रिया चक्रवर्तीला वेश्या म्हणणाऱ्या भोजपुरी इंडस्ट्रीत अश्लील आणि थिल्लर गाणी का लोकप्रिय होतात?

  • वाचन वेळ: 10 मिनिटे

बोकारो स्टीलच्या एका कारखान्याच्या गेटवर कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू होतं. तेव्हा तिथं असलेल्या एका मुलीला आपल्या आईच्या शब्दांची आठवण आली. तिनं डोळे बंद केले आणि तीन हजारांहून अधिक लोकांसमोर गाणं गायला सुरू केलं.

तिथं उपस्थित हजारो माणसं ज्या कंपनीत नोकरी करत होते, त्याच कंपनीत या मुलीचे वडील नोकरी करायचे.

भोजपुरी गायिका चंदन तिवारी यांचा हा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता. त्यांनी बिहारच्या बिरहा गाण्यांचे प्रसिद्ध गायक महेंद्र मिश्रा यांचं भोजपुरी गाणं गायलं होतं.

चंदन तिवारी यांनी कायमच त्यांच्या आईला हे गाणं गुणगुणताना पाहिलं होतं. त्या सांगतात, "या गाण्याच्या ओळी अशा आहेत, कष्टकऱ्यांचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत, न्याय होईल."

यावेळी चंदन या फक्त 10 वर्षांच्या होत्या आणि त्या एका कामगाराची मुलगी होत्या. आपल्या मुलीनं इतक्या लोकांसमोर गाणं गाऊ नये, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण चंदन यांची लोकांनी स्तुती केली, तेव्हा मग त्यांनी आपल्या मुलीचं गायन सुरू ठेवायला परवानगी दिली.

चंदन तिवारी आता एक लोकप्रिय भोजपुरी गायिका आहेत. ज्या गेल्या दोन दशकांपासून बिभत्स आणि अश्लील व्हीडिओंसाठी ओळखल्या जाणाऱ्या भोजपुरी संगिताची प्रतिष्ठा परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियावर नुकतेच एक गाणं व्हायरल झालं, ज्यात रिया चक्रवर्तीला वेश्या संबोधण्यात आलं. या गाण्यामुळे पुन्हा एकदा भोजपुरी संगीत आणि सिनेमा उद्योगातील स्त्री-द्वेष आणि सेक्सिझमकडे सगळ्यांचं लक्ष गेलं.

पण चंदन तिवारी यांनी जो विचार केला आहे, तो पूर्णत्वास नेणं इतकं सोपं नाही. कारण आता लोक भोजपुरी संगीताकडे अश्लील म्हणून पाहतात. याला चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेकांनी प्रमोटही केलं आहे. यात डायमंड स्टार उर्फ गुड्डू रंगीलासुद्धा सामील आहे. गुड्डू रंगीलाने दोन हजारांहून अधिक गाणे गायले आहेत. यात महिलांपासून एनआरसी ते कोरोना व्हायरसलादेखील सेक्शुलाईज करण्यात आलं आहे.

'स्वत:हून दिला नकार'

चंदन तिवारी बिभत्स पद्धतीचे गाणे गायला स्वत:हून नकार देत आल्या आहेत. पण तीच गाणी आज भोजपुरी संगीताची ओळख बनली आहेत.

ऑटो-ट्युन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जण असे गाणे रेकॉर्ड करत आहेत. या गाण्यांना यूट्यूब आणि सोशल मीडियावर लोकप्रियता मिळत आहे.

भोजपुरी बोलली जाणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील संगीत क्षेत्राचं लोकतांत्रिकरण करण्याच्या नावाखाली अशापद्धतीची गाणी पसरवली जात आहेत. ही गाणी अश्लिलतेकडे झुकणारी आणि राष्ट्रवादी पद्धतीचे आहेत. यामध्ये महिलांच्या शरीराला एखाद्या वस्तूची उपमा दिली जाते आणि हिंदुत्व विचारधारेची चर्चा करण्यासाठी ही गाणी प्रसारित केली जातात.

