मध्य पूर्वेच्या दिशेने कूच करत आहेत हजारो अमेरिकन सैनिक; ट्रम्प इराणच्या भूमीवर सैन्य उतरवतील का?

फोटो स्रोत, VANO SHLAMOV/AFP via Getty Images
अमेरिका इराणमध्ये अनेक आठवड्यांसाठी जमिनीवरील कारवाया करण्याची तयारी करत आहे, असं वृत्त इंग्रजी वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'नं दिलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लष्कराचं भूदल इराणमध्ये पाठवण्याच्या योजनेला मंजुरी देतील की नाही, हे अद्याप ठरलेलं नाही, असं या वृत्तपत्रानं म्हटलेलं आहे.
यूएसएस त्रिपोली ही युद्धनौका त्या परिसरात दाखल झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं शनिवारी (28 मार्च) दिली.
एका सोशल मीडिया पोस्टनुसार, या जहाजावर अंदाजे 3 हजार 500 खलाशी आणि नौसैनिक असून, त्यामध्ये वाहतूक आणि लढाऊ विमानेही आहेत.
अमेरिकेचे 4 हजारांहून अधिक नौसैनिक जहाजांमधून आखाताकडे रवाना होत आहेत आणि त्यांच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनचे पॅराट्रूपर्सदेखील सज्ज ठेवण्यात आले आहेत, असं सांगितलं जातंय.
दरम्यान, मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 3 देशांचे (इजिप्त, सौदी अरेबिया आणि तुर्की) परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात भेटत आहेत.
पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचे आयोजन करण्याचा प्रस्तावही दिला आहे.
तेहरानमध्ये कतारच्या अल-अरबी नेटवर्कच्या कार्यालयावर हल्ला
कतारच्या अल-अरबी टीव्हीने एका निवेदनात म्हटलंय की, त्यांच्या तेहरानमधील कार्यालयावर इस्रायली क्षेपणास्त्रानं हल्ला केला होता.
या टीव्ही चॅनलनं 'एक्स'वर वृत्त दिलंय की, त्यांच्या तेहरानमधील इमारतीचे मोठं नुकसान झालं असून थेट प्रक्षेपण थांबवण्यात आलं आहे.
प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये नेटवर्कच्या कार्यालयाच्या फुटलेल्या खिडक्या, उद्ध्वस्त झालेला अंतर्गत भाग आणि आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झालेलं दिसत होतं.
मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर डागलं दुसरं क्षेपणास्त्र
येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर दुसरं क्षेपणास्त्र डागलं आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले आहेत.
यासंदर्भातील माहिती सीएनएन आणि टाइम्स ऑप इस्रायल या वृत्तसंस्थांनी दिली आहे. मात्र, येमेनकडून डागण्यात आलेल्या एका क्षेपणास्त्राला रोखण्यात यश आल्याचं इस्रायलनं म्हटलंय.
इराणकडून समर्थन असलेल्या या हुती बंडखोरांनी इस्रायलवर एक क्रूझ क्षेपणास्त्र सोडलं. या क्षेपणास्त्राला पाडण्यात आलं. त्याआधीही हुती बंडखोरांनी एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागलं होतं.

फोटो स्रोत, Wisam Hashlamoun/Anadolu via Getty Images)
इस्रायलमधील मीडिया चॅनल 12 आणि टाइम्स ऑफ इस्रायल या वृत्तसंस्थांनी असंही सांगितलंय की, दक्षिण इस्रायलमधील इलात शहरावर ड्रोन हल्ला झाला. हा हल्ला येमेनच्या दिशेहून करण्यात आला होता.
याआधी हुती बंडखोरांनी सांगितलं होतं की, त्यांनी अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागलेले आहेत.
हे क्षेपणास्त्र 'इस्रायलमधील संवेदनशील लष्करी तळां'ना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आले होते.
हुती बंडखोरांनी या हल्ल्यांना प्रतिहल्ला असं संबोधलं आहे. त्यांनी म्हटलं, "आधी इस्रायलने इराण, लेबनान, इराक आणि पॅलेस्टाईन या भागांना लक्ष्य केलं. त्या बदल्यात आता इस्रायलवर हल्ले होत आहेत."
आतापर्यंत इराणच्या 11 हजारहून अधिक ठिकाणांना करण्यात आलं लक्ष्य - अमेरिकन सैन्य
यूएस सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितलंय की, इराणच्या विरोधात जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हापासून आतापर्यंत इराणमधील 11 हजारांहून अधिक ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, या हल्ल्यांमध्ये इराणची 150 हून अधिक विमानं नष्ट झाली आहेत किंवा अपघातग्रस्त झाली आहेत.

फोटो स्रोत, Chung Sung-Jun/Getty Images
सेंटकॉमने म्हटलं, "इराणी सत्तेची संरक्षण व्यवस्था तोडण्यासाठी ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. खासकरून त्या ठिकाणांवर जिथून तातडीनं धोका निर्माण होतोय."
अमेरिका आणि इस्रायल या देशांनी इराणवर 28 फेब्रुवारी रोजी हल्ले सुरू केले होते. पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मारले गेले.
मात्र, या सगळ्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, इराणला चर्चा करायची आहे.
ट्रम्प यांच्या या दाव्यानंतरही इराणकडून आतापर्यंत चर्चा किंवा युद्धविरामासंदर्भात कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाहीये.
जगातील सर्वात मोठ्या धातू शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक असलेल्या ॲल्युमिनियम बहरीनवर हल्ला
जगातील सर्वात मोठ्या धातू शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक असलेल्या 'ॲल्युमिनियम बहरीन'वर हल्ला झाला आहे.
बहरीनमधील 'ॲल्युमिनियम बहरीन' कंपनीनं सांगितलं की, शनिवारी (28 मार्च) झालेल्या इराणी हल्ल्यात त्यांचे 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Phil Weymouth/Bloomberg via Getty Images
कंपनीनं सांगितलं, "नुकसानीचं मूल्यांकन अजूनही सुरू आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हीत हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे."
या महिन्याच्या सुरुवातीला, 'ॲल्युमिनियम बहरीन'नं आपल्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 19 टक्के असलेल्या 3 रिडक्शन लाईन्स बंद केल्याची घोषणा केली.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला होता, म्हणून कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं शनिवारी (28 मार्च) सांगितलं की त्यांनी ॲल्युमिनियम बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियमला लक्ष्य केलेलं आहे.
इराणमधील 2 पोलाद कारखान्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हा हल्ला करण्यात आला.
यूएईच्या कंपनीनं शनिवारी सांगितलं की, प्लांटचं गंभीर नुकसान झालेलं आहे. अनेक कामगार जखमी झाले, परंतु कोणाचीही प्रकृती गंभीर नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























