तुम्ही औषधं चुकीच्या पद्धतीनं घेताय का? वाचा डॉक्टरांचा इशारा

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सारदा मियापुरम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

औषधं घ्यायची असतात तेव्हा आपण गोळ्या तोंडात टाकतो आणि थोडंसं पाणी पितो. हे झालं की आपल्याला मोठ्ठं काम झालं... एकदाची सुटका झाली, असं वाटतं.

काहीजण गोळ्या थंड पाण्याबरोबर घेतात, तर काहीजण गरम पाण्याबरोबर घेतात.

ज्या लोकांना गोळ्या गिळायला आवडत नाही, ते औषधांची चव समजू नये किंवा जाणवू नये म्हणून अनेकदा ती चहा, कॉफी, दूध किंवा शीतपेयांसोबत घेतात.

काहीजण औषधं किंवा गोळ्या डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितलं असेल त्याप्रमाणे घेतात. तर इतरजण त्यांना दिवसभरात आठवेल त्याप्रमाणे गोळ्या घेतात.

मग...त्यांना वाटेल तेव्हा गोळ्या घेणं योग्य असतं का?

आपण औषधं किंवा गोळ्यांबरोबर जे पाणी पितो आणि ज्यावेळेस आपण औषधं घेतो, यासारख्या अगदी छोट्या गोष्टींचाही किती मोठा परिणाम असतो, हे तुम्हाला माहित आहे का?

तुम्ही गोळ्या कशाप्रकारे घेता त्याचा त्या गोळ्या म्हणजे त्यातील औषधी द्रव्यं शरीरात कशाप्रकारे शोषली जातात आणि त्याच्या परिणामकारकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

औषधांच्या गोळ्यांसंदर्भातील काही रंजक तथ्ये जाणून घेऊया.

औषधं पोटात अनेक तास राहतात...

आपल्याला औषधं विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. सिरप, सस्पेंशन्स, गोळ्या, कॅप्सूल, पावडर आणि इंजेक्शनच्या स्वरुपात औषधं असतात.

द्रव स्वरुपातील औषधं शरीरात सहजपणे शोषली जातात. मात्र खराब न होता ही औषधं दीर्घकाळ साठवून ठेवणं आणि त्यांना जतन करणं कठीण असतं.

त्यामुळे अनेक औषधं गोळ्या आणि कॅप्सूलच्या स्वरुपात तयार केली जातात. त्याचबरोबर सर्वच प्रकारची औषधं द्रव स्वरुपात घेता येत नाहीत.

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

विशेषकरून स्लो-रीलीज औषधं. म्हणजे अशी औषधं जी आपल्या पोटात गेल्यानंतर लगेच विरघळून शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत. तर त्यातील औषधी घटक अनेक तास काम करत राहतो.

स्लो-रीलीज या नावाप्रमाणेच ही औषधं त्यातील औषधी घटकाचा अंश शरीरात हळूहळू अनेक तास सोडत राहतात. अशाप्रकारच्या गोळ्या भुगा करून किंवा चावून खाऊ नयेत.

जर त्यांचा भुगा करण्यात आला किंवा त्या चुरडण्यात आल्या तर त्यातील सर्व औषधी घटक एकाच वेळी शरीरात सोडलं जाऊ शकतं. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

गोळ्या कशाबरोबर घ्याव्यात थंड किंवा गरम पाण्याबरोबर?

गोळ्या कोणत्या प्रकारच्या पाण्यासोबत घ्याव्यात हे जाणून घेऊया.

गोळ्यांसोबत कोणतं पाणी घ्यावं आणि कोणतं घेऊ नये, याची माहिती डॉक्टर गोपेश यांनी बीबीसीला दिली.

ते म्हणाले, "कोणतीही गोळी किंवा कॅप्सूल कोमट पाण्याबरोबर घेणं सर्वोत्तम ठरतं."

"गोळ्या असोत की ग्रॅन्युल्स म्हणजे कणांच्या स्वरुपात औषध असलेल्या कॅप्सूल असो की पावडरच्या स्वरुपात औषध असलेल्या कॅप्सूल असो, त्या कोमट पाण्याबरोबर घेतल्यास त्यांचा योग्य परिणाम होतो", असं ते म्हणाले.

"थंड पाण्यामुळे गोळी किंवा कॅप्सूल विरघळण्याची क्रिया मंदावते. तर गरम पाण्यासोबत गोळी किंवा कॅप्सूल घेतल्यास त्यामधील औषधी घटकाची परिणामकारकता कमी होऊ शकते", असं ते पुढे म्हणाले.

