मोहम्मद बगर गालिबाफ : इस्रायलच्या हिटलिस्टवर, तरीही त्यांचंच नाव अमेरिकेशी वाटाघाटीत का पुढे आलंय?

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, पॉरिया महरूयान
- Role, बीबीसी न्यूज पर्शियन
- वाचन वेळ: 6 मिनिटे
इराणच्या संसदेचे सभापती (स्पीकर) मोहम्मद बगर गालिबाफ आता एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समोर आलेल्या वृत्तांनुसार, इराण युद्धादरम्यान त्यांना अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका पाकिस्तानी सूत्राचा संदर्भ देत सांगितलं की, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याबरोबर गालिबाफ यांचं नावदेखील इस्रायलच्या 'हिट लिस्ट'मधून काढून टाकण्यात आलं होतं.
या सूत्रानं सांगितलं, "इस्रायलकडे त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती होती. ते गालिबाफ यांना मारू इच्छित होते. आम्ही अमेरिकेला सांगितलं की जर यांनादेखील मारलं, तर मग चर्चा करण्यासाठी कोणीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे, अमेरिकेनं इस्रायलला असं करण्यापासून मागे हटण्यास सांगितलं."
इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचादेखील समावेश आहे.
'पॉलिटिको' या अमेरिकेतील प्रसारमाध्यमानुसार, 64 वर्षांच्या गालिबाफ यांनी भलेही शत्रूंना इशारा दिला असेल की 'आमच्या भूमीचं रक्षण करण्याचा आमचा निश्चय परीक्षा घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये.'
त्यांनी एक्सवर 'सतत हल्ले' करण्याची धमकीदेखील दिली आहे. तरीदेखील अमेरिकेचे काही अधिकारी त्यांच्याकडे अशा सहकाऱ्याच्या दृष्टीकोनातून पाहतात, ज्यांच्यासोबत काम केलं जाऊ शकतं.
गालिबाफ यांनी इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
सध्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत.
अशा परिस्थितीत, इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) बरोबर असलेली त्यांची जवळीक, सरकारच्या विविध विभागांमधील त्यांचा अनुभव आणि कट्टरतावादी मात्र एक 'व्यवहारिक' व्यक्ती म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेमुळे ते सत्तेच्या एका वरच्या स्तरावर पोहोचू शकतात.
गालिबाफ यांचा इस्लामिक क्रांतीशी असलेला संबंध
आयआरआयबी हे इराणचं सरकारी प्रसारमाध्यम आहे. तर 'अल आलम' हे आयआरआयबीची मालकी असलेलं अरबी भाषेतील टीव्ही चॅनल आहे. अल आलमनुसार गालिबाफ यांचा जन्म इराणच्या ईशान्य भागातील तोरगबेह शहरात एका धार्मिक, मजूर वर्गातील कुटुंबात झाला होता.
त्यांचं गाव मशहदच्या जवळ आहे. याच्याशी इस्लामिक क्रांतीतील काही प्रमुख व्यक्तिमत्त्वाचा संबंध राहिला आहे.
वयाच्या 16 वर्षी, त्यांनी मशहदमधील प्रमुख मशिदींमधील क्रांतिकारक धर्मगुरूंकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये नंतर इराणचे सर्वोच्च नेते झालेल्या अयातुल्ला अली खामेनी यांचाही समावेश होता.
इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्याबरोबर लगेचच, गालिबाफ यांनी इराकविरुद्धच्या युद्धात भाग घेतला. ते वयाच्या 20 व्या वर्षी आयआरजीसीशी जोडले गेले. दोन वर्षांनी, ते त्याच्या एका लढाऊ डिव्हिजनचे कमांडर झाले. ते 1988 मध्ये इराक युद्ध संपेपर्यंत या पदावर होते.
अल-आलम यांच्यानुसार, गालिबाफ ज्या वर्षी आयआरजीसीचे कमांडर झाले होते, त्याच वर्षी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे विधी सर्वोच्च नेते अयातुल्ला रोहिल्ला खुमैनी यांनी पूर्ण केले होते. गालिबाफ यांनी 3 अपत्यं आहेत.
