चायनामॅक्सिंग काय आहे? सकाळी गरम पाणी पिणं खरोखरंच आरोग्यासाठी चांगलं असतं का?

तरुण पिढीला ऑनलाइन स्वरुपात पारंपरिक चिनी जीवनशैलीच्या टिप्स जाणून घेण्यास रस वाटतो आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तरुण पिढीला ऑनलाइन स्वरुपात पारंपरिक चिनी जीवनशैलीच्या टिप्स जाणून घेण्यास रस वाटतो आहे.
    • Author, केट बोवी
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

"ते कॉन्टेंट माझ्या सोशल मीडियावर आलं आणि मी एकामागून एक व्हीडिओ पाहत राहिले. हे करून पाहायला काय हरकत आहे, असं मला वाटतं," 21 वर्षांची मरियम खान म्हणाली.

ते व्यायामाचं कठीण वेळापत्रक किंवा महागडं स्किनकेअर औषध नव्हतं. मरियम खान आणि इतर अनेकजण जो ट्रेंड अंमलात आणू पाहत आहेत, तो अतिशय सोपा आहे. ते म्हणजे सकाळी गरम पाणी पिणं.

गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांचा, पारंपरिक चिनी औषधं आणि भारतात उगम पावलेल्या आयुर्वेदासारख्या समग्र उपचार पद्धतींमधून हजारो वर्षांपासून प्रचार केला जातो आहे.

मात्र आता ही प्राचीन पद्धत जगभरातील लोकापर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर वर्षाच्या सुरुवातीला याचा प्रसार झाल्यानंतर जगभरात त्याचा ट्रेंड आला आहे.

लाखो व्ह्यूज मिळालेल्या टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरील व्हीडिओंना 'न्यूली चायनीज' आणि 'चायनामॅक्सिंग' अशा शब्दांनी टॅग करण्यात आलं आहे.

या व्हीडिओंमध्ये प्रामुख्यानं तरुण लोक गरम पाणी पिताना, गरम नाश्ता करताना आणि दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंगनं करताना दिसत आहेत.

मात्र खरोखरंच, जीवशैलीतील या सोप्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते का?

ऊर्जेच्या रक्षणातून आरोग्य?

चीनमध्ये लाखो लोकांमध्ये प्रचलित असलेल्या पारंपरिक वैद्यकशास्त्रात एक मध्यवर्ती विचारप्रवाह किंवा विश्वास आहे. तो म्हणजे आपल्या शरीरातून ऊर्जा प्रवाहित असते. जेव्हा या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो किंवा ती असंतुलित होते, तेव्हा आजारपण येतं आणि आपलं आरोग्य बिघडतं.

गरम पाणी पिण्याचं समर्थक करणाऱ्यांना वाटतं की गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील ऊर्जेचं संवर्धन किंवा रक्षण होतं आणि ती वाढते. त्याचा परिणाम म्हणून आरोग्यात सुधारणा होते आणि दीर्घायुष्य मिळतं.

गरम पाणी पिताना ते 40-60 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केलं जातं, जेणेकेरून तोंड किंवा घसा गरम पाण्यानं भाजला जाऊ नये.

"याचा विचार एका घराप्रमाणे करा," असं पारंपरिक चिनी औषधशास्त्रातील संशोधक प्राध्यापक शुन ऑ म्हणतात.

ते म्हणतात की समग्र आरोग्य व्यवस्थेनुसार, थंड अन्न खाणं हे तुमच्या घरातून थंड हवेची झुळूक येण्यासारखं आहे.

हा सिद्धांत इतर पारंपरिक चिनी औषधांच्या इतर टिप्ससाठीचा आधार आहे. उदाहरणार्थ, घरात गरम, उबदार स्लिपर्स किंवा चपला घालणं आणि दिवसाची सुरुवात गरम नाश्त्यानं करणं.

मरियम खान लोखंडी कुंपण असलेल्या एका इमारतीशेजारी उभ्या आहेत. त्या कॅमऱ्याकडे पाहून हसतात. त्यांनी गॉगल घातला आहे, गुलाबी रंगाची कॉलर असलेला शर्ट, बर्गंडी रंगाचं जम्पर किंवा स्वेटर आणि हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं आहे.

