जसप्रीत बुमरा : आईच्या भीतीमुळे कसा बनला 'यॉर्कर किंग'? काय आहे गोलंदाजीचं वैशिष्ट्य?

बुमरा

फोटो स्रोत, AFP via Getty Images

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात इतिहास घडलाय. भारताच्या आक्रमक फलंदाजांनी शेवटच्या दोन सामन्यात तब्बल 250 धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम केला आणि सलग दुसऱ्यांदा हा विश्वचषक भारताच्या नावे केला.

एका बाजूला संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे, रिंकू सिंग असे एकाहून एक आक्रमक फलंदाज भारताकडून खेळत होते.

तर दुसऱ्या बाजूला एक नाव अगदी शांतपणे भारतीय गोलंदाजीच्या पाठीचा कणा बनून भारताला सामने जिंकवून देत होतं.

ते नाव होतं 'जसप्रीत जसबीरसिंग बुमरा'.

खरंतर भारतीय क्रिकेटला वेगवान गोलंदाजांची मोठी परंपरा नाही.

झहीर खान, जवागल श्रीनाथ, कपिल देव आणि अशी नावं घेता येतील. पण हे सगळे गोलंदाज एकीकडे आणि सातत्याने भेदक यॉर्कर टाकणारा जसप्रीत बुमरा एकीकडे.

बरं मागच्या काही दशकांमध्ये 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाजही भारतीय संघात आले पण बुमराचा अचूकपणा, मोक्याच्या वेळी वेग बदलण्यासाठी लागणार चाणाक्षपणा आणि सातत्याने विकेट्स मिळवण्याची कला मात्र फक्त जसप्रीतकडेच आहे असं म्हणावं लागेल.

कुटुंबासह बुमरा

फोटो स्रोत, Getty Images

जसप्रीतने त्याच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक बहुमान पटकावले आहेत. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजयी केलं आहे.

जगभरातल्या अनेक खेळाडूंनी जसप्रीतच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. काहींना त्याची अ‍ॅक्शन वेगळी वाटते, काहींना त्याच्या मानसिकतेचं कौतुक वाटतं पण एक गोष्ट जी बुमराला जगावेगळी करते, ती म्हणजे जेव्हा हवं तेव्हा स्टम्पच्या मुळाशी यॉर्कर टाकण्याची त्याची कला.

आज आपण याच यॉर्करची गोष्ट जाणून घेणार आहोत. जसप्रीत यॉर्कर टाकायला कसा शिकला? त्याची कारकीर्द कशी होती हे देखील आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

सलग दोन विश्वचषक विजयाचा शिल्पकार

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी चांगला खेळ केला. सुरुवातीला अंतिम 11 चा भागही नसणाऱ्या संजू सॅमसनने तर शेवटच्या तीन निर्णयकी सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतकं झळकावली त्याला मालिकावीराचा खिताबही मिळाला.

पण अत्यंत निर्णायक क्षणी कधी 'यॉर्कर,' कधी 'स्लोवर' तर कधी 'ऑफ कटर' टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा जसप्रीत बुमरा हा भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

32 वर्षांच्या जसप्रीतने मागच्या 13 वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट रसिकांना अशा अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार केलं आहे.

2013 ला रणजीमध्ये पदार्पण होण्याचाही आधी आयपीएलमध्ये आलेल्या या तरुण गोलंदाजाने मागच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

कसोटी असो, एकदिवसीय असो वा टी-20 जसप्रीतने मेहनतीच्या आणि शिस्तीच्या बळावर त्याच्या गोलंदाजीची धार कमी होऊ दिलेली नाही.

जसप्रीत बुमरा

फोटो स्रोत, Matt Roberts/Getty Images

फोटो कॅप्शन, 7 जुलै 2014 रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे अ‍ॅलन बॉर्डर फील्डवर ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यातील चौरंगी मालिकेच्या सामन्यात भारत अ संघाचा जसप्रीत बुमरा गोलंदाजी करताना.

सुरुवातीला मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगाकडे पाहून गोलंदाजीचं बाळकडू घेतलेल्या बुमराने अल्पवधीतच आधी मुंबईच्या संघात आणि नंतर भारतीय संघात त्याचं स्थान पक्कं केलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही.

