इराणचे नवे सर्वोच्च नेते समोर न येणं आणि IRGC मजबूत होण्याचा काय अर्थ आहे?

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची 8 मार्चला नियुक्ती झाल्यापासून ते आतापर्यंत सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची 8 मार्चला नियुक्ती झाल्यापासून ते आतापर्यंत सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत
    • Author, अरमान शरीफी आणि घोन्चेह हबीबीआझाद
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची 8 मार्चला नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत ते सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची तब्येत आणि अधिकार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

अधिकाऱ्यांनी खामेनी यांच्या उपस्थितीची ही पोकळी लेखी वक्तव्यं, एआयद्वारे बनवण्यात आलेले फोटो आणि प्रतिकात्मक इशारे यांचा वापर करून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून नेतृत्वातील सातत्य कायम आहे, हे दाखवता येईल.

यामुळे सत्तेची खरी ताकद अद्याप समोर न आलेल्या आयआरजीसीच्या त्या नेत्याच्या हाती आहे, हा समज आणखी बळकट झाला आहे.

मोज्तबा खामेनी कुठे आहेत?

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर देखील मोज्तबा खामेनी आतापर्यंत दिसलेले नाहीत.

या 56 वर्षांच्या धार्मिक नेत्याला 8 मार्चला सर्वोच्च नेता करण्यात आल्यानंतर, त्यांनी कोणतंही भाषण केलेलं नाही.

ते कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत. तसंच पुष्टी होऊ शकेल असा त्यांचा कोणताही फोटो समोर आलेला नाही. त्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे सुरक्षा आणि धार्मिक यंत्रणांना त्यांची सत्ता बळकट करणं कठीण झालं आहे.

28 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात मोज्तबा खामेनी जखमी झाले होते, असं म्हटलं जातं. या हल्ल्यात त्यांचे वडील अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

त्यांच्या वडिलांची टीव्हीवरील भाषणं, इराणच्या राजकारणाचा नियमित भाग झाली होती. मात्र त्याच्या उलट मोज्तबा खामेनी, आतापर्यंत फक्त सरकारी टीव्हीवरील सूत्रसंचालकांनी वाचलेल्या वक्तव्यांच्या माध्यमातून समोर आले आहेत.

द गार्डियन या वृत्तपत्रानं 11 मार्चला वृत्त दिलं की, मोज्तबा खामेनी, त्यांचे वडील असलेल्या परिसरावर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले होते. इराणच्या सायप्रसमधील राजदूतांचा संदर्भ देत ही माहिती देण्यात आली होती.

खामेनी यांचा हात आणि पायांना दुखापत झाली होती, असंही सांगण्यात आलं. मात्र, त्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या मुलानं सर्वोच्चे नेते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, असंही सांगितलं होतं.

मोज्तबा खामेनी यांचा हा फोटो 2024 मध्ये तेहरानमध्ये हिजबुल्लाहच्या कार्यालयात घेण्यात आला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोज्तबा खामेनी यांचा हा फोटो 2024 मध्ये तेहरानमध्ये हिजबुल्लाहच्या कार्यालयात घेण्यात आला होता
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खामेनी यांचा पहिला संदेश, 12 मार्चला एका टीव्ही अँकरनं वाचून दाखवला होता. यात त्यांनी बदला घेण्याची भाषा केली होती. तसंच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती.

खामेनी यांनी 18 मार्चला, इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलचे सचिव अली लारीजानी आणि बसीज कमांडर, गुलामरेजा सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं वचन दिलं.

तर 20 मार्चला नवरोजच्या प्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा देशाला फक्त लेखी संदेशाद्वारे संबोधित केलं. तर सर्वसामान्यपणे त्यांचे वडील इराणच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीव्हीवर दिसत असत.

त्यानंतर 21 मार्चला ते तेहरानमध्ये ईद उल फितरच्या नमाजमध्येही सहभागी झाले नाहीत. हे नमाज पठण पारंपारिकरित्या सर्वोच्च नेतेच करतात.

त्यांच्याऐवजी एका वरिष्ठ कट्टरतावादी मौलवीच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. त्यांनी खामेनी यांच्या नवरोजच्या संदेशाचं कौतुक करत तो 'जीवनाचा संदेश' असल्याचं म्हटलं.

मार्चच्या शेवटी त्यांनी इराणच्या विरोधातील 'आक्रमकपणा'बद्दल स्पष्ट भूमिका घेण्यासाठी इराकचे मौलवी आणि तिथल्या जनतेचे आभार मानले.

1 एप्रिलला त्यांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाहचे नेते नाइम कासिम यांना पाठवलेल्या संदेशात संघटनेला असलेल्या इराणच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

त्याच दिवशी त्यांनी आणखी एक लेखी वक्तव्यं जारी केलं. त्यात 'नेचर डे'च्या दिवशी वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं.

तसेच म्हटलं की, हे इराणच्या पर्यावरणाला लक्ष्य करत असलेल्या 'अमेरिकन आणि झायोनिस्ट सैतानां'च्या विरोधातील एक पाऊल आहे.

मात्र याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही फोटो समोर आला नाही. त्यांचा आवाज ऐकण्यात आला नाही आणि त्यांची कोणतीही सार्वजनिक उपस्थितीदेखील दिसून आली नाही.

एआय फोटो, कार्डबोर्ड मीम आणि अमेरिकेचं मूल्यमापन

नेतृत्वात निर्माण झालेल्या या पोकळीला प्रचार, इंटरनेटवरील विनोद, खिल्ली आणि भ्रम यांच्या संमिश्र वातावरणानं भरून काढलं आहे.

