'माझी मुलगी ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे', अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये तेहरानची काय अवस्था झालीय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नवाल अल-मगाफी
- Role, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय तपास प्रतिनिधी
- Author, रुझगार अकगुन, इशान जावेरी आणि एमिल कॉस्टार्ड
- Role, बीबीसी आय ओपन-सोर्स इंटेलिजन्स टीम
- वाचन वेळ: 7 मिनिटे
हवाई हल्ल्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यासमोर उभी राहून एक आई रडत रडत आपल्या मुलीला शोधत होती.
काही दिवसांपासून ती आई बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे. पूर्व तेहरानच्या रेसालत भागात तिच्या मुलीचा प्लॅट होता. या फ्लॅटच्या ढिगाऱ्यातून तिला मुलीचा शोध घ्यायचा आहे.
"मुलीला अंधाराची भीती वाटते. तिला बाहेर काढण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नाही," असं ती महिला सांगते.
गेल्या एक महिन्यापासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे.
अमेरिका आणि इस्रायल इराणच्या सरकारशी संबंधित ठिकाणांवर देशभरात हल्ले करत आहेत.
पण या हल्ल्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांवरही भयंकर परिणाम होत आहे.
आता हे लोक आकाशातून सतत होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांमुळे आणि जानेवारीमध्ये सरकारच्या दडपशाही विरोधातील आंदोलकांवर झालेल्या घातक कारवाईमुळे अडचणीत आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, सॅटेलाइट फुटेजचे विश्लेषण
युद्ध सुरू झाल्यापासून, बीबीसी आयने तेहरानमधील स्वतंत्र पत्रकारांकडून
विशेष माहिती, फुटेज गोळा केले आहेत.
बीबीसीला इराणमध्ये काम करण्यास फार क्वचितच परवानगी दिली जाते. युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना प्रवेशही देण्यात आलेला नाही.
आम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणजे साक्षीदारांचे अनुभव गोळा केले, हल्ल्यांनंतरचे चित्रिकरण केले आणि सोशल मीडिया तसेच उपग्रह (सॅटेलाइट) चित्रांचे विश्लेषण, अभ्यास केला.
आमच्या विश्लेषणात दिसून आलं की तेहरानमध्ये सरकारशी संबंधित ठिकाणांवर हल्ले झाले आहेत. त्याचे घातक परिणाम आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य नागरिकांवरही झाले आहेत.
रेसालतमधील बहु-मजली इमारतीत अनेक कुटुंबं राहात होती. 9 मार्च रोजी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ही संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली.
या अवशेषाखाली (ढिगारा) अडकलेली महिला तिचा पती आणि लहान मुलीसह या कॉम्पलेक्समध्ये राहत होती.

हवाई हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ती आणि तिची मुलगी ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत आढळून आली. पती यातून कसातरी बचावला होता.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली आणखी एक इमारतही हवाई हल्ल्यात नष्ट झाली.
या इमारतीत राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीने सांगितलं की, हल्ला खूप 'अचानक' झाला आणि ते 'खोलीत अक्षरशः फेकले गेले' होते.
आता त्यांच्या मालकीची सर्व मालमत्ता या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे, असं ते म्हणाले.
"माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही. माझी सर्व कागदपत्रं, सर्व काही नष्ट झालं आहे."
केवळ या एका हल्ल्यामुळं सुमारे 40 ते 50 लोक मारले गेल्याचं स्थानिक अधिकारी आणि नागरिकांनी सांगितलं.
रहिवासी भागावर हल्ले
या हल्ल्यामुळे बेघर झालेले काही लोक सध्या जवळच्या हॉटेलमध्ये राहत आहेत. ते पुढे म्हणाले, "हेच आमचं जीवन होतं."
इस्रायलच्या संरक्षण दलानं (आयडीएफ) या हल्ल्याबाबत बीबीसीला सांगितलं. इराणमधील बसीज या निमलष्करी गटाकडून वापरल्या जाणाऱ्या एका इमारतीवर हल्ला केला होता, असं त्यांनी म्हटलं. हा गट इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित आहे.
परंतु, हल्ल्याचा परिणाम त्या एका ठिकाणापुरता मर्यादित राहिला नव्हता, हे नंतरच्या तपासणीत समजलं. त्याच्याही फार पुढे आजूबाजूच्या परिसरावर हा परिणाम झाला होता.
हल्ला झाल्यानंतर काही दिवसांत घेतलेल्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये किमान चार इमारती उद्धवस्त झाल्याचं दिसत आहे.
यातील एक इमारत बसीजशी संबंधित होती. पण, आजूबाजूला निवासी इमारती होत्या.
बीबीसी आयने तपासलेल्या व्हीडिओत संपूर्ण परिसराचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतं. आमच्या विश्लेषणानुसार, स्फोटामुळे 65 मीटर अंतरापर्यंतच्या इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्थानिक लोक सांगतात की, काही सेकंदांच्या अंतराने एकामागोमाग अनेक स्फोट झाले.
"त्यांनी तीन वेळा हल्ला केला," असं यातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितलं
"कदाचित तीन ते पाच सेकंदांचं अंतर होतं. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण दगड-विटांचा ढिगारा माझ्या डोक्यावर पडला."
लष्करी तज्ज्ञांनी बीबीसी आयला सांगितलं की, इस्रायलचे हवाई दल तेहरानमध्ये मोठ्या शक्तीचे बॉम्ब वापरत असावे. हे 'मार्क 80' मालिकेतील बॉम्ब आहेत आणि त्यांना नेमकं लक्ष्य साधण्यासाठी खास मार्गदर्शन प्रणाली लावलेली असते.
ते सांगतात की, रेसालतमध्ये झालेलं मोठं नुकसान 'मार्क 84' नावाच्या मोठ्या बॉम्बमुळे झाले असावे. हा बॉम्ब या मालिकेतील सर्वात मोठा आणि सुमारे 2 हजार पाउंड वजनाचा (साधारण 907 किलो) आहे.
शहरात असेच स्फोट न झालेले बॉम्ब आढळून आले असून त्यांचे फोटो काढले गेले आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) पूर्वीच देशांना आणि युद्ध करणाऱ्या सशस्त्र गटांना दाट लोकवस्ती असलेल्या भागात शक्तिशाली बॉम्ब न वापरण्याचं आवाहन केलं आहे. कारण त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.
इराणमध्ये महिनाभरात 12 हजाराहून जास्त बॉम्ब डागले
बीबीसी आयने दोन आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्यांच्या मते, इतक्या दाट लोकवस्तीच्या भागात असा मोठा बॉम्ब वापरणे योग्य नाही. कारण त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा धोका होतो आणि ते कदाचित बेकायदेशीरही ठरू शकतं.
ही घटना केवळ रेसालतपुरती मर्यादित नाही.
युद्ध सुरू झाल्यापासून, इस्रायलने इराणमध्ये 12 हजारहून जास्त बॉम्ब टाकले आहेत. त्यापैकी सुमारे 3600 बॉम्ब केवळ तेहरानवर टाकले असल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इराणमध्ये 9 हजारपेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक हल्ल्यांमध्ये पोलीस ठाणे, बसीज गटाच्या इमारती, पोलीस मुख्यालय, लष्करी आणि पोलीस विद्यापीठे, सेफ हाऊसेस, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सची घरे, तसेच शस्त्रसाठ्याची ठिकाणे आणि तपासणी नाके लक्ष्य करण्यात आले आहेत.
अनेकदा ही ठिकाणे दाट लोकवस्ती असलेल्या भागातच असतात.

इस्रायलने 1 मार्च रोजी निलोफर चौकाजवळील अब्बासाबाद पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तिथे रमजानचा उपवास सोडण्यासाठी काही कुटुंबं एकत्र आले होते.
प्रत्यक्षदर्शींनी या हल्ल्यात किमान 20 लोक ठार झाल्याचे सांगितले. बीबीसीने ही आकडेवारी पडताळून पाहिलेली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आधी एक 'भीतीदायक प्रकाश' दिसला आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले.
"आम्ही रस्त्यावर पळत आलो," असं एका व्यक्तीने सांगितलं.
"एक पुरुष आणि एक महिला दुकानातून नुकतंच बाहेर आले होते. लगेचच ते हल्ल्याच्या तडाख्यात सापडले."
स्थानिक लोकांनी सांगितलं की, एकाच ठिकाणी एकामागोमाग अनेक हल्ले झाले.
"दोन मिनिटेसुद्धा झाली नव्हती. आम्ही परत आलो, तेव्हा त्यांनी पुन्हा हल्ला केला," असे दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं.
इस्रायलच्या सैन्यानं (आयडीएफ) हा हल्ला आपणच केला असल्याचं मान्य केले आणि त्यांनी 'लष्करी ठिकाणांवर हल्ला केला' असं सांगितलं.
बीबीसी आयच्या विश्लेषणानुसार, स्फोटाचा परिणाम फक्त लक्ष्यापुरताच मर्यादित न राहता रेसालतप्रमाणे इतर ठिकाणीही पसरला.
आतापर्यत तब्बल 1464 नागरिकांचा मृत्यू
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार, युद्धात सहभागी सर्वांनी नागरिकांच्या वस्तू आणि लष्करी ठिकाणं यामध्ये फरक करणे आवश्यक आहे.
एखादी लष्करी कारवाई करताना नागरिकांना किंवा त्यांच्या घरांना होणारे नुकसान, त्यातून मिळणाऱ्या लष्करी फायद्याच्या तुलनेत जास्त नसावे.
या नियमांनुसार, शक्य असेल तिथे लष्करी ठिकाणे जिथे जास्त लोक राहतात (दाट लोकवस्ती) त्या भागात किंवा त्याच्या जवळ ठेवू नयेत.
अमेरिकेतील ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी (एचआरएएनए) या संस्थेच्या मते, युद्धाच्या पहिल्या महिन्यात इराणमध्ये 1464 सामान्य नागरिक मारले गेले आहेत. यात किमान 217 लहान मुलांचा समावेश आहे.

स्थानिक लोकांनी बीबीसी आयला सांगितलं की, रहिवासी भागांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. पूर्वी जे सरकारवर टीका करत होते त्यांच्यातही राग दिसून येत आहे.
बीबीसीने या घटनेबाबत आयडीएफकडे विचारणा केली. त्यांनी हल्ले झाल्याची पुष्टी केली, पण अधिक काही सांगितले नाही. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
युद्धादरम्यान इराणने जवळच्या काही देशांमधील नागरी ठिकाणांवर, जसे की विमानतळ आणि हॉटेल्सवर, हल्ले केले आहेत. प्रामुख्याने अमेरिकेचे मित्र देश असलेल्या आखाती देशांमध्ये.
तेहरानमधील नागरिकांनी युद्ध हाताळण्याच्या पद्धतीवरुन सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
ना सायरन, ना पूर्वसूचना फक्त स्फोटांचे आवाज
सुरक्षिततेसाठी सरकारकडून फारशी व्यवस्था दिसली नसल्याचे लोकांनी बीबीसीला सांगितलं. सार्वजनिक निवारा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीची मदत किंवा बेघर झालेल्यांसाठी तात्पुरती राहण्याची सोय अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले.
आम्ही ज्यांच्याशी बोललो, त्यांपैकी अनेकांनी सांगितलं की हल्ल्याच्या वेळी कुठे जावं किंवा स्वतःचं संरक्षण कसं करावं, याबद्दल त्यांना कोणतीही माहिती किंवा मार्गदर्शन मिळाले नाही.
"इथे ना सायरन वाजतात, ना कोणतीही पूर्वसूचना मिळते. फक्त अचानक स्फोटाचा आवाज ऐकू येतो," असं एक रहिवासी सांगत होते.
स्पष्ट माहिती मिळत नसल्याने आणि इंटरनेटही बंद असल्यामुळं अनेक लोक स्वतःला असुरक्षित आणि गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे सांगतात. पुढचा हल्ला कधी आणि कुठे होईल, याची त्यांना काहीच खात्री नाही.

या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सरकारने देशभरासाठी कोणती नागरिक सुरक्षा योजना आहे, याची स्पष्ट माहिती सार्वजनिकपणे दिलेली नाही.
अमेरिका आणि इस्रायलचं म्हणणं आहे की, ते इराणच्या सरकारी यंत्रणा आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहेत.
पण ही ठिकाणं घरं, दुकाने आणि शाळांच्या जवळ असल्यामुळे, हल्ल्यांचा परिणाम फक्त लक्ष्यांवरच नाही, तर आसपासच्या लोकांवरही होतो.
हे सगळं सहन करणाऱ्या लोकांसाठी ही परिस्थिती म्हणजे घरं उद्ध्वस्त होणं, विखुरलेली कुटुंबं आणि आता कुठेच सुरक्षित नाही अशी वाढती भीती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