सध्या जसप्रीत बुमरा जगातला अव्वल गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तो मैदानात आला की त्याचे फॅन्स 'बूम बूम बुमरा'चा गजर करतात.

खरंतर भारतीय संघात एवढ्या तेजतर्रार गोलंदाजाचं असणं हेच भारतीय क्रिकेटरसिकांसाठी सुखावह असतं. पण बुमराची अचूक, भेदक आणि निर्णायक क्षणी भारताला जिंकवून देणारी गोलंदाजी हे समीकरण खूपच वेगळं आहे.

'घरात हॉलमध्ये शिकलो यॉर्कर'

जगातील भल्याभल्या फलंदाजांना बाद करणाऱ्या बुमराच्या 'यॉर्कर'ची नेहमीच चर्चा होत असते. पण 2017 साली विक्रम साठ्ये यांना दिलेल्या मुलाखतीत बुमराने त्याच्या यॉर्कर्सचं गुपित उलगडून सांगितलेलं आहे.

त्या मुलाखतीत बुमराने म्हटलं की, "मी दिवसभर टीव्हीवर क्रिकेट बघायचो. मी वसीम अक्रम-वकार युनूस यांना गोलंदाजी करताना बघायचो. त्या काळात त्यांना बॉलिंग किंग म्हटलं जायचं. मी बघायचो की त्यांना यॉर्करवर विकेट मिळत होत्या. मग विकेट हवी असेल तर फक्त यॉर्कर हा एकच मार्ग आहे असं मला वाटायला लागलं."

जसप्रीत बुमरा

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images

"उन्हाळ्यात सतत बाहेर खेळायला जाता यायचं नाही. आमच्या घरातला हॉल खूप मोठा होता. त्यामुळे मग भिंतीच्या तळाशी म्हणजे जिथं भिंत आणि फ्लोअरिंग मिळतं त्या कोनात बॉल टाकला तर आवाज कमी होतो, हे माझ्या लक्षात आलं.

असं केल्याने जास्त वेळ खेळता यायचं. कारण आवाज आला रे आला की आई बाहेर यायची आणि चांगलीच रागवायची. त्यामुळे भिंतीच्या तळाशी बॉल टाकून मी खेळायचो, हळू हळू टेनिस आणि रबर बॉलने खेळायला लागलो.

पण आधी घरात केलेल्या सरावामुळे मला फक्त स्टम्पच्या तळाशीच बॉलिंग करता यायची आणि असा मी यॉर्कर टाकायला लागलो," बुमराने सांगितलं.

'हे' आहे जसप्रीतच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य

जसप्रीतचं त्याच्या बॉलिंगवर उत्तम नियंत्रण असल्याचं विश्लेषक सांगतात. 32 वर्षांच्या जसप्रीतने हे कौशल्य वारंवार सिद्ध केलं आहे.

6 डिसेंबर 1993 ला अहमदाबादमधील एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या जसप्रीतने आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. 7 वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या जसप्रीतला आई दलजीतने मोठं केलं.

चेंडू फेकण्याच्या त्याच्या वेगळ्या अ‍ॅक्शनमुळे बॅट्समन नेहमी फसतात. शाळेत असताना त्याची निवड गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरात झाली होती.

तेथून त्याची निवड एमआरएफ फाऊंडेशनमध्ये झाली. बघता बघता त्याची निवड गुजरातच्या 19 वर्षांखालील संघात झाली.

जसप्रीत बुमरा

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP via Getty Images

जसप्रीतची कामगिरी लक्षात घेत त्याची निवड सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी झाली. गुजरात संघाच्या विजयात जसप्रीतची कामगिरी महत्त्वाची ठरली.

पण या कामगिरीपेक्षा दुसऱ्याच एका घटनेने त्याच नशिब बदललं.

त्यावेळी मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राईट पुण्यात सुरू असलेली सैय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. त्यांची नजर जसप्रीतवर पडली.

त्यांनी जसप्रीतचा करार मुंबई इडियन्ससोबत केला. ज्या ड्रेसिंगरूममध्ये सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज आणि लसिथमलिंगा सारखा जिनियस गोलंदाज होता, तिथं तो पोहोचला.

जसप्रीत बुमरा

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images

स्टार खेळाडूंच्या सहवासाचा काय परिणाम होऊ शकतो, हे जसप्रीतच्या कामगिरीवरून दिसू लागलं होतं. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात जसप्रीतला संधी दिली.

