हान दिले. 2019 मध्ये उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
परंतु, 2022 मध्ये उच्च न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
न्यायालयाच्या आदेशानंतरही संदीप तोमरने आत्मसमर्पण केले नाही आणि तो फरार झाला, असं गुरमीत सिंग यांनी सांगितलं.
मृत महिलेच्या वडिलांनी 2024 मध्ये हायकोर्टात धाव घेत संदीप तोमरच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर तपासासाठी फाजिल्काचे एसपी असवंत सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यांच्या एसआयटीची स्थापना करण्यात आली.
यानंतर पोलिसांकडून संदीप तोमरचा सातत्याने शोध सुरू होता.
गुरमीत सिंग यांच्या माहितीनुसार, संदीपला अटक करण्यासाठी एक विशेष सेल तयार करण्यात आला होता. जो त्याच्या हालचालींवर सातत्याने पाळत ठेवून होता.
पोलिसांनी संदीप तोमरचा शोध कसा लावला?
एसएसपी गुरमीत सिंग यांनी सांगितलं की, तुरुंगातून सुटल्यानंतर संदीप तोमरने आपली ओळख बदलली. तो देशातील वेगवेगळ्या ठिकाणी राहून नोकरी करत होता. ज्यावेळी त्याला अटक झाली, त्यावेळी त्याने दुसरं लग्न केल्याचंही आढळून आलं.
या चार वर्षांत त्याने आपला पेहराव (लुक) आणि पत्ता बदलला. पंजाबनंतर तो ओडिशा, बंगळुरू आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन काम करत होता.
"काही दिवसांपूर्वी संदीप तोमरच्या बँक स्टेटमेंटमधून लक्षात आलं की, तो गॅस एजन्सीकडून एलपीजी सिलिंडर भरत होता," असं गुरमीत सिंग यांनी सांगितलं.
"पोलिसांनी गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता त्यांना संदीपचा पत्ता मिळाला. ही माहिती पांढुर्णा पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनी संदीप तोमरला तात्काळ अटक केली."
त्यानंतर फाजिल्का पोलिसांच्या पथकाने संदीप तोमरला ताब्यात घेऊन पंजाबला आणले. स्थानिक न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)