फोटो स्रोत, Maryam Khan

फोटो कॅप्शन, व्यग्र, धावपळीच्या दिवसामध्ये, पारंपरिक पद्धतीनं अंमलात आणलेली सकाळची दिनचर्या एक सजग क्षण निर्माण करू शकते, असं मरियम खान म्हणतात.

मरियम खान एक आर्किटेक्चरल असिस्टंट असून त्या सध्या लंडनमध्ये राहतात. त्यांच्यासाठी या सवयी म्हणजे पारंपरिक चिनी उपचार पद्धतींचा वापर करण्याचा मार्ग ठरल्या. त्यांनी सर्वात आधी हा ट्रेंड टिकटॉकवर पाहिला होता.

त्या म्हणाल्या की, दिवसाची सुरुवात ताई-ची नं केल्यामुळं त्यांना फायदा होतो. यात संथ, प्रवाही हालचाली, खोल किंवा दीर्घ श्वासोच्छवास आणि ध्यान यांचा एकत्रितपणे समावेश असतो. तसंच नेहमीच्या कॉफीऐवजी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यामुळंही त्यांना फायदा होतो.

"सुरुवातीलाच कॉफी प्यायल्यामुळं नंतर मला मळमळ होते, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही," असं त्या म्हणाल्या.

"मग मी साधं गरम पाणी पिण्यास, कधीकधी पाण्यात पुदिना किंवा लिंबू टाकून पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला खरोखरंच जास्त ताजंतवानं वाटलं," असं त्या म्हणाल्या.

लोक पारंपरिक उपचार पद्धतींकडे का वळत आहेत?

तरुण पिढीला ऑनलाइन स्वरुपात पारंपरिक चिनी जीवनशैलीच्या टिप्स जाणून घेण्यास रस वाटतो आहे. यातून एक वाढता सामाजिक ट्रेंड दिसून येतो, असं डॉ. श्यामा कुरुविला म्हणतात. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक पारंपरिक औषध केंद्राच्या अंतरिम संचालक आहेत.

"अगदी युरोपमध्येही लोकसंख्येवर आधारित अभ्यास झाले आहेत. जर्मनीतील एका अभ्यासातून दिसतं की 70 टक्के किंवा त्याहून अधिक लोक कोणत्यातरी स्वरुपात, पारंपरिक, पूरक, एकात्मिक औषधोपचारांचा वापर करतात. तर चीन, भारत यासारख्या काही देशांमध्ये हे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक असू शकतं," असं त्या म्हणाल्या.

सकाळी गरम पाणी पिणं ही एक शतकानुशतकं जुनी जीवनशैलीतील पद्धत असून ती सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. त्यासंदर्भातील कॉन्टेंट व्हायरल होतं आहे.
फोटो कॅप्शन, सकाळी गरम पाणी पिणं ही एक शतकानुशतकं जुनी जीवनशैलीतील पद्धत असून ती सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. त्यासंदर्भातील कॉन्टेंट व्हायरल होतं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पारंपरिक उपचार पद्धतीच्या काही समर्थकांचा आधुनिक औषधोपचारांवर विश्वास नाही. ही मानसिकता कदाचित कोरोनाच्या संकट काळात निर्माण झाली असावी.

अमेरिकेतील एका अभ्यासातून दिसून आलं की सर्वेक्षण करण्यात आलेल्या लोकांचा डॉक्टर्स आणि हॉस्पिटलवरील विश्वास कमी झाला आहे. यानुसार, 2020 मध्ये विश्वास असण्याचं प्रमाण 70 टक्के होतं. तर 2024 मध्ये ते घसरून अंदाजे 40 टक्क्यांवर आलं आहे.

इतर लोकांच्या बाबतीत त्यांना जैववैद्यकीय (बायोमेडिकल) उपचार उपलब्ध नसतील. किंवा ते स्वस्त पर्याय म्हणून पारंपरिक औषधोपचारांचा वापर करतात.

