You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्याचं नाव ठेवायलाही ब्रिटीशांना 30 वर्षं लागली, ते शहर आहे 'या' देशाची राजधानी
- Author, अँथनी हॅम
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
- वाचन वेळ: 5 मिनिटे
सेशेल्स या द्विपसूमहाच्या रूपातील देशाच्या राजधानीचं शहर व्हिक्टोरिया समुद्रात भर टाकून उभारण्यात आलं. हे शहराचं क्षेत्रफळ लहान असलं, तरी तिथली जिवंत संस्कृती आणि विलक्षण इतिहास मात्र व्यापक आहे.
विमानातून सेशेल्सला जात असताना आजूबाजूला अथांग सागर पसरलेला होता. नंतर कठीण खडकाचे उंच कडे विमानाच्या खिडकीतून अगदीच जवळ दिसायला लागले, ढगांनी हे दृश्य अधूनमधून झाकलं जात होतं. आता विमान जमिनीवर उतरेल किंवा या डोंगरांमध्ये जाऊन कोसळेल, असं वाटण्याइतकं दोन्हींमधलं अंतर कमी होतं.
सेशेल्स हा देश म्हणजे 115 बेटांचा समूह आहे. विस्मयकारक निळ्या आकाशाखाली समुद्र आणि जमीन यांचे उदात्त मिलन होतं. आफ्रिकेच्या मुख्य भूमीपासून समुद्रात 1800 किलोमीटरांवर असणाऱ्या माहे या सर्वांत मोठ्या बेटावर एक उंच ज्वालामुखी आहे. इथलं सगळंच भव्यदिव्य असल्याचं जाणवतं.
याला अर्थातच सेशेल्सच्या लहानखुऱ्या राजधानीचा अपवाद आहे. इथल्या राजधानीचं व्हिक्टोरिया हे शहर जगातील सर्वांत कमी क्षेत्रफळाच्या राजधानींपैकी एक आहे.
जगामध्ये सॅन मॅरिनो किंवा व्हॅटिकन सिटी यांसारख्या, अथवा पॅसिफिक महासागरातील काही मोजक्या बेटांसारख्या इतर काही राजधानीच्या शहरांमधील लोकसंख्यासुद्धा कमी आहे. पण बहुतांश राष्ट्रीय राजधान्यांचा विचार केला, तर त्या तुलनेत व्हिक्टोरियामधील 30 हजार ही लोकसंख्या खूपच कमी ठरते.
माहेच्या अरुंद किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरेशी जागा असल्याचं दिसत नाही. स्वाभाविकपणे तिथे राजधानीच्या शहरासाठीसुद्धा फारशी जागा नाही. माहेचं क्षेत्रफळ केवळ 20 चौरस किलोमीटर इतकंच आहे. इथल्या रस्त्यांच्या घट्ट जाळ्याच्या कडेवरून चालायला जेमतेम 10 मिनिटं लागतात. सभोवताली असणाऱ्या डोंगरांवर अगदी तीव्र उतार नसलेल्या भागांवर घरं आपापली जागा पकडून बसलेली आहेत.
इथल्या भौगोलिक अभियांत्रिकीमुळे एवढ्याशा जागेतही व्हिक्टोरिया शहर स्वतःचा कारभार चालवतं आहे.
फ्रेंचांनी वसवलेलं शहर
"अर्धं व्हिक्टोरिया शहर समुद्रात भर घातलेल्या जमिनीवर आहे," असं सेशेल्समधील एक प्रसिद्ध चित्रकार जॉर्ज कॅमिली म्हणतात. त्यांचा जन्म व्हिक्टोरियामध्ये झाला आणि त्यांनी बरंचसं आयुष्य तिथेच व्यतीत केलं आहे. "आपली टॅक्सी थांबलेय तिथे पूर्वी समुद्र होता."
आधुनिक सेशेल्सची कथा व्हिक्टोरियातील इमारतींमधून आणि तिथल्या अत्यंत केंद्रित स्वरूपाच्या कोलाहलातून उत्तमरित्या उलगडते. शांत समुद्रकिनारे, पामची झाडं, जगापासून व तिथल्या गोंगाटापासून अंतर राखणारी ठिकाणी- अशी सेशेल्सची लोकप्रिय प्रतिमा झालेली आहे, पण त्यावरचा उतारा व्हिक्टोरियाच्या रूपात पाहायला मिळतो.
