You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो वर्षं जुन्या प्रागैतिहासिक स्थळांचं अस्तित्व धोक्यात; खाण आणि विकासकामांचा कसा बसतोय फटका?
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 8 मिनिटे
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरानजीक असलेलं पुरातन भटाळा मंदिर परिसर आणि चंद्रपूर शहरातील प्रागैतिहासिक पापामिया टेकडी या दोन महत्त्वाच्या स्थळांची दुर्दशा झाल्याची खंत इतिहासप्रेमी आणि संबंधित भागातील नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर याची दखल माननीय उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.
मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या खुणा असलेलं भटाळा परिसर अवैध दगडी खनन तर चंद्रपूर शहरातील पापामिया टेकडी परिसर विकासकामांच्या कचाट्यात सापडला असून त्याचा ऱ्हास होताना दिसत आहे.
याचं कारण ठरतेय परिसराच्या अगदी जवळ पोहोचलेल्या दगडखाणी. या खाणींचा विस्तार आणि स्फोटांमुळे मंदिरासह हा पुरातत्त्वीय परिसर नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं इतिहासप्रेमींचं म्हणणं आहे.
भटाळा मंदिर परिसराची अवस्था आणि दुर्दशा पाहता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने या संदर्भात स्वत:च जनहित याचिका (सुओ मोटो) दाखल करून घेतली.
तर, चंद्रपूर शहरातील तब्बल दीड ते 2 लाख वर्ष जुन्या आणि महाराष्ट्रातील सर्वात जुन्या अश्मयुगीन प्रागैतिहासिक स्थळापैकी एक असलेल्या 'पापामिया टेकडी' टेकडीची स्थितीही दयनीय आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील या स्थळांचं ऐतिहासिक महत्त्व काय? इतका समृद्ध वारसा लाभला असतानाही या स्थळाची अशी दयनीय अवस्था का होत असावी? प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाचं म्हणणं काय, जाणून घेऊया.
विदर्भातील प्रसिद्ध भटाळा येथील प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळ
वरोरा तालुक्यात असलेलं भटाळा गाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व सांस्कृतिक वारशाचे समृद्ध केंद्र आहे.
या पुरातत्त्वीय स्थळाला सुमारे दीड ते 2 लाख वर्षांचा समृद्ध प्रागैतिहासिक वारसा लाभला असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या ठिकाणी आद्य पाषाणयुगीन हत्यारं, वाकाटक-कालीन गुहा शिल्प, तसेच मध्ययुगीन सुबक कोरीव शिल्पांचा अद्भुत संगम आढळतो.
ऐतिहासिक स्थळांच्या सुरक्षेसाठी 'प्राचीन वास्तू आणि पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष, 1958' हा कायदा अस्तित्वात आहे. त्यात ऐतिहासिक वारसा स्थळांच्या परिसरात उत्खननाविषयी नियम दिले आहेत. पण तरी देखील उत्खनन सुरू असल्यामुळे, ब्लास्टिंगमुळे वाकाटक लेणी धोक्यात सापडल्याचे तज्ज्ञ आणि इतिहास प्रेमींचे म्हणणे आहे.
दरम्यान, ऐतिहासिक स्थळाच्या हानी झालेली नाही तर खनन सुरू असलेल्या भागात अश्मयुगीन हत्यारे सापडली, असं पुरातत्त्व विभागाने बीबीसीला सांगितले.
पुरातत्त्व विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, भटाळा गावामध्ये भोंडा महादेव मंदिरासह भवानी माता मंदिर, लघुचित्र व शिल्प असलेल्या लेण्या आढळतात.
भटाळा येथील सुंदर अशा पिवळ्या दगडांमध्ये कोरलेलं महादेवाचं मंदिर विदर्भातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारण आठव्या किंवा नवव्या शतकात बांधले गेले.
मंदिर सुमारे 50 ते 60 फूट उंच असून यात मंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात विदर्भातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक शिवलिंग आहे, जे सुमारे 10 फूट लांबीच्या काळ्या दगडाच्या एका खंडातून कोरलेले आहे.
या मंदिराला पारंपरिक शिखर नसल्यामुळे स्थानिक लोक याला 'भोंडा महादेव' म्हणून ओळखतात.
नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने 2003 साली भटाळा परिसरात संशोधन केले होते. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात प्राचीन दगडी साधने आढळून आली होती. मात्र, अलीकडील पाहणीत ही स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं आहे.
नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग प्रमुख प्रभाष साहु याबाबत बोलताना म्हणाले, "भटाळा आणि मोवाडा ही दोन्ही अतिशय महत्त्वपूर्ण स्थळं आहेत. मानवी उत्क्रांतीचा इतिहास या ठिकाणी दडलेला आहे."
"मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीचा टप्प्यातील शिकारीसाठी वापरण्यात आलेली दगडी हत्यारं येथे सापडली असून आणखी बरंच संशोधन बाकी आहे. त्यामुळे या स्थळाचं योग्यप्रकारे जतन आणि संवर्धन व्हायला हवं. मात्र, अवैध दगडी खनन आणि पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे सुमारे 60 टक्के साईट आधीच नष्ट झालेली आहे, याचा उर्वरित भाग तरी वाचवता यायला हवा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत," असं साहु म्हणतात.