तर काहीजण पारंपरिक औषधांकडे आकर्षित झाले आहेत कारण, त्यात वैयक्तिक स्वरुपाचा आणि समग्र दृष्टिकोन असतो. कोमट पाणी पिण्यासारख्या सवयी या आरोग्यदायी व्यवस्थेत जाण्याचा एका मार्ग असू शकतात. याप्रकारच्या व्यवस्थेत मन, शरीर आणि पर्यावरण यांच्यात संतुलन साधलं जातं.

या व्यवस्थेचं अनेक लोकांसाठी खोलवर रुजलेलं सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वंदेखील आहे.

"पारंपरिक औषधोपचार करणारे अनेकजण, स्थानिक समुदाय म्हणतात की आम्ही याचा वापर हजारो वर्षांपासून करत आलो आहोत. याचा लोकांना फायदा होतो, असं आम्हाला दिसून आलं आहे," असं कुरुविला म्हणतात.

अधिक पुरावे गोळा करण्याची आवश्यकता

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) जागतिक पारंपरिक औषध केंद्र, यासंदर्भात धोरण तयार करणाऱ्यांना आणि रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी पुराव्यांचं मूल्यमापन करतं.

हे प्रचंड मोठं काम आहे. सध्या जागतिक आरोग्य संशोधन निधीपैकी 1 टक्क्यांहून कमी पैसे पारंपरिक औषध संशोधनावर खर्च केले जातात, असं त्या म्हणतात.

"पुराव्यांचं प्रमाण वाढवण्याची मोठी गरज आहे," असं त्या म्हणतात.

पारंपरिक औषधोपचारांचा वापर करण्यापूर्वी, रुग्णांनी हे उपचार त्यांच्या एकूणच आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, असं जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ म्हणतात.

मात्र विशेषकरून गरम पाणी पिण्याबद्दल काय? यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं कोणतंही विशिष्ट मार्गदर्शन नसलं तरीदेखील, पाणी किती गरम आहे, तुम्ही किती पाणी पिता आणि तुमच्या आरोग्याची काय स्थिती आहे, यावर ते अवलंबून आहे, असं कुरुविला म्हणतात.

"हे सर्वकाही पुरावे आणि संतुलनाशी निगडीत आहे," असं त्या भर सांगतात.

विज्ञान काय सांगतं?

सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्यायल्याचे काही फायदे असू शकतात, असं डॉ. रोझी ब्रुक्स म्हणतात. त्या डॉक्टर आणि दीर्घायुष्य वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ आहेत.

"पचन होण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास याचा थोडा फायदा होतो," असं त्या म्हणाल्या.

कोमट पाणी प्यायल्यामुळे नलिकेतील (इसोफॅगस) पेटके कमी होण्यास मदत होऊ शकते, याचे थोडे पुरावे आहेत, असं त्या म्हणाल्या.

घसा आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका असते.

"मात्र, एरवी थंड किंवा गरम पाणी पिण्याचा फायदा फक्त शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) टिकवून ठेवण्यासाठी होतो," असं त्या म्हणाल्या.

सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्यायल्याचे काही फायदे असू शकतात, असं डॉ. रोझी ब्रुक्स म्हणतात. त्या डॉक्टर आणि दीर्घायुष्य वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्यायल्याचे काही फायदे असू शकतात, असं डॉ. रोझी ब्रुक्स म्हणतात. त्या डॉक्टर आणि दीर्घायुष्य वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ आहेत.

"थंड पाणी प्यायल्यामुळे आरोग्याची हानी होते, हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही," असं डॉ. सेलिना ग्रेन म्हणतात. त्या डॉ. हेलेन मेडिकलमध्ये सर्वसाधारण डॉक्टर आणि जीवनशैलीशी निगडीत डॉक्टर आहेत. डॉ. हेलेन मेडिकल हे युकेमधील खासगी क्लिनिक आहे.

त्या या गोष्टीवरही भर देतात की सोशल मीडियावर काही दावे केले जात असले तरीदेखील, कोमट पाणी प्यायल्यामुळे चरबी कमी होते, चयापचयाची क्रिया सुधारते किंवा शरीरातील 'विषारी घटक बाहेर' (डिटॉक्स) टाकले जातात, याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत.

