फुगलेलं डोकं आणि सुजलेली जीभ; कीटकनाशकांमुळं आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या वेदना ओरडून सांगणारे 8 फोटो

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
- Author, शर्लिन मोलन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(या बातमीतील काही फोटो आणि तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)
केरळ राज्यातील कोच्ची-मुझिरिस बिएनाले येथे आधुनिक कला प्रदर्शन भरलं आहे. या कला प्रदर्शनात काही विचित्र, भयानक आणि भीतीदायक असे फोटो देखील ठेवण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये फुगलेले, मोठ्या आकाराचे डोके आणि विकृत हात-पाय असलेली मुलं दिसतात. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसू शकतो.
हे सर्व फोटो, फोटोजर्नालिस्ट मधुराज यांनी काढलेले आहेत. या फोटोंमध्ये 1990 आणि 2000 च्या दशकात केरळच्या कासरगोड जिल्ह्यात एंडोसल्फान नावाच्या स्वस्त पण अत्यंत विषारी कीटकनाशकामुळे अनेक मुलांचे आरोग्य कसे उद्धवस्त झालं, हे दिसून येतं.
1970 च्या दशकापासून 20 वर्षांहून अधिक काळ, केरळच्या प्लांटेशन कॉर्पोरेशनने कासरगोडमधील काजू बागांवर वर्षातून 2 ते 3 वेळा एंडोसल्फान फवारले. नंतर या कीटकनाशकाचा चहा, तांदूळ आणि आंबा यांसारख्या पिकांसाठीही वापर केला.
1990 च्या दशकात, तिथले लोक सांगू लागले की प्राणी आणि मुलांमध्ये जन्मजात दोष दिसू लागले. यामध्ये शरीराचे विकार तसेच मेंदूविषयक आजारही होते, जसं की सेरेब्रल पाल्सी, एपिलेप्सी आणि हायड्रोसेफलस (मेंदूत पाणी साचणे).
स्थानिक लोकांनी त्वचेवर रॅशेस, हार्मोनचा त्रास, दमा आणि कर्करोग यासारखे आजार आढळल्याची तक्रार केली. नंतर काही पर्यावरण संघटना आणि केरळ सरकारने सांगितलं की, हे सर्व एंडोसल्फान विषबाधेमुळे झालं आहे.
भारतातील काही शास्त्रज्ञांनी पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत एंडोसल्फानचा या आजारांशी संबंध जोडण्याला आव्हान दिले. पण 2004 मध्ये केरळच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कीटकनाशकाचा वापर बंद केला.
2011 मध्ये, स्टॉकहोम कन्व्हेन्शनने एंडोसल्फानची निर्मिती आणि वापर यावर जगभरात बंदी घातली. त्याच वर्षी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एंडोसल्फानचा वापर, विक्री, उत्पादन आणि निर्यातीवर देशभरात बंदी घालण्याचा आदेश दिला.
2017 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला 5 हजार पीडितांना 5 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. पण काही पीडितांना अजूनही भरपाईचे पैसे मिळाले नसल्याचे मधुराज यांनी सांगितलं.
बीबीसीने याबाबत बोलण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला आहे.
यातील अनेक पीडित गरीब कामगार होते. त्यांची कुटुंबं मागास प्रवर्ग आणि आदिवासी गटातील होती. त्यांना योग्य पोषण आणि आरोग्यसेवेची फारशी सोय नव्हती.
मधुराज यांनी दोन दशकांहून अधिक काळ कासरगोडमधील एंडोसल्फान समस्येचे डॉक्युमेंटेशन (दस्तऐवजीकरण) केलं. त्यांनी अनेकदा पीडित व्यक्तींच्या घरी जाऊन या कीटकनाशकाचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आहे, हे पाहिलं.
"मी स्वतः पाहिलं आहे की, पीडितांवर एंडोसल्फानचा किती भयंकर परिणाम झाला आणि यामुळे अनेक कुटुंबं कसे उद्धवस्त झालं हे देखील अनुभवलं," असं मधुराज यांनी बीबीसीला सांगितलं.
"खूप घरांमध्ये अनेक मुले शारीरिक आणि मानसिक आजारांनी त्रस्त आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणं खूप कठीण आहे. मी वृद्ध लोकांना देखील पाहिलं जे एंडोसल्फानमुळे आजारी झालेल्या जोडीदारांची काळजी घेत आहेत," असं ते म्हणाले.
मधुराज यांनी मागील अडीच दशकांत काढलेले काही फोटोज आम्ही इथे देत आहोत.
- महत्त्वाची सूचना: या फोटोंमध्ये असे दृश्य आहेत ज्यामुळे काहींना अस्वस्थ किंवा त्रासदायक वाटू शकतं.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
वरील फोटोत जमीला दिसत असून त्यांनी त्यांची मुलगी जैनाबाचा फोटो हातात धरला आहे.