या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.
मंदिराचे जतन आणि परिसरातील पुरातत्त्वीय वारशाच्या संरक्षणाबाबत सविस्तर चौकशी करण्याचंही न्यायालयाने नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
भटाळाबाबत बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील आणखी एक महत्त्वपूर्ण स्थळ पापामिया टेकडीबाबतही भाष्य केलं.
लाखो वर्ष जुन्या आणि इतिहासातील मानवी उत्क्रांतीचं महत्त्वाचं पान उलगडणारी पापामिया टेकडी तर पूर्णत:च नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या या स्थळांना वाचविण्यासाठी नागरिकांनी शासनाकडे मागणी करावी, असं डॉ. साहु म्हणाले.
याबाबत राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी बीबीसीने संवाद साधला. ते म्हणाले, "संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. परंतु ज्या ठिकाणी दगडी खाणी आहेत त्या ठिकाणी काही पाषाणयुगीन हत्यारे प्राप्त झालेली आहेत."
"सदर ठिकाणी होणाऱ्या अवैध उत्खननामुळे सदर पुरातत्त्वीय स्थळाचे नुकसान झाल्याचे दिसले आहे. परंतु या स्थळाचे संरक्षण करण्यासाठी विभागामार्फत पाहणी करण्यात येऊन सदर ठिकाणी होणारे अवैध उत्खनन थांबवणे व संबंधितांविरुद्ध ग्राम महसूल अधिकारी भटाळा, तहसीलदार वरोरा आणि जिल्हा खनन अधिकारी चंद्रपूर यांना नियमांन्वये कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे.
"तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या प्रत्यक्ष स्थळभेटी दरम्यान सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली असून त्यांनी संबंधितांना आवश्यक कार्यवाही करणे हेतू मौखिकरीत्या सूचना दिल्या आहेत," डॉ. गर्गे यांनी सांगितले.
हायकोर्टाने दाखल केली 'सुओ मोटो'
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने भटाळा मंदिर परिसराची अवस्था आणि दुर्दशा पाहता सुओ मोटो दाखल करून घेतली.
तसेच (अमेकस क्युरी) न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. भानुदास कुलकर्णी यांची नियुक्ती करत त्यांना 2 आठवड्यात रीतसर माहिती न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश दिले.
हायकोर्टाने दाखल करून घेतलेल्या सुओ मोटोबाबत माहिती देताना डॉ. गर्गे म्हणाले की, "या स्थळाचे संवर्धन व सदर ठिकाणाचे अवैध उत्खनन थांबवण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करणे हेतू सुचित केलं आहे. तसेच तज्ज्ञांच्याद्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे."
'चंद्रपुरातील प्रागैतिहासिक पापामिया टेकडी अडकली विकासाच्या कचाट्यात'
भटाळाप्रमाणेच चंद्रपूर शहरातही एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रागैतिहासिक स्थळ असलेली पापामिया टेकडी देखील दुर्लक्षित राहिल्याचे संशोधक सांगत आहेत.
चंद्रपूर येथील स्वतंत्र संशोधक अमित भगत याबाबत बोलताना म्हणाले, "पापामिया टेकडी भागात आढळलेल्या हत्यारांची संख्या बघता ही साईट आणि महाराष्ट्रातील सर्वात जुन्या अश्मयुगीन प्रागैतिहासिक स्थळापैकी एक असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मात्र, इतकं महत्त्वाचं स्थळ असूनही पापामिया टेकडीवर अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्यात आलं आहे."
अतिशय महत्त्वपूर्ण अशा या स्थळाचं संरक्षण, संवर्धन होण्याऐवजी या ठिकाणी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठीची परवानगी कशी काय मिळाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पापामिया टेकडीकडे दुर्लक्ष का? सद्यस्थिती काय?
याबाबत माहिती देताना अमित म्हणाले, "या स्थळाचा शोध 1960-61 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पुरातत्त्वज्ञ एल. के. श्रीनिवासन यांनी लावला होता. त्यानंतर, डॉ. एस.एन. रघुनाथ आणि डॉ. एस.बी. ओटा यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं की, येथे वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या मधल्या भौगोलिक स्थानामुळे हे ठिकाण प्राचीन मानवासाठी अत्यंत अनुकूल असल्याने या ठिकाणी अश्मयुगीन मानवाची वसाहत वसली.
"इ.स. पूर्व दीड लाख वर्ष ते इ.स. पूर्व 10 हजार वर्षांपर्यंत सातत्याने अश्मयुगीन मानवाचा वावर राहिल्याचे येथील वैविध्यपूर्ण दगडी हत्यारांवरून दिसून येते. कालांतराने या भागात लोकवस्ती वाढत गेली आणि स्थळ दुर्लक्षित झाले," अमित सांगतात.
