इंटरनेटवर असलेला आपला डेटा पूर्णपणे मिटवणं खरंच शक्य आहे का?

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, के. सुभगुणम
    • Role, बीबीसी तमिळ
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आजच्या युगात इंटरनेटशिवाय आयुष्याची कल्पनाही करणं कठीण झालं आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे इंटरनेट ही आता एक मूलभूत गरज बनली आहे.

या परिस्थितीत आपण अनेक गोष्टी ऑनलाइन करतो, माहिती मिळवतो म्हणजे शिकतो, टाइमपास करतो, शॉपिंग करतो आणि सोशल मीडियावर पोस्टही करतो.

इंटरनेटवर ऑनलाइन अपलोड केलेली आपल्याशी संबंधित एखादी माहिती डिलीट केली म्हणजेच हटवली तर ती कायमची नाहीशी होते, असा अनेकांचा समज असतो.

उदाहरणार्थ, इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट केल्यावर, गुगलसारख्या ब्राउझरमध्ये आपली सर्च हिस्ट्री डिलीट केल्यानंतर किंवा फेसबुकवर अपलोड केलेला फोटो काढून टाकल्यानंतर ती माहिती पूर्णपणे नष्ट झाली आहे, असं आपल्याला वाटतं.

पण हा डेटा खरंच पूर्णपणे नाहीसा होतो का, असं विचारलं तर तज्ज्ञांचं उत्तर 'नाही' असंच असतं. प्रत्यक्षात हे इतकं सोपं नाही. इंटरनेटचं जग खूपच गुंतागुंतीचं, क्लिष्ट आहे.

'डिलीट' बटण दाबल्यावर नेमकं काय होतं?

सामान्यतः 'डिलीट' बटण दाबल्यावर ती माहिती युजरच्या मोबाइल किंवा संगणकातून गायब होते, असं सायबर तज्ज्ञ मुरलीकृष्णन चिन्नादुरई सांगतात.

त्याव्यतिरिक्त, "सोशल मीडियावर इतर यूझर्सनाही ती माहिती दिसेनाशी होते, त्यामुळे ती पूर्णपणे डिलीट झाली आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात ती पोस्ट त्या कंपनीच्या सर्व्हरवर कायम साठवलेलीच राहते."

गुगल आणि मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम) सारख्या मोठ्या टेक कंपन्या प्रचंड प्रमाणात डेटा साठवून ठेवतात, असं ते सांगतात.

"एखादी गोष्ट आपण डिलीट केली तरी ती फक्त लोकांच्या नजरेतून जाते; पण त्यानंतरही काही काळ ती त्या कंपन्यांच्या सर्व्हरवर संग्रहित राहते," असंही ते स्पष्ट करतात.

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

साधारणपणे डिजिटल कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या डेटाच्या प्रती जपून (बॅकअप) ठेवतात. तांत्रिक अडचण, हॅकिंग किंवा सिस्टिम बंद पडल्यास या प्रती उपयोगी पडतात.

त्यामुळे "आज तुम्ही एखादी पोस्ट किंवा फोटो डिलीट केला, तरी तो काही आठवडे किंवा महिने त्या सर्व्हरवर संग्रहित राहू शकतो."

त्याचबरोबर, तुमचा डेटा फक्त एका प्लॅटफॉर्मवरच नाही, तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी संग्रहित केलेला असू शकतो, असं सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि वकील एन. कार्तिकेयन यांनी सांगितलं.

इंटरनेट हे संगणक किंवा मोबाइलसारखं एखादं विशिष्ट उपकरण नाही. ते जगभरातील कोट्यवधी संगणकांना जोडणारं एक मोठं जाळं आहे.

सोप्या भाषेत सांगायचं तर, "आपण दोन जगात राहतो, एक जग म्हणजे आपण जिथे खातो, झोपतो, फिरतो अशा सगळ्या गोष्टी करतो; आणि दुसरं म्हणजे इंटरनेटवर आपण करत असलेल्या गोष्टींचं डिजिटल जग म्हणजेच आभासी जग," असं कार्तिकेयन सांगतात.

वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला डेटा

त्यांच्या मते, एखाद्याने इंटरनेटवर फोटो अपलोड केला की, तो फक्त त्या व्यक्तीच्या डिव्हाइसवरच असतो असं नाही. तो वेगवेगळ्या मार्गांनी अनेक ठिकाणी पोहोचतो.

