You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. संग्राम पाटील प्रकरणी 15 एप्रिलला सुनावणी, मित्र-हितचिंतकांना पडलेल्या प्रश्नाला काय दिले उत्तर?
फेसबुकवर पोस्ट लिहिल्याप्रकरणी डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लंडन परतण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्क्युलर जारी केले आहे. ते रद्द व्हावे अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. आता पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार असल्याचे डॉ. संग्राम पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?'
असा प्रश्न अनेक मित्र आणि हितचिंतकांना पडलेला आहे. अशा सर्व जणांना माहिती देणे हे माझे कर्तव्य म्हणून मी ही अपडेट देत आहे.
या प्रकरणाबद्दल बोलताना डॉ. संग्राम पाटील म्हणाले, "सदर प्रकरणी सुनावणी सुरू असून माझ्या वकिलांमार्फत माननीय उच्च न्यायालयात माझी बाजू व्यवस्थित मांडलेली आहे, सरकार पक्षाने मुंबई पोलिसांची बाजू मांडली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी प्रतिज्ञापत्र सादर करून माझे म्हणणे लिखित स्वरूपात मुद्देसूदपणे सविस्तर मांडलेले आहेत व मला न्याय मिळावा यासाठी माननीय उच्च न्यायालयास विनंती केली आहे."
"सदर प्रकरणी पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे. त्या दिवशीच्या सुनावणीत मला माननीय न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी मला आशा आहे. संविधान आणि न्यायव्यवस्था यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे," असे पाटील यांनी म्हटले आहे.
याआधी, संग्राम पाटील काम करत असलेल्या कार्यालयातून तीन वेळा नोकरीवर येण्याची नोटीस देखील देण्यात आलेली आहे. आता त्यांची नोकरी धोक्यात आहे.
आतापर्यंत काय घडलं? जाणून घेऊयात.
डॉ. संग्राम पाटील प्रकरणाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे -
18 डिसेंबर 2025 - मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सोशल मीडिया पोस्टवरून मानहानी व इतर कलमांखाली FIR दाखल झाली. तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
10 जानेवारी 2026 - लंडनस्थित डॉक्टर आणि युट्यूबर डॉ. पाटील मुंबई विमानतळावर आल्यानंतर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेऊन ताब्यात घेतले. पंधरा तासाच्या चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन नंतर सोडण्यात आले.
10–21 जानेवारी 2026 दरम्यान गुन्हे शाखेकडून तीन वेळा चौकशी करण्यात आली. पाटील यांना एकूण तीन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
19 जानेवारी 2026 - ते यूकेला परत जाण्यासाठी विमानतळावर गेले असताना Look Out Circular (LOC) असल्यामुळे त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले.
22 जानेवारी 2026 - डॉ. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून FIR आणि LOC रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पोलिसांना उत्तर देण्यास सांगितले.
30 जानेवारी 2026 - मुंबई पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत सांगितले की, कारवाई मनमानी नसून चौकशीच्या गरजेनुसार करण्यात आली आहे.या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलंय की, "संग्राम पाटील भारतीय वंशांचे ब्रिटिश नागरिक आहेत. पण परदेशात बसून भारतातल्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तींची ते बदनामी करत आहेत."
4 फेब्रुवारी - 4 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी पार पडणार होती, मात्र सरकारी वकिलांनी केलेल्या विनंतीनुसार ही सुनावणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली.
9 फेब्रुवारी - 9 फेब्रुवारी रोजी कोर्टात अधिक प्रकरणे असल्यामुळे वेळेअभावी संग्राम पाटील यांची सुनावणी पार पडली नाही. पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी नियोजित करण्यात आली.
17 फेब्रुवारी - मुंबई हायकोर्टामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणे अपेक्षित होतं मात्र पुन्हा वेळेअभावी सुनावणी पार पडली नाही. संग्राम पाटील यांच्या वकिलांनी माझ्या अशिलाची नोकरी धोक्यात आहे असे कोर्टाला स्पष्ट केले व पुढील सुनावणी लवकर घ्यावी अशी विनंती केली. मात्र पुढील सुनावणी दरम्यान सरकारी वकील उपलब्ध नसल्याचं सरकारी बाजूने स्पष्ट करण्यात आलं. मात्र संग्राम पाटील यांची विनंती पाहता 27 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी नियोजित करण्यात आलेली आहे.
27 फेब्रुवारी - सुनावणी बोर्डावर होती. मात्र वेळेअभावी ती पुढे ढकलली. पुढील सुनावणी तातडीने घ्या अशी विनंती संग्राम पाटील यांच्याकडून करण्यात आली. मात्र ती ही सुनावणी पुढे मार्च महिन्यात नियोजित करण्यात आली.
4 मार्च रोजी - 4 मार्चला काही सुनावणी तारखा वेळेअभावी पुढे ढकलल्यामुळे होणे अपेक्षित होते. पुढील सुनावणी चार तारखेला घेऊ असं न्यायाधीशांनी सांगितलं होतं. मात्र अनेक सुनावण्या कोर्टात असल्यामुळे संग्राम पाटील यांचे प्रकरण सुनावणीसाठी त्यादिवशी आलेच नाही.
5 मार्च - संग्राम पाटील प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यासाठी पाटील यांच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केली आहे.
15 एप्रिल - पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार असल्याची दिली माहिती
संग्राम पाटील काम करत असलेल्या कार्यालयातून तीन वेळा नोकरीवर येण्याची नोटीस देखील देण्यात आलेली आहे. आता त्यांची नोकरी धोक्यात आहे.
काय काय घडलं?
संग्राम पाटील यांच्याविरोधात ठाण्यातील रहिवासी निखिल भामरे यांनी तक्रार नोंदवली होती. ते भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक या पदावर काम करतात.
त्यांनी पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर 2025 रोजी 'शहर विकास आघाडी' हे खातं चालवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मजकूर प्रसिद्ध केला.
त्यात त्यांनी आपल्या नेत्याबद्दल द्वेषाची भावना पसरवली आहे अशी तक्रार भामरे यांनी केली.
तसेच एका महिलेबद्दल आक्षेपार्ह माहिती यात प्रसिद्ध केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या मजकुराचा स्क्रीनशॉट घेतल्याचं या तक्रारीत नमूद केलं होतं.
भामरे यांनी संग्राम पाटील यांच्याविरोधातही अशीच तक्रार केली होती.
पाटील यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच समाजात द्वेषाची भावना निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केला असं त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं.
त्यानंतर, डॉ. संग्राम पाटील यांना एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 10 जानेवारीला ताब्यात घेतलं होतं.
लंडनहून मुंबईत आल्यावर विमानतळावर त्यांची चौकशी झाल्याची माहिती समाजमाध्यमांतून प्रसिद्ध झाली.
त्यावर मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी डॉ. पाटील यांना अटक करण्यात आले नसून त्यांना बीएनएसएसच्या 35 (3) नुसार पुढील तपासासाठी नोटीस दिल्याचे स्पष्ट केले होते.
तर संग्राम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या कारवाईबाबत दुजोरा दिला होता. रात्री अडीचच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं आणि सायंकाळी 5 वाजता सोडलं असं त्यांनी सांगितलं होतं.
संग्राम पाटील हे डॉक्टर असून त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवरील माहितीनुसार त्यांचे शिक्षण पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले असून ते भूलशास्त्र विषयात एमडी आहेत.
त्यानंतर ते इंग्लंडमधील विविध वैद्यकीय संस्थांशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते पेन मेडिसिन आणि अॅनेस्थेटिक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याचं या प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.