18 वर्षं एफबीआयला चकवा देणारा 'गणितज्ज्ञ' सिरीयल किलर, एका चुकीनं कसा पकडला गेला?

उनाबॉम्बर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ग्रेग मॅककेव्हिट
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

कुप्रसिद्ध उनाबॉम्बरने माजवलेली दहशत इतकी होती की, जवळपास 18 वर्षं अमेरिकेतील तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. पण इतक्या वर्षांच्या शोधानंतरही पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. कुठलाही पुरावा मागे न ठेवता तपास यंत्रणेला चकवा देण्यात तो इतका निष्णात होता.

30 वर्षांपूर्वी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या या गणित तज्ज्ञापर्यंत पोलीस नेमके कसे पोहचले आणि सरतेशेवटी तो का आणि कसा पकडला गेला, याची ही चित्तथरारक गोष्ट.

3 एप्रिल 1996 रोजी अमेरिकेच्या पोलिसांनी मोंटानाच्या जंगलातील एका छोट्या लाकडी घराला घेराव घातला. या घरावर धाड टाकल्यानंतर तिथून थिओडोर टेड केझेन्स्कीला पोलीसांनी ताब्यात घेतलं.

उनाबॉम्बर या नावानं ओळखला जाणारा थिओडोर टेड केझेंनस्की 18 वर्षं अमेरिकन तपास यंत्रणेला हुलकावणी देत आला होता.

लोकांना बॉम्ब असलेलं पार्सल पाठवून मारण्याची त्याची शैली इतकी अनोखी होती की जवळपास 3 दशकं त्यानं अमेरिकेत अक्षरशः दहशत माजवली होती. पण त्याचा चेहरा अथवा ओळख कोणालाच माहिती नव्हती.

अमेरिकेतील या सर्वात वॉन्टेड सिरीयल किलरचं पत्रक देशभरात वाटलं गेलेलं असलं, तरी हूडी आणि काळा चष्मा घातलेला हा चेहरा अजूनही अंधारातच होता.

शेवटी मोंटानाच्या जंगलात धाड घालून पोलिसांनी उनाबॉम्बरचा चेहरा जगासमोर आणला. यानंतर उनाबॉम्बर म्हणजे नेमका कोण या मागच्या दोन दशकांपासून जगाला पडलेल्या कोड्याचा उलगडा झाला.

अमेरिकेच्या मनात इतकी दहशत निर्माण करणारा हा उनाबॉम्बर प्रत्यक्षात अतिशय विस्कळीत आणि भणंग अवस्थेत मोंटानाच्या जंगलात आढळून आला.

अखेर स्वतःच्याच लिखाणामुळे पकडला गेला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेतील हा वॉन्टेड आरोपी शेवटी त्याच्याच लिखाणामुळे पकडला गेला. उनाबॉम्बर हा आपल्या एका उद्देश आणि विचारसरणीला कटिबद्ध होता. त्याची पूर्तता करण्यासाठीच त्याने हा दहशतीचा मार्ग अवलंबला होता.

आपली विचारसरणी आणि मागणी त्याला जगासमोर मांडायची होती. या आपल्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने विस्तृत लिखाणही केलं होता. याला उनाबॉम्बरचा जाहीरनामा असं म्हटलं जातं.

हा आपला जाहीरनामा अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तपत्रांनी छापावा जेणेकरून देशभरातील जनतेपर्यंत आपले विचार पोहोचतील, अशी उनाबॉम्बरची इच्छा होती. 'यापुढे लोकांची हत्या करणं तू थांबवलं तर आम्ही तुझा जाहीरनामा छापू,' अशी अट अमेरिकेच्या 2 आघाडीच्या वृत्तपत्रांनी उनाबॉम्बरला घातली.

ही अट त्याने मान्य केल्यावर उनाबॉम्बरचा जाहीरनामा या वृत्तपत्रात छापला गेला. शेवटी हाच जाहीरनामा उनाबॉम्बर पकडला जाण्याचं कारण बनला.

या जाहीरनाम्यातील लिखाण थिओडोर टेड केझेन्स्कीचंच आहे, अशा संशय त्याच्या वहिनीला (टेडच्या भावाची पत्नी) आला. विशेष म्हणजे हे दोघं प्रत्यक्षात कधी भेटले देखील नव्हते.

