डोनाल्ड ट्रम्प यांनी 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' आणि 'अ‍ॅटर्नी जनरल' यांना पदावरून हटवलं; सरकारनं काय सांगितलं?

लष्करप्रमुख रँडी जॉर्ज आणि अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी

फोटो स्रोत, Getty/Reuters

    • Author, मॅक्स मात्झा
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं आहे.

पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं, "जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41 वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून तात्काळ प्रभावाने सेवानिवृत्त होत आहेत."

तेथील लष्करप्रमुखांचा कार्यकाळ साधारणपणे 4 वर्षांचा असतो.

रँडी जॉर्ज यांनी वेस्ट पॉइंट मिलिटरी अकादमीमध्ये शिक्षण घेतले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 2023 मध्ये त्यांची या पदासाठी निवड केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, इराणविरुद्ध सुरू असलेलं अमेरिका-इस्रायल युद्ध लवकरच संपणार आहे.

अशावेळी अमेरिकेतील लष्करप्रमुखांना हटवण्यात आलं आहे.

रँडी जॉर्ज यांनी पहिल्या आखाती युद्धात आणि नंतर इराक व अफगाणिस्तानमधील अलीकडील संघर्षांमध्ये सेवा बजावली होती.

कारण स्पष्ट नाही

रँडी जॉर्ज यांना पदत्याग करण्यास का सांगण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

संरक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सीबीएसशी बोलताना सांगितलं, "आम्ही त्यांच्या सेवेबद्दल आभारी आहोत, पण सैन्यात नेतृत्वबदलाची वेळ आली होती."

पेंटागॉनचे प्रवक्ते पार्नेल म्हणाले, "जनरल जॉर्ज यांनी बजावलेल्या अनेक दशकांच्या सेवेबाबत युद्ध विभाग कृतज्ञ आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो."

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ

फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे उपप्रमुख (व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ) जनरल क्रिस्टोफर लानेव्ह हे हंगामी लष्करप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतील.

लानेव्ह यांच्याबद्दल बोलताना पार्नेल म्हणाले, "लानेव्ह यांना प्रत्यक्ष कारवाईचा अनेक दशकांचा अनुभव आहे."

पार्नेल असेही म्हणाले की, संरक्षण मंत्री हेगसेथ यांना लानेव्ह यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की, ते सरकारच्या व्हिजननुसार काम करतील.

रँडी जॉर्ज

फोटो स्रोत, Getty Images

रँडी जॉर्ज यांनी बुधवारी (1 एप्रिल) वेस्ट पॉइंट मिलिटरी अकादमीला भेट दिली होती. तेव्हा अकादमीने त्या भेटीचे फोटो प्रसिद्ध करत असं म्हटलं होतं की, रँडी यांनी भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

पेंटागॉनमध्ये आल्यापासून, हेगसेथ यांनी नौदल ऑपरेशन्सचे प्रमुख आणि हवाई दलाचे उपप्रमुख यांच्यासह डझनहून अधिक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी यांचीही उचलबांगडी

अ‍ॅना फेगे आणि बर्न्ड डिब्शमन ज्युनियर, व्हाईट हाऊसमधून

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना त्यांच्या पदावरून हटवलं आहे. बाँडी या ट्रम्प यांच्या दीर्घकाळच्या सहकारी आणि त्यांच्या प्रशासनाच्या कट्टर समर्थक होत्या.

अमेरिकेत अ‍ॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अंमलबजावणी अधिकारी असतात.

'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पाम बाँडी यांची प्रशंसा केली असून त्या खासगी क्षेत्रात नवीन भूमिकेत रुजू होतील, असं म्हटलं आहे.

जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायली प्रसिद्ध करणे आणि त्याच्या चौकशीवरून निर्माण झालेल्या वादामुळे बाँडी यांचा न्याय विभागातील कार्यकाळ चर्चेत होता.

डोनाल्ड ट्रम्प आणि पाम बाँडी

फोटो स्रोत, Reuters

अलीकडच्या आठवड्यांत पदावरून हटवण्यात आलेल्या ट्रम्प प्रशासनातील त्या दुसऱ्या अधिकारी आहेत. यापूर्वी मार्चमध्ये क्रिस्टी नोएम यांना होमलँड सिक्युरिटी प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं. माजी उपप्रमुख टॉड ब्लँच हे बाँडी यांच्या जागी नियुक्त होतील.

बाँडी म्हणाल्या की, ब्लँच यांच्याकडे या पदाची सूत्रं सोपवण्याची संपूर्ण जबाबदारी त्या पार पाडतील. या पदावर काम करणं हा फार मोठा 'सन्मान' होता, असंही त्या म्हणाल्या.

बाँडी यांनी सांगितलं की, खासगी क्षेत्रातील आपल्या नवीन भूमिकेत 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि या प्रशासनासाठी लढत राहीन.' मात्र, खासगी क्षेत्रातील आपली नवीन भूमिका नेमकी काय असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

इराणमधील सर्वात मोठ्या पुलावर हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमधील सर्वात मोठ्या पुलावर हल्ला केला आहे.

'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी काळ्या धुराचे लोट दिसत आहेत.

त्यांनी म्हटलं, "इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त करण्यात आला आहे. आता पुन्हा याचा वापर होऊ शकणार नाही."

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे. ते म्हणाले, "इराण अजूनही एक महान देश बनू शकतो. त्यामुळे त्यांनी आता आमच्याशी करार केला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल आणि इराणमध्ये काहीही उरणार नाही."

