चार्ली चॅप्लिन यांच्या सिटी लाईट्स चित्रपटातील इतिहास घडवणारा अजरामर शेवट, काय आहे दृश्याची कहाणी?

चार्ली चॅप्लिन

फोटो स्रोत, Alamy

    • Author, ग्रेगरी वेकमन
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

'सिटी लाईट्स' हा चार्ली चॅप्लिन यांचा अजरामर विनोदी मूक चित्रपट आहे. प्रदर्शित होऊन 95 वर्षे उलटल्यानंतरही हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून नावाजला जातो.

या चित्रपटातील शेवटचं दृश्य हे त्याच्या या नावलौकिकामागचं प्रमुख कारण आहे.

लाईफ मासिकानं 1966 मध्ये चार्ली चॅप्लिन यांना विचारलं होतं की त्यांचा कोणता चित्रपट त्यांना सर्वाधिक आवडतो. त्यावर त्यांनी 'सिटी लाईट्स' या चित्रपटाचं नाव घेतलं होतं.

मात्र आपल्या कामगिरीला फार महत्त्वं न देता ते म्हणाले होते की, "मला वाटतं, तो एक उत्तम, चांगला चित्रपट आहे."

या चित्रपटाचा प्रीमियर 30 जानेवारी 1931 ला लॉज एंजेलिस थिएटरमध्ये झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटप्रेमी आणि चित्रपट निर्मात्यांनी या मूक प्रणय-विनोदीपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.

या चित्रपटातील चार्ली चॅप्लिन यांचं पात्र (एक गरीब आणि बेघर तरुण) एका आंधळ्या फुलविक्रेत्या मुलीच्या (व्हर्जिनिया चेरिल) प्रेमात पडतं. ती त्याला चुकून एक लक्षाधीश व्यक्ती समजते.

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटनं 1952 मध्ये सार्वकालिक महान चित्रपटांची त्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी या यादीत सिटी लाईट्स हा चित्रपट चार्ली चॅप्लिन यांच्याच द गोल्ड रश (1925) या चित्रपटाबरोबर संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर होता.

स्टॅन्ली कुब्रिक, ऑर्सन वेलेस आणि अँड्री तारकोव्स्की यांनी प्रत्येकानं हा चित्रपट त्यांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक असल्याचं सांगितलं होतं.

तर, द नाईट ऑफ द हंटरचे पटकथा लेखक जेम्स ॲग्री यांनी लिहिलं होतं की यात 'अभिनयाचा सर्वोत्कृष्ट नमुना आणि चित्रपटांमधील सर्वोच्च क्षण' आहेत.

काय होतं ते शेवटचं अजरामर दृश्य?

तो क्षण सिटी नाईट्स चित्रपटात अगदी शेवटी येतो. ती फुलविक्रेती तरुणी आता पाहू शकत असते. तो बेघर भटकणारा तरुण तिला पुन्हा भेटल्यावर तिच्याकडे प्रेमानं पाहतो. त्याचवेळी ते दृश्य हळूहळू अंधारात गुडूप होतं.

हा प्रसंग शुद्ध, निखळ भावनांनी भरलेला त्याचबरोबर मनाला खोलवर स्पर्श करणारा आहे, अतिशय मार्मिक आहे. चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महान शेवट म्हणून त्याचा उल्लेख वारंवार होतो.

सिटी लाईट्स चित्रपट प्रदर्शित होऊन 95 वर्षे उलटून गेलेली असूनही त्याचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की अनेक चित्रपटांनी त्यातील सूक्ष्म कलात्मकता आणि अभिनयाच्या ताकदीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

चॅप्लिन

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, चॅप्लिन यांच्या मूक रोमँटिक विनोदीपटात, त्यांनी साकारलेलं एक भटक्या, बेघर तरुणाचं पात्र एका अंध फुलविक्रेत्या तरुणीच्या प्रेमात पडतं, जी त्याला चुकून लक्षाधीश समजते
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिटी लाईट्समधील हा शेवटचा क्षण चित्रित करण्यासाठी अनेक वर्षांची सर्जनशील मेहनत आणि कष्ट लागले. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यासाठी इतकी उत्तम पार्श्वभूमी तयार केलेली असल्यामुळंच ते दृश्य इतकं प्रभावी ठरतं.