बीबीसीचे वरिष्ठ पत्रकार कृष्णन गुरु मूर्ती यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, "अतिशय हुशार आणि विद्वान असा हा माणूस ज्याने उच्चशिक्षण व सुखासीन आयुष्य सोडून जंगलात राहण्याचा निर्णय घेतला. इतकी वर्ष आपल्या हुशारीच्या जोरावर पोलिसांना चकवा देत राहिला. पण शेवटी याच अतिशहाणपणामुळे पकडला गेला. त्यानेच स्वतः लिहून प्रसिद्ध केलेले लिखाणच त्याच्या पकडलं जाण्याचं कारण बनलं."

उनाबॉम्बरचा शोध पोलिसांनी 1978 सालच्या मे महिन्यातच सुरू केला होता. घरगुती बॉम्ब बनवून टेड केझेन्स्कीनं तो इलीनोईसमधील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात पार्सल म्हणून पाठवला.

हा उनाबॉम्बरनं केलेला पहिला हल्ला होता. यानंतर पुढच्याच वर्षी त्यानं परत दुसरा हल्ला केला. 1979 सालच्या नोव्हेंबर महिन्यात टेड केझेन्स्कीनं एक घरगुती बॉम्ब बनवून अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात त्याचं पार्सल पाठवलं.

अर्थात टेडला अपेक्षित होतं त्याप्रमाणे या बॉम्बचा मोठा विस्फोट झाला नाही. पण बॉम्ब फुटून पसरलेल्या धुरामुळे विमानातील 12 लोकांना श्वसनाचा विकार जडला.

टेड केझेन्स्कीनं पहिला हल्ला विद्यापीठात तर दुसरा हल्ला विमानात केला. हल्लेखोरानं ओळख गुप्त ठेवल्यामुळे एफबीआय या अमेरिकेच्या तपास यंत्रणेनं या हल्ल्यांना उनाबॉम्ब असं नाव दिलं.

युनिव्हर्सिटी आणि एअरलाइन्सना लक्ष्य करणारा हा हल्लेखोर त्यामुळे हल्ला म्हणजे उनाबॉम्ब व हल्लेखोर बनला उनाबॉम्बर. University चा Un आणि Airlines चा A असा Una.

पुढच्या काही वर्षात या उनाबॉम्बरने आपली बॉम्ब बनवण्याची पद्धत आणखी विकसित करून असे 13 हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 3 लोक मारले गेले.

संगणक विक्री करणाऱ्या दुकानाचा मालक ह्युज स्क्रटन, एका जाहिरात कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी थॉमस मोसर आणि लाकूड उद्योगातील मोठं प्रस्थ असलेले गिल्बर्ट मरे असे हे 3 लोक उनाबॉम्बरच्या हल्ल्यात मारले गेले.

उनाबॉम्बर नेमकं कोणाला आणि कशासाठी आपलं लक्ष्य बनवत आहे आणि त्याचा उद्देश काय आहे, याचा अंदाज सुरुवातीचे काही वर्ष कोणालाच लागत नव्हता. कारण वरकरणी पाहता त्याने लक्ष्य बनवलेल्या या 3 लोकांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता.

या त्याच्या सगळ्या हल्ल्यांच्या लक्ष्यांमधील समान धागा पोलिसांना व लोकांना बराच नंतर लक्षात आला. टेड केझेन्स्कीनं हे बॉम्ब घरगुती वस्तूंपासून स्वतः बनवले होते. त्यामुळे त्याचा मागोवा घेणं तपास यंत्रणेला जड जात होतं.

एफबीआयचे तपास अधिकारी ख्रिस रोनी यांनी उनाबॉम्बरला "रिसायकल बॉम्बर" म्हटलं होतं. 1996 साली बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, " कचऱ्याच्या डब्यात आणि आजूबाजूला पडलेल्या सापडतील अशा टाकाऊ वस्तूंपासून तो बॉम्ब बनवत असे. जणू एखाद्या निॲन्डरथलनं शिकारीसाठी शस्त्र बनवलं असावं."

हेलेना, मोंटाना येथील फेडरल कोर्टात उनबॉम्बरला घेऊन जाताना. हा फोटो 4 एप्रिल 1996 चा आहे.