"जर कुणाला कोमट पाणी प्यायला आवडत असेल आणि त्यामुळे ते जास्त पाणी पित असतील, तर ती चांगली बाब आहे. मात्र तो चयापचयाच्या क्रियेसाठी कोणताही शॉर्टकट नाही," असं त्या म्हणाल्या.

ग्रे, सिंगापूरमध्ये पांरपरिक चिनी औषधोपचार पद्धतीचा वापर केला जाणाऱ्या वातावरणात वाढल्या आहेत. त्या म्हणाल्या, "त्यांना अजूनही आठवतं की त्यांची आई त्यांना शरीराला आतून ऊब देण्यासाठी गरम पाणी पित जा, असं सांगत असे."

त्या पुढे म्हणतात, "या परंपरा नैसर्गिक स्वरुपाच्या वाटतात, त्या करण्यास अधिक सहज, सोप्या वाटतात, तसंच सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्या अर्थपूर्ण आहेत."

मन शांत करण्याची एक संधी

कोमट पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दलचे पुरावे फार कमी असले तरीदेखील, संशोधनातून दिसून येतं की इतर पारंपरिक पद्धती फायदेशीर ठरू शकतात.

संपूर्ण घटक असलेला गरम नाश्ता, थंड धान्याच्या वाटीपेक्षा अधिक पौष्टिक असू शकतो.

भीती वाटल्यानं, आत्मविश्वास नसल्यामुळं आजार होतो, याचा कोणताही पुरावा नसला तरीही, उबदार आणि सुलभ वाटल्यामुळं तुम्हाला आराम वाटू शकतो आणि चांगली झोप येऊ शकते.

मर्यादित स्वरुपाच्या मात्र चांगल्या दर्जाच्या अभ्यासातून आढळून आलं आहे की, पांरपरिक चिनी ताई ची आणि किगोंग व्यायामांमुळे शरीराची ताकद वाढते, गतिशीलता वाढते आणि तणाव कमी होतो.

'की' म्हणजे ऊर्जा टिकवण्याची संकल्पना हा पारंपरिक चिनी उपचार पद्धतीतील मध्यवर्ती विचार आहे.

'की' म्हणजे ऊर्जा टिकवण्याची संकल्पना हा पारंपरिक चिनी उपचार पद्धतीतील मध्यवर्ती विचार आहे.

फोटो स्रोत, Prof Shun Au

फोटो कॅप्शन, 'की' म्हणजे ऊर्जा टिकवण्याची संकल्पना हा पारंपरिक चिनी उपचार पद्धतीतील मध्यवर्ती विचार आहे.

"दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा आपलं मन अस्थिर असतं, वेगानं धावत असतं. आपलं शरीर आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत असण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी असतात," असं चिनी वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ शुन ऑ म्हणतात.

"ध्यान करणं, किगोंग आणि ताई ची यांचा मूळ उद्देश मनाचा हा वेग कमी करणं, त्याला स्थिर करणं हाच आहे," असं ते पुढे म्हणतात.

कोमट पाणी प्यायल्यानं आरोग्याला कोणतेही मोठे किंवा लक्षणीय फायदे होतात, असं डॉक्टर ब्रुक्स यांना वाटत नसलं, तरीदेखील त्या हे मान्य करतात की, ते मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं.

"ही एकप्रकारची दिनचर्याच आहे. आपल्या रोजच्या व्यग्र, धावपळीच्या जगात आपण अनेकदा स्वत:ला वेळ देणंच विसरून जातो. या दिनचर्येद्वारे, पद्धतींमुळे तुम्ही स्वत:ला तो वेळ देता," असं त्या पुढे म्हणतात.

खान म्हणतात की, त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं जाणवलं आहे. सकाळी गरम पाणी पिणं म्हणजे स्वत:साठी वेळ काढण्यासारखंच आहे.

"मनाची गतिशीलता कमी करण्याची, मन शांत करण्याची, माझ्या अवतीभोवतीच्या गोष्टी टिपून घेण्याची आणि माझ्या दिवसाची सुरुवात अर्थपूर्णरित्या करण्याची एक संधी म्हणून मी याकडे पाहते," असं त्या म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)