या बेघर, भटकत फिरणाऱ्या तरुणाला जेव्हा समजतं की त्या अंध तरुणीला तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर काढलं जाणार आहे. तेव्हा तो रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करतो, नंतर बॉक्सरही होतो.

अखेरीस त्याला एका दारू प्यायलेल्या लक्षाधीशाकडून पैसे मिळतात. तो लक्षाधीश शुद्धीवर आल्यावर त्याला विसरून जातो आणि त्या तरुणावर पैसे चोरल्याचा आरोप करतो.

तरुणाला अटक होण्याआधी तो ते पैसे त्या फुलविक्रेत्या तरुणीला देतो. त्यामुळे तिला घरभाडं भरता येतं आणि तिच्या अंधत्वावर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे जाता येतं.

काही महिन्यांनी त्या तरुणाची तुरुंगातून सुटका होते. तेव्हा त्याला कळतं की तिला आता दृष्टी मिळाली आहे. ती आता तिचं एक फुलांचं अत्यंत यशस्वी दुकान चालवते आहे.

फाटक्या कपड्यांमधील तो तरुण तिच्या दुकानाबाहेर येतो. अखेरीस ती जेव्हा त्याला ओळखते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अत्यंत आपुलकीचे, प्रेमाचे भाव उमटतात. तो तरुणही हसतो आणि चित्रपट संपतो.

'ते खूपच निर्मळ होतं'

चार्ल्स मार्लंड यांनी बीएफआय क्लासिक्स पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी सिटी लाईट्स चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांना वाटतं की या चित्रपटातील शेवटचं दृश्य, एक चित्रपट निर्माता म्हणून चार्ली चॅप्लिन यांच्या प्रभुत्वाचं एक निश्चित उदाहरण आहे.

"दृश्याचा भावनिक परिणाम तीव्रतेनं साधण्यासाठी दृश्याची मांडणी कशी करायची हे त्यांना माहिती होतं. या दृश्यात कॅमेरा मध्यम अंतरावरील शॉटपासून क्लोज-अपपर्यंत आक्रसत जातो," असं बीबीसीला म्हणाले.

त्यांनी नमूद केलं की चार्ली चॅप्लिन एकदा म्हणाले होते की त्यांनी विनोदासाठी लाँग शॉट्स म्हणजे दूरवरून दृश्यं चित्रित केली. तर शोकांतिका आणि नाट्यमयतेसाठी क्लोज-अप म्हणजे पात्रांच्या जवळून दृश्य चित्रित केली.

ते पुढे म्हणाले, "मग त्यातील साऊंडट्रॅकचा मुद्दा येतो. तो अतिशय गुंतागुंतीचा, भावनिक आहे. तो त्या दृश्याला एक बौद्धिक प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतो."

सिटी लाईट्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिटी लाईट्सच्या निर्मितीसाठी अनेक वर्षांची सर्जनशील मेहनत घेण्यात आली, हा चित्रपट आजही सार्वकालिक सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो

या सर्व गोष्टी चार्ली चॅप्लिन आणि चेरिल यांच्या अभिनयाशिवाय व्यर्थ ठरल्या असत्या. विशेष म्हणजे 'सिटी लाईट्स' या चित्रपटातून चेरिलनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

शेवटच्या दृश्यात भावनांची देवाणघेवाण करण्यासाठीच्या संवादांचे अनेक टेक घेतल्यानंतर चॅल्पिन यांना वाटलं की ते अतिरेक करत आहेत.

ते जास्तीचा अभिनय करत आहेत आणि भावनांचा अतिरेक करत आहेत. त्यामुळे चॅप्लिन यांनी ठरवलं की त्या भटक्या, बेघर तरुणानं चेरिलकडे फक्त अधिक तीव्र भावनांनी पाहावं.

मार्लंड यांच्या मते, या दृश्याच्या चित्रीकरणाचं वर्णन एकदा पुढीलप्रमाणे केलं होतं.