फोटो स्रोत, Michael Macor/The San Francisco Chronicle via Getty Images

फोटो कॅप्शन, हेलेना, मोंटाना येथील फेडरल कोर्टात उनबॉम्बरला घेऊन जाताना. हा फोटो 4 एप्रिल 1996 चा आहे.

आपल्या या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यानं 35 हजार शब्दांचा एक प्रबंधही लिहिला होता. यात त्याने केलेल्या हिंसेचं समर्थन तर होतंच शिवाय आजच्या आधुनिक जगातील विरोधाभास आणि त्यावर मात करण्यासाठीचा त्याचा मार्गदेखील सुचवला होता.

औद्योगिकरण, समाज आणि आपलं भविष्य (Industrial Society and Its Future) या नावाचा आपला हा लेख थिओडोर टेड केझेन्स्कीनं 1995 सालच्या एप्रिल महिन्यात न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टला पाठवला.

हा लेख म्हणजे त्याच्या कल्पनेतील आदर्श जगाचा एक प्रबंधच होता आणि ही कल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा मार्गही त्याने यात विस्तृतपणे सांगितला होता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं लिखाण पर्यायाने विचारसरणी पोहचावी अशी त्याची इच्छा होती.

आपलं हे लिखाण जर वृत्तपत्रांनी छापलं तर इथून पुढे मी कुठलीच हिंसा करणार नाही, असं आश्वासनही त्यानं दिलं. या त्याच्या मागणीमुळे वृत्तपत्र कोड्यात पडले.

वॉशिंग्टन पोस्टचे प्रकाशक 2016 साली बीबीसीशी बोलताना म्हणाले, "त्याची ही अट ऐकून आम्ही तर सुरुवातीला चक्रावलोच होतो. जरी आम्ही त्याची ही एक मागणी मान्य केली आणि त्याचा हा लेख छापायचं ठरवलं तरी तो आपलं आश्वासन पाळेल आणि यापुढे आणखी कोणत्या मागण्या करणार नाही, याची कुठलीच शाश्वती नव्हती."

"अशा गुन्हेगार किंबहुना दहशतवाद्याच्या अटी आणि मागण्या मान्य करून आपण त्याच्या हिंसक विचारसरणीला खतपाणी तर घालत नाही ना? अशी भीतीही आम्हाला वाटली."

उनाबॉम्बर

फोटो स्रोत, Sygma/Sygma via Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकन गणितज्ज्ञ आणि प्राध्यापक टेड केझेन्स्की. जो पुढे उनाबॉम्बर म्हणून कुप्रसिद्ध झाला. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे जून 1968 मध्ये काढलेला फोटो.

एफबीआयचे विशेष अधिकारी टेरी टर्ची यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "उनाबॉम्बरची ही मागणी ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटलं. उनाबॉम्बरचा हा जाहीरनामा असा राष्ट्रीय वृत्तपत्रात छापून त्याला प्रसिद्धी देणं आम्हाला मान्य नव्हतं. कारण त्याचे विचार आणि लिखाण फारच जहाल आणि अतिरेकी होतं."

"अशा पद्धतीच्या अराजक विचारांच्या प्रसाराला मान्यता देणं घातक होतं. पण नंतर आम्ही पुन्हा विचार केला. उनाबॉम्बरला पकडण्यासाठी ही एक मोठी संधी आयती चालून आलेली आहे. त्याचं लिखाण जेव्हा बाहेर वाचलं जाईल तेव्हा हा अंधारात असलेला अतिरेकी उजेडात येऊ शकेल."

"त्याचं लिखाण जितकं कडवट होतं तितकंच उत्कट देखील होतं. लिखाण वाचून कोणी ना कोणी आपल्याला त्याची ओळख पटवायला मदत करेल, अशी आशा आम्हाला यात दिसली. त्यामुळे आम्ही त्याची मागणी मान्य करत लेख छापायची परवानगी या वृत्तपत्रांना दिली."

अतिरेकी विचारसरणीच्या या किलरला आयती प्रसिद्धी आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी इतका मोठा मंच सरकार आणि पोलीस का उपलब्ध करून देत आहे? असा प्रश्न यावेळी अमेरिकन जनतेलाही पडला होता.

ज्याचा माग काढत देशाची तपास यंत्रणा मागