You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिला थांबा चंद्र, दुसरा थांबा मंगळ? 'नासा'चं हे मिशन किती महत्त्वाचं?
- Author, रेबेका मोरेल
- Role, विज्ञान संपादक
- Author, ॲलिसन फ्रान्सिस
- Role, ज्येष्ठ विज्ञान पत्रकार
- वाचन वेळ: 6 मिनिटे
नासाच्या आर्टेमिस II या मोहिमेला सुरूवात झाली आहे. चार अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या या रॉकेटने अखेर चंद्राच्या दिशेने उड्डाण केलं आहे. ही ऐतिहासिक मोहीम 10 दिवसांची असेल.
चंद्राभोवतीचा त्यांचा हा प्रवास भविष्यात चंद्रावर लँडिंग म्हणजेच उतरण्यासाठी मदत करेल आणि पुढे तिथे कायमस्वरूपी बेस (तळ) तयार करण्याचा मार्ग मोकळा करेल.
आर्टेमिस प्रोगाम तयार करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागली आहे. हजारो लोकांनी त्यात काम केलं आहे. आतापर्यंत त्यावर सुमारे 93 अब्ज डॉलर खर्च (सुमारे 87 खर्व 4 अब्ज, 62 कोटी रुपये) झाला आहे.
पण काही लोकांना असं वाटतं की, "हे सर्व आधीच झालं आहे, यात नवीन काहीच नाही."
50 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमेमुळे इतिहास घडला, तेव्हा पहिल्यांदा माणसं चंद्रावर उतरली. एकूण सहा वेळा चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर असं वाटलं की, अंतराळातील 'करायच्या गोष्टींच्या' (स्पेस टू-डू लिस्ट) यादीतील चंद्राचा टप्पा पूर्ण झाला आहे.
मग पुन्हा चंद्रावर जाण्यासाठी अमेरिका इतका वेळ, मेहनत आणि पैसा का खर्च करत आहे?
मौल्यवान संसाधने
तिथली जमीन कोरडी, धूळयुक्त आणि ओसाड दिसत असली तरी प्रत्यक्षात तसं नाही.
नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील ग्रह शास्त्रज्ञ प्रा. सारा रसेल म्हणतात, "चंद्रावरही तेच घटक आढळतात जे पृथ्वीवर आहेत."
"उदाहरणार्थ, 'रेअर अर्थ' घटक पृथ्वीवर खूप कमी प्रमाणात सापडतात, पण चंद्रावर काही ठिकाणी ते इतके जास्त असू शकतात की तिथून त्यांचं खाणकाम (मायनिंग) करता येऊ शकतं."
चंद्रावर लोखंड (लोह) आणि टायटॅनियमसारखे धातूही आहेत, तसेच हेलियमसारखा वायूही आहे, जो सुपरकंडक्टरपासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये वापरला जातो.
पण सर्वात जास्त महत्त्वाचं आणि थोडं आश्चर्यकारक असं संसाधन किंवा स्रोत म्हणजे पाणी आहे.
त्या म्हणतात, "चंद्रावरील काही खनिजांमध्ये पाणी अडकलेलं आहे, आणि ध्रुवांवर काही भागातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे."
चंद्रावर काही खड्डे (क्रेटर्स) असे आहेत जे कायम सावलीत असतात, त्यामुळे तिथे बर्फ तयार होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.
चंद्रावर राहायचं असेल तर पाणी खूप महत्त्वाचं आहे. ते पिण्यासाठी तर उपयोगी पडतंच, पण त्याचं विभाजन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार करता येतो. ज्यामुळे अंतराळवीरांना श्वास घेण्यासाठी हवा मिळते आणि अंतराळयानासाठी इंधनही तयार करता येऊ शकतं.
अंतराळातील वर्चस्वासाठी शर्यत
1960-70 च्या दशकात अमेरिकेच्या अपोलो मोहिमा या सोव्हिएत युनियनशी अंतराळात वर्चस्व मिळवण्याच्या शर्यतीमुळे झाल्या. यावेळी मात्र चीन हा मुख्य स्पर्धक आहे.
चीन आपल्या अंतराळ कार्यक्रमात वेगाने प्रगती करत आहे. त्यांनी चंद्रावर रोबोट आणि रोव्हर यशस्वीरित्या उतरवले आहेत, आणि 2030 पर्यंत मानवाला तिथे पाठवण्याचं लक्ष्यही त्यांनी ठेवलं आहे.
चंद्रावर सर्वात आधी आपला ध्वज लावणं ही अजूनही मोठी आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे. पण आता तो ध्वज नेमका कुठे लावतो, हे जास्त महत्त्वाचं झालं आहे.
अमेरिका आणि चीन दोघांनाही जिथे मुबलक संसाधनं आहेत अशा भागांवर हक्क हवा आहे, म्हणजेच चंद्रावरील सर्वोत्तम जागा (रिअल इस्टेट) मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे.
युनायटेड नेशन्सच्या 1967 च्या बाह्य अवकाश करारानुसार (आऊटर स्पेस ट्रिटी) कोणताही देश चंद्राचा मालक होऊ शकत नाही. पण चंद्रावर आढळून येणाऱ्या गोष्टींबाबत नियम इतके सरळ नाहीत.
पहिल्या ब्रिट्रिश अंतराळवीर डॉ. हेलन शर्मन म्हणतात, "यूएनच्या करारामुळे तुम्ही चंद्रावरील जमिनीची मालकी घेऊ शकत नाही. पण त्या जागेवर कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय काम करू शकता."