उदाहरणार्थ, तुमचा प्रोफाइल पाहणारा दुसरा युजर तो फोटो डाउनलोड करून सेव्ह करू शकतो आणि पुढे शेअरही करू शकतो. तो फोटो वेगवेगळ्या वेबसाइट्सवर कॉपी करून टाकला जाऊ शकतो.

गुगलसारख्या सर्च इंजिन्सकडूनही तो डेटा साठवला जाऊ शकतो. याचं एक उदाहरण म्हणजे गुगलकडून केलं जाणारं तात्पुरतं स्टोरेज (कॅशे). कधी कधी वापरकर्त्यांनी काही डिलीट केलं तरी गुगल मूळ माहिती काढून टाकतं, पण त्याची कॉपी काही काळासाठी संग्रहित करून ठेवतं.

गुगल वेबसाइटनुसार, "तुम्ही डेटा डिलीट केल्यानंतर तो आमच्या सर्व्हरमधून सुरक्षितपणे आणि पूर्णपणे काढून टाकला जाईल, किंवा कधी कधी तो कोणाची ओळख पटणार नाही (अनॉनिमस) अशा स्वरूपातच ठेवला जाईल, यासाठी आम्ही निश्चित केलेली प्रक्रिया पाळतो."

यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट डिलीट करता, त्याच्या कॉपीज आमच्या सिस्टिममधून पूर्णपणे हटायला थोडा वेळ लागू शकतो, असंही त्यात म्हटलं आहे.

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजेच, एखाद्याने आपला डेटा डिलीट केला तरी त्याची कॉपी काही काळ गुगलच्या सर्व्हरवर राहू शकते.

जवळपास सर्व सर्च इंजिन्समध्ये हीच पद्धत असल्यामुळे, आपण डिलीट केलेली कोणतीही गोष्ट इंटरनेटवरून पूर्णपणे नाहीशी होत नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

याशिवाय 'डेटा ब्रोकर्स' नावाच्या काही कंपन्याही असतात. त्या वेगवेगळ्या वेबसाइट्समधून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून जाहिरात किंवा मार्केटिंगसाठी विकतात.

"एकदा तुमचा डेटा अशाप्रकारे गोळा झाला की तो अनेक प्लॅटफॉर्मवर जातो," असं कार्तिकेयन सांगतात.

म्हणूनच, एका ठिकाणाहून काहीतरी डिलीट केलं म्हणजेच हटवलं तरी ते इंटरनेटवरून पूर्णपणे नाहीसं होतं नाही.

सर्च इंजिन आणि सर्च हिस्ट्री

गुगल, याहूसारख्या सर्च इंजिनमध्ये सर्च हिस्ट्री (ब्राऊजर हिस्ट्री) पूर्णपणे डिलीट केली की सगळे डिजिटल ठसे (ट्रेस) नाहीसे होतात, असं आपल्याला वाटतं. पण ते खरं नाही, असं मुरलीकृष्णन म्हणतात.

"एखाद्याने आपली सर्च हिस्ट्री डिलीट केली तर ती त्याच्या डिव्हाइसवरून हटते. पण त्याने पाहिलेल्या वेबसाइट्सवर त्याच्या भेटी आणि ॲक्टिव्हिटीचे रेकॉर्ड तसेच राहतात. तसेच, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे साठवलेला डेटा देखील त्यामुळे हटत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही सर्च इंजिनवर कोणत्या वेबसाइट्स पाहिल्या, याची माहिती इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना असू शकते. तसेच, वेबसाइट्सही तुमचा आयपी ॲड्रेस, भेटीची वेळ अशा गोष्टींची नोंद ठेवतात.

तसंच, यामुळे जाहिरातदारांकडून होणारं तुमचं ट्रॅकिंगही थांबत नाही, असं त्यांनी सांगितलं.

"उदाहरणार्थ, एखाद्या युजरने सर्च इंजिनवर दुचाकी खरेदीबद्दल शोध घेतला आणि नंतर ती सर्च हिस्ट्री डिलीट केली. तरीही त्याला दुचाकीच्याच जाहिराती दिसत राहतात. यावरून कळतं की, आपल्या ॲक्टिव्हिटीची माहिती फक्त आपल्या डिव्हाइसवरूनच डिलीट होते; पण इंटरनेटवर ती वेगवेगळ्या ठिकाणी संग्रहित केली जाते."