या छोटेखानी शहराच्या इतिहासाची मुळं बरीच खोलवर गेलेली आहेत. फ्रेंचांनी 1778 साली या शहराची स्थापना केली. त्या वेळी अमेरिकेत क्रांतिकारी युद्ध सुरू होतं, ऑस्ट्रेलियातील शिक्षा छावणीची कल्पना प्रत्यक्षात यायची होती आणि आफ्रिकेतेली बहुतांश प्रदेशाला युरोपियांचा स्पर्श झालेला नव्हता. त्या वेळी स्थापन झालेली ही नवीन वसाहत लाकडी आणि दगडी घरांनी उभी राहिली, तिथे सैन्याच्या बराकी होत्या आणि कासवं ठेवायला छोटी कुंपणं घातलेली होती. इतक्या लहानखुऱ्या जागेला नवा मात्र बरंच भव्यदिव्य ठेवलं होतं- L'Établissement du Roi म्हणजे 'राजाची वसाहत'.
नवीन शहराच्या वाढीसाठी फ्रेंचानी काही प्रयत्न केले नाहीत आणि 1811 साली त्यांच्याकडून या भागाचा ताबा घेतलेल्या ब्रिटिशांनीसुद्धा त्यासाठी काही हातपाय हलवले नाहीत. इतरत्र जात-येत असताना एक सोयीचं बंदर म्हणूनच तेवढा या बेटाचा वापर होत होता.
हे बेट इतकं लहान आणि बिनमहत्त्वाचं होतं की ब्रिटिशांना त्याचं नाव व्हिक्टोरिया असं बदलण्यासाठी 30 वर्षं लागली. 1841 साली व्हिक्टोरिया राणीचा प्रिन्स अल्बर्टसोबत शाही विवाह पार पडला, तेव्हा त्या निमित्ताने या बेटाचं नाव बदलण्यात आलं.
एकोणिसाव्या शतकाचा बहुतांश काळ इथे दखलपात्र असं काहीच घडलं नाही. पण 12 ऑक्टोबर 1862 रोजी या शहरावर प्रचंड मोठं हिमस्खलन झालं आणि चिखल व खडकांच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण मृत्युमुखी पडले. स्विझ मालकी असणाऱ्या हॉटेल इक्वेटरने 1890 साली व्यवसाय सुरू केला. तेव्हापासून या भागात पर्यटनाला सुरुवात झाली आणि अखेर सेशेल्सची ही विशेष ओळख झाली.
गुलामगिरीचा इतिहास
नॅशनल म्युझियम ऑफ हिस्ट्री ही व्हिक्टोरियामधील सध्या अस्तित्वात असणारी बहुधा सर्वांत जुनी इमारत असावी. इथे भिंत भरून लावलेली चित्रं आणि लिखित माहितीपट्ट्या यांचं लक्षवेधी मिश्रण पाहायला मिळतं. आरंभिक काळातील वसाहतकाळाची कहाणी त्यातून आपल्या समोर उलगडते.
गुलामांची मुक्ती आणि त्यानंतर निर्माण झालेली संमिश्र संस्कृती याचा पट यातून उभा राहतो. सेशेल्समध्ये 1 फेब्रुवारी 1835 रोजी 6521 गुलामांना मुक्त करण्यात आलं. त्या वेळी या बेटावरची संपूर्ण लोकसंख्या केवळ 7500 इतकी होती. त्यातील सुमारे 90 टक्के मुक्त झालेले गुलाम होते आणि या पायावर एक संमिश्र राष्ट्र उभं राहिलं.
सेशेल्सच्या सर्वोच्च न्यायालयाची इमारत 1885 साली उभी राहिली, त्याचं रूपांतर 2018 साली या संग्रहालयात करण्यात आलं. लाकडी दारं आणि उंच छत आणि पाम झाडांनी भरलेल्या बागा, अशी ही एक हवेशीर इमारत आहे. इन्डिपेन्डन्स अव्हेन्यू आणि फ्रान्सिस राशेल स्ट्रीट यांचा छेद जातो त्या कोपऱ्यावर हे संग्रहालय आहे. लंडनमधील वॉक्सहॉल ब्रिज रोडवर असणाऱ्या लिट्ल बेन या क्लॉक टॉवरची छोटी प्रतिकृती या चौकातून दिसते.
1903 साली ही प्रतिकृती व्हिक्टोरियाला आणण्यात आली आणि आणखी मोठं होण्याची शक्यता नसलेल्या शहरामधील एक सुसंगत खूण म्हणून तिचा उपयोग होतो.
पर्यटकांचं आकर्षण
गर्दीने भरलेले रस्ते व गल्ल्या हे व्हिक्टोरियाचं खरं केंद्र आहे. अनेक कार आणि लोक, हॉर्न आणि चकचकीत कपडे यांची वर्दळ इथे दिसते. सर सेल्विन सेल्विन-क्लार्क मार्केटभोवती अनेक मच्छिमार ओरडत असतात आणि नारळांपासून व्हॅनिलाच्या बिया, केळी, मिरच्या असे विविथ ताजे पदार्थ इथे विक्रीसाठी उपलब्ध असतात.