2019 मध्ये भोजपुरी गायक वरुण उपाध्याय उर्फ वरुण बहार यांना एका गाण्यासाठी अटक करण्यात आली होती. या गाण्याच्या ओळी होत्या, "जो ना बोले जय श्री राम, उसको भेजो कब्रिस्तान." (जो कुणी जय श्रीराम म्हणणार नाही, त्याला स्मशानात पाठवा)

हे गाणं अल्पसंख्याक समुदायाच्या मॉब लिंचिंगला प्रोत्साहन देतं, अशी या गाण्यावर टीका करण्यात आली होती. बहार आणि त्यांचे निर्माते अशा दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बहार यांनी बजरंग दल आणि हिंदू युवा वाहिनीसारख्या उजव्या विचारसरणीच्या समूहांकडे मदतीची याचना केली होती.

यापद्धतीच्या आक्षेपार्ह गाण्यांसाठी कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाही. द्वेषयुक्त भाषणाला आळा घालण्यासाठी भारतीय दंड सहितेची कलम 153A असतानादेखील गायक धार्मिक हिंसा भडकावणारे गाणे गात आहेत.

भोजपुरी इंडस्ट्रीच्या सल्लू खेसारी-2 ने एक गाणं बनवलं ज्यात त्यांनी काश्मिरी मुलींशी लग्न करणं आणि कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची गोष्ट सांगितली.

इतर भोजपुरी गायकांनीही काश्मिरी मुलींसोबतच्या लग्नाचे आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याप्रकरणी आनंद व्यक्त करणारे गाणे प्रसिद्ध केले.

टीम रंजनचे संस्थापक रंजन सिन्हा सांगतात, "संपूर्ण राज्यात 500हून अधिक रेकॉर्डिंग स्टुडियो आहेत. टीम रंजन एकाहून एक हिट गाणे देणाऱ्या खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांच्यासारख्या कलाकारांचं प्रतिनिधित्व करतात."

या कलाकारांनी गुड्डू रंगीलाप्रमाणेच गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि मग ते सिल्व्हर स्क्रीनकडे वळले होते.

भोजपुरी संगीत क्षेत्राची वार्षिक उलाढाल 500 कोटींहून अधिक आहे, तर भोजपुरी चित्रपटसृष्टीची वार्षिक उलाढाल 2000 कोटी रुपये आहे.

दरवर्षी इथं 300 ते 400 चित्रपट बनतात. रंजन सिन्हा सांगतात, "आमच्याकडे खूप प्रेक्षक आहेत. पण, आमचे ग्राहक रिक्षाचालक आणि स्थलांतरित मजूर आहेत. जे पूर्वी बी-ग्रेड हिंदी चित्रपट पाहायचे. आमच्या लोकांना त्यांची (हिंदी) भाषा आवडत नाही."

रंजन यांच्या मते, "भोजपुरी चित्रपट आणि संगीत क्षेत्राचे जवळपास 26 कोटी प्रेक्षक आहेत आणि नेपाळ, पंजाब, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांचे अल्बम प्रसिद्ध होतात."

यांचे प्रेक्षक बहुतेक करून स्थलांतरित मजूर असतात ज्यांना नेहमीच घराची आठवण येत असते आणि या चित्रपटांत असा एक हिरो असतो जो समाजातल्या तळागाळातून येतो. त्यामुळे मग हे चित्रपट त्यांना आवडतात.

जेव्हा मनोज तिवारी यांचा 'ससुरा बडा पैसेवाला' चित्रपट रिलीज झाला, तेव्हा त्यानं सगळेच रेकॉर्ड तोडले. त्यानंतर अशापद्धतीच्या चित्रपटांची रांगच लागली. ज्या लोकांना खूप पैसा कमवायचा होता, त्यांनr या चित्रपटांत पैसे गुंतवायला सुरुवात केली.

असं असलं तरी 2012 नंतर काही गोष्टी हळूहळू बदलत आहेत.

काय बदल होत आहेत?

यशी फिल्म्स प्रायव्हेड लिमिटेडचे कंटेंट हेड कुमार सौरभ सिन्हा सांगतात, "आमची कंपनी भोजपुरी चित्रपटांच्या दुनियेत यशराज फिल्म्ससारखी आहे आणि आता आम्ही 'चांगला कंटेट' निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. असा कंटेंट जो कुटुंबासोबत बसून बघता येईल."

