'महादेवाचा अवतार असल्याचं सांगत जबरदस्तीनं ठेवले शारीरिक संबंध'; ऋषिकेश वैद्यवर नेमके काय आरोप?

फोटो स्रोत, Alpesh Karkare
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
'मी महादेवाचा अवतार आहे', असं सांगत प्रसादामधून गुंगी आणणारं औषध खायला घातलं आणि जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप एका महिलेनं केला आहे.
या प्रकरणातील आरोपीचं नाव ऋशिकेश वैद्य असं असून तो स्वयंघोषित धर्मगुरू आहे.
पुन्हा न भेटल्यास नग्न फोटो पतीला दाखवण्याची धमकी देऊन आरोपीनं पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचाही आरोप पीडित महिलेनं केला आहे.
दुसरीकडे आरोपी ऋषिकेश वैद्य यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून लवकरच सत्य बाहेर येईल."
काय आहे हे प्रकरण?
25 मार्च 2025 रोजी वसई येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनंतर, बलात्कार आणि धमकी या गुन्ह्याखाली 40 वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात 'झिरो एफआयआर' दाखल करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Alpesh Karkare
या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत या तपासासाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
या प्रकरणी 27 मार्चला सायंकाळी आरोपी ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
'नवऱ्याला नग्न फोटो पाठवेन'
पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, 40 वर्षीय आरोपी ऋषिकेश वैद्य धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ता म्हणून काही वर्षांपासून वसई येथे वास्तव्यास आहे.
आरोपी ऋषिकेश वैद्यने पीडित महिलेला 'आपण महादेवाचा अवतार आहोत,' असं सांगत तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर, 31 डिसेंबर 2023 रोजी आरोपीने पीडितेला वसई येथील मांजरी येथे नेलं. तिथे आरोपीने पीडितेला 'प्रसाद आहे' असं सांगून गुंगी आणणारं औषध खायला दिलं, असा आरोप आहे.
त्यानंतर, जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडितेने केला आहे.
तसेच, 11 मे 2025 रोजी पुन्हा या आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
'मला भेटायला आली नाहीस, तर तुझे नग्न फोटो नवर्याला पाठवून देईन,' अशी धमकी त्यानं पीडित महिलेला दिली.
त्यानंतर, या आरोपीने पीडितेला वसई येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना कोणास सांगितल्यास तुझ्या नवऱ्याला गोळ्या घालेन, अशीही धमकी त्यानं दिली, असा पीडितेचा आरोप आहे.
या भीतीमुळे आपण ही घटना गेल्या काही वर्षांपासून कोणालाही सांगितली नाही, असंही पीडितेनं म्हटलं आहे.
खरात प्रकरणानंतर पीडितेला मिळाली हिंमत
सध्या राज्यात स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातचं लैंगिक शोषणाचं प्रकरण प्रचंड चर्चेत आहे.
या अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेनं हिंमत दाखवत सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला.
त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने या महिलेने 25 मार्च 2026 रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्ह्याची नोंद आणि तपास कसा सुरू आहे?
पीडित महिलेच्या तक्रारीवरून कलम 64, 351(2) नुसार आरोपी ऋषिकेश वैद्य यांच्यावर 'झिरो एफआयआर' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेने सुरुवातीला वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मात्र, घटनेचे मुख्य ठिकाण पुण्यातील मांजरी (हडपसर) असल्याने हा शून्य क्रमांकाने दाखल केलेला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी ऋषिकेश वैद्य याला पिंपरी चिंचवड येथून अटक केल्याची माहिती मांजरी पोलिसांनी दिली.
या प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, "महिलेवर जबरदस्ती केल्याची आणि मानसिक छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार आहे."
"हा आरोपी स्वयंघोषित धर्मगुरू असल्याचा भासवतो आणि लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करतो, अशा तक्रारी आणि माहिती तपासात समोर येत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."
"नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत पोलिसांना माहिती द्यावी," असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या प्रकरणानंतर विरोधकांची टीका
अशोक खरात प्रकरणानंतर आता या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यने महिलांवर केलेले अत्याचार समोर आले आहेत, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली.
समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी म्हटले, "जसा अशोक खरात 'मी कृष्ण तू राधा' असे सांगून महिलांवर अत्याचार करत होता, त्याच प्रकारे ऋषिकेश वैद्यने 'मी महादेव, तू पार्वती' असे सांगत एका महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे."
काही नेत्यांसोबत त्याचे फोटो समोर येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
कोण आहे आरोपी ऋषिकेश वैद्य?
ऋषिकेश वैद्य हा वसई परिसरातील एक स्वयंघोषित धर्मगुरू आणि 'आमची वसई' नावाच्या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष आहे.
तो वसई (पश्चिम) येथे आपल्या कुटुंबासह राहतो.
ऋषिकेश वैद्य हा वसई परिसरात गुरुजी म्हणून ओळखला जातो. तो पूजा-पाठ, आध्यात्मिक प्रवचने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो. याद्वारे त्याने तरुण, तरुणी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले.
'आमची वसई' संस्थेमार्फत तो सामाजिक कार्य करत असल्याचा दावा करतो.
मात्र, धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असल्याचाही आरोप काही स्थानिकांनी केला आहे.

फोटो स्रोत, Alpesh Karkare
या प्रकरणासंदर्भात ऋषिकेश वैद्य आणि त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
अटक होण्यापूर्वी समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी सर्व आरोप फेटाळले. "माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते," असं त्यानं म्हटलेलं आहे.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच या घटनेने खळबळ उडाली आहे.
अंधश्रद्धेमुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























