'आजूबाजूला पडणाऱ्या मिसाईल्सकडे हताशपणे बघायचो'; इराणहून परतलेल्या भारतीय खलाशांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
इराणच्या अधिकाऱ्यांनी, गेल्या वर्षी, 8 डिसेंबर 2025 रोजी जप्त केलेल्या 'एमटी व्हॅलीयंट रोअर' (MT Valiant Roar) या जहाजावरील आठ भारतीय कर्मचारी रविवारी पहाटे भारतात परतले.
संयुक्त अरब अमिरातीच्या दिब्बा बंदराजवळ इराणच्या अधिकाऱ्यांनी हे जहाज जप्त केलं होतं.
आंतरराष्ट्रीय सीमेतून जप्त करण्यात आलेल्या या जहाजात 16 भारतीय कर्मचारी उपस्थित होते.
इराणने अटक केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी 10 फेब्रुवारी रोजी भारतात परतले होते. उर्वरित आठ कर्मचाऱ्यांची 27 फेब्रुवारी 2026 रोजी सुटका होऊनही, त्यांना भारतात परतता आलं नव्हतं.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, जहाजाचे कॅप्टन आणि इतर सात जण 29 मार्च 2026 रोजी भारतात परत आले.
भारतात परतण्याची आशा सोडून बसलेले हे खलाशी आता पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करतील. यापैकी एकाचं लवकरच लग्नही होणार आहे.
या खलाशांनी फोनवरून बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधींशी बोलताना इराणमध्ये तयार झालेल्या बिकट परिस्थितीची माहिती दिली.
'आम्हाला वाटलं होतं आता भारतात परतणं शक्य नाही'
इराणच्या अधिकाऱ्यांनी या जहाजातून बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 6000 मेट्रिक टन डिझेलची वाहतूक होत असल्याचा आरोप लावला होता. युएईच्या दिब्बा बंदराजवळ आंतरराष्ट्रीय हद्दीतून हे जहाज जप्त करण्यात आलं होतं. 'एमटी व्हॅलियंट रोअर' नावाच्या या जहाजावरुन 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
या जहाजाचे कॅप्टन, विजय यांनी सांगितलं, संयुक्त अरब अमिरातीच्या दिब्बा बंदराजवळील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत त्यांच्या जहाजावर अचानक गोळीबार झाला. नंतर त्यांना समजलं की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड या सुरक्षा दलाने हा गोळीबार केला होता.
या गोळीबारानंतर इराणच्या सुरक्षा दलाने हे जहाज आंतरराष्ट्रीय हद्दीतून इराणच्या अब्बास बंदरापर्यंत नेलं.

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
विजय यांनी असा दावा केला की, या प्रवासादरम्यान इराणच्या अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे फोन, पैसे, मोबाईल, लॅपटॉप, कपडे, पासपोर्ट, इतर साहित्य आणि एवढंच नाही तर शैक्षणिक कागदपत्रं सुद्धा जप्त केली.
कॅप्टन विजय म्हणाले, "आम्हाला बऱ्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं गेलं, पण आम्ही तसं करण्यास नकार दिला."
या जहाजावरील एकूण 18 कर्मचाऱ्यांपैकी 16 व्यक्ती भारतीय होत्या. यापैकी 10 जणांना तुरुंगात पाठवण्यात आलं आणि इतर सहा जणांना 27 फेब्रुवारीपर्यंत जहाजाच्या मेसरूममध्ये नजरकैदेत ठेवलं गेलं.
या कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत तिथे ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
जहाजाचे सेकंड इंजिनिअर, राजशेखर डुंगा, फोनवर बोलताना भावूक झाले आणि म्हणाले, "धान्य नसल्याने आम्ही मीठ-भात खायचो आणि प्यायचं शुद्ध पाणीही नव्हतं. त्यामुळे मग कारखान्यात वापरलं जाणारं पाणी उकळून प्यावं लागायचं."
दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 15 जानेवारी 2026 रोजी सरकारला या प्रकरणावर उत्तर मागितलं आणि परराष्ट्र मंत्रालयाने 20 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात प्रतिसाद दिला.
परराष्ट्र खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटलं की, "परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना दूतावासामार्फत भेटण्याची (काउन्सिलर अॅक्सेस) परवानगी देण्यात आली आहे."