उदाहरणार्थ 2015 नंतर खेसारी लाल यादव यांचे चित्रपट कमी अश्लील दिसून आले. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यांतील बहुतेक चित्रपट मुंबईतील स्टुडियोमध्ये शूट केले जातात आणि बिहारमध्ये कोणताही स्टुडियो नाही.

अश्लील गाण्यांविषयी रंजन सांगतात, "इंटरनेट, स्मार्टफोन आणि यूट्यूब आल्यानंतर आता कुणीही गाणे अपलोड करू शकतं आणि यावर सेन्सॉरशिपही नाहीये. हे गाणे म्हणजे संपूर्ण भोजपुरी चित्रपट सृष्टीचं चित्रं आहे आणि आता इतर दर्शकही आमच्याकडे वळत आहेत."

सौरभ सांगतात, "नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॉटफॉर्म भोजपुरी कंटेंट घेण्यासाठी जास्त इच्छुक दिसत नाही. त्यामुळे यावर्षीच्या शेवटापर्यंत आम्ही स्वत:चा ओटीटी प्लॉटफॉर्म लाँच करणार आहोत."

सौरभ पुढे सांगतात, "भोजपुरी चित्रपटसृष्टीत खूप फायदा आहे. पंजाबनंतर दुसऱ्या क्रमांकावर या सृष्टीचा क्रमांक लागतो. भोजपुरी चित्रपटसृष्टी सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतातील चित्रपटांच्या पावलावर चालली आणि रजनीकांतच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेतली. यात त्यांनी सामान्य माणसाची भूमिका निभावली होती."

ते सांगतात, "आता आम्ही बॉलीवूडप्रमाणे शहरकेंद्रित चित्रपट बनवत आहोत. 'निरहुआ रिक्षावाला' चित्रपट 10 वर्षांपूर्वी बनला होते. इतकंच काय तर तेलुगू आणि अन्य क्षेत्रीय इंडस्ट्रीतही अश्लीलता होती. कालांतरानं चांगला कंटेट यायला लागला."

असं असलं तरी अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. लोक एकदम टीका करतात. ते स्वीकार करू इच्छित नाही. गाणे आणि व्हीडिओ अश्लील का झालेत, हे त्यांना समजून घ्यायचं नसतं, असंही ते सांगतात.

रियावरील आक्षेपार्ह गाणे

11 ऑगस्टला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी विकास गोर उर्फ यादव जी यांच्या अटकेची मागणी करणारं ट्वीट केलं. कारण, या भोजपुरी गायकानं आपल्या गाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात शिव्यांचा वापर केला होता.

रिया सध्या मूळचा बिहारचा असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मीडिया ट्रायलचा सामना करत आहे.

2 मिनिट 36 सेकंदांच्या या व्हीडिओत 'रिया तो ****है' (रिया वेश्या आहे) असं म्हटलं आहे. 9 ऑगस्टला बनडमरू नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर लगेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाण्यांपैकी हा एक व्हीडिओ होता. या चॅनेलचे 6.68 हजार सबस्क्रायबर आहेत.

याच दिवशी अपलोड करण्यात आलेल्या एका गाण्यात रियाला तिच्या आईवरुन शिवी देण्यात आली आहे. हे गाणं गायक राम जनम यादवने अपलोड केलं होतं आणि तीन लाख जणांनी ते पाहिलं आहे.

अजून एक गाणं एस म्यूझिक-2 चॅनेलवर अपलोड करण्यात आलं होतं. प्रमोद एलआयसीनं गायलेल्या या गाण्यात रियाला 'वेश्या तुम क्या भागोगी' असं संबोधण्यात आलं होतं.

राष्ट्रवाद आणि स्त्री-द्वेष

पण, भोजपुरी चित्रपटसृष्टीचा राष्ट्रवाद आणि चित्रपटसृष्टीशी संबंध यात नवीन काही आहे असं नाही.