"अभिनय न करण्याची सुंदर भावना. स्वत:च्या भावनांशी अलित्त होत तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहणं. तिच्यासमोर थोडंस लज्जित वाटणं, तिला पुन्हा भेटल्याचा आनंद, भावनिक न होता क्षमा मागणं, ही गोष्ट त्यात मुख्य होती. तरुण तिच्याकडे पाहतो आहे आणि ती काय विचार करते आहे याचा विचार करतो आहे. ते खूपच निर्मळ दृश्य होतं."

अफलातून अभिनय आणि कलात्मक उंची

जेफ्री वेन्स 'चॅप्लिन: जीनियस ऑफ द सिनेमा' या पुस्तकाचे लेखक आहेत. 'सिटी लाईट्स' चित्रपट पदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी, चेरिल यांनी जेफ्री वेन्स यांना सांगितलं होतं की एरवी चॅप्लिन यांची त्वचा कोरडी असायची. मात्र ते अपेक्षित अभिनयाच्या जसजसे जवळ येत होते, तसतसा त्यांचा तळहात ओलसर होत असल्याचं त्यांना जाणवलं होतं.

वेन्स यांनी बीबीसीला सांगितलं, "तिला जाणवलं की त्यांच्या बाबतीत काहीतरी असामान्य घडतं होतं. त्यांना जे हवं होतं ते ती देत होती. तो वेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत होता, व्यक्त होत होता. तो त्या पात्राच्या मन:स्थितीनुसार प्रतिक्रिया देत होता."

सिटी लाईट्स या चित्रपटानं अनेक दशकं खोलवर परिणाम करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण त्या दृश्यात निर्णायक शेवटाच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच चॅप्लिन यांनी ते दृश्य संपवलं होतं.

रोमँटिक विचारसरणीचे लोक असं म्हणतील की, त्या तरुणाचं फाटकं रूप आणि त्याच्याकडील पैशांचा अभाव असूनही त्या फुलविक्रेती तरुणीनं त्या तरुणानं तिच्यासाठी जे केलं त्यामुळे त्याचा स्वीकार केला. मात्र इतर काहीजणांना असं वाटतं की त्याच्याबरोबरच्या तिच्या नात्याचा सुंदर, गोड शेवट होण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

वेन्स म्हणतात, "ते रोमॅंटिक आहे असं मला अजिबात वाटत नाही. तिची दृष्टी परत आल्यावर तिला स्वत:बद्दल वाटणारा अहंकार आपल्याला दिसतो. ती आरशात पाहते. केसांशी चाळा करते. तिला वाटत असलेला श्रीमंत माणूस तो नाही याचं तिला वाईट वाटतं, तिचा अपेक्षाभंग होतो. ती जेव्हा पहिल्यांदा त्या बेघर तरुणाला पाहते, तेव्हा ती खुदकन हसते. ती त्याला दयेपोटी पैसे देते."

अत्यानंद, भीती, लज्जा ते उत्तेजित होण्यापर्यंत, त्या शेवटच्या क्षणांमधील चॅप्लिन यांच्या अभिनयाला इतके थर आहेत. तो इतका बहुआयामी आणि सूक्ष्म स्वरुपाचा आहे की तिथून पुढे काय होईल, हे ठरवण्याचं काम तो प्रेक्षकांवर सोडून देतो.

सर्वोत्तम दृश्य?

अर्थात चित्रपटांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अंतिम दृश्याच्या किताबासाठी अनेक दावेदार आहेत. या यादीत प्लॅनेट ऑफ द एप्समधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं दर्शन, द ग्रॅज्युएटमधील हळूहळू होत जाणारी जाणीव, बुच कॅसडी अँड संडन्स किड्समधील शेवटचं दृश्य एकदम थिजणं, द गॉडफादरमधील दरवाजा बंद होण्याचा क्षण आणि सनसेट बुलवर्डमधील नॉर्मा डेसमंडनं क्लोज-अपची मागणी करणं, या प्रत्येकाचा उल्लेख व्हायला हवा. मात्र यातील कोणत्याही दृश्याची इतर चित्रपटांमध्ये सिटी लाईट्सच्या अंतिम दृश्याएवढ्या वेळा पुनरावृत्ती झाली नाही.