अल्बर्ट मार्गाला लागून एक जुनं लाकडी कोठार आहे, भिंतींवरचे रंग उडत आलेत, आणि पुढचा भाग मोठ्या काचांनी बनलेला आहे. तिथून जवळच मोठा सज्जा असणारी एक चर्चशी संबंधित निवासी इमारत दिसते. क्विन्सी मार्गावर हिंदूंचं श्री नवशक्ती विनिगार मंदीर आहे. आजूबाजूला आधुनिक इमारती आहेत.
"लोकांना सेशेल्समधले फक्त समुद्रकिनारेच माहीत असतात," असं स्थानिक व्यापारी कॉनी पटेल म्हणतात.
संपूर्ण आयुष्य व्हिक्टोरियात घालवलेले पटेल हौशी इतिहासकार आहेत.
"समुद्रकिनारे अर्थातच महत्त्वाचे आहेत, पण सेशेल्समध्ये आणखीही बरंच काही आहेत. माहेमध्ये फारसे रस्ते नाहीत. सर्व रस्ते व्हिक्टोरियामधून जातात. पर्यटनाव्यतिरिक्त सर्वसामान्य सेशेल्सवासीय कुठला व्यवसाय करतात, हे पाहायचं असेल तर व्हिक्टोरियामध्ये येऊन पाहावं लागतं. सेशेल्सच्या कथेचा हा एक आवश्यक भाग आहे."
दुसऱ्या एक शहवासीय गीतिका पटेल यावर सहमती दर्शवतात, "खऱ्या सेशेल्सची खिडकी व्हिक्टोरिया आहे. इथे बराच गोंगाट आणि गर्दी दिसू शकते. आम्ही सगळेच वाहतुकीच्या कोंडीविषयी तक्रार करतो. पण हे आधुनिक सेशेल्स आहे. आजूबाजूला पाहा. इथले चेहरे आणि वास्तुरचना आम्ही कोण आहोत ते तुम्हाला सांगतील. सगळे जण संमिश्र भाषा बोलताना दिसतील. इथे आल्याशिवाय सेशेल्स कळणार नाही."
डोंगरावर, शहराच्या वरच्या भागात रिव्होल्यूशन अव्हेन्यूजवळ एका जुन्या घरात मेरी-अन्तोइने रेस्तराँ आहे. वेल्श-अमेरिकी पत्रकार व शोधक हेन्री मॉर्टन स्टेन्ली 1870च्या दशकात आफ्रिकेहून परत जाताना महिनाभर इथे राहिले होते. तिथेच त्यांची डॉ. डेव्हिल लिव्हिंगस्टोन यांच्याशी भेट झाली.
अमेरिकेतील एका वृत्तपत्राने स्टेन्ली यांनी लिव्हिंगस्टोन यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं होतं. अनेक वर्षांपूर्वी लिव्हिंगस्टोन यांचा जगाशी संपर्क तुटला होता. या पहिल्या भेटीत स्टेन्ली यांनी उद्गारलेले शब्द प्रसिद्ध झाले. ते म्हणाले होते, "आपणच डॉ. लिव्हिंगस्टोन, बरोबर ना?"
परतीच्या प्रवासात सेशेल्समध्ये आल्यावर स्टेन्ली एका फ्रेंच टपाली जहाजामध्ये चढणार होते, पण ते एक दिवस उशिरा पोचल्यामुळे त्यांचं हे जहाज चुकलं. मग युरोपात परत जाण्याच वाट बघत त्यांना महिनाभर सेशेल्समध्ये राहावं लागलं. पूर्णतः लाकडी बांधकामाची ही इमारतसुद्धा शहरातील एक महत्त्वाची खूण आहे.
डोंगराच्या खालच्या बाजूला चित्रकार कॅमिली यांनी एका पारंपरिक घराचं रूपांतर प्रदर्शनी जागेत आणि 'कझ झनाना' आर्ट गॅलरीमध्ये केलं आहे. व्हिक्टोरियाला संमिश्र संस्कृतीची प्रादेशिक राजधानी बनवायचं त्यांचं स्वप्न आहे.
"व्हिक्टोरियातील घरं पूर्वी अशी दिसत असत," असं कॅमिली सांगतात. "लुप्त होणाऱ्या जगाचा हा अवशेष आहे."
तिन्हीसांजेला मी कझ झनानामधून बाहेर पडलो आणि शहराच्या मध्यवर्ती भागात भटकलो. विचारात गर्क असताना मी बाजारपेठेच्या बाहेर येऊन पोचलो. दिवसाभरातली उष्णता आता कमी झाली होती आणि बाजारपेठेतील विक्रेतेही कमी झाले होते. वाहतूक नव्हती. रस्ते शांत झाले होते. या क्षणी व्हिक्टोरिया पुन्हा मूळच्या गावासारखं दिसत होतं- जणू काही ते कधी त्याहून मोठं झालंच नसावं असा भास होत होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)