हत्या, मृतदेहाचे तुकडे आणि फ्रीज; मोनिकाला नौदलाच्या कर्मचाऱ्यानं का मारलं? नेमकं घडलं काय?

फोटो स्रोत, Venugopala rao/UGC
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील.)
आंध्र प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. विशाखापट्टणम येथे डेटिंग अॅपवरून मैत्री करणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.
विशाखापट्टणमच्या गाजुवाका परिसरात डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या 29 वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव मोनिका आहे.
या प्रकरणी 35 वर्षीय रवींद्र याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी बीबीसीला सांगितलं आहे. रवींद्र हा पूर्व नौदल कमांडमध्ये (ईस्टर्न नेव्हल कमांड) टेक्निशियन म्हणून काम करतो.
गाजुवाका पोलीस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) पार्थसारथी यांनी बीबीसीला सांगितलं की, खून केल्यानंतर शरीराचे काही तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते, तर उरलेले तुकडे पिशवीत भरून जाळून टाकण्यात आले होते.
"रवींद्रची पत्नी प्रसूतीसाठी आपल्या गावी विजयनगरला गेली होती आणि गेल्या आठ महिन्यांपासून ती तिथेच राहत होती. त्या काळात त्याने आपल्या प्रेयसीला घरी बोलावून हा गुन्हा केला," असं पोलिसांनी सांगितलं.
बीबीसीने रवींद्रच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर ही बातमी अपडेट केली जाईल.

फोटो स्रोत, Venugopala rao
डेटिंग अॅपवरून झाली ओळख
संशयित आरोपी रवींद्रला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशीत त्याने काही महत्त्वाची माहिती दिल्याचे सीआय पार्थसारथी यांनी सांगितले.
पोलीस म्हणाले की, "चौकशीदरम्यान रवींद्रने तीन वर्षांपूर्वी डेटिंग अॅपच्या माध्यमातून मोनिकाशी भेट झाल्याचे सांगितले. मोनिका ही विशाखापट्टणम येथील एका खासगी बँकेत काम करत होती."
साधारण दोन वर्षांपूर्वी रवींद्रचं लग्न झालं होतं. त्याची पत्नी प्रसूतीसाठी आपल्या गावी गेली होती.
पोलिसांनी सांगितलं की, "या काळात रवींद्र मोनिकाला आपल्या घरी भेटत होता. रविवारी सकाळी (29 मार्च) त्याने मोनिकाला आपल्या फ्लॅटवर बोलावलं. तिथे दोघांमध्ये भांडण झालं होतं."
रवींद्रच्या सांगण्यानुसार, ती महिला पैशांसाठी त्याला त्रास देत होती आणि पत्नीला सर्वकाही सांगण्याची धमकी देत होती, असं सीआय पार्थसारथी म्हणाले.

फोटो स्रोत, UGC
घराची तपासणी करताना पोलिसांना काय सापडलं?
पार्थसारथी यांनी सांगितलं की, "रविवारी सायंकाळी आम्हाला एक फोन आला. फोनवर एलव्ही नगरमधील रवीद्र नावाच्या नौदल कर्मचाऱ्याने कोणाचा तरी खून केला आहे आणि त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली."
"आम्ही लगेचच दिलेल्या पत्त्यावर पोहोचले, पण घर बंद होतं. खिडक्या आणि व्हेंटिलेटरमधून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच दिसलं नाही, त्यामुळे आम्ही शेजाऱ्यांना बोलावलं."
"घरमालक आणि रवींद्रच्या भावाला बोलावलं. त्यांच्या मदतीने आम्ही घरात प्रवेश केला. संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ होतं, पण स्प्रे पेंटचा वास येत होता. सुरुवातीला काहीही संशयास्पद दिसलं नाही. पण फ्रीज उघडल्यावर आत डोकं नसलेलं धड आढळलं. अधिक शोध घेतल्यानंतर आम्हाला एका सुटकेस मिळाली. यात शरीराचे काही तुकडे सापडले."
पार्थसारथी यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही लगेचच रवींद्रचा शोध सुरू केला. त्याचवेळी त्याच्या आई-वडिलांचा फोन आला आणि त्यांच्या मदतीने रवींद्रला पोलीस ठाण्यात बोलावून ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने सांगितलं की, खून केल्यानंतर त्यानं डोकं आदिविवरमच्या धरापालम भागात नेलं आणि तिथे जाळून टाकलं. या ठिकाणी पोलीस पथक तपास करत आहे."
हत्या करण्याच्या एक दिवस आधीच चाकू खरेदी केला होता, असं रवींद्रने पोलीस तपासात सांगितलं.
'आम्ही घाबरून तिथून पळून गेलो'
रवींद्र जिथे राहतो, त्या मजल्यावरच राहणारे दुसऱ्या फ्लॅटचे मालक रामकृष्ण यांनी पोलीस आल्यानंतर काय घडलं, याची माहिती बीबीसीला दिली.
रामकृष्ण यांनी सांगितलं की, "रविवारी रात्री सुमारे 8 वाजता काही लोक शेजारच्या फ्लॅटच्या खिडकीतून आत डोकावत होते. आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना काही गुन्हा घडल्याची माहिती मिळाली आहे...ते पोलीस आहेत, तसेच त्यांनी रवींद्रबद्दल काही माहिती विचारली."
"पोलीस आत गेल्यानंतर सुरुवातीला सगळं ठीक वाटलं आणि आम्ही थोडे निर्धास्त झालो. पण काही वेळातच फ्रीज आणि एका सुटकेसमध्ये धड आणि शरीराचे तुकडे सापडले. हे पाहताच आम्ही घाबरून तिथून पळून गेलो. तो धक्का आणि भीती आजही कमी झालेली नाही."

फोटो स्रोत, UGC
'एक वर्षापासून राहत होता भाड्याने'
फ्लॅटचे मालक श्रीराममूर्ती यांनी सांगितलं की, त्यांनी 29 मार्च 2025 रोजी हे घर रवींद्रला भाड्याने दिलं होतं. हत्या झाल्याची बातमी समजल्यावर, एक वर्षानंतर त्यांना पुन्हा या घरात यावं लागलं.
श्रीराममूर्ती यांनी सांगितलं की, "तो घर भाड्याने घेण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने त्याचं ओळखपत्र दाखवलं. तो नौदलात काम करतो आणि त्याचं गाव राजाम आहे. मीही बीएसएफचा निवृत्त कर्मचारी असल्यामुळे मी लगेच त्याला भाड्यानं घर दिलं. तो दर महिन्याला भाडं देत होता. त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला."
'त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे'
बीबीसीने मोनिकाचे वडील वेणुगोपाल राव यांच्यांशी चर्चा केली.
वेणुगोपाल राव यांनी म्हणाले की, "त्याने आमच्या मुलीला मारण्याच्या हेतूनेच घरी बोलावलं होतं. यासाठी त्याने आधीच चाकू आणि स्प्रेही घेतला होता. आता आमची मुलगी कधीच परत येणार नाही. किमान त्याला त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा मिळावी, म्हणजे आमच्या मुलीच्या आत्म्याला तरी शांती मिळेल."
मोनिकाच्या कुटुंबीयांकडून अधिक माहिती घेतली जात असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं सीआय पार्थसारथी यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























