इराण युद्ध नक्की कधी संपेल? ट्रम्प वारंवार युद्धाची मुदत का बदलत आहेत?

इराणची राजधानी तेहरानमधील 2 मार्च 2026 रोजीचं हे दृश्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणची राजधानी तेहरानमधील 2 मार्च 2026 रोजीचं हे दृश्य आहे.
    • Author, एना फेगुई
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Author, डॅनियल बुश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इराणविरुद्धच्या युद्धाचा कालावधी किती असेल, याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नवं भाष्य केलं.

इराणविरुद्धचं युद्ध सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या (एक एप्रिल) भाषणात म्हटलं की, अमेरिका इराणमधील आपली लष्करी उद्दिष्टं 'लवकर... खूपच लवकर' साध्य करण्याच्या मार्गावर आहे.

दुसरं महायुद्ध आणि व्हिएतनाम युद्धासारख्या प्रदीर्घ काळ चाललेल्या युद्धांच्या तुलनेत, हे युद्ध आतापर्यंत कमी कालावधीचं राहिलं आहे, याची ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांना आठवण करून दिली.

त्यानंतर त्यांनी या युद्धाची एक नवीन मुदत सांगितली.

ट्रम्प म्हणाले, "पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये आम्ही त्यांना, ते जिथे असायला हवेत, अशा पाषाण युगात पोहोचवू."

ट्रम्प किंवा त्यांच्या सरकारमधील वरिष्ठ सदस्यांनी या युद्धाबाबत एखाद्या कालमर्यादेचा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारीला जेव्हा या मोहिमेची सुरुवात झाल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, हे युद्ध 'आमचं उद्दिष्टं साध्य होईपर्यंत' सुरू राहील.

तेव्हापासून ट्रम्प कधी म्हणाले आहेत की, "अमेरिकेनं आधीच हे युद्ध जिंकलं आहे"; तर कधी म्हणाले आहेत की, "लष्करी मोहीम काही आठवडे सुरू राहील."

'ट्रम्प सरकारची पद्धत वेगळी आहे'

बीबीसीशी बोलणाऱ्या विश्लेषकांनी सांगितलं की, जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाची एक कालमर्यादा सांगावी आणि नंतर त्यात बदल करावा, ही एक सर्वसामान्य बाब आहे.

तर, एक तज्ज्ञ म्हणाले की, ट्रम्प सरकारची पद्धत वेगळी राहिली आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी संकेत दिला की, या प्रकारे कालमर्यादा बदलत राहिल्यामुळे व्यूहरचनात्मक फायदा होऊ शकतो.

बुधवारी (1 एप्रिल) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते म्हणाले, "तुम्ही काय करणार आहोत किंवा करणार नाहीत हे तुमच्या शत्रूला सांगू नका. तसंच तुम्ही कधी थांबणार आहात, हे देखील सांगू नका."

हेगसेथ म्हणाले, "ट्रम्प यांनी 4 ते 6 आठवडे, 6 ते 8 आठवडे, 3 आठवडे सांगितलं आहे. ही कोणतीही संख्या असू शकते. मात्र आम्ही अचूक कालमर्यादा सांगणार नाही. कारण त्या उद्दिष्टांना साध्य करणं, हे आमचं ध्येय आहे. आम्ही त्या दिशेनं पुढे जात आहोत."

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कधी म्हणतात की अमेरिकेनं युद्ध आधीच जिंकलं आहे आणि कधी म्हणतात की 'लष्करी मोहीम काही आठवडे सुरू राहील'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कधी म्हणतात की अमेरिकेनं युद्ध आधीच जिंकलं आहे आणि कधी म्हणतात की 'लष्करी मोहीम काही आठवडे सुरू राहील'
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युद्ध जसजसं सुरू राहिलं, तसं ट्रम्प सरकारमधील इतर लोकांनी देखील युद्ध किती काळ चालणार, याच्या कालमर्यादेबद्दल त्यांचे अंदाज व्यक्त केले. ते अनेकदा राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यापेक्षा वेगळे वाटले.

हेगसेथ, 8 मार्चला सीबीएस न्यूजच्या '60 मिनिट्स' या कार्यक्रमात म्हणाले की, आतापर्यंत जी कारवाई राहिली झाली आहे, ती 'फक्त सुरुवात' आहे. संरक्षण विभागानं 24 तासांपेक्षाही कमी काळानंतर सोशल मीडियावर लिहिलं, 'आम्ही नुकतंच युद्ध सुरू केलं आहे.'

मात्र, त्याच दिवशी फ्लोरिडात एका पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की अमेरिकेनं इराणमधील आपल्या लष्करी उद्दिष्टांना साध्य करण्याच्या दिशेनं 'बरीच प्रगती' केली आहे. ते पुढे म्हणाले, "काहीजण म्हणू शकतात की हे जवळपास पूर्ण झालं आहे."

परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीदेखील यावर वक्तव्यं केलं आहे. ते मंगळवारी (31 मार्च) फॉक्स न्यूजला म्हणाले, "आम्हाला शेवट दिसतो आहे. तो आज नाही, उद्या नाही, मात्र जवळ येतो आहे."

या प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जाणारं ट्रम्प सरकार हे अमेरिकेतील पहिलंच सरकार नाही.

कधी-कधी राष्ट्राध्यक्ष कालमर्यादा अस्पष्ट ठेवतात. तर कधी ते स्पष्टपणे सांगतात. मात्र अशी फार थोडी युद्धं आहेत, जी राष्ट्राध्यक्षांच्या अंदाजानुसार संपली आहेत.

'सर्व राष्ट्राध्यक्षांचा डेडलाईनचा अंदाज चुकतो'

लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक एरिक मिन संघर्ष निवारण आणि मुत्सद्देगिरीचा अभ्यास करतात. ते म्हणाले की जस-जसं युद्ध पुढे सरकतं, तशी कालमर्यादा बदलत राहते.

ते म्हणाले, "कोणतंही युद्ध किती काळ चालू राहील, हे ठरवणं कठीण असतं."

राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन 1967 मध्ये व्हिएतनाम युद्ध संपण्याबाबत म्हणाले होते की, 'बोगद्याच्या शेवटी प्रकाश' दिसतो आहे. अमेरिकेत युद्धाला विरोध वाढत असताना त्यांनी हे वक्तव्यं केलं होतं.

हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. ते युद्ध आणखी 8 वर्षे चाललं. अमेरिकेतील या युद्धाबद्दलच्या नाराजीनं जॉन्सन यांनी निवडणूक पुन्हा न लढवण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अनेक दशकांनी 1999 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी संकेत दिला होता की युगोस्लावियाच्या विरुद्ध नाटोचे बॉम्बहल्ले कमी कालावधीचे असू शकतात. मात्र हवाई हल्ले 2 महिन्यांपासून अधिक काळ चालले.

नंतर इराक युद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 'मिशन पूर्ण झालं', हे प्रसिद्ध भाषण केलं होतं. ते भाषण त्यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी एका विमानवाहू युद्धनौकेवर केलं होतं. अमेरिकेचं सैन्य 2011 पर्यंत इराकमधून परतलं नव्हतं.

'राष्ट्राध्यक्ष अनेकदा युद्धाच्या काळात जनतेला मुदतीबाबत सांगतात आणि जवळपास सर्वच राष्ट्राध्यक्षांचा कमी मुदतीचा अंदाज बांधतात'

फोटो स्रोत, Adam Gray/Getty Images

फोटो कॅप्शन, 'राष्ट्राध्यक्ष अनेकदा युद्धाच्या काळात जनतेला मुदतीबाबत सांगतात आणि जवळपास सर्वच राष्ट्राध्यक्षांचा कमी मुदतीचा अंदाज बांधतात'

हार्वर्ड केनेडी स्कूलमधील इतिहासकार थॉमस पॅटरसन यासंदर्भात म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष अनेकदा युद्धकाळात जनतेला मुदतीबाबत सांगतात आणि जवळपास सर्व राष्ट्राध्यक्ष कमी मुदतीचा अंदाज बांधतात."

बीबीसीशी बोलणाऱ्या तज्ज्ञांनुसार, इराणबाबत ट्रम्प यांची गोष्ट वेगळी वाटते आहे. कारण राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सल्लागारांनी युद्धाचा कालावधी आणि युद्धाची कारणं अनेकदा बदलली आहेत.

मिन म्हणाले, "संपूर्ण सरकारमध्ये याप्रकारची विसंगती खूपच वेगळी आहे. याचं कोणतंही ऐतिहासिक उदाहरण मला आठवत नाही."

व्हाईट हाऊसनं असा कोणताही दावा नाकारला आहे. कॅरोलिन लेविट गेल्या महिन्यात म्हणाल्या होत्या की "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची संपूर्ण टीमनं सातत्यानं स्पष्ट उद्दिष्टं समोर ठेवली आहेत."

बुधवारी (1 एप्रिल) ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण अतिशय महत्त्वाचं मानलं जात होतं. कारण ते युद्धाबाबत एखादी मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा होती.

वॉशिंग्टनमध्ये असे अंदाज बांधले जात होते की ट्रम्प इराणमध्ये जमिनीवरून सैन्य पाठवण्याची घोषणा करू शकतात किंवा मग युद्ध कमी करण्याबद्दल बोलू शकतात.

मात्र, त्याऐवजी ट्रम्प यांनी एका नवीन मुदतीचा उल्लेख केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)