अर्थात त्यांनी असाही सावधगिरीचा इशारा दिला की डॉक्टरांनी दिलेली कोणतीही गोळी, सिरप किंवा इतर कोणतंही औषध हे डॉक्टरांनी सांगितलं असेल त्याचप्रमाणे घेतलं पाहिजे. स्वत:च्या मनानं किंवा आकलनानं कधीही औषधं घेऊ नयेत.

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. एन. विजयालक्ष्मी यांनी 'केआयएमएस हेल्थ' या वेबसाईटवर याच विषयावर प्रकाशित झालेल्या एका लेखात अशाच प्रकारची माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या तपशीलानुसार, "आपण ज्या औषधांचा सेवन करतो ती पोट आणि आतड्यांमधील पेशींद्वारे शरीरात शोषली जातात.

औषधी घटक शरीरात योग्यप्रकारे शोषली जाण्यासाठी, पोटातील आतलं वातावरण त्यासाठी अनुकूल, योग्य स्थितीत असणं आवश्यक असतं. म्हणजेच, पोट आणि आतड्यांमधील पोकळी, जिथे आपण खाल्लेलं अन्न किंवा द्रवपदार्थ जातात, तिथलं तापमान योग्य असणं आवश्यक असतं.

थंड पाण्यामुळे औषधांचा पोटात विरघळण्याचा वेग मंदावतो. तसंच थंड पाण्यामुळे पोटातील तापमानदेखील कमी होतं. यामुळे औषधी घटक शरीरात नीटप्रकारे शोषले जात नाहीत. या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो."

आपण जेव्हा गोळ्या थंड पाण्यासोबत घेतो, तेव्हा ते पाणी पोटात गेल्यावर त्या पाण्याला उबदार करण्यासाठी आपलं शरीर अधिक ऊर्जा खर्च करतं. वास्तविक आपण ज्या गोळ्या घेतलेल्या असतात त्यावर प्रक्रिया करण्यासाठी म्हणजे औषध शोषून घेण्याची प्रक्रिया करण्यासाठी शरीराकडून ऊर्जा खर्च होण्याची आवश्यकता असते. मात्र तसं न होता त्याउलट ती ऊर्जा पोटातील पाणी उबदार करण्यावर खर्च होते.

अगदी तुम्ही भात खाल्ल्यावर जरी थंड पाणी प्यायलात तरीसुद्धा शरीर अन्नातील पोषक घटकांना शोषून घेण्याऐवजी, त्या थंड पाण्याला शरीराच्या तापमानाइतकं उबदार करण्यासाठी ऊर्जा खर्च करतं.

मग गरम पाण्यासोबत औषधं घेणं योग्य असतं का?

त्या लेखात डॉ. विजयालक्ष्मी यांनी म्हटलं आहे की, "कोमट किंवा सामान्यपणे खोलीचं तापमान असतं तितकं तापमानाचं म्हणजे घरात सहसा ज्या तापमानाचं पाणी असतं, तसं पाणी औषधांसोबत घेतल्यास त्यामुळे औषधं शरीरात अधिक वेगानं विरघळतात आणि त्यांचा परिणामदेखील लवकर होतो."

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

औषधांचं सेवन करण्यामागचा उद्देश, ती शरीरात पटकन विरघळावीत, त्यामधील औषधी घटक शरीरात पटकन शोषले जावेत आणि त्यांचं काम सुरू व्हावं, असा असतो. थंड पाण्यासोबत गोळ्या घेतल्यामुळे ही प्रक्रिया मंदावू शकते, असं त्यांनी सांगितलं.

औषधं गरम पाण्यासोबत घेऊ नयेत. कारण त्यामुळे औषधांचा गुणधर्म किंवा परिणामकारकता नष्ट होऊ शकते. औषधांसोबत तिथल्या सध्याच्या तापमान असलेल्या (रूम टेम्परेचर) पाण्याचाच वापर करावा, असं त्या म्हणतात.

दूध, मिनरल वॉटर किंवा ज्यूससोबत औषधं घेणं योग्य असतं का?

"साध्या पाण्यासोबत औषधं घेणंच सर्वोत्तम असतं. कारण दूध, मिनरल वॉटर, ज्यूस, बिअर आणि वाईन सोबत औषधं घेतल्यास काहीवेळा त्या औषधांच्या परिणामात बदल होऊ शकतो," हे उर्सुला सेलेरबर्ग यांचं वक्तव्य द हिंदूनं त्यांच्या लेखात दिलं आहे.

