पती-पत्नीचा वाद ते लैंगिक शोषण; नव्या 2 तक्रारीत अशोक खरातवर नेमके काय आरोप?

- Author, प्रविण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अंकशास्त्राच्या नावाखाली अशोक खरातनं राजकारणी, उद्योजक आणि महिलांची फसवणूक केल्याचं प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. खरातला अटक होऊन 10 दिवस झाले. या 10 दिवसांत खरातविरोधात एकूण 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज (29 मार्च) संपत असल्याने त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करत 1 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.
दरम्यान, खरातच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित अनेक प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. अनेक पीडित महिला आणि फसवणुकीला बळी पडलेले लोक समोर येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांबाबत बोलू लागले आहेत, तक्रारी दाखल करण्यास पुढे येत आहेत.
शुक्रवारी (28 मार्च) मध्यरात्री अशोक खरातविरोधात आणखी 2 नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचा समावेश आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.
नव्या तक्रारीत नेमके काय आरोप?
स्वतःजवळ धार्मिक व तांत्रिक शक्ती असल्याचा दावा करून अशोक खरातने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
यापैकी नेवासा येथील व्यावसायिकाने अशोक खरात विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. या व्यवसायिकाचा कापड व्यापार होता, पण व्यवसाय हवा तसा चालत नसल्याने त्याने एका व्यक्तीच्या शिफारसीने खरातशी संपर्क साधला आणि त्याला आपल्या अडचणींबाबत सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
खरातने भागवत यांना त्यांच्या व्यवसायात मोठी वृद्धी होईल आणि प्रगती होईल, असं आमिष दाखवलं. त्यासाठी त्याने पुष्कराज आणि हिरा हे रत्न सोन्याच्या अंगठीत धारण करण्याचे सुचवले.
आपण कृष्णाचा अवतार असून तुम्हाला लाभासाठी अंगठी मंतरून देतो, असं म्हणत त्याने व्यापाऱ्याला 20 ग्रॅम वजनाच्या एकूण 3 अंगठ्या, रत्न, खडे बसवून दिले. नंतर तिन्ही अंगठ्यामध्ये 2 पुष्कराज, एक हिरा बसवून व्यवसायिकास दिला. याचा मोबदला म्हणून खरातने 1 लाख रुपये आगाऊ घेतले, तर उर्वरित 1 लाख 62 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले.
मात्र, व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारात फारसा लाभ झाला नाही. 19 मार्चला खरातच्या दुष्कृत्याच्या बातम्या बघितल्यावर व्यावसायिकाने त्याला दिलेल्या अंगठ्या व हिरे याची तपासणी केली. तेव्हा तिन्ही अंगठ्या सोन्याच्या नव्हे, तर तांबे व इतर धातूच्या असल्याचं आढळलं. तसेच पुष्कराज व हिऱ्याची किंमत 5 हजार रुपये असल्याचं समजलं.
यावर व्यवसायिकाने 20 ग्रॅम खोट्या सोन्याच्या अंगठ्या आणि खोटे पुष्कराज व हिरे जडवलेल्या धातूच्या अंगठ्या देत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
पती पत्नीच्या वादाचा फायदा घेत फसवणूक
शुक्रवारी (28 मार्च) दाखल झालेल्या दुसऱ्या प्रकरणात एका विवाहित महिलेनं खरातवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे.
शेतीचा व्यवसाय असलेल्या पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत खटके उडत होते. त्यामुळे हा कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की, प्रकरण विभक्त होण्यापर्यंत गेले होते.
दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार यावर उपाय विचारण्यासाठी ती आपल्या पतीसह खरातकडे गेली होती.
खरातने समजवल्यानंतर दोघे पती-पत्नी पुन्हा एकत्र आले आणि नांदायला लागले. खरात या दाम्पत्याला वेळोवेळी बोलावून घेत होता.
जोडप्याचा आपल्यावर विश्वास बसला हे लक्षात येताच खरातने लैंगिक शोषण केलं, असा आरोप पीडितेनं केला आहे.
खरातने तिला सांगितलं, "मी साक्षात महादेवाचा अवतार आहे. माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तुझ्यावरील सर्व संकटे दूर होतील."
इतकेच नव्हे तर, तिने नकार दिला तर, "तुझ्या मुलांचा आणि पतीचा मृत्यू होईल," अशी भीती घालून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Kiran Sakale
पीडित महिला पती व मुलाला मारण्याची धमकी मिळाल्याने घाबरली होती. त्याचा फायदा वेळोवेळी खरातने उचलला. प्रसारमाध्यमांवरील वृत्त बघितल्यावर पीडितेने पतीला विश्वासात घेत ही तक्रार दिली.
