इराण 'होर्मुझ'नंतर तांबड्या समुद्राचा जलमार्गही बंद करणार? असं झालं तर काय होईल?

वाचन वेळ: 5 मिनिटे

तांबड्या समुद्रातील एका अतिशय महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गाबाबत इराणनं दिलेल्या धमक्यांमुळे जागतिक व्यापारातील अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याबाबतची चिंता वाढली आहे.

इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी मार्ग परिणामकरित्या आधीच बंद केलेला आहे. यामुळे पर्शियन आखातातील सागरी वाहतूक ठप्प झाली आहे.

आता इराण एडनचं आखात आणि तांबडा समुद्र यामध्ये असलेल्या 'बाब अल मंदेब' सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी वाहतूक थांबवण्याची धमकी देतो आहे. तांबड्या समुद्रातून ही वाहतूक पुढे सुएझ कालव्यापर्यंत जाते.

इराणनं म्हटलं आहे की, जर जमिनीवर अमेरिकेचे सैनिक तैनात करण्यात आले, तर ते युद्धात 'इतर आघाड्या' सुरू करू शकतात.

इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी संलग्न असलेल्या तस्नीम या वृत्तसंस्थेनं इराणच्या सैन्यातील एका सूत्राचा संदर्भ देत सांगितलं, "बाब अल मंदेब सामुद्रधुनीची गणना जगातील व्यूहरचनात्मक स्ट्रेट्स किंवा सामुद्रधुनीत केली जाते. हा मार्ग अडवण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची इराणची फक्त इच्छाच नाही, तर खरोखरंच तशी क्षमतादेखील आहे."

इराणनं धमकी दिली आहे की जर अमेरिकेनं इराणच्या खार्ग बेटावर हल्ला केला, तर ते बाब अल मंदेब सामुद्रधुनीचा मार्ग अडवतील.

खार्ग बेटावर कच्च्या तेलाचं एक मोठं टर्मिनल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते इराणचं तेल 'ताब्यात' घेऊ इच्छितात आणि या बेटावर कब्जा करण्याचा विचार करत आहेत.

बाब अल मंदेब सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे?

बाब अल मंदेब सामुद्रधुनी, तांबड्या समुद्रात अरबी समुद्राच्या बाजूला येमेन आणि आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील जिबूती आणि इरिट्रिया या देशांमध्ये आहे. म्हणजेच या सामुद्रधुनीच्या एका बाजूला येमेन आहे तर दुसऱ्या बाजूला जिबूती आणि इरिट्रिया हे देश आहेत. हिंदी महासागर आणि एडनच्या आखातातून येणारी सागरी वाहतूक सुएझ कालव्यापर्यंत याच मार्गानं जाते.

बाब अल मंदेब सामुद्रधुनी 115 किलोमीटर लांब आणि 36 किलोमीटर रुंद आहे. सुएझ कालवा 1869 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ही सामुद्रधुनी जागतिक व्यापारातील एक महत्त्वाचा दुवा बनली. कारण यामुळे युरोप आणि आशियामध्ये सर्वात कमी लांबीचा सागरी मार्ग तयार झाला.

तांबड्या समुद्रातील हा कॉरिडॉर आता जगातील सर्वात वर्दळीच्या, व्यग्र सागरी मार्गांपैकी एक बनला आहे. जगातील एकूण सागरी वाहतुकीतील जवळपास एक-चतुर्थांश वाहतूक याच मार्गाद्वारे होते.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. युद्धामुळे हा सागरी मार्ग जवळपास बंद आहे. जर बाब अल मंदेब सामुद्रधुनीतून जाणारा सागरी मार्ग जर बंद झाला, तर यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या आणखी 12 टक्के भागावर परिणाम होईल.

अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनानुसार, मध्य पूर्व आणि आशियातील देशांमधून पाश्चात्य देशांना जाणारं जवळपास 50 लाख बॅरल कच्चे तेल दररोज याच मार्गानं जातं.

याव्यतिरिक्त, लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी)च्या जागतिक वाहतुकीपैकी जवळपास 8 टक्के वाहतूक देखील याच सामुद्रधुनीतून जाते. त्यामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद झाल्यापासून जागतिक व्यापारात तांबड्या समुद्रात महत्त्व आणखी वाढलं आहे.

सौदी अरेबियानं यनबू बंदरातून त्यांच्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी बाब अल मंदेबचा वापर एक ट्रान्झिट पॉईंट म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबिया त्याच्या पूर्व भागातील तेल क्षेत्रांमधून दररोज पाईपलाईनद्वारे तिथे लाखो बॅरल कच्चे तेल पाठवतो.

कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूव्यतिरिक्त, बाब अल मंदेब सामुद्रधुनी पूर्व आणि पश्चिमेमधील मुख्य व्यापारी संपर्काचा देखील भाग आहे. तिथून दररोज अनेक मालवाहू जहाजं जातात.

जर या सामुद्रधुनीतील सागरी मार्ग बंद झाला, तर त्याचा परिणाम 2021 च्या घटनांसारखा होईल. त्यावेळेस पनामाचा झेंडा असणारं एव्हर गिवेन हे मालवाहू जहाज अडकल्यामुळे सुएझ कालवा बंद झाला होता. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. परिणामी कच्चे तेल आणि इतर अनेक प्रकारच्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या आणि त्यांच्या डिलिव्हरीला म्हणजे माल पोहोचवण्यास विलंब झाला होता.

हुती बंडखोरांची भूमिका

बाब अल मंदेब सामुद्रधुनीवरील कोणत्याही प्रकारचा हल्ला, होण्याची शक्यता हुती बंडखोरांकडून असेल. हुती हा येमेनमधील इराणचा पाठिंबा असलेला एक राजकीय आणि लष्करी गट आहे.

रॉयटर्सशी बोलताना, नाव न छापण्याच्या अटीवर हुतींच्या एका नेत्यानं सांगितलं की हा गट इराणला पाठिंबा देण्यासाठी बाब अल मंदेबच्या सामुद्रधुनीला लक्ष्य करण्यासाठी 'लष्करीदृष्ट्या सज्ज' आहे.

हुतींनी 28 मार्चला इस्रायलवर हल्ला केला. इराणविरुद्ध सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्धातील हा त्यांचा पहिला सहभाग होता. इस्रायलनं म्हटलं की येमेनहून मारा करण्यात आलेली 2 क्षेपणास्त्रं त्यांनी पाडली आहेत.

या गटाचं, तांबड्या समुद्राला लागून असलेल्या येमेनच्या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण आहे. गाझा युद्धाच्या वेळेस देखील बाब अल मंदेब सामुद्रधुनीला हुतींनी लक्ष्य केलं होतं. एकट्यानंच कारवाई करत, हुतींनी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 100 हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ला केला होता. यात 2 जहाजं बुडाली होती आणि 4 खलाशांचा मृत्यू झाला होता.

नोव्हेंबर 2023 मध्ये या गटानं एका हेलिकॉप्टरचा वापर करून तांबड्या समुद्रात जपानद्वारे संचालित आणि ब्रिटनचा मालकी हक्क असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं होतं.

अर्थात हुतींनी दावा केला होता की ते फक्त इस्रायलशी संबंधित जहाजांनाच लक्ष्य करत आहेत. मात्र हे मोठ्या प्रमाणात केलेले अंदाधुंद हल्ले असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर जगातील अनेक सर्वात मोठ्या शिपिंग आणि तेल कंपन्यांनी या सागरी मार्गानं होणारी त्यांच्या जहाजांची वाहतूक थांबवली होती.

अमेरिकेनं दावा केला होता की हुतींनी हार पत्करली आहे. तर त्याला उत्तर देताना हुतींनी दावा केला होता की अमेरिकेनं माघार घेतली होती. यात अखेरीस हल्ले थांबले. मात्र विश्लेषकांना चिंता वाटते की हे हल्ले पुन्हा सुरू होऊ शकतात.

बीबीसीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस डुसेट म्हणतात, "जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं, तर येमेनमधील हुती यात सहभागी होतील, ही अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जात होती."

त्या पुढे म्हणाल्या, "हुतींचा वायव्य (उत्तर-पश्चिम) येमेनवर मोठा प्रभाव आहे. त्यांनी अजून त्यांचं सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरलेलं नाही. ते म्हणजे बाब अल मंदेबमार्गे होणाऱ्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करण्याची त्यांची क्षमता. हा मार्ग तांबड्या समुद्राला जागतिक व्यापार मार्गांशी जोडणारा एक महत्त्वाचा सागरी चोकपॉईंट आहे."

अमेरिकेच्या परिवहन विभागाच्या मॅरीटाईम प्रशासनानं 26 फेब्रुवारीला एका नोटीस किंवा सूचनेत म्हटलं आहे, "ऑक्टोबर 2025 मध्ये इस्रायल आणि गाझामध्ये शस्त्रसंधी झाल्यापासून हुती दहशतवादी गटानं कोणत्याही व्यापारी जहाजावर हल्ला केलेला नाही. मात्र या प्रदेशातील अमेरिकेच्या मालमत्ता, ज्यात व्यापारी जहाजांचाही समावेश आहे, त्यांच्यासाठी हुती अजूनही एक धोका आहेत."

जागतिक सागरी वाहतुकीवरील दबाव

बाब अल मंदेबचा अरबी भाषेत अर्थ होतो, 'अश्रूंचा दरवाजा' किंवा 'दु:खाचं द्वार'. या नावातून तिथे असलेले धोके दर्शविले जातात. यात वेगवान सागरी प्रवाह आणि अनिश्चित स्वरुपाच्या वाऱ्यांपासून ते सागरी लूटमार (सागरी चाचे) आणि युद्धापर्यंतचा समावेश आहे.

बाब अल मंदेब सामुद्रधुनी आणि त्याच्या आसपासच्या सागरी क्षेत्रात, 2008 ते 2012 दरम्यान सागरी लूटमारीच्या किंवा चाचेगिरीच्या अनेक घटना घडल्या. ही चाचेगिरी बहुताशपणे सोमाली गटांनी केली होती. हे गट खंडणीसाठी जहाजांच्या कर्मचाऱ्यांचं अपहरण करायचे. या घटनांनंतर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शिपिंग कंपन्यांनी या प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.

आज जर हा सागरी मार्ग बंद करण्यात आला, तर त्यामुळे ऊर्जेच्या बाजारपेठेतील संकट आणखी तीव्र होईल. होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या स्थितीमुळे ही बाजारपेठ आधीच दबावाखाली आहे.

आखाती प्रदेशात जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यामुळे ब्रेंट क्रूड (कच्चे तेल)ची किंमत वाढून 115 डॉलर (जवळपास 10,810 रुपये) प्रति बॅरलवर पोहोचली आहे. युद्धाच्या आधी त्याची किंमत जवळपास 70 डॉलर (जवळपास 6,580 रुपये) प्रति बॅरल होती.

ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते कृषी उत्पादनांपर्यंत, अनेक प्रकारच्या वस्तूंशी संबंधित जागतिक व्यापारावर देखील याचा परिणाम दिसून येतो आहे. दुसऱ्या एखाद्या सागरी मार्गात निर्माण झालेल्या नवीन अडथळ्यामुळे किमती आणखी वाढू शकतात. तसंच इराणविरुद्धच्या युद्धामुळे झालेला आर्थिक परिणाम आणखी गंभीर होऊ शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)