भारतीय दूतावासाने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काउन्सिलर अॅक्सेस दिल्याचं सतीश नावाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
या खलाशांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, हा अॅक्सेस मिळण्याआधी भारतात परतण्याच्या आशा संपूर्णपणे मावळल्या होत्या. त्यांना असं वाटलं होतं की आता ते भारतात कधीही परतू शकणार नाहीत, कारण अनेकांना अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे जहाजावर अडकून पडावं लागलं होतं.
सुटका तर झाली, पण...
10 फेब्रुवारी 2026 रोजी यापैकी आठ जण भारतात पोहोचले होते. पण तुरुंगात असलेले दिल्लीचे केतन मेहता, उत्तर प्रदेशचे अनिल कुमार सिंग, हरियाणाचे सतीश कुमार, आंध्र प्रदेशचे व्यंकटराव आणि बिहारचे मसूद आलम यांना सोडण्यात आलं नव्हतं.
इराणच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना परत जहाजावर नेल्याचं ते म्हणाले. जिथे आधीच उत्तर प्रदेशचे कॅप्टन विजय, आंध्र प्रदेशचे राजशेखर डुंगा आणि नंदकी व्यंकटेश नजरकैदेत होते. अखेर 27 फेब्रुवारी रोजी या लोकांची सुटका झाली.

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर भारतीय दूतावासाने हस्तक्षेप केला आणि इराणच्या सुरक्षा दलाकडून सर्व कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट परत मिळवले. पासपोर्ट मिळाल्यानंतर आता आमची सुटका होईल असं या कर्मचाऱ्यांना वाटलं पण त्याच रात्री अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला.
"युद्ध सुरु झाल्याने सुटकेचा आनंद क्षणभंगुर ठरला," असं जहाजाचे कॅप्टन विजय म्हणाले.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध सुरु झालं आणि इराणच्या हवाई आणि जलमार्गाने होणारी वाहतून पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे सुटका होऊनही हे खलाशी इराणमध्येच अडकून पडले.
'असहाय्य होऊन आजूबाजूला पडणाऱ्या क्षेपणास्त्रांकडे बघायचो'
इराणच्या अब्बास बंदरात या खलाशांचं जहाज होतं. हे ठिकाण इराणच्या नौदल तळापासून खूप जवळ होतं. अशातच हे युद्ध सुरु झालं आणि या कर्मचाऱ्यांची चिंता वाढू लागली.
कॅप्टन विजय म्हणाले की इच्छा असूनही त्यांना त्यांचं जहाज घेऊन इतर ठिकाणी जाता आलं नाही. कारण जहाजावर दिशा दाखवणारी(नेव्हिगेशन) सगळी यंत्रणा इराणच्या अधिकाऱ्यांनी आधीच काढून घेतली होती.
"या परिस्थितीत आम्ही आकाशातून पडणाऱ्या क्षेपणास्त्रांकडे असहाय्य होऊन बघत बसायचो. ही क्षेपणास्त्रं आमच्या आजूबाजूलाच पडत होती," असं विजय यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
कॅप्टन विजय म्हणाले की, त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी कसलीही सुविधा किंवा उपकरणं नसल्याची माहिती त्यांनी त्यांच्या कंपनीला दिली होती. तरीही, कंपनीने सर्वांना जहाजावरच थांबण्याचा आदेश दिला.
बीबीसी न्यूज हिंदीने कॅप्टन विजयच्या आरोपांसंदर्भात कंपनीचे मालक जोगविंदर ब्रार यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. भारतीय दूतावासाने तीन मार्चच्या रात्री या कर्मचाऱ्यांना जहाजावरुन वाचवलं आणि अब्बास बंदरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आश्रय दिला.
केतन मेहता म्हणाले की, तिथेही उध्वस्त झालेल्या इमारतीचे अवशेष बघून दिवसभर झोप यायची नाही आणि रात्री देखील क्षेपणास्त्रांची दहशत असायचीच.
जहाजाचे मुख्य अभियंते अनिल कुमार सिंग यांनी केतन मेहता यांना थांबवलं आणि म्हणाले, "माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मला एवढी दहशत, भीती आणि चिंता कधीही वाटली नव्हती. या संपूर्ण काळात प्रत्येक क्षणाला मृत्यूची आठवण होत होती."