लैंगिक अत्याचार व शोषणाच्या सर्व तक्रारींमध्ये खरातने एकच 'मोडस ऑपरेंडी' वापरल्याचं समोर आलं आहे.
सध्या या प्रकरणाने नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. खरात विरोधात तक्रारींची मालिका अजूनही सुरूच आहे.
विशेष तपास पथकाच्या हेल्पलाईन नंबरवर जवळपास 100 लोकांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत. पोलीस या सर्व प्रकरणांचा अधिक तपास करत असून आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जसा जसा अशोक खरातचा भोंदूपणा समोर येत आहे, तसं तसं लोकही समोर येत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहेत.
याशिवायही इतर कुणाचं शोषण खरातने केलं असेल अथवा फसवणूक केली असेल तर पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप
खरातची पोलीस कोठडी आज (29 मार्च) संपत असल्याने त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्याला 1 एप्रिलपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याआधी खरातला 7 दिवसांची, त्यानंतर 5 दिवसांची तर, आता 3 दिवसांची म्हणजेच 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावेळी एसआयटी आणि पोलिसांकडून खरातच्या मालमत्तेबाबतची चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.
सुनावणीत एसआयटीने खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले लॅपटॉप, पेनड्राईव्ह यासह इतर कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केले.
एसआयटी तपास अधिकाऱ्याने न्यायालयात दावा केला की, कुणीही नवीन भाविक आल्यास खरात नेहमी मोठमोठ्या नेत्यांचे फोन आल्याचे सांगून प्रतिष्ठा वाढवत असे. तो दुसऱ्या (खरात याचा वेगळा नम्बर) नंबरवरून कॉल करत व्हीआयपी राजकीय नेत्यांची नावे दाखवत असे. जेणेकरून ही संभाषणं ऐकल्यावर नवीन भाविकावर त्याची छाप पडेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी मालमत्तेसंदर्भात याआधीही असाच युक्तिवाद करण्यात आला असल्याने, उर्वरित तपासासाठी कोठडीची गरज नसल्याचे म्हणत कोठडी वाढवून देऊ नये, अशी मागणी केली.
तसेच तपासात वारंवार उल्लेख होणाऱ्या आणि व्हीडिओ असलेल्या पेनड्राईव्हविषयी प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडून ठोस माहिती दिली जात नसल्याचा आरोप खरातच्या वकिलांनी केला.
यावर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयासमोर सांगितलं, "FSSL कडून पेनड्राईव्ह नुकताच आला असल्याचं सांगितलं. हा पेनड्राईव्ह पंचनामा करून लॅबमध्ये पाठवण्यात आला असून त्याची क्लोन कॉपी आली आहे."
खरातच्या मोबाईलमधून राजकीय किंवा काही ईतर लोक असतील. काही नंबरवर transaction झाले आहेत, मात्र कोणाचे नाव काय नावाने सेव्ह केले ते मोबाईल मधून शोधायचे आहे.
"खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे. मात्र, त्यामध्ये कोणाचे नंबर कोणाच्या नावाने सेव्ह आहेत हे आरोपीच सांगू शकतो. त्यामुळे त्याची 3 दिवसांची कोठडी वाढवून द्यावी. तसेच आरोपीचे इतर जे साथीदार आहेत त्यांची चौकशी करायची आहे," असेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.

खरातच्या जंगम मालमत्तेची चौकशी करायची असून, याप्रकरणात खरात मास्टरमाइंड आहे. हा संवेदनशील गुन्हा असून, अनेक महिलांची फसवणूक झाली आहे, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला.
तर पीडितेच्या वकिलांनी खरात तपासात सहकार्य करत नसून, पोलिसांना खरी उत्तरे देत नसल्याचं म्हटलं.
यावेळी पीडितेचे वकील एम. वाय. काळे म्हणाले की, आरोपी मदत करत नसल्यामुळे तपास पूर्ण होऊ शकत नाही. पीडितेचे कुटुंब अस्वस्थ झाले आहेत, तिचे आयुष्य अडचणीत आलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संशयित आरोपीच्या निकालाचे वाचन केले. यानंतर खरातला बुधवारपर्यंत (1 एप्रिल) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