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

फोटो स्रोत, X/@araghchi

फोटो कॅप्शन, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी या हल्ल्याची पुष्टी केली असून नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

"अपूर्ण पुलांसहित नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे इराणचे नागरिक शरणागती पत्करणार नाहीत. असे हल्ले केवळ शत्रूची गोंधळलेली परिस्थिती आणि त्यांचं खचलेलं मनोधैर्य दाखवतात," असे अराघची म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "प्रत्येक पूल आणि इमारत पूर्वीपेक्षा अधिक मजबूतपणे पुन्हा बांधली जाईल. पण अमेरिकेच्या विश्वासार्हतेला झालेली हानी कधीही भरून काढता येणार नाही."

इराणच्या पुलावर हल्ला झाल्यानंतर इराणच्या युद्धसमर्थक लोकांनी बीबीसीला काय सांगितलं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

घोंचेह हबीबियाझाद, बीबीसी पर्शियन

इराणमधील एका पुलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर मी इराणी लोकांशी बोललो.

इंटरनेट बंद असल्यामुळे इराणमधील लोकांशी संपर्क साधणे अजूनही खूप कठीण आहे. मात्र, काहींनी स्टारलिंकसारख्या सॅटेलाइट इंटरनेट आणि इतर पद्धतींच्या मदतीने संपर्क साधण्यात यश मिळवलं, परंतु त्यासाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे.

इराणमध्ये स्टारलिंक वापरल्यास किंवा बाळगल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

इराणमध्ये मी ज्या लोकांशी बोललो, ते सध्याच्या राजवटीच्या विरोधात आहेत.

मी तेहरानमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षांच्या तरुणीला करजमधील पुलावरील हल्ल्याबद्दल तिच्या भावना विचारल्या. व्हॉइस मेसेज देताना ती रडू लागली.

ती म्हणाली, "मला असहाय्य वाटत आहे. (ट्रम्प) आमच्या पुलावरील हल्ल्याबद्दल निर्लज्जपणे पोस्ट करत आहेत. हे प्रकरण कुठे जाईल हे मला माहीत नाही. त्यांच्या विरोधात कोणीच का उभे राहत नाही? ते खरोखरच आपल्याला अश्मयुगात परत घेऊन जात आहेत."

तेहरानमध्ये राहणारा एक 20 वर्षांचा तरुण म्हणाला, "आपला देश उद्ध्वस्त होईल. मी इराणचा विनाश पाहत आहे आणि काहीही करू शकत नाही, या गोष्टीचे मला जास्त दुःख आणि निराशा वाटते. माझा देश दररोज अधिकाधिक उद्ध्वस्त होत आहे."

करजमधील पुलावरील हल्ल्यामुळे एक स्थानिक रहिवासी चिंतेत आहे. या 20 वर्षीय तरुणाने स्वतःला 'युद्ध समर्थक' म्हटले आहे.

तो म्हणाला, "त्या पुलामुळे शहरातील वाहतूक कमी होऊ शकली असती. तो उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. त्यांनी त्यालाच लक्ष्य का केले हे मला माहीत नाही."

तेहरानमध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला म्हणाली, "त्यांनी पुलावर हल्ला केला, याचे मला खरंच आश्चर्य वाटले. पण यामागे काहीतरी कारण असले पाहिजे, असे मला वाटते."

या महिलेनेही स्वतःला 'युद्ध समर्थक' म्हटले आहे.

तेहरानमध्ये हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली एक निवासी इमारत (27 मार्च रोजीचा फोटो)

फोटो स्रोत, Majid Saeedi/Getty

फोटो कॅप्शन, तेहरानमध्ये हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली एक निवासी इमारत (27 मार्च रोजीचा फोटो)

हल्ला झालेल्या इराणी पुलाविषयी जाणून घ्या

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (2 एप्रिल) जाहीर केले की, इराणमधील B1 पुलावर हल्ला झाला आहे. हा नुकताच बांधलेला पूल कराज शहराला राजधानी तेहरानशी जोडतो.

B1 पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झाला नव्हता. मध्यपूर्वेतील सर्वात उंच पुलांपैकी एक म्हणून त्याचे वर्णन केले जाते.

इराणी सरकारी माध्यमांतील एका अहवालानुसार, हा पूल 1050 मीटर लांब असून त्याचे खांब 136 मीटर उंच आहेत.

हल्ल्याच्या वेळी पुलाचे बांधकाम सुरू होते आणि इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

इराण युद्धावर अमेरिका रोज किती खर्च करत आहे?

बीबीसी व्हेरिफाय

इराणसोबतचे युद्ध अमेरिकेसाठी दिवसेंदिवस खर्चिक ठरत आहे.

अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 6 दिवसांनी पेंटागॉनने अमेरिकन खासदारांना सांगितलं की, या युद्धावर आतापर्यंत 11.3 अब्ज डॉलर्स खर्च झाला आहे.

या बातम्यांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात शेकडो टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आणि प्रत्येक टोमाहॉक क्षेपणास्त्राची किंमत अंदाजे 3.5 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 32 कोटी रुपये) होती.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Alex Brandon-Pool/Getty

फोटो कॅप्शन, अमेरिकेने इराणच्या युद्धात आधीच लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.

युद्ध जसजसे लांबत गेले, तसतसा अमेरिकेला होणारा दैनंदिन खर्च बदलत गेला.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, इराणची संरक्षण यंत्रणा कमकुवत झाल्यामुळे खर्चात घट झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या संघर्षावर अजूनही दररोज अंदाजे 385 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 35 अब्ज रुपये) खर्च होत आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने असेही म्हटले आहे की, इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले 90 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)