महाकाय देवमासा मेल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? त्याच्या मांस-सांगाड्यावर जगते एक अख्खी जीवसृष्टी

    • Author, कॅथरीन लॅथम
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

अथांग समुद्राच्या तळाशी जेव्हा एखाद्या महाकाय देवमाशाचा मृत्यू होतो, तेव्हा तो तिथल्या हजारो लहान-मोठ्या जलचर प्राण्यांसाठी पोषक तत्वांचा एक 'प्रचंड मोठा साठा' बनतो.

या भव्य अशा मेजवानीवर ताव मारण्यासाठी समुद्राच्या तळाशी राहणारे जीव तिथे गर्दी करतात.

यामध्ये प्रामुख्याने दिसतात ते म्हणजे हाडं फस्त करणारे 'स्नॉट-फ्लॉवर्स' (Snot-flowers) आणि चक्क स्नोबोर्डिंग करणाऱ्या 'स्केल वर्म्स' (Scale worms) सारखे अजब जलचर प्राणी.

एका मेलेल्या देवमाशावर फक्त दोन-चार मासे येत नाहीत, तर तब्बल 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींचे हजारो जीव तिथे येऊन राहू लागतात. जणूकाही वाळवंटात अचानक एखादं आलिशान शहर वसल्यासारखं हे दृश्य असतं.

समुद्रातील प्रचंड मोठे मालवाहू ट्रक्स असावेत, तसंच समुद्रात देवमाशांचं अस्तित्व असतं.

जेव्हा एखादा देवमासा समुद्रात प्रवास करत असतो, तेव्हा त्याच्या निमित्ताने तब्बल 150 टन (3,00,000 पाउंड्स) इतका अन्नाचा साठाच वाहत असतो. या दीडशे टनांमध्ये त्याचं मांस, चरबी आणि त्याच्या हाडांचा समावेश असतो.

एका महासागरातून दुसऱ्या महासागरात आणि समुद्राच्या पृष्ठभागापासून थेट अथांग खोलीपर्यंत त्याचं अफाट शरीर वाहत असतं. त्याचं हे शरीर म्हणजे जणू समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या जीवांसाठी तयार होणारी एक शाही मेजवानीच आहे.

सॅन दिएगो येथील 'स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफी'चे संशोधक ग्रेग राउज यांच्या मते, देवमाशांचा मृत्यू सहसा त्यांच्या विस्तीर्ण स्थलांतर मार्गावर भर समुद्रात होतो.

सुरुवातीला शरीरात तयार होणाऱ्या वायूंमुळे हा मृतदेह एखाद्या फुग्यासारखा फुगतो आणि समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगू लागतो. परंतु, त्यानंतर सुरू होतो या महाकाय जीवाचा समुद्राच्या तळाच्या दिशेने प्रवास.

सूर्याचा प्रकाश पोहोचणाऱ्या वरच्या थरापासून अर्धवट प्रकाश असलेल्या 'ट्वायलाइट झोन' आणि त्यानंतर पूर्णपणे काळोख असलेल्या 'मिडनाईट झोन' मधून हा मृतदेह हळूहळू खाली जातो.

अखेर हा देवमासा समुद्राच्या सर्वात खोल आणि अंधाऱ्या अशा 'अबीस' भागात पोहोचतो. समुद्राचा या भागात सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही.

अशा ठिकाणी देवमाशाचं हे मृत शरीर इतर जीवांना जीवदान देण्यासाठी विसावलं जातं.

मृत्यूनंतरही एक देवमासा समुद्राच्या खोल अंधारात वसलेल्या नव्या जीवसृष्टीला जीवदान देतो आणि अन्नाचे एक प्रचंड मोठे बेट बनतो.

सहसा खोल समुद्रात पोषक तत्वे सेंद्रिय पदार्थांच्या सूक्ष्म कणांच्या स्वरूपात पोहोचतात, ज्याला 'मरीन स्नो' (Marine snow) म्हटले जाते. मात्र, जेव्हा एखादा देवमासा समुद्राच्या तळाशी विसावतो, तेव्हा तो खोल समुद्रात पोहोचलेला सर्वात मोठा सेंद्रिय साठा मानला जातो.

एकाच देवमाशाचे शरीर हे हजारो वर्षांच्या 'मरीन स्नो'च्या बरोबरीचे असू शकते आणि त्यातून मिळणारा हा अफाट खजिना संपूर्ण जीवसृष्टीला कित्येक दशके जगवू शकतो.