"सध्या मोठी गोष्ट म्हणजे शक्य तितकी जागा मिळवण्याची स्पर्धा आहे. ती तुमची मालकीची नसली तरी तुम्ही ती वापरू शकता. आणि एकदा तुम्ही तिथे गेलात की, हव्या तितका वेळ ती जागा वापरू शकता."
मंगळावर जाण्यासाठी मार्ग मोकळा
नासाची नजर आता मंगळावर आहे, आणि 2030 च्या दशकात तिथे माणसं पाठवण्याची त्यांची योजना आहे.
हे सर्व करताना अनेक तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे हा काळ थोडा अवघड आणि महत्त्वाकांक्षी वाटतो.
पण कुठेतरी सुरुवात करावीच लागेल, आणि अमेरिकेने त्यासाठी चंद्राची निवड केली आहे.
सायन्स म्युझियम स्पेसच्या प्रमुख लिबी जॅक्सन सांगतात, "चंद्रावर जाऊन काही काळ तिथे राहणं हे जास्त सुरक्षित, स्वस्त आणि सोपं आहे. त्यामुळे दुसऱ्या ग्रहावर कसं राहायचं आणि काम करायचं, हे शिकण्यासाठी चंद्र हे चांगलं सरावासाठीचं ठिकाण आहे."
चंद्रावर बेस (तळ) तयार करून नासा अंतराळवीरांसाठी लागणारी हवा आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, हे नीट शिकू शकते.
तसेच वीज कशी तयार करायची, राहण्यासाठी सुरक्षित घरे कशी बांधायची, आणि ती घरं तीव्र तापमान व धोकादायक किरणांपासून (रेडिएशन) लोकांचं संरक्षण कसं करतील, हेही शोधावं लागणार आहे.
"ही सगळी तंत्रज्ञानं जर तुम्ही पहिल्यांदाच मंगळावर वापरून पाहिली आणि त्यात काही चूक झाली, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ती आधी चंद्रावरच तपासून पाहणं जास्त सुरक्षित आणि सोपं आहे," असं लिबी जॅक्सन म्हणतात.
आणखी बरीच रहस्ये न उलगडलेलीच
शास्त्रज्ञ चंद्रावरून आलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
अपोलो मोहिमेमधून अंतराळवीरांनी आणलेल्या खडक किंवा दगडांमुळे चंद्राबद्दलच्या खूप नवीन गोष्टी आपल्याला समजल्या.
प्रा. सारा रसेल सांगतात की, "या दगडांमुळे आपल्याला कळलं की, चंद्राची निर्मिती एका मोठ्या धडकेतून झाली आहे. मंगळाएवढ्या आकाराचा एक भाग पृथ्वीवर आदळला, आणि त्यातून निघालेल्या तुकड्यांपासून चंद्र तयार झाला. हे आपल्याला अपोलो मोहिमेतून आणलेल्या दगडांमुळेच माहीत झालं."
पण आणखी खूप काही शोधायचं बाकी आहे, असंही त्या सांगतात.
चंद्र कधी काळी पृथ्वीचा भाग होता, त्यामुळे त्यात आपल्या पृथ्वीच्या 4.5 अब्ज वर्षांच्या इतिहासाची नोंद आहे. तसेच, चंद्रावर भूकंप (प्लेट टेक्टोनिक्स), वारा किंवा पाऊस नसल्यामुळे ही नोंद नष्ट होत नाही, म्हणून चंद्र हे एक उत्तम 'टाइम कॅप्सूल' (भविष्यासाठी जतन केलेलं वर्तमान) आहे.
"चंद्र म्हणजे पृथ्वीचा अद्भुत इतिहास जपणारी जागा आहे. चंद्राच्या दुसऱ्या भागातून आणलेले नवीन खडक खूप रोचक ठरतील," असं सारा रसेल म्हणतात.
नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी
अपोलो मोहिमेतून पाठवलेले ब्लॅक अँड व्हाइट धुसर व्हीडिओ फुटेज अंतराळाविषयीचं स्वप्न वास्तवात आणल्यासारखे झाले.
केवळ काही लोकच अंतराळवीर झाले असले, तरी अनेक लोकांनी नंतर विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर केलं.
आर्टेमिस मोहिमा थेट आणि 4K मध्ये पाहायला मिळाल्यामुळे, नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.
लिबी जॅक्सन म्हणतात, "आपण तंत्रज्ञानाच्या जगात राहतो. आपल्याला शास्त्रज्ञ, अभियंते आणि गणितज्ज्ञांची गरज आहे, आणि त्या विषयांबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याची क्षमता अंतराळात आहे."
आर्टेमिसवर खर्च केलेल्या अब्जावधी डॉलरमधून अमेरिकेला नवीन नोकऱ्या आणि वाढणाऱ्या अंतराळ अर्थव्यवस्थेमुळे फायदा होईल. तसंच, या मोहिमेसाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा पृथ्वीवरही उपयोग झाला, तर त्यातूनही फायदा होऊ शकतो.
हेलन शर्मन म्हणतात की, चंद्रावर पुन्हा गेल्यामुळे जगाला एक नवीन उत्साह आणि चालना मिळेल.
"आपण सर्वांनी एकत्र येऊ काम केलं, तर मानवजातीसाठी खूप चांगल्या गोष्टी करू शकतो," असं हेलेन शर्मन सांगतात.
"माणूस किती मोठ्या गोष्टी करू शकतो, हे यातून दिसून येतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)