अलीकडचे आणि सत्यापित फोटो नसल्यामुळे सरकारशी संबंधित प्रसारमाध्यमांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) बनवण्यात आलेले फोटो वापरण्यास सुरुवात केली.

यात तेहरानच्या रिव्होल्युशन स्क्वेअरमध्ये लावलेल्या एका मोठ्या बॅनरचाही समावेश होता. यात सर्वोच्च नेत्यांना आयआरजीसी कमांडरांसोबत दाखवण्यात आलं होतं.

त्यांचा नवीन एक्स प्रोफाईल फोटोदेखील छेडछाड करून बनवलेला असल्याचं एआय डिटेक्शन टूल्सनं सांगितलं.

डिजिटल स्वरुपात बनवण्यात आलेली ही प्रतिमा लवकरच विनोदाचा विषय झाली.

एका व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये कथितरित्या समर्थक नव्या नेत्यांच्या एका कार्डबोर्ड कटआऊटवरून पडदा हटवताना दिसले.

तो प्रत्यक्षात एआयद्वारे बनवण्यात आलेला खोटा किंवा बनावट व्हीडिओ होता. ढोबळमानानं तो कोम या धार्मिक शहरात आधी चित्रित करण्यात आलेल्या खऱ्या व्हीडिओवर आधारित होता.

फॅक्ट चेक करणाऱ्यांनी सांगितलं की, खऱ्या व्हीडिओमध्ये कार्डबोर्ड मूर्ती नाही, तर एक फोटो फ्रेम होती. तर एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या आवृत्तीत अरबी लिखाणदेखील वेडंवाकडं होतं.

मात्र असं असूनही 'कार्डबोर्ड अयातुल्लाह' हे मीम वापरलं जाऊ लागलं. विरोध करणाऱ्या लोकांबरोबरच सर्वसामान्य युजर्सनं देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला.

इराण इंटरनॅशनल या लंडनमधील चॅनलनं एक क्लीप दाखवली. यात लास वेगासमधील एका उत्सवाच्या वेळेस इराणच्या स्थलांतरित कार्यकर्त्याला कार्डबोर्डपासून बनलेल्या प्रतिकृतीसोबत नाचताना दाखवण्यात आलं होतं. या व्हीडिओमुळे आणखी ऑनलाइन खिल्ली उडवण्यात आली.

अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी देखील आपापलं मूल्यमापन मांडलं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, "या हल्ल्यात खामेनी 'संभाव्यरित्या जखमी झाले आहेत आणि कदाचित त्यांचा चेहरा विद्रुप झाला आहे.'

तेहरानमध्ये नेचर डेमध्ये नव्या सर्वोच्च नेत्याच्या फोटोंसह सहभागी झालेल्या महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमध्ये नेचर डेमध्ये नव्या सर्वोच्च नेत्याच्या फोटोंसह सहभागी झालेल्या महिला

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मोज्तबा 'यांचा एक तर मृत्यू झाला आहे किंवा ते फार वाईट स्थितीत आहेत. कारण कोणीही त्यांचं कोणतंही बोलणं ऐकलेलं नाही.'

इराणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. जिनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इराणचे राजदूत म्हणाले की, खामेनी यांची अनुपस्थिती 'सुरक्षेच्या कारणां'मुळे आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भर देत सांगितलं की ते 'पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि सर्व कामकाज पाहत आहेत.' मात्र या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणताही ऑडिओ किंवा व्हीडिओ समोर आलेला नाही.

सिंहासनामागे दडलेली शक्ती?

खामेनी दुखापतीतून बरे होत आहेत, हत्या होण्याच्या धोक्यापासून बचाव करत आहेत, की आणखी कोणत्यातरी कारणामुळे समोर येत नाहियेत. त्यामागचं कारण काहीही असो. मात्र त्यांची अनुपस्थिती राजकीय बदलाची दिशा ठरवते आहे.

कथितरित्या त्यांच्या नियुक्तीचं समर्थन करणारी आयआरजीसी युद्धाच्या काळात खरं सत्ताकेंद्र म्हणून काम करते आहे, ही भावना त्यामुळे बळकट होते आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.

आयआरजीसी युद्धाच्या काळात खरं सत्ताकेंद्र म्हणून काम करत असल्याचं मानलं जात आहे

फोटो स्रोत, Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, आयआरजीसी युद्धाच्या काळात खरं सत्ताकेंद्र म्हणून काम करत असल्याचं मानलं जात आहे

अशा परिस्थितीत नव्या सर्वोच्च नेत्यांनी सार्वजनिकरित्या समोर येऊन, सभा-बैठकांचं नेतृत्व करून आणि प्रतिकात्मक कार्यक्रमांमधून त्यांचा अधिकार दाखवावा, अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते.

अशा वेळेस त्यांच्या अनुपस्थितीमुळे सत्तेच्या उत्तराधिकाऱ्याची वैधता कमकुवत होऊ शकते. तसंच व्यवस्था स्थिर ठेवणं कठीण होऊ शकतं.

सध्या, इराणचा सर्वात शक्तिशाली व्यक्ती अजून समोर आलेला नाही. फक्त लेखी वक्तव्यं आणि एआयद्वारे बनवण्यात आलेले फोटो, हेच नेतृत्व आणि जिवंत असण्याचे पुरावे आहेत, असा दावा करणं अधिकाऱ्यांसाठी दिवसेंदिवस आणखी कठीण होत चाललं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)