भारतीय खलाशांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे परिस्थिती एवढी खराब होती की क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे रात्रभर त्यांच्या हॉटेलच्या भिंती थरथरत होत्या.
उत्तर प्रदेशच्या अनिल कुमार सिंह यांनी सांगितलं की, 3 ते 11 मार्चपर्यंत परिस्थिती अधिकाधिक बिघडत गेली, पण 11 मार्चनंतर हे हल्ले कमी झाले.
पैश्यांशिवाय दोन देशांचा प्रवास केला
भारतीय दूतावासाने 15 मार्च रोजी अर्मेनियाची सीमा उघडल्याचं कॅप्टन विजय यांना कळवलं. या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, इराणच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कपडे, पैसे सगळंच काढून घेतलं होतं त्यामुळे, त्यांना भारतात परत येण्यासाठी उधारीने पैसे घ्यावे लागले.
पैसे मिळाल्यानंतर त्यांनी एक कॅब भाड्याने घेतली. या प्रवासात काही ठिकाणी बॉम्बहल्ले होत होते असं ते म्हणाले. अर्मेनियाच्या सीमेआधीच त्यांना इराणच्या जोल्फा येथे थांबावं लागलं. हे शहर सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर होतं.
तीन दिवस वाट बघितल्यानंतर सगळ्यांना अर्मेनियाचा व्हिसा मिळाला. 27 मार्च रोजी हे कर्मचारी अर्मेनियाची राजधानी येरेवानमध्ये पोहोचले. तिथे विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये त्यांनी रात्र घालवली आणि 28 मार्चच्या संध्याकाळी ते दुबईत पोहोचले.

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
हे सगळे लोक 29 मार्चच्या पहाटे पाच वाजता मुंबईत पोहोचले.
डीजी शिपिंग ऑफ इंडियाच्या पुढाकारामुळे या विमानांची तिकिटे सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. कॅप्टन विजय म्हणाले, "आम्ही इराणच्या ताब्यात होतो तेव्हा जहाजावरील अन्न, वकील, हॉटेल, टॅक्सीचा खर्च इत्यादींसह सर्व अत्यावश्यक गोष्टी आणि आमच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनी मालकाची होती. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही निराश झालो."
भारतीय दूतावासाने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांच्या कंपनीने फक्त अब्बास बंदराजवळ असलेल्या हॉटेलचा खर्च उचलला, पण जोल्फातील हॉटेलचा खर्च भारतीय दूतावासाने केला. अर्मेनियात ते ज्या हॉटेलमध्ये राहिले त्याचा खर्च मात्र कर्मचाऱ्यांनी स्वतः उचलल्याचं सांगितलं.
मसूद आलम यांनी कॅप्टन विजय यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "आम्हा कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांचा पगार अडकला आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही पुन्हा या कंपनीच्या जहाजावर जाण्याची हिंमत कशी करावी?"
गंभीर गुन्हेगारांसोबत तुरुंगात घालवलेली रात्र ते आता लग्नाची तयारी

फोटो स्रोत, Mohammad Sartaj Alam
मसूद आलम म्हणतात की या प्रवासाच्या कटू आठवणी आता कधीही पुसल्या जाणार नाहीत.
"आम्हाला इराणी लोकांनी हत्या, बलात्कार आणि ड्रग्ज तस्करीचे आरोप असणाऱ्यांसोबत तुरुंगात ठेवलं होतं. आम्ही निर्दोष होतो त्यामुळे हे सगळं खूप अवघड होतं. आम्ही हे कधीही विसरू शकणार नाही आणि या सगळ्याची जबाबदारी आमच्या कंपनीची आहे," असं मसूद म्हणाले.
एवढ्या संकटांचा सामना करून भारतात परत आलेल्या या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मसूद आलम यांचं ईदनंतर लग्न होणार होतं, इराणमध्ये अडकल्यानंतर हे लग्न रद्द होतंय की काय असं वाटत होतं पण अखेर आता हे लग्न होणार आहे.
आता लग्नाची नवीन तारीख ठरणार आहे आणि त्यांच्या घरी पुन्हा एकदा जोमाने तयारी देखील सुरु झाली आहे.
आजकाल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती लग्नाच्या खरेदीत गुंतला असल्याचं मसूद यांच्या मेहुण्याने बीबीसी हिंदीला सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