द 400 ब्लोज, धिस इज इंग्लंड, गॉन गर्ल आणि मूनलाईट यासारखे विविध चित्रपट चॅप्लिन यांचे ऋणी आहेत. कारण त्यातील प्रत्येकाचा शेवट त्यातील पात्र कॅमेऱ्याकडे रोखून पाहत असताना होतो. काही चित्रपटांनी तर उघडपणे याबाबत आभार मानले आहेत.

वूडी ॲलन यांच्या मॅनहॅटन (1979) या चित्रपटाचा शेवट त्यातील पात्र, ट्रेसी या त्याच्या तरुण गर्लफ्रेंडनं ती लंडनला 6 महिन्यांसाठी जाणार असल्याचं सांगितल्यावर तिच्याकडे पाहून खेदानं किंवा खिन्नपणे हसतं.

पिक्सार्स मॉन्स्टर्स, इंक.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, 'पिक्सार्स मॉन्स्टर्स, इंक.' या चित्रपटात शेवटी चॅप्लिन यांच्या सिटी लाईट्सला ॲनिमेटेड शैलीत मानवंदना देण्यात आली आहे

एका वर्षानंतर, द लाँग गूड फ्रायडे या चित्रपटात दिग्दर्शक जॉन मॅकेन्झी यांनी बॉब हॉस्किन्सच्या गँगस्टरवर लक्ष केंद्रित केलं. हा गँगस्टर तो आयआरएच्या मारेकऱ्यांच्या हाती सापडल्याचं आणि मारला जाणार असल्याचं जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा एकापाठोपाठ अनेक भावना त्याच्या मनात निर्माण होतात.

अगदी 'पिक्सार्स मॉन्स्टर्स, इन्क.' या चित्रपटाचा शेवटदेखील सिटी लाईट्स चित्रपटाला ॲनिमेटेड स्वरुपात मानवंदना देण्यात आली आहे.

सली आणि बू च्या बेडरूमधील पोर्टल नष्ट झाल्यावर सली आणि बू कायमचे वेगळे झाले असं वाटत असतं. त्या क्षणी सली आणि बू यांच्या पुनर्मिलनाचं दृश्य दाखवण्याऐवजी सली तिचा दरवाजा उघड असताना, आजूबाजूला पाहत असताना, बू 'किटी!' असं म्हणत असताना आणि हसताना आपल्याला दिसतात.

अनेकदा घडतं त्याप्रमाणे, अल्पकालिकपणामुळे किंवा अतिशय थोडा वेळ राहिल्यामुळे हे क्षण अधिकच प्रभावी ठरतात. मात्र त्यासाठी अनेक तासांची सर्जनशीलता, कौशल्य आणि प्रतिभा लागतात. तसंच हजारो काही वेळा लाखो डॉलर्स खर्च करावे लागतात. त्यानंतर ही दृश्य पडद्यावर साकारली जातात.

सिटी लाईट्स या चित्रपटाच्या बाबतीत ही गोष्ट विशेषकरून खरी होती. हा चॅप्लिन यांचा सर्वात महागडा चित्रपट होता. याच्या निर्मितीसाठी 15 लाख डॉलर्स (आजच्या हिशेबानं 3 कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास 282 कोटी रुपये) खर्च आला होता.

मात्र इतकंच नव्हतं तर त्यांनी या चित्रपटाच्या कथेच्या मांडणीसाठी, त्याचं चित्रीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या या कामाकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा या चित्रपटाकडून पूर्ण होतील, या आशेनं त्यावर काही वर्षे खर्ची घातली होती.

प्रेमापोटी केलेले श्रम

सिटी लाईट्स या चित्रपटाचं चित्रीकरण 27 डिसेंबर 1928 ला सुरू झालं. त्यावेळेस चॅप्लिन हे जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होते. लंडनमधील दारिद्र्याच्या, हलाखीच्या परिस्थितीतून वर येत, ते आता कोट्यधीश बनले होते. त्यांच्या चित्रपटांवर त्यांचं संपूर्ण सर्जनशील नियंत्रण होतं.