निसर्गाची स्वच्छता राखणारे मृतभक्षक जीव

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे खोल समुद्र परिसंस्थिती तज्ज्ञ अ‍ॅड्रियन ग्लोव्हर यांच्या मते, मेलेल्या जीवांवर ताव मारून निसर्गाची स्वच्छता राखणारे जीव म्हणजेच स्कॅवेंजर्स हे देवमाशाजवळ सर्वात आधी पोहचतात.

यामध्ये हॅगफिश आणि स्लीपर शार्क सारख्या पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचा तसेच कोळंबीसारख्या अनेक कवचधारी जीवांचा समावेश असतो.

हे सर्व जीव मिळून देवमाशाचे मांस ओरबाडून खातात आणि अखेर त्याचा सांगाडा उघडा पाडतात. शास्त्रज्ञांच्या मते, हा फिरत्या शिकारी जीवांचा टप्पा चक्क पुढची काही वर्षे सुरू राहू शकतो.

स्वसंरक्षणासाठी या हॅगफिशकडे एक अनोखी युक्ती असते. जेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो, तेव्हा हे मासे आपल्या शरीरातून प्रचंड प्रमाणात चिकट द्रव (Mucous) बाहेर सोडतात.

या चिकट द्रव्यामुळे शिकारी प्राण्याला एकतर तिथून पळ काढावा लागतो किंवा त्याचा गुदमरून मृत्यू होतो.

रॅटटेल मासे (Rattail fish) सुमारे एक मीटरपर्यंत वाढू शकतात आणि समुद्राच्या 4,000 मीटर खोलीपर्यंत त्यांचा वावर असतो. जिथे सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचत नाही अशा अंधारात केवळ सजीव प्राण्यांकडून निर्माण होणारा प्रकाश हाच 'आशेचा किरण' असतो.

या रॅटटेल माशांचे मोठे निळे डोळे अंधारातील तो सूक्ष्म प्रकाशही टिपू शकतात ज्यामुळे शिकार शोधणे त्यांना सोपे जाते.

केवळ नजरच नाही तर त्यांच्या हनुवटीवर असलेल्या 'मिशां'सारख्या अवयवांना चिखलाखाली लपलेल्या लहान खेकड्यांच्या किंवा किड्यांच्या हालचालींची त्वरित जाणीव होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे वासाची तीव्र क्षमता असते ज्याच्या मदतीने ते मैलोनमैल दूर असलेल्या मृत देवमाशाच्या शरीराचा अचूक शोध घेतात.

उघड्या पडलेल्या हाडांवर तुटून पडणारे 'झोम्बी वर्म्स'

जेव्हा मोठे मृतभक्षक प्राणी व्हेलचे मांस खाऊन तृप्त होतात आणि हाडे उघडी पडतात तेव्हा तिथे लहान जीवांची वर्दळ सुरू होते.

ग्रेग रॉस म्हणतात, "या टप्प्यावर 'ओसेडॅक्स' (Osedax) नावाचे 'हाडे खाणारे जंत' मोठ्या संख्येने तिथे येतात."

हे ओसेडॅक्स म्हणजे 'पॉलीकीट वर्म्स' नावाच्या जंतांचाच एक प्रकार आहेत. त्यांना सामान्यतः 'ब्रिस्टल वर्म्स' म्हणून ओळखले जाते. हा खंडित शरीर असलेल्या जंतांचा एक वैविध्यपूर्ण समूह असून ते हजारोंच्या संख्येने व्हेलच्या शरीरावर जमा होतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यातील काही प्रजाती जगात इतर कुठेही सापडत नाहीत. त्या फक्त जिथे व्हेल मासा मरून पडलेला असतो तिथेच आढळतात.

हाडं विरघळवणारे निसर्गाचे चमत्कारिक जीव

समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या अजब जीवांच्या यादीत 'बोन-ईटिंग स्नॉट-फ्लॉवर' (Osedax mucofloris) या जिवाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2005 मध्ये एका मृत देवमाशाच्या सांगाड्यावर या जीवाचा शोध पहिल्यांदा लागला. हे नाव ऐकायला जितकं विचित्र आहे, तितकीच याची काम करण्याची पद्धत अंगावर काटा आणणारी आहे.

संशोधक अ‍ॅड्रियन ग्लोव्हर यांच्या मते, हे किडे देवमाशाच्या टणक हाडांमध्ये चक्क अ‍ॅसिड म्हणजे एक प्रकारचे आम्ल सोडतात. या अ‍ॅसिडमुळे हाडं विरघळतात आणि मग हे किडे त्यातील पोषक तत्वं शोषून घेतात.