गुड्डू रंगीला जे स्वत:ला डायमंड स्टार म्हणतात, त्यांनी एका गाण्यात एका महिलेच्या साडीत कोरोना व्हायरस घुसल्याचा उल्लेख केला.

डबल मीनिंग गोष्टी, सेक्सिझम आणि हायपर सेक्शुअलिटीचा खूप दिवसांपासून वापर केला जात आहे. पण, 1990ला रंगीला यांच्यानंतर अनेक गायक आले ज्यांनी रंगीला यांच्याप्रमाणे शिव्यांचा वापर केला आणि बीभत्सपणा निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग बनला.

रंगीला स्पष्टपणे बीभत्सपणाचं संरक्षण करतात. त्यांच्या आधी आणि नंतरच्या गायकांनीही ते अवलंबवलं. त्यांच्या नंतरचे गायक ज्यात खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांचा समावेश होतो, त्यांनी रंगीला यांच्या अश्लील शब्दांना आणि व्हिज्यूअल्सला जणू वारसा हक्कानं पुढे नेलं.

रंगीला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांना होळी सम्राट म्हटलं जातं. त्यांच्या गाण्यात बहुतेकदा लहंगा (साडी) आणि भौजी (वहिनी) असे शब्द ऐकू येतात.

त्यांच्या काही गाण्यांचे शब्द असे आहेत, "अपना लहंगा में एनआरसी लागू होखे ना देम" आणि "हमारा लहंगा में कोरोना वायरस घुसल बा."

रंगीला यांच्यापूर्वी गायक बालेश्वर यादव होते, ते खूप लोकप्रिय होते. ते त्यांच्या संगीत कार्यक्रमात मंचावर मुलींना नाचायला लावत.

बिहारमधील चित्रपट दिग्दर्शक नितीन नीरी चंद्रा सांगतात, "सुरुवातीला त्यांच्यावर या कारणामुळे टीका झाली, पण नंतर उच्च वर्गातील लोक भोजपुरी भाषेपासून दूर गेले आणि त्यामुळे भाषेची स्थिती बिघडत गेली. आता तर या भाषेसोबत बीभत्सपणा आणि अश्लीलतेचे टॅग जोडले गेलेत."

मिथिला मखानसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे चंद्रा हिंदी भाषेच्या अधिपत्याला भोजपुरी संगीत आणि चित्रपटाच्या स्थितीसाठी जबाबदार मानतात.

सुरुवातीच्या काळात गाणे कसे होते?

1970च्या दशकात बालेश्वर यादव यंत्रणा आणि सरकारच्या अपयशावर बोट ठेवणारे गाणे बनवत असत.

1970 आणि 1980च्या दशकात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि बेरोजगारी वाढली तेव्हा त्यांनी एक गाणं लिहिलं, 'बिकाई ए बाबू बीए पास घोड़ा'. या गाण्यात तत्कालीन युवकांचं दु:ख होतं.

त्यांनी सुशिक्षत तरुणाला घोड्याची उपमा दिली होती. असा घोडा ज्याच्या हातात डिग्री आहे, पण नोकरी नाही.

बालेश्वर यांनी प्रेमासंबंधित गाणेही लिहिले. पण, यात प्रेमींची उदासीनता आणि त्यातून मिळणारं दु:ख सांगितलं नव्हतं. उलट या गाण्यात प्रेमी एकमेकांना चिडवत असत. याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्पर्श असायचा. उदाहरणार्थ एका गाण्यात एक पुरुष आपल्या पत्नीला म्हणत आहे, तो कोळश्याच्या खाणीत काम करायला निघून जात आहे.

या गाण्यातून दिसून येतं की, त्याकाळात अनेकांजवळ फक्त कोळश्याची खाण होती.

बालेश्वर यांच्या गाण्यात महिलांच्या स्वातंत्र्याविषयी सांगितलेलं असायचं. आजकालच्या अश्लील गाण्यांत याविषयी कमी बोललं जातं.

आजच्या गाण्यांत महिलांना एक वस्तू म्हणून दाखवलं जातं. एका लोकप्रिय हिरोच्या गाण्यात त्याच्या स्वाक्षरीची स्टाईल तो महिलेच्या कंठावर च्याबी लावत असल्याची आहे. दुसरीकडे अश्लीलता आवडणाऱ्या प्रेक्षकांसमोर महिला स्वत:हून एका वस्तूच्या स्वरुपात येत आहेत.

