पोटच्या 7 मुलांसह एकूण 8 जणांचा गोळीबार करत घेतला जीव; नेमकं काय घडलं?

अमेरिकेतल्या लुसियाना राज्यातील श्रेव्हपोर्ट इथं एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात आठ मुलांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Reuters

वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेतल्या लुसियाना राज्यातील श्रीव्हपोर्ट इथं एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. या आठ मुलांमधली सात मुलं ही गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचीच होती.

ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी माध्यमसंस्था असलेल्या सीबीएस न्यूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात मृत्यूमुखी पडलेली मुलं ही एक ते चौदा वर्षं या वयोगटातली होती.

रविवारी (19 एप्रिल) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. या संशयिताने दहा जणांवर गोळीबार केला आणि नंतर चोरलेल्या कारमधून त्याने पळ काढला, अशी माहिती श्रीव्हपोर्ट पोलीस विभागाचे प्रवक्ते ख्रिस बोर्डेलन यांनी दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ठार केले.

या गोळीबारात दोन महिलाही जखमी झाल्या. या दोघींपैकी एकजण मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची आई आहे. या दोघीही गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख शार्मर एल्किन्स अशी पटविण्यात आली आहे. ली अॅन एव्हन्स्की यांनी ही माहिती बीबीसीला दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आधी रस्त्यावर एका महिलेला गोळी मारली. नंतर तो शेजारच्या घरात गेली, जिथे आठ मुलांची हत्या केली. या आठपैकी सात मुलं त्या व्यक्तीचीच होती, आठवा मुलगा हा त्यांच्या नात्यातला नव्हता.

जखमी झालेल्या एका व्यक्तीने शेजारच्या घरात जाऊन अधिकाऱ्यांना फोन करून या गोळीबाराची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. हल्लेखोराने हा हल्ला एकट्यानेच केला होता. या ठिकाणी नववा मुलगाही होता, ज्याने घराच्या छतारून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचं बोर्डेलन यांनी सांगितलं.

रविवारी (19 एप्रिल) माध्यमांशी बोलताना श्रीव्हपोर्टचे महापौर टॉम अर्केनॉक्स यांनी म्हटलं की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कदाचित श्रीव्हपोर्टमध्ये घडलेली आतापर्यंतची सर्वांत भयंकर घटनाही.

अमेरिकेतल्या लुसियाना राज्यातील श्रेव्हपोर्ट इथं एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात आठ मुलांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अमेरिकेतल्या लुसियाना राज्यातील श्रेव्हपोर्ट इथं एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात आठ मुलांचा मृत्यू झाला.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"या घटनेमुळे केवळ संबंधित कुटुंबंच नाहीत, तर पोलीस अधिकारी आणि शवविच्छेदन कार्यालयातले कर्मचारीही दुःखी आहेत. या घटनेचा परिणाम इथल्या लोकांवर झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्वचजण या कुटुंबांसोबत शोक व्यक्त करत आहोत," असं श्रीव्हपोर्टच्या महापौरांनी म्हटलं.

गन व्हायोलन्स अर्काइव्ह (जीव्हीए) ही अमेरिकेतील स्वयंसेवी संस्था बंदुकीमुळे घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांची नोंद ठेवते. जानेवारी 2024 मध्ये इलिनॉइस राज्यातील जोलिएट इथं गोळीबारात आठ जणांची हत्या झाली होती. त्यानंतर घडलेली ही सामूहिक गोळीबाराची ही सर्वांत भीषण घटना आहे.

जीव्हीएच्या व्याख्येनुसार, एखाद्या घटनेत संशयिताव्यतिरिक्त चार किंवा अधिक लोकांवर गोळीबार झाल्यास तिला 'सामूहिक गोळीबार' (Mass Shooting) समजलं जातं.

रविवारी (19 एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत ख्रिस बोर्डेलन यांनी सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार पोलीस सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका घरात पोहोचले. तिथे त्यांना मुलांचे मृतदेह आढळले.

या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेले सर्वचजण अल्पवयीन असल्याचंही बोर्डेलन यांनी सांगितलं.

ही घटना 'कौटुंबिक वादातून' घडल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात आढळलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर संशयिताने एका वाहनचालकाला धमकावून त्याची कार हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी संशयिताचा पाठलाग करत त्याला दुसऱ्या परिसरात गाठले आणि त्याच्यावर गोळीबार केला. या कारवाईत त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

श्रीव्हपोर्टचे पोलीस प्रमुख वेन स्मिथ यांनी म्हटलं की, या सगळ्यांसाठीच आपलं मन व्यथित झालं आहे.

अशी घटना कशी घडली याची कल्पनाही करता येत नसल्याचं स्मिथ यांनी म्हटलं.

या घटनेचा तपास लुसियाना पोलीस आणि इतर संस्थांच्या समन्वयाने केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

"नेमके काय घडले याची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही कितीही वेळ लागला तरी सातत्याने आणि काटेकोरपणे काम करू," असं त्यांनी म्हटलं.

श्रीव्हपोर्टचे कौन्सिलमन (आपल्याकडील नगरसेवकाप्रमाणेच हे पद आहे.) ग्रेसन बुशर यांनी म्हटलं की, शहरातील 30% पेक्षा जास्त गुन्हे आणि हत्या या कौटुंबिक वादातून घडलेल्या दिसतात.

"हा आकडा आता आणखी वाढला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमुळे होणाऱ्या हत्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे," असं त्यांनी सांगितलं.

लुसियानाचे राज्यपास जेफ लँड्री यांनी म्हटलं की, ते आणि त्यांची पत्नी या भीषण घटनेमुळे अत्यंत दु:खी झालो आहे आणि या घटनेत बळी पडलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत.

"घटनास्थळी अथकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि तातडीने कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत," असंही लँड्री यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)