प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांची हत्या करून त्यांच्याच जागी मिळवली पोलिसाची नोकरी, असं उलगडलं हत्या प्रकरण

आर्या बल्लावार आणि आशिष शेडमाके
फोटो कॅप्शन, आर्या बल्लावार आणि आशिष शेडमाके
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3 वर्षांनी त्याच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.

मुलीनेच आपल्या वडिलांना मिल्क शेकमध्ये विष देऊन मारल्याचं समोर आलं असून चंद्रपूर पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीला अटक केली आहे.

मुलीनं वडिलांचा खून का केला? 3 वर्षानंतर प्रकरण कसं उघडकीस आलं? पाहुयात

आर्या बल्लावार (22) असं आरोपी मुलीचं नाव आहे. तिचे वडील जयंत बल्लावार हे चंद्रपूर पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला होते.

एप्रिल 2023 मध्ये ते प्रशासकीय इमारतीत नोकरीवर असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.

पण, त्यावेळी मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळे मर्ग (Accidental Death Report - ADR) दाखल करण्यात आला होता, अशी माहिती चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी दिली.

वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या बल्लावार अनुकंपा तत्त्वावर 2025 मध्ये नोकरीला लागली. रामनगर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला होती.

पण, आता 3 वर्षानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून मुलगी आर्या बल्लावारनेच वडिलांना संपवल्याचं समोर आलं आहे.

मुलीनं वडिलांची हत्या का केली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याचे आशिष शेडमाके नावाच्या व्यक्तीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आशिष हा देखील चंद्रपूर पोलिसांत कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. पण, त्यानं काही चुका केल्या. त्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं.

आशिष आणि आर्या यांचे खूप वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण, ते आर्याच्या वडिलांना मान्य नव्हते. वडिलांचा दोघांच्या लग्नालाही विरोध होता. त्यामुळे वडिलांनाच आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं असं दोघांनीही ठरवलं.

दोघांनी संगनमत करून वडील जयंत बल्लावार यांच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी आर्यानं आशिषच्या मार्फत 5 हजार रुपये देऊन विष मागवलं. तिने ते एप्रिल 2023 मध्ये नोकरीवर जाण्यापूर्वी मिल्कशेकमध्ये टाकून वडिलांना दिलं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

वडील मिल्कशेक पिऊन प्रशासकीय इमारतीत नोकरीवर गेले. पण, एक तासातच त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यावेळी आर्याची आई व्यायामाला गेली होती. त्यामुळे आर्यानं वडिलांना काही खायला प्यायला दिलं याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं.

आपले वडील खूप दारू प्यायचे. प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाल्यानं मारहाण सुद्धा करायचे. वडिलांचं वागणं सहन झालं नाही, प्रियकरासोबत लग्न सुद्धा लावून देणार नव्हते. त्यामुळे आपण वडिलांना संपवल्याचा गुन्हा आर्या बल्लावारने कबूल केल्याची माहिती पोलिस अधिकारी चौगुले यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.

3 वर्षानंतर हत्येचा उलगडा कसा झाला?

चंद्रपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी एक अर्ज प्राप्त झाला होता आणि त्यामध्ये आपल्या पत्नीने सासऱ्याला संपवल्याच्या गुन्ह्याची माहिती दिली होती. याच अर्जावरून या हत्येचा उलगडा झाला.

हा अर्ज देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आर्या बल्लावर हिचा पती आशिष शेडमाके होता.

त्याचं झालं असं आर्या बल्लावार वडिलांच्या मृत्यूनंतर 2025 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून चंद्रपूर पोलिसांत नोकरीवर लागली होती.

प्रेमसंबंधातील अडथळा दूर झाल्यानं तिनं तिचा प्रियकर आशिष शेडमाके याच्यासोबत लग्नही केले होते. आशिष देखील वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर 2024 मध्ये नोकरीला लागला होता. पोलीस ट्रेनिंगमध्येही दोघेही सोबत होते.

आशिष शेडमाके
फोटो कॅप्शन, आशिष शेडमाके

पण, ट्रेनिंगनंतर आशिषच्या हातून काही चुका झाल्या. त्यामुळे त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे आर्या आणि आशिषमध्ये वाद होत होते.

ती ट्रेनिंग संपवून आल्यानंतर आशिषकडे न राहता आपल्या आईकडे राहायला गेली होती. ती आशिषला टाळायला लागली होती. त्याच्या फोनकडे दुर्लक्ष करत होती.

त्यामुळे आशिष संतापला आणि त्यानं फोनवरील संभाषणासह आणखी काही पुरावे घेऊन थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा उलगडा केला.

आर्या बल्लावार
फोटो कॅप्शन, आर्या बल्लावार
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आर्या बल्लावारची चौकशी केली असता तिनं देखील गुन्ह्याची कबुली दिली.

हा गुन्हा 2023 मध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 302, 120, 201 आणि 34 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं वडिलांना संपवल्याचं तिनं सांगितलं. तसेच यासाठी आशिषनं देखील तिला मदत केली होती.

याप्रकरणात पोलिसांनी आर्या बल्लावारसह, तिचा पती आशिष शेडमाके तसेच त्यांना विष आणून द्यायला मदत करणारा चैतन्य गेडाम आणि एका विधिसंघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आर्यासह इतर दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

वडिलांच्या मृत्यूनंतर आर्याला दोन वर्षांनी अनुकंपा तत्वावर नोकरी लागली. त्यामुळे नोकरीसाठी वडिलांना संपल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण, याबद्दल कुठलेही पुरावे नसून तिनं सुद्धा प्रेमासाठी वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं पोलिस अधिकारी चौगुले यांनी सांगितलं.

आरोपींच्या कुटुंबीयांची किंवा वकिलांची प्रतिक्रिया घेण्याचा बीबीसी मराठी प्रयत्न करत आहेत. ती आल्यावर या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)