या गाण्यांची आक्रमक कामवासना भोजपुरी संगीताची ओळख बनली आहे. बालेश्वर आपल्या मार्केटला ओळखत होते. स्टेज शोमध्ये प्रेक्षकांसमोर नाचणाऱ्या मुली आणि नंतर माहितीचा काळ, इंटरनेटचा जमाना आला, जो आजतागायत सुरू आहे.

पत्रकार निराला बिदेसिया आखर नावाच्या भोजपुरी प्रचार आणि साहित्यिक विकासाच्या संकल्पनेसोबत जोडले गेले आहेत.

ते सांगतात, "याला विरोध होत नव्हता कारण महिलांना गाण्याची आणि अभिनय करण्याची परवानगी नव्हती. ज्या महिला डान्स करायच्या अथवा या व्हीडिओचा भाग असायच्या त्यातील बहुतेक महिला बिहारच्या भोजपुरी क्षेत्राबाहेरील होत्या."

चंदन तिवारींना आजही तो काळ आठवतो, जेव्हा त्यांचे वडील संगीताच्या विरोधात होते.

त्या लहानपणी आजीसोबत राहायच्या. त्यांची आजी मंदिरात भोजपुरी भजन आणि लग्न समारंभात लोकगीत गायच्या. चंदन यांनी त्यांच्याकडून गाणं शिकलं. नंतर त्यांचं कुटुंब बोकारो स्टील सिटीला आलं तेव्हा त्या त्यांच्या आईसोबत स्थानिक जागरण गोंधळांच्या कार्यक्रमात जायच्या. तिथं गाणं गायन करायच्या.

तिथंच त्यांना त्यांचे शिक्षक भेटले ज्यांनी त्यांना मोफत शिकवण्याची संधी दिली.

माझ्यासाठी अशा क्षेत्राचा भाग होणं सोपं नव्हतं, जे क्षेत्र कामवासना आणि अश्लीलतेच्या सामुग्रीने भरलेलं होतं.

नुकतंच त्यांनी कलाकार मियां रसूल यांचं 'राम के सेहरा' हे गाणं गायल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. पण, त्यांना या गोष्टीची चिंता नाही.

बिदेसिया सांगतात, भोजपुरीनं फक्त हिरो आणि पुरुष गायक दिले आहेत. त्यामुळेच आम्ही इथं आहोत.

गुड्डू रंगीला यांचे मॅनेजर फोनवर कारणं सांगत राहिले आणि म्हणाले की, फोन रंगीला यांच्याजवळ नव्हता. तसंच ते बाहेर गेले आहेत आणि थोड्यावेळानं येणार आहेत. नंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की ते बाहेर गेले आहेत. कदाचित स्टार असेच असतात आणि गुड्डू रंगीला एक स्टारच आहे. डायमंड स्टार.

250 हून अधिक अल्बम रेकॉर्ड करणारे आणि 200 हून अधिक गाणे गाणारे गुड्डू रंगीला 1999मध्ये वयाच्या 33व्या वर्षी तेव्हा लोकप्रिय झाले होते, जेव्हा त्यांचा पाचला अल्बम 'जा झार के' प्रसिद्ध झाला होता.

त्यानंतर एकानंतर एक प्रसिद्ध अल्बम येत गेले. यात हमरा हउ चाही (मला ते पाहिजे), जीन्स ढीला कर, हम लेम (मी घेईल) आणि रसदार होली, यांचा समावेश होते. हे गाणे बीभत्स आणि अश्लीलतेने परिपूर्ण होते.

2004मध्ये मोठी भारतीय म्यूझिक कंपनी टी-सीरिजनं त्यांना 'डायमंड स्टार' असं नाव दिलं. 2006मध्ये गायनाबरोबरच त्यांनी भोजपुरी चित्रपटांत अभिनय सुरू केला. त्यांची कंपनी संजीवनी एंटरटेनमेंट ऑनलाईन आणि ऑफलाईन अल्बमची विक्री आणि यूट्यूब गाण्यांच्या माध्यमातून पैसे कमावते.