इराक युद्धानंतर देखील गालिबाफ यांची वरच्या पदांकडील वाटचाल सुरूच राहिली. ते 1997 मध्ये आयआरजीसीच्या हवाई दलाचे कमांडर झाले.

फोटो स्रोत, Pacific Press/LightRocket via Getty Images
विद्यार्थी आंदोलन दडपण्यातील भूमिका
जुलै 1999 मध्ये इराणमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे इराणमध्ये खळबळ उडवून दिली होती. या आंदोलनाची सुरुवात एक सुधारणावादी वृत्तपत्र बंद झाल्यामुळे झाली होती.
हे आंदोलन अतिशय निर्दयीपणे चिरडण्यात आलं. यात अनेकजण मारले गेले. या दडपशाहीच्या कारवाईत गालिबाफ यांचादेखील सहभाग होता, असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
एका लीक झालेल्या ऑडिओ फाईलमध्ये ते असं म्हणताना ऐकू आले, "माझा एक फोटो आहे, ज्यात मी एक हजार सीसीच्या मोटरसायकलवर बसलेलो आहे. माझ्या हातात एक काठी आहे. जिथे रस्त्यावर उतरून बळाचा वापर करण्याची आवश्यकता असायची, ती करणाऱ्यांमध्ये माझा समावेश होता. मला याचा अभिमानदेखील आहे."
आंदोलनानंतर आयआरजीसीच्या 24 कमांडरांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि एक सुधारणावादी नेते, मोहम्मद खातमी यांना एक अतिशय कठोर भाषेत पत्र लिहिलं.
या पत्रात आयआरजीसीनं हस्तक्षेप न करण्याची धमकी दिली होती. गालिबाफ यांनी सांगितलं की ज्या दोन कमांडरांनी या पत्राचा मसुदा तयार केला, त्यापैकी एक ते होते. त्या पत्रावर इतर लोकांनी सह्या केल्या होत्या.
अनेकजण या पत्राकडे राजकीय बाबींमधील आयआरजीसीच्या वाढत्या प्रभावाचं एक स्पष्ट चिन्ह म्हणून पाहतात. तेव्हापासून हा प्रभाव सातत्यानं वाढतच गेला आहे.
पोलीस प्रमुख ते तेहरानचे महापौर
विद्यार्थी आंदोलनाच्या एक वर्षानं, गालिबाफ यांना वयाच्या 39 व्या वर्षी पोलीस प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.
पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळात, त्यांनी एक राष्ट्रीय आपत्कालीन पोलीस हॉटलाईन सुरू केली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याची प्रक्रिया सोपी झाली.
त्यांनी पोलीस दलाला परदेशी गाड्यांनी सज्ज केलं. याला ते त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या कामगिरींपैकी एक मानतात. मात्र टीकाकारांचं म्हणणं आहे की यावर खूप पैसे खर्च करण्यात आले.
गालिबाफ यांनी 2005 मध्ये पोलीस प्रमुख पदाचा राजीनामा दिला. मग त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना तेहरानचा महापौर म्हणून निवडण्यात आलं.
ते 12 वर्षे या पदावर होते. तेहरानच्या महापौरपदी सर्वाधिक कार्यकाळ राहण्याचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
ट्रॅफिकच्या समस्येला तोंड देत असलेल्या तेहरानमध्ये मेट्रो व्यवस्थेच विस्तार करण्याचं आणि सदर एक्सप्रेसवे सारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं.
मात्र 2016 मधील 'ॲस्ट्रोनॉमिकल प्रॉपर्टीज घोटाळ्या'नंतर गालिबाफ यांच्या प्रतिमेला धक्का बसला. या प्रकरणात सिटी कौन्सिलवर अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना शेकडो मालमत्ता मोठी सूट देत विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. ही सूट बाजारभावापेक्षा 50 टक्क्यांहून अधिक होती.
