पाकिस्तानी क्रिकेट लीगमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाकडून बॉल टॅम्परिंग? नेमकं काय घडलं?

खेळाडू आणि अंपायर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीकडून बॉल घेतल्यानंतर तपासताना अंपायर्स.
    • Author, रशीद शकूर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, कराचीहून
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तान सुपर लीगमध्ये गतविजेता लाहोर कलंदर्स संघ आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कराची किंग्स यांच्यातील सामन्याच्या शेवटच्या ओव्हरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

या ओव्हरमध्ये कराची किंग्सला विजयासाठी 14 धावांची गरज होती. हारिस राऊफ शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणार होता. पण ओव्हर सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक प्रकार घडला.

ओव्हर सुरू होण्यापूर्वी घडलेला हा प्रकार चाहत्यांनी टीव्ही स्क्रीनवरही पाहिला आणि व्हायरल झालेल्या या दृश्यानं खळबळ उडाली. व्हीडिओमध्ये लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी, हरिस राऊफ आणि फखर झमान एकत्र उभे असल्याचे दिसत आहे.

शाहीन आफ्रिदी गोलंदाजाची कॅप पंचांना देत आहे आणि चेंडू फखर जमानच्या हातात आहे. तो चेंडू स्वतःकडे ठेवून हारिसला देतो. शाहीन आफ्रिदी हसत जागेवर जाऊ लागतो पण याचदरम्यान अंपायर फैसल आफ्रिदी हारिस राऊफकडे चेंडू मागतात.

पुढे मैदानावर जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. अंपायर फैसल आफ्रिदी यांनी चेंडू तपासला आणि सहकारी पंच शराफुदुल्ला यांच्याशी सल्लामसलत केली. त्यानंतर पंचांनी कराची किंग्सला पाच पेनल्टी धावा दिल्या. त्यावरून चेंडूशी छेडछाड झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

त्यावेळी मैदानातील कराची किंग्सचे फलंदाज आझम खान आणि खुशदिल शाह यांना बदललेला चेंडू निवडण्याची परवानगी देण्यात आली.

शाहीन आफ्रिदी, फखर झमान आणि पीसीबीनं काय म्हटलं?

सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रमीझ राजा यांनी कर्णधार शाहीन आफ्रिदीला चेंडू बदलण्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की, पाच पेनाल्टी धावा का दिल्या हे त्याला अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल अंपायर का म्हणतात ते पाहणार असल्याचं तो म्हणाला.

सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जाहीर केलं. पाकिस्तान सुपर लीगमधील प्लेयर्स अँड सपोर्ट पर्सनल कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल 41.3 च्या कलम 2.14 अंतर्गत फखर झमानवर लेव्हल 3 च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आलं. त्यात बॉलची कंडिशन बदलण्यासाठी केलेल्या कृत्याला गुन्हा ठरवलं जातं.

फखर झमान सामनाधिकारी रोशन महानामा यांच्यासमोर हजर झाला आणि त्यांनं बॉल टॅम्परिंचे आरोप फेटाळून लावले.

शाहीन शाह आफ्रिदी आणि फखर झमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहीन शाह आफ्रिदी आणि फखर झमान

आता या संदर्भात 48 तासांत शिस्तभंगाची पुढील सुनावणी घेण्यात येईल. त्यात व्हीडिओ पुराव्याचा वापर केला जाईल, त्यानंतर सामनाधिकारी निर्णय देतील.

फखर झमानवरील आरोप सिद्ध झाले, तर त्याला पीएसएल टेक्निकल कमिटीकडे अपील करण्यासाठी 48 तासांचा कालावधी मिळेल.

लेव्हल 3 व्हायलेशनमध्ये एखाद्या खेळाडूनं पहिल्यांदाच उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावर किमान एक आणि कमाल दोन सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते.

या संपूर्ण प्रकारानंतर सोशल मीडियातून पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

शेवटच्या ओव्हरमध्ये हारिस राऊफ गोलंदाजी करणार होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेवटच्या ओव्हरमध्ये हारिस राऊफ गोलंदाजी करणार होता.

कशी होते बॉल टॅम्परिंग?

क्रिकेटच्या बॉल टॅम्परिंगचे अनेक मार्ग आहेत. त्यातली सर्वात सोपी पद्धत म्हणजे, खिळ्यांनी बॉलचं स्ट्रक्चर खराब करणे.

त्याशिवाय बाटलीच्या झाकणांचाही वापर केला जातो. पण चेंडूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फेरफार करण्यात आल्याच्या इतर काही घटनाही घडल्या आहेत.

1994 मध्ये इंग्लंडचा माईक अॅथर्टन यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटीदरम्यान पॅन्टच्या खिशात माती ठेवत चेंडूबरोबर छेडछाड केल्याचं आढळलं होतं. पण त्याच्यावर बंदी घालण्यात आली नाही. मात्र, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्याच्यावर दंड आकारला होता.

2006 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगची घटना घडली, त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला.

अंपायर डेरिल हेअर यांनी पाकिस्तानी संघाचा बॉल टॅम्परिंगशी संबंध असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर कर्णधार इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ मैदानाबाहेर गेला. ते परत आले, तेव्हा अंपायर्सनी खेळ थांबल्याचं घोषित करून सामना इंग्लंडला बहाल केला.

इंज़माम उल हक़ और अंपायर डेरिल हेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंझमाम उल हक आणि अंपायर डेरिल हेयर (बसलेले उजीकडून दुसरे.)

2010 मध्ये पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी चेंडूची छेडछाड करताना पकडला गेला होता.

त्याने चेंडू विचित्र पद्धतीने चावला होता. त्यामुळं पंचांना चेंडू बदलावा लागला. त्यानंतर आफ्रिदी सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासमोर हजर झाला आणि त्याने माफी मागितली. त्यानंतर आयसीसीने आफ्रिदीवर दोन ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घातली होती.

2018 मध्ये, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील केपटाऊन कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमेरॉन बँक्रॉफ्ट सँडपेपर वापरताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं होतं.

शाहीद आफ्रिदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बॉल टॅम्परिंगप्रकरणी आयसीसीनं आफ्रिदीवर दोन टी-20 इंटरनॅशनल सामन्यांची बंदी घातली होती.

ही घटना क्रिकेटच्या इतिहासातील बॉल टॅम्परिंगची सर्वात मोठी घटना म्हणून समोर आली. त्याला 'सँडपेपरगेट' म्हणूनही ओळखलं जातं. त्यात केवळ बँक्रॉफ्टच नव्हे, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश होता.

या प्रकरणात स्मिथने कर्णधारपद आणि वॉर्नरने उपकर्णधारपद गमावले. प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीही राजीनामा दिला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्वतः क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधून या घटनेत सामील क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची, तर बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली.

यानंतर स्टीव्ह स्मिथ पत्रकार परिषदेत खूप रडला आणि त्याने कृतीबद्दल सर्वांची माफी मागितली. , हे सर्वांना चांगलेच आठवते.

पाकिस्तानचा वकार युनूस, भारताचा राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचा फॅफ डु प्लेसिस यांनाही चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदी आणि दंडाचा सामना करावा लागला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)