डिजिटल जगातून आपलं अस्तित्व पूर्णपणे मिटवता येतं का?

व्हॉट्सॲपमध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन असतं, असं म्हटलं जातं. समजा तुम्ही तुमच्या मित्रासोबत दुचाकी खरेदी करण्याबाबत वैयक्तिक चॅटिंग केलं.

पण तरीही, "तुमच्या पगारानुसार हप्त्यांवर मिळणाऱ्या दुचाकीची जाहिरात तुम्हाला इतर सर्च इंजिन किंवा ॲपवर दाखवली जाते. त्यामुळे डिजिटल जगात काहीही पूर्णपणे नष्ट होत नाही; तो डेटा कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहतोच," असं कार्तिकेयन सांगतात.

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते, तुमचं डिजिटल आयुष्य पूर्णपणे नष्ट करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. पुढे त्यांनी यामागची कारणंही सांगितली.

  • डेटा अनेक वेळा कॉपी केला जातो : जेव्हा तुम्ही काहीही पोस्ट केलं की त्याच्या कॉपीज वेगवेगळ्या सर्व्हरवर साठवल्या जाऊ शकतात
  • डेटा कॉपीज : इंटरनेट कंपन्या डेटा डिलीट केल्यानंतरही त्याच्या कॉपीज काही काळासाठी साठवून ठेवतात.
  • इतर लोक तुमचा कंटेंट सेव्ह करू शकतात : तुम्ही पोस्ट केलेला फोटो किंवा पोस्ट कोणीतरी स्क्रीनशॉट घेऊन किंवा डाउनलोड करून ठेवू शकतो. त्यावर तुमचं नियंत्रण नसतं.
  • डेटा खूप मौल्यवान असतो : आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत वैयक्तिक डेटा खूप महत्त्वाचा असतो. कंपन्या तो जाहिरात, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सिस्टिमला प्रशिक्षण देण्यासाठी वापरतात.

वैयक्तिक सुरक्षिततेसाठी काय करावं?

डिजिटल पद्धतीने अपलोड केलेली सगळी माहिती पूर्णपणे मिटवता येत नसली तरी, आपला डिजिटल फूटप्रिंट (ठसा) कमी करून आपण अधिक सुरक्षित राहू शकतो, असं मुरलीकृष्णन सांगतात.

"काहीही पोस्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मोबाइल नंबर, पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती शेअर करू नये. वापरात नसलेली जुनी अकाउंट्स डिलीट करावीत. तसेच मजबूत पासवर्ड आणि दोन-स्तरीय सुरक्षा (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) वापरावी," असं त्यांनी स्पष्ट केलं.

"बाल लैंगिक शोषणाशी संबंधित किंवा परस्पर संमतीशिवाय शेअर केलेल्या लैंगिक सामग्रीसारखी गंभीर प्रकरणं असल्यास, ती हटवण्यासाठी stopncii.org या वेबसाइटवर तक्रार करून ती पूर्णपणे काढता येऊ शकते. याशिवाय इतर प्रकारच्या कंटेंटसाठी मात्र अशी कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नाही," असं ते सांगतात.

इंटरनेट आणि डेटा प्रोटेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

इंटरनेटवर काहीही पोस्ट किंवा फोटो टाकण्यापूर्वी त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा नीट विचार करणे, हीच सर्वात चांगली सुरक्षा आहे, असं ते म्हणतात.

एखाद्याचा डिजिटल ठसा कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहतोच. "उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नकारात्मक पोस्ट टाकते आणि नंतर ती डिलीट करते, तरी ती पूर्णपणे नष्ट होत नाही.

"त्याच व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली, तर ती पोस्ट पुन्हा शोधता येऊ शकते. त्यामुळे डिजिटल जगात आपण काय करतो याबद्दल नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे," असं मुरलीकृष्णन यांनी म्हटलं.

इंटरनेट माहिती जलद आणि सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी बनवलं आहे. माहिती सहजपणे विसरून टाकण्यासाठी डिझाइन केलेलं नाही.

खरंतर, इंटरनेट आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त गोष्टी लक्षात ठेवतं आणि साठवून ठेवतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.