प्लास्को बिल्डिंग ही 17 मजली इमारत इराणमधील सुरुवातीच्या सर्वात उंच इमारतींपैकी एक होती. गालिबाफ यांनी पद सोडण्याच्या काही महिने आधी ही इमारत आग लागल्यानंतर कोसळली.
या घटनेत अग्मिशमन दलाच्या किमान 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील शहरातील प्रशासनातील व्यवस्थेचा निष्काळजीपणा उघड झाला.
तरीदेखील या दोन्हींपैकी कोणत्याही घोटाळ्यामुळे गालिबाफ यांना पदावरून हटवण्यात आलं नाही. तसंच त्यांच्यावर महाभियोग देखील चालवण्यात आला नाही. या दोन्ही प्रकरणांमधून ते निसटले.
नंतर 2020 मध्ये ते इराणमधील संसदीय निवडणुकांमध्ये एका जागी जिंकले. त्यानंतर ते संसदेचे स्पीकर म्हणजे सभापती झाले.

फोटो स्रोत, Majid Saeedi/Getty Images
राष्ट्राध्यक्षपदासाठीचे अयशस्वी प्रयत्न आणि सभापती पद
गालिबाफ यांचं लक्ष नेहमीच राष्ट्राध्यक्षपदावर राहिलं आहे. मात्र 2005, 2013, 2017 आणि 2024 असे त्यांचे 4 प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
पहिल्या प्रयत्नाच्या वेळेस आयआरजीसीच्या या अनुभवी सैनिकानं त्यांच्या लष्करी पार्श्वभूमीवर भर दिला होता. मात्र नंतर त्यांनी त्यांचे डावपेच बदलून राजकीय भूगोलातील पीएचडीधारक आणि प्रशिक्षित पायलट म्हणून त्यांच्या क्षमतांचा प्रचार केला.
त्यांनी स्वत:ला एक 'जिहादी मॅनेजर' म्हणूनही सादर केलं आहे. त्यांनी स्वत:च्या लष्करी क्षमतेबरोबरच त्यांच्या निष्ठेचा प्रचार केला.
भलेही गालिबाफ यांना प्रदीर्घ काळापासून सुधारणावाद्यांचा विरोधक मानलं गेलं असेल. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये अशी चिन्हं दिसली आहेत, ज्यातून दिसून येतं की पुराणमतवादी गटातील काही घटकांशी त्यांचे मतभेद झाले आहेत.

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images
इराणमध्ये 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत, कट्टर पुराणमतवाद्यांच्या एका मोठ्या गटानं गालिबाफ यांच्या उमेदवारीला विरोध केला. तसंच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
गालिबाफ, 2022 मध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या एका कथित घोटाळ्यात अडकले. तुर्कियेतून परतल्यानंतर विमानतळावरील त्यांच्या कुटुंबाचे काही फोटो समोर आले. यात एका स्ट्रोलरसह मुलांच्या बऱ्याच वस्तू नेत असताना ते दिसत होते. या फोटोंमळे लोकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला.
त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर, ढोंगीपणा, दुटप्पीपणा आणि पाखंडीपणाचा आरोप केला. मात्र त्यांनी त्यांच्या पाठिराख्यांना सांगितलं की या प्रकरणामागे राजकारण आहे. त्यांना इराणच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा हा एक कट आहे.
गालिबाफ यांच्यावर या प्रकरणाचा कोणताही परिणाम झाला नाही. ते 2024 मध्ये पुन्हा एकदा संसदेचे सभापती म्हणून निवडले गेले.
आता इराण एक अत्यंत निर्णायक वळणावर आहे. अशावेळी त्यांचं राजकीय भवितव्य आणखी उजळू शकतं.
युद्ध सुरू ठेवण्यासाठी देखरेख करण्याची आणि सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि सत्तेच्या तीन शाखांच्या प्रमुखांमध्ये ताळमेळ साधण्याची त्यांची क्षमता, हे त्यामागचं कारण आहे.
संपादन: ग्रेस त्सोई
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