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

उर्सुला सेलेरबर्ग या फेडरल युनियन ऑफ जर्मन असोसिएशन्स ऑफ फार्मासिस्ट्सच्या प्रवक्त्या आहेत.

"दुधामध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियम रक्ताला चिकटतं. त्यामुळे औषध रक्तप्रवाहात जाण्यास अडथळा निर्माण होतो. अगदी कपभर कॉफीमध्ये एक थेंब दूध असल्यावरदेखील त्याचा औषधाच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकतो. हीच बाब कॅल्शियम-फोर्टिफाईड ज्यूस आणि कॅल्शियमचं अधिक प्रमाण असलेल्या मिनरल वॉटरच्या बाबतीत देखील होऊ शकते," असा इशारा त्यांनी दिला.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे काही औषधांची परिणामकारकता कमी होऊ शकते. विशेषकरून थायरॉईड हार्मोन्स, ऑस्टिओपोरोसिसची औषधं आणि अनेक प्रकारची अँटिबायोटिक्स यांच्या परिणामकारकेत घट होऊ शकते, असं उर्सुला सेलेरबर्ग यांनी सांगितलं आहे.

द्राक्षाचा रस

इतर फळांच्या रसाशी तुलना करता, द्राक्षाच्या रसामुळे अनेक प्रकारच्या औषधांचे परिणाम आणि दुष्परिणाम यात वाढ होते, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.

"द्राक्षाच्या रसामुळे आपल्या शरीरात जे औषधांचं विघटन करणारं करणारे एन्झाईम असतात, त्यांना रोखलं जातं," असं सेलेरबर्ग म्हणाल्या.

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

द्राक्षाच्या रसाचा उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, लिपिड चयापचयाचे विकार आणि इतर जुनाट किंवा दीर्घकाळ असलेल्या आजारांवरील औषधांवर परिणाम होऊ शकतो.

असे दुष्परिणाम, संत्री आणि सफरचंदाच्या रसाच्या बाबतीत आतापर्यंत आढळून आलेले नाहीत.

मद्य

कोणत्याही परिस्थितीत मद्यासोबत औषधं घेऊ नयेत.

कारण मद्याची काही सक्रिय औषधांबरोबर परस्परक्रिया होऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

औषधासोबत किती पाणी प्यायला हवं?

काहीजण पाणी न घेता थेट औषधाचं सेवन करतात.

यामुळे आवरण नसलेली गोळी जिभेला चिकटते. तसंच त्यामुळे जिभेवर कटवट चवही येते.

डॉ. प्रदीप सिंह मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. हेल्थसाईट डॉट कॉमनं डॉ. प्रदीप सिंह यांचं वक्तव्य दिलं आहे. त्यात म्हटलं आहे की जर तुम्ही पाण्याशिवाय गोळी घेतली, तर ती तुमच्या घशामध्ये अडकू शकते आणि तुम्हा गळा बंद होऊन तुम्हाला गुदमुरल्यासारखं वाटू शकतं.

"जर तुम्ही पाण्याशिवाय गोळी घेतली, तर तिचं विघटन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे गोळी पचनसंस्थेतून तशीच पुढे जात शौचावाटे बाहेर पडेल. जर गोळीचं विघटन न होताच ती शरीराबाहेर पडली, तर त्याचा अर्थ त्या औषधाचा शरीराला कोणताही फायदा मिळालेला नाही," असं ते म्हणतात.

उदाहरणार्थ, आयबुप्रोफेनसारखी नॉन-स्टेरॉयडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधं पुरेशा पाण्यासोबत घेतली नाहीत, तर त्यांची पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत अभिक्रिया होते किंवा त्याच्याशी ते जोडले जातात. त्यामुळे पोटात अल्सर होऊ शकतात, असं डॉ. प्रदीप सांगतात.

औषधं थंड पाण्याबरोबर घ्याव्यीत की गरम पाण्याबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही सर्वसाधारपणे गोळी घेताना खोलीतील तापमान असलेलं एक ग्लास पाणी पिऊ शकतात. जर तुम्हाला याबाबत काही शंका असेल, तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.

(स्त्रोत: इंडियन मेडिकल असोसिएशन, एनएचएस.युके, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन)

(टीप: ही माहिती फक्त जनजागृतीसाठी देण्यात आली आहे. आरोग्य, उपचार आणि औषधांशी संबंधित बाबींमध्ये थेट वैद्यकीय सल्ल्याचं पालन करावं, किंवा डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.