पुढे अमित सांगतात, "2015 साली या जागेवर जिल्हा सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडून जमीन मंजूर झाली. टाटा हॉस्पिटल ट्रस्टसोबत कॅन्सर हॉस्पिटलचा निर्मितीचा करारही झाला. या स्थळाचे संरक्षण आणि बचावासाठी मी जिल्हा, राज्य ते केंद्र पातळीवर शक्य ते प्रयत्न केले. याचा एक विस्तृत अहवालही मी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवला.
"त्याची दखल घेत 15 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव सचिन परदेशी यांनी त्यासंबंधी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये नागपूरच्या डेक्कन कॉलेजद्वारे या स्थळावर पुरातत्त्वीय उत्खनन करून येथे प्रागैतिहासिक हत्यारांचे व जीवाश्मांचे भव्य संग्रहालय उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची 4 एकर जागा राखीव ठेवण्यात आली. संग्रहालयासाठीचा निधी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून वितरित करण्याचे ठरले. त्यासंबंधी शासकीय करार करण्याचेही सुचविण्यात आले.
"मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही संग्रहालयाचे काम सुरू होऊ शकले नाही. दुसरीकडे वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाची इमारत दिमाखात उभी राहिली आहे. परंतु, या 100 एकर प्रकल्पाच्या मधोमध असलेली 4 एकराची संग्रहालयासाठीची राखीव जागा तशीच ओसाड पडून आहे," असं अमित सांगतात.
दरम्यान, ही सर्व विकासकामे नियमाअंतर्गत झाली असल्याचे पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. गर्गे यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक स्थळाच्या संरक्षणासाठी अमित भगत यांच्या पुढाकाराने नागरिकांनी मिळून याचिका दाखल केली. गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन प्रतिसाद मागितला. सेव्ह पापामिया टेकडीच्या नावे कॅम्पेनही चालवले.
याबाबत पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. गर्गे म्हणाले, "पापमिया टेकडी येथील सद्यस्थितीत संरक्षित असलेल्या भागाची पुरातत्त्व विभागामार्फत पाहणी करण्यात येऊन सदर पुरातत्त्वीय स्थळाचे संवर्धन व विकास करणे हेतू सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे."
"तसेच भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर, भवानी मंदिर व ऋषी तलाव लेणी समूह ही स्मारके राज्य संरक्षित स्मारके असून सदर ठिकाणी विभागामार्फत संवर्धन व विकास कामे करण्यात येत आहे", असं अमित भगत म्हणाले.
याबाबत बीबीसीने चंद्रपूर जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांना प्रश्न विचारला असता, "शासकीय आदेशानुसार तिथे काम झालंय," इतकीच प्रतिक्रिया त्यांनी बीबीसी मराठीला दिली.
टाटा ट्रस्टसोबत संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, ती आल्यानंतर बातमीत अपडेट करण्यात येईल.
पिजदुरातील डायनासोरचे जीवाश्म केंद्रही दुर्लक्षित
वरोरानजीक पिजदुरा या गावी आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे जेथे सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वीच्या महाकाय अशा डायनासोरचे जीवाश्म शास्त्रज्ञांना आढळून आले आहेत.
डायनासोरचे जीवाश्म सापडणारी ही भारतातील दुसरी मोठी साईट असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र, असं असूनही हे गाव मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिलं आहे.
या ठिकाणी आपण अनेकदा भेटी देऊन सर्व्हेक्षण केलं असल्याचं अमित भगत सांगतात. पिजदुराचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारी कागदपत्रे आणि पुरावे तसेच संदर्भ त्यांच्या संग्रही असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या संदर्भात आपण पुरातत्त्व विभाग, प्रशासनाकडे पाठपुरावा केला तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील चर्चा केली. परंतु, अद्याप त्याबाबत हवा तसा बदल दिसून आलेला नसल्याचं भगत म्हणाले.
पुरातत्त्व विभागाचं म्हणणं काय?
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी चर्चा केली. अशाप्रकारे अतिप्राचीन स्थळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, पुरातत्त्व भागाचा याकडे कानाडोळा होतोय का? असा प्रश्न विचारला असता, "पुरातत्त्व विभागामार्फत पाहणी करण्यात आली असून नियमान्वये आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे," अशी प्रतिक्रिया डॉ. तेजस गर्गे यांनी दिली.
पापामिया टेकडी येथील पाषाणयुगीन ठिकाणी पाषाणयुग संग्रहालय उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. ते काम कुठपर्यंत आलं आहे? संवर्धनासाठीच्या भविष्यातील योजना काय?
या प्रश्नाचं उत्तर देताना गर्गे म्हणाले, "पापामिया टेकडी येथील पाषाणयुगीन ठिकाणी पाषाणयुग संग्रहालय उभारण्यासंदर्भात प्राथमिक टप्प्यात संरक्षित ठिकाणी संरक्षण भिंत, ग्रील गेट, पदपथ व सदर ठिकाणी प्राप्त पुरवशेषांची माहितीफलक इ. कामाची रु. 1,12,35000 इतक्या रकमेची निविदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुढील टप्प्यात सदर ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून सदर ठिकाणी स्थळ संग्रहालय व संशोधन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने अनुषंगिक कामे करण्याचे नियोजित आहे."
ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात होणारे उत्खनन आणि त्यांच्या संरक्षणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.