ग्लोव्हर पुढे सांगतात की, "हे दृश्य अतिशय अजब असतं. जणू काही हे जीव आपलं संपूर्ण पोटच त्या हाडाच्या आत घुसवतात आणि तिथून थेट अन्न शोषतात.

संशोधक ग्रेग राउज यांच्या मते, हे हाडं खाणारे किडे (Osedax) केवळ हाडं कुरतडत नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने त्या हाडांचे डिकॅल्सिफिकेशन (Decalcify) करतात. म्हणजेच हे किडे हाडांमधील कॅल्शिअम काढून टाकतात आणि त्यातील 'कोलाजन' (Collagen) नावाच्या लवचिक प्रथिनांपर्यंत पोहोचतात.

यामुळे ते हाड अतिशय स्पंजसारखे मऊ होते आणि मग खेकडे आणि इतर जीव ते सहजपणे तोडून खाऊ शकतात.

मृत शरीरातून सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात आणि आसपासच्या समुद्राचा तळ पोषक तत्वांनी समृद्ध करतात. आता हजारो जंत, मोलस्क (मृदुकाय प्राणी) आणि कवचधारी प्राणी उरलेले मांस आणि चरबी खाण्यासाठी आणि समुद्राच्या तळाचा गाळ चाळण्यासाठी तिथे पोहोचतात.

जपानी स्पायडर क्रॅब हा जगातील सर्वात मोठा खेकडा मानला जातो, ज्याचे आयुष्य तब्बल 100 वर्षांपर्यंत असू शकते. या खेकड्याच्या शरीराचा मुख्य भाग जरी 30 सेंटीमीटर म्हणजे 12 इंच रुंद असला तरी त्याचे पाय मात्र सतत वाढत राहतात.

एका नांगीपासून दुसऱ्या नांगीपर्यंत याच्या पायांचा विस्तार 3.8 मीटर पर्यंत असू शकतो. म्हणजेच जवळपास एका लहान कारच्या लांबीएवढा.

ज्यावेळी मृतभक्षक जीव हाडे पचवत असतात त्याच वेळी भक्षकांचा आणखी एक गट मेजवानीत सामील होतो आणि 50 वर्षांपर्यंत त्यावर जगतो. हा 'सल्फोफिलिक' म्हणजेच गंधकप्रिय टप्पा आहे. जीवाणू हाडे कुजवत राहिल्यामुळे हायड्रोजन सल्फाईड वायू बाहेर पडतो. हे वायू 'किमोसिंथेटिक' जीवांद्वारे शोषले जातात.

किमोऑटोट्रॉफ्स हे असे सजीव आहेत जे रासायनिक प्रक्रियेमधून उर्जा निर्माण करू शकतात या प्रक्रियेला 'किमोसिंथेसिस' म्हणतात. याउलट वनस्पतींना उर्जेसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. हे सूक्ष्मजीव अनेकदा इतर प्राण्यांसोबत राहून त्यांना आवश्यक असलेले पोषण पुरवतात.

संशोधक ग्लोव्हर म्हणतात, "या विलक्षण आणि अत्यंत वेगळ्या वातावरणात तग धरून राहण्यासाठी या जीवांनी विकसित केलेली ही अद्भुत क्षमता पाहून आम्ही सतत थक्क होतो."

खोल समुद्रातील फक्त चार विशिष्ट ठिकाणांवरच 'केमोऑटोट्रॉफ्स' म्हणजे रसायनांवर जगणारे जीव आढळतात ज्यामध्ये हायड्रोथर्मल व्हेंट्स, कोल्ड सीप्स, वूड फॉल्स आणि व्हेल फॉल्स (मृत देवमासे) यांचा समावेश होतो. आता तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, हे मृत देवमासे या विशिष्ट प्राण्यांसाठी 'स्टेपिंग स्टोन्स' (प्रवासातील महत्त्वाचे टप्पे) म्हणून काम करतात. यामुळेच या जीवांना समुद्राच्या ओसाड असलेल्या तळावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरणे सोपे जाते.

देवमासा हा आपल्या आयुष्यात महासागरांना सुपीक बनवतो आणि कार्बनला समुद्राच्या अथांग खोलीत वाहून नेतो ज्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी बहरलेली राहते आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

एका मृत देवमाशाचे शरीर समुद्राच्या तळाशी असलेल्या हजारो समुद्री जीवांना अन्न, राहण्यासाठी हक्काचे घर आणि जगातील सर्वात कठीण परिस्थितीतही जगण्याची संधी उपलब्ध करून देते. स्वतःचा अंत करून हा महाकाय जीव एका संपूर्ण नवीन जीवसृष्टीला जन्म देतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)