जैनाबाचा हायड्रोसेफालसमुळे 2001 मध्ये ती एक वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू झाला. 2010 मध्ये मधुराज जमीला यांना भेटले, तेव्हा त्यांनी हा फोटो बाहेर काढला.
हा फोटो त्यांनी त्यांनी एका लिफाफ्यात सुरक्षित ठेवला होता.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
1990च्या शेवटी आणि 2000च्या सुरुवातीला, समाजसेवी गट, पर्यावरण संघटना आणि स्थानिक लोक मोठ्या आंदोलनात सामील झाले आणि त्यांनी एंडोसल्फानवर बंदी घालण्याची मागणी केली.
अनेक वर्षे, जे पालक त्यांच्या मुलांवर या कीटकनाशकाचा परिणाम झाला असल्याचे मानायचे, ते आजारी मुलांसह आंदोलनात सहभागी होत आणि सरकारकडून वैद्यकीय मदत आणि भरपाईची मागणी करत.
मधुराज म्हणतात की, हे पालक अनेक वर्षांपासून खासगी आणि सार्वजनिक लढाया लढत आहेत- त्यातील सर्वात कठीण संघर्ष म्हणजे त्यांच्या मुलांना जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न.
"मी प्रभावित म्हणजे एंडोसल्फानचा परिणाम झालेल्या भागांमध्ये फिरलो आणि मला समजलं की केरळने, आरोग्य क्षेत्रात जरी मोठी प्रगती केली असली तरी, एंडोसल्फानच्या पीडितांना त्यांनी अद्याप योग्य न्याय दिलेला नाही," असं मधुराज म्हणतात.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
2012 मध्ये, मातांनी आपल्या आजारी मुलांना हातात घेऊन कासरगोडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
त्यांनी त्यांच्या मुलांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि पीडितांसाठी नुकसान भरपाईची मागणी केली होती.
वरील फोटोमध्ये अशाच काही माता दिसत आहे.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
2019 मध्ये काढलेल्या या वरील फोटोत काही महिला त्यांच्या आजारी मुलांसह रात्रीच्या रेल्वेने राज्याची राजधानी तिरुवनंतपुरमकडे जात आहेत.
एंडोसल्फान दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या जात होत्या.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
वरील फोटोमध्ये 2017 मध्ये कासरगोड येथे एका सरकारी वैद्यकीय शिबिरात मुलाला घेऊन आपला नंबर येण्याची वाट पाहत बसलेले एक वडील दिसत आहेत.
याप्रकरणातील पीडितांची ओळख व्हावी आणि त्यांना वैद्यकीय उपचार आणि नुकसान भरपाई देता यावी या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
वरील फोटोमध्ये सरोजनी दिसत आहेत.
आपली मुलगी सरन्याच्या वस्तू पाहून सरोजिनी यांना अश्रू अनावर होतात. सरन्याचा 2014 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी मृत्यू झाला होता.
सरन्या जन्मतःच अंध होती आणि तिला हृदय आणि फुफ्फुसाचेही आजार होते. सरोजिनी यांच्या पतीचा 2006 मध्ये फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यांचे कुटुंब कासरगोड येथील काजू बागेजवळ राहत होते.

फोटो स्रोत, Madhuraj/Kochi Biennale Foundation
विमला आणि तिची मुलगी रेश्मा, जी मृत्यूच्या वेळी 28 वर्षांची होती, त्यांची दुःखद कहाणी एंडोसल्फान शोकांतिकेचे हृदयद्रावक स्वरूप अधोरेखित करतं.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रेश्मा, ही जन्मतःच मानसिक आजारी होती. जेव्हा तिची आई कामाला जात त्यावेळी तिच्या आजीने तिचा सांभाळ केला. ती लहान असतानाचा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. 2014 मध्ये तिची आजीही मरण पावली.
कोविड महामारीच्या काळात, रेश्मा ज्या विशेष शाळेत जात होती, ती शाळाही बंद झाली.
विमलाने आत्महत्या करण्यापूर्वी रेश्माची हत्या केली, असं 2022 मध्ये पोलिसांनी सांगितलं. विमलाला एकट्याने आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, असंही त्यांनी सांगितलं.
मधुराज म्हणाले की, त्यांनी एंडोसल्फान शोकांतिकेवरील घेतलेले फोटो कोची बिएनालेत दाखवण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना अधिक लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं.
"अशा आपत्ती आणि त्यात गमावलेल्या लोकांचं दुःख आपण विसरता कामा नये," असं त्यांनी शेवटी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