रंगीला यांचा जन्म बिहारच्या सिवान जिल्ह्यातल्या चैनपूरमध्ये झाला होता आणि त्यांना सिद्धेश्वर नंदगिरी म्हटलं जात होतं. कधीकाळी कुमार सानूप्रमाणे पार्श्वगायक बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं.

वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अष्टजाम गीतं गायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर रामलीला आणि शिवलीला गायली. 1993ला वयाच्या 17व्या वर्षी ते दिल्लीला आले आणि किर्तन गायला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी गंगा म्यूझिक नावाच्या कंपनीसोबत एक करार केला आणि आपला पहिला अल्बम 'जवानी का तूफान' रीलिज केला. 1998मध्ये टी-सीरिजनं त्यांना आपल्यासोबत जोडलं आणि त्यांच्यासोबत 'जा झार के' अल्बम रीलिज केला.

याप्रकारे गुड्डू रंगीला भोजपुरी चित्रपटसृष्टीचे पोश्टर चाईल्ड बनले आणि बीभत्स आणि अश्लीलता सुपरहिट अल्बमचसाठीचे घटक ठरले.

2003मध्ये मनोज तिवारी यांच्या 'ससुरा बडा पैसेवाला' या चित्रपटानं सगळ्यांचं लक्ष भोजपुरी सिनेमाकडे ओढलं गेलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 4.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

पुनर्जीवनाची गोष्ट

बॉलीवूडचे चित्रपट खूप जास्त शहरकेंद्रित होते आणि स्थानिक प्रेक्षक स्वत:च्या क्षेत्राशी संबंधित चित्रपट पाहू इच्छित होते. इथूनच मग भोजपुरी चित्रपटाच्या पुवर्जीवनाची कथा सुरू झाली.

बिहारमधील स्थलांतरित मजूरांमुळे याप्रकारचे चित्रपट आणि संगीत देशभरात पोहोचले. यूट्यूब आणि स्वस्त इंटरनेटमुळे भोजपुरी गाणे लोकप्रिय होत गेले. यामुळे मग असे गाणे मोठ्याप्रमाणावर बनायला लागले. खरं तर या गाण्यांचा स्वत:चा असा एक संदर्भ असतो, ज्याला बहुतेकदा दुर्लक्षिलं जात.

उदाहरणार्थ लोकगीतांमध्ये काही ठिकाणी अश्लीलता असते आणि बिहारी लग्नांच्या गाण्यांत शिव्यांचा समावेश असतो.

1990च्या दशकात भोजपूर जिल्ह्यातील सहारमध्ये एका सरकारी शाळेतील महिला मुख्याध्यापक आराहून सहारला जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास तयार नव्हत्या. कारण त्यांना जवळपास 2 तास अश्लील गाणे ऐकावे लागले होते, असं शांति सिन्हा सांगतात.

त्या काळी बस आणि ऑटोमध्ये मोठ्या आवाजात अश्लील भोजपुरी गाणे वाजत असत.

रिना सिन्हा सांगतात, यामुळे मी अनेकदा ड्रायव्हरसोबत भांडायचे आणि त्याला गाणे बंद करायला सांगायचे. हे गाणे साली (बायकोची बहीण) आणि सेक्शुअलिटीसंबंधित होते.

असं असलं तरी उच्च जातीतल्या श्रीमंत बिहारी माणसांप्रमाणे त्यासुद्धा हिंदीत बोलतात. त्या म्हणतात माझी आई 'मगही' बोलायच्या आणि मी 'हिंदी'.

आमच्यासारखे असे अनेक लोक आहेत, ज्यांनी भोजपुरीला स्वीकारण्यास नकार दिला आहे.

बराच काळ असे गाणे बाजारात राहिले. बिहारमधील शिक्षित आणि संपन्न माणसं आणि गरीब माणसं यांच्यातील दरी दाखवण्याचं काम हे गाणे करत आले आहेत.

संपन्न बिहारी लोकांनी भोजपुरीला सोडल्यामुळेच भोजपुरी भाषेची अशी स्थिती झाली. यामुळे लोकगीतांमधील वेगळेपणे अश्लीलता आणि कामवासनेमुळे मागे पडत गेलं.

दिनेश लाल यादव निरहुआ, पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यानंतर संपूर्ण चित्रं पालटलं.

2003मध्ये मनोज तिवारींचा चित्रपट यशस्वी झाला आणि मग अनेक निर्मात्यांनी चित्रपटसृष्टीत गुंतवणूक केली. जिथं महिलांना फक्त सेक्सचं प्रतीक म्हणून वापरण्यात आलं. प्रायव्हेट अल्बम या प्रकारात तर भोजपुरीला अधिक अश्लील बनवण्यात आलं,

1990च्या दशकात नीलम कॅसेट आणि चंदा कॅसेट यायला सुरुवात झाली. ते सुरुवातीला 'शिव विवाहा'वर अल्बम बनवत असत.

त्यावेळी एकट्या पटना शहरात 100हून अधिक रेकॉर्डिंग स्टुडिओ होते. त्यानंतर वेव्ह आणि मग टी-सीरिज या कंपन्या आल्या. गुड्डूनं महिलांवर गाणे बनवले तेव्हा लोकांनी त्यांना पसंत केलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीला सेक्शुअलाईज केलं.

पण, गुड्डू रंगीला यांना सहन का करण्यात आलं, आपला बुद्धिजीवी आणि मध्यम वर्ग गप का राहिला?

बिहारचे मुन्ना पांडे दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, ते सांगतात, "विनय बिहारी त्याकाळी बिहारचे सांस्कृतिक मंत्री होते आणि ते याप्रकारचे गाणे लिहायचे. त्यामुळे काहीही विरोध झाला नाही."

नितीन चंद्रा सांगतात, "शिक्षा, व्यापार आणि प्रशासकीय कामकाजात भाषा थोपल्यामुळे भोजपुरीचा विध्वंस सुरू झाला."

चंद्रा सांगतात, "हिंदीमुळे भोजपुरी विस्थापित झाली. मैथिलीचे हाल भोजपुरीसारखे झाले नाही, कारण मैथिली ब्राह्मण आपल्या संस्कृतीप्रती सजग होते."

या गोंगाटात चंदन तिवारींचं संशोधन सुरू आहे. त्या अशा गाण्यांचा संग्रह करत आहे, जे गाणे त्यांना गायची इच्छा आहे.

सध्या त्या नातेवाईकांसोबत बोकारोला राहतात. फोनवर त्या सांगतात, "आता गोष्टी बदलत आहे. आमचे लोकगीत महिला गात आहेत. मला महिलाविरोधी गाणे गायचे नाहीत आणि जेव्हा लोक भोजपुरीविषयी चुकीचं बोलतात, तेव्हा मला भोजपुरीला चांगल्याप्रकारे सादर करावं लागणार आहे."

आमची संस्कृती सुंदर आहे आणि अश्लील गाण्यांना भोजपुरीशी जोडलं जातं तेव्हा वाईट वाटतं, असं त्या म्हणतात.

"मला असे अनेक गाणे सापडले आहेत, जे महिलांनी चंपारण सत्याग्रहाच्या वेळेस गायले आहेत. आम्हाला आमची लोकगीतं गाण्यासाठी इथं राहायला हवं. शारदा सिन्हा बिहारमध्ये राहतात. मी पण इथंच आहे."

कदाचित 'लहंगा' आणि 'भौजी'वाले गाणे आणि ऑटोट्यूनचं तंत्रज्ञान या आवाजाला दाबू शकणार नाही. त्यांनी आपल्या भाषेला वाचवण्यासाठी नवीन इनिंग सुरू केली आहे.

त्यांनी स्वत : नितीन नीरा चंद्रा यांच्यासारखी भाषा शिकली आहे.

एक आंदोलन सुरू झालं आहे आणि तिवारी सांगतात की, "त्या संगीताला स्वच्छ करतील. तसंच अश्लीलतेचा टॅग हटवतील आणि त्याला त्याची मूळ प्रतिष्ठा मिळवून देतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)