अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळल्यावर क्रू सदस्यांना कसे वाचवले जाते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बर्न्ड डेबुसमॅन ज्युनियर
- Role, व्हाइट हाऊसमधून
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दक्षिण इराणमध्ये अमेरिकेचे एक F-15 लढाऊ विमान पाडण्यात आले. माध्यमांमध्ये सुरुवातीला आलेल्या काही वृत्तांनुसार या विमानाच्या पायलटला वाचवण्यात आलं आहे.
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमध्ये पाडण्यात आलेल्या एफ-15 या अमेरिकन लष्करी विमानातील दुसऱ्या क्रू मेंबरचीही सुटका करण्यात आली आहे.
जर हे वृत्त खरं ठरलं, तर अमेरिकेच्या युद्धातील शोध आणि बचाव मोहिमांच्या प्रदीर्घ परंपरेतील ही आणखी एक यशस्वी घटना ठरेल.
कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू मिशन (सीएसएआर) हे अतिशय कठीण आणि वेळेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे लष्करी ऑपरेशन मानले जाते. यासाठी अमेरिका आणि त्याचे मित्रदेश खास तयारी करतात.
अमेरिकेत वायुसेनेच्या विशेष पथकांना सीएसएआर मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. ज्या भागात युद्धादरम्यान विमान पडण्याची शक्यता असते, त्या ठिकाणाजवळ त्यांना आधीच तैनात केलं जातं.
कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचं तर, सीएसएआर मोहीम म्हणजे अडचणीत सापडलेल्या सैनिकांना शोधून त्यांना मदत करणे आणि सुरक्षित बाहेर काढणे. उदाहरणार्थ, कोसळलेल्या विमानाचे पायलट किंवा एकाकी पडलेले सैनिक.
सामान्य शोध आणि बचाव मोहिमा नैसर्गिक आपत्ती किंवा मदतकार्यांसाठी केल्या जातात. परंतु, सीएसएआर मोहीम मात्र शत्रूच्या किंवा युद्ध सुरू असलेल्या भागात राबवली जाते.
काही वेळा या मोहिमा शत्रूच्या प्रदेशात खूप आत जाऊनही केल्या जातात. जसं की शुक्रवारी (3 एप्रिल) इराणमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये दिसून आलं.

फोटो स्रोत, STATE MEDIA
या मोहिमा वेळेच्या दृष्टीने खूप संवेदनशील असतात, कारण ज्या ठिकाणी बचाव पथक आपल्या सैनिकांचा शोध घेत असतं, तिथेच शत्रूचे सैन्यही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात.
हल्ली सीएसएआर मोहिमा बहुतांश वेळा हेलिकॉप्टरच्या मदतीने केल्या जातात. यासोबत इंधन भरणारी विमानं आणि इतर लष्करी विमानंही असतात. ही विमानं गरज पडल्यास हल्ला करतात किंवा त्या भागावर नजर ठेवून असतात.
विशेष म्हणजे, शुक्रवारी इराणमधून समोर आलेल्या काही खात्रीशीर व्हीडिओंमध्ये अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टर आणि किमान एक इंधन भरणारे विमान खुजेस्तान प्रांतात काम करताना दिसले.
सीएसएआर मोहिमांचा इतिहास
हवाई हल्ले आणि युद्धाच्या काळात केल्या जाणाऱ्या बचाव मोहिमांचा इतिहास खूप जुना आहे. याची सुरुवात पहिल्या महायुद्धाच्या काळात झाल्याचे मानले जाते.
तेव्हा पायलट फ्रान्समध्ये अचानक उतरून (लँडिंग) संकटात सापडलेल्या आपल्या सहकाऱ्यांना वाचवत असत.
अमेरिकन सैन्याच्या पॅरा-रेस्क्यू टीमची मुळे 1943 मधील एका मिशनपर्यंत जातात. त्या वेळी दोन लष्करी सर्जन पॅराशूटने तत्कालीन बर्मामध्ये (आता म्यानमार) उतरून जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी गेले होते.
स्मिथसोनियन एअर अँड स्पेस मॅगझिननुसार, जगातील पहिलं हेलिकॉप्टर रेस्क्यू एका वर्षानंतर झालं. त्यावेळी एका अमेरिकन लेफ्टनंटने जपानच्या हद्दीतून 4 सैनिकांना वाचवलं. युद्धात हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचं हे पहिलं उदाहरण मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
युद्धानंतर अमेरिकेत प्रथमच अधिकृत सर्च अँड रेस्क्यू पथकं तयार करण्यात आली. पण आधुनिक सीएसएआर मोहिमांची खरी सुरुवात व्हिएतनाम युद्धाच्या काळात झाली.
'बॅट 21' या मोहिमेत उत्तर व्हिएतनामच्या सीमेत पडलेल्या पायलटला वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक विमानं गमावावी लागली आणि अनेक अमेरिकन सैनिक मारले गेले.
या युद्धाच्या काळात सीएसएआर मोहिमांची व्याप्ती आणि गुंतागुंत दोन्ही खूप वाढली. या अनुभवातून सैन्याने आपली रणनीती आणि कार्यपद्धती सुधारली आणि त्यावरच आजच्या बचाव मोहिमांची पायाभरणी झाली.
अमेरिकन वायुसेनेच्या पॅरा-रेस्क्यू टीम्स
यूएस सैन्याच्या प्रत्येक शाखेकडे मर्यादित सीएसएआर क्षमता असते. परंतु, अडकलेल्या सैनिकांना शोधून त्यांचा बचाव करण्याची मुख्य जबाबदारी वायुसेनेचीच असते.
हे काम प्रामुख्याने पॅरा-रेस्क्यूमॅन करतात, जे लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन युनिटचा भाग असतात.
पॅरा-रेस्क्यूचं अधिकृत ब्रीदवाक्य आहे: "आम्ही हे सगळं करतो, जेणेकरून इतर जगू शकतील."
एकही अमेरिकन सैनिक मागे सोडला जाणार नाही, हे वचन या कामामागे असते.
हे सैनिक लढाई आणि वैद्यकीय मदत या दोन्ही गोष्टींमध्ये तरबेज असतात. त्यांना अमेरिकन सैन्य दलातील सर्वात कठीण प्रशिक्षणांमधून जावं लागतं.
निवड आणि प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया सुमारे 2 वर्षे चालते. यात पॅराशूट ट्रेनिंग, डायव्हिंग, पाण्याखाली काम करण्याचं प्रशिक्षण, सर्व्हायवल (जगण्याचं) प्रशिक्षण, शत्रूपासून बचाव आणि सुटण्याचं प्रशिक्षण, तसेच सिव्हिलियन (नागरी) पॅरामेडिक कोर्स यांचा समावेश असतो.
याशिवाय त्यांना युद्धभूमीवर वैद्यकीय मदत देणे, कठीण बचाव मोहिमा पार पाडणे आणि शस्त्रास्त्रे हाताळण्याचं विशेष प्रशिक्षणही दिलं जातं.
मिलिट्री न्यूज वेबसाइट सोफरेबच्या माहितीनुसार, साधारणपणे सुमारे 80 टक्के उमेदवार हे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. कधी कधी ही संख्या याहूनही जास्त असते.
जमिनीवर या टीमचं नेतृत्व कॉम्बॅट रेस्क्यू ऑफिसर्स करतात. ते पूर्णपणे प्रशिक्षित असतात आणि बचाव मोहिमांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळतात.
अमेरिकेच्या अलीकडील बचाव मोहिमा
इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धांदरम्यान पॅरा-रेस्क्यू टीम मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांनी हजारो मोहिमा राबवून जखमी किंवा बाहेर काढण्याची गरज असलेल्या अमेरिका आणि मित्रदेशांच्या सैनिकांना वाचवलं होतं.
उदाहरणार्थ, 2005 मध्ये अफगाणिस्तानमधील एका गावात लपून बसलेल्या अमेरिकन नेव्ही सीलला वाचवण्यासाठी हवाई दलाच्या पॅरा-रेस्क्यू टीम पाठवली होती.
या नेव्ही सीलच्या टीमवर अचानक हल्ला झाला होता. त्यात त्याचे 3 साथीदार मारले गेले. या घटनेवर नंतर 'लोन सर्व्हायव्हर' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला.
अलिकडच्या दशकांत विमान कोसळलेल्या अमेरिकन वैमानिकांना वाचवण्याच्या मोहिमा खूप कमी झाल्या आहेत.
1999 मध्ये सर्बियावर पाडण्यात आलेल्या एफ-117 स्टिल्थ फायटरच्या पायलटला पॅरा-रेस्क्यू टीमने शोधून सुरक्षितपणे बाहेर काढलं होतं.
त्याचप्रमाणे, 1995 मध्ये बोस्नियातील एका गाजलेल्या घटनेत अमेरिकन पायलट स्कॉट ओ'ग्रेडीला वाचवण्यात आलं होतं.
त्याचं विमान पाडण्यात आलं होतं आणि त्यांनी 6 दिवस शत्रूपासून लपून स्वतःचा बचाव केला होता.
नंतर हवाई दल आणि मरीन कॉर्प्सच्या संयुक्त सीएसएआर मिशनमधून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