विराट कोहलीने जसप्रीतच्या पहिल्या 3 बॉलवर चौकार ठोकत, त्याचं स्वागत केलं. पुढं काय करायचं, हे जसप्रीतला समजत नव्हतं. त्याने सचिनशी सल्लामसलत केली.

"तुझ्या एका चांगल्या चेंडूने या मॅचचं चित्र बदलेल. काही काळजी करू नको, फक्त खेळावर लक्ष दे," सचिनचा हा सल्ला जसप्रीतने मानला आणि याच ओव्हरमध्ये त्याने विराटला एलबीडब्लूवर बाद केलं.

पहिल्याच सामन्यात त्याने 3 बळी घेतले. त्यानंतर जसप्रीतचं कौतुक अमिताभ बच्चन यांनीही केलं.

पण जसप्रीतला फॉर्म आणि फिटनेसची समस्या सतावू लागली. अशा स्थितीही मुंबई इंडियन्सचा त्याच्यावर विश्वास कायम होता.

लसिथ मलिंगाबरोबर स्लो बॉल आणि यॉर्करच्या कुलुप्त्या शिकण्यात त्याला काहीच अडचण आली नाही.

स्लो बॉल आणि यॉर्करला आपल्या भात्यातील घातक शस्त्र बनवण्यात तो यशस्वी ठरला. अर्थात त्याची गोलंदाजी हे त्याचं सर्वांत मोठं शस्त्र ठरलं.

2016 नंतर मागे वळून पाहिलं नाही

2013 च्या आयपीएल पदार्पणानंतर भारतीय संघात यायला जसप्रीतला तीन वर्षं लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या मैदानात मोहम्मद शमी जखमी झाल्यामुळे जसप्रीतला संधी मिळाली आणि बुमराने भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं.

त्याच महिन्यात जसप्रीतला टी-20 मध्येही संघात स्थान मिळालं आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातला भरवशाचा गोलंदाज म्हणून बुमरा नावारूपाला आला. आता एकच गोष्ट बाकी होती आणि ती म्हणजे भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवणं.

खरंतर बुमराची गोलदांजी करण्याची शैली खूप वेगळी आहे. त्यामुळे कसोटीमध्ये तो कसा खेळेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.

अखेर 2018 मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत संधी मिळाली आणि बुमराने कसोटीमध्ये देखील चमकदार सुरुवात केली.

त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात बुमराने भारताकडून एकाच वर्षात परदेशी मातीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.

जसप्रीत बुमरा

फोटो स्रोत, Shubhajit Roy Karmakar/NurPhoto via Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2019मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात देखील बुमरा भारताकडून सर्वाधिक विकेट्स (18) घेणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर त्याने कसोटी सामन्यात हॅट्रिकदेखील मिळवली. किंग्स्टन येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने ही किमया केली.

एव्हाना भारतीय संघाचा तिन्ही प्रकारांमधील हुकमी एक्का म्हणून बुमराचं नाव घेतलं जाऊ लागलं होतं.

पण इथेच बुमराला दुखापतींनी घेरलं आणि 2021-22 मध्ये बुमराने मर्यादित षटकांचे बहुतांश सामने खेळलेच नाहीत.

या दरम्यान त्याचे दोन टी-20 विश्वचषक हुकले. पण कसोटीमध्ये बुमरा उत्तम कामगिरी करतच राहिला. 2021मध्ये बुमराने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स मिळवल्या.

2023 मध्ये बुमरा तंदुरुस्त झाला आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

पण अहमदाबादच्या मैदानावर झालेला तो अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकू दिला नाही. आणि 2013 नंतर भारताचाच आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुरूच राहिला.

अखेर 2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात बुमराने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली.

अगदी पराभवाच्या घशातून त्याने विजय खेचून आणला आणि भारतीय संघाने तब्बल 13 वर्षांनंतर विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण केलं.

आता 2026 मध्येही भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. जसप्रीत बुमराने देखील सलग दुसऱ्या विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

यावर्षीच्या विश्वचषकात भारतीय फलंदाजांचीच चर्चा जास्त होती होती पण भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही.

अंतिम सामन्यात त्याने केलेली कामगिरी हा त्याचाच पुरावा म्हणावा लागेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.