ते इतकं जबरदस्त होतं की 'द जॅझ सिंगर' हा पहिला बोलपट 14 महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. हॉलीवूडला आता मूकपटांमध्ये रस राहिला नव्हता. मात्र, 'सिटी लाईट्स' या चित्रपटात चॅप्लिन यांनी एकही संवाद नसावा यासाठी आग्रह धरला होता.

जेफ्री वेन्स म्हणतात, "भटका, बेघर तरुण हे मूकपटांमधीलच पात्र आहे, यावर चॅप्लिन ठाम होते. मात्र त्यांना हेदेखील माहिती होतं की त्यांना एक परिपूर्ण चित्रपट बनवायचा आहे. त्यांना वाटलं होतं की प्रेक्षक मूकपट स्वीकारतील याचा तो एकमेव मार्ग आहे."

सिटी लाईट्स हा चित्रपट शक्य तितका निर्दोष बनवण्याबद्दल चॅप्लिन यांना इतकी काळजी वाटत होती की त्यांनी या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन म्हणजे निर्मिती-पूर्व कामासाठी एक वर्षभर काम केलं. या चित्रपटाचं चित्रीकरण सप्टेंबर 1930 पर्यंत चाललं.

रिटेकचा वर्ल्ड रेकॉर्ड आणि इतिहास घडवणारा शेवट

त्या गरीब, बेघर तरुणाची फुलविक्रेत्या मुलीशी पहिली भेट होते, तेव्हा ती त्याला चुकून लक्षाधीश समजते. हा प्रसंग चित्रित करण्यानं चॅप्लिन यांना इतकं सतावलं की एका दृश्यासाठी सर्वाधिक वेळ रिटेक करण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आजही याच दृश्याच्या नावावर आहे. अखेरीस, त्यांनी हा प्रसंग 342 वेळा चित्रित केला.

चॅप्लिन यांनी सर्जनशीलतेसाठी घेतलेले सर्व कष्ट सार्थ ठरले. सिटी लाईट्सनं बॉक्स ऑफिसवर त्यांच्या निर्मिती खर्चाच्या तिप्पट कमाई केली. चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं. समीक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली. इतकंच नाही तर काळाच्या ओघात या चित्रपटाची प्रतिष्ठा, त्यांचं चित्रपटांच्या दुनियेतील स्थान अधिकच उंचावत गेलं आहे.

त्यानंतरच्या अनेक दशकांमध्ये, 'मॉडर्न टाइम्स'मधील भेदक उपहास, 'द ग्रेट डिक्टेटर'चा उत्साही शेवट आणि 'द गोल्ड रश'मधील अद्वितीय विनोदी दृश्यं या सर्व कलाकृती असूनही 'सिटी लाईट्स' हा चॅप्लिन यांचा सर्वात चिरस्थायी आणि प्रेक्षकांचा लाडका चित्रपट ठरला आहे.

वेन्स म्हणाले, "डिकन्स यांच्या कादंबऱ्या आणि शेक्सपियरची नाटकं याप्रमाणे चॅप्लिन यांच्या चित्रपटांची लोकप्रियता कमी-जास्त होत राहते. मात्र 'सिटी लाईट्स' चित्रपटाचं सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. चॅप्लिन यांना माहित होतं की साधेपणा साकारणं ही खूप कठीण गोष्ट आहे."

सिटी लाईट्सची काव्यात्मकता आणि ताकद, त्याच्या शेवटच्या दृश्यातून उत्तम प्रकारे व्यक्त होतात. या दृश्यात हा आशावादी भटका, बेघर तरुण हसताना आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहताना दिसतो. जवळपास 100 वर्षानंतर आणि हजारो 'चित्रपटां'नंतर, इतर कोणत्याही चित्रपटाचा शेवट अद्याप त्याच्या जवळपास देखील पोहोचू शकलेला नाही.

"म्हणूनच चॅप्लिन जीनियस होते. त्यामुळेच ते अद्वितीय होते, इतरांच्या पुढे होते आणि वेगळ्याच उंचीचे चित्रपटकार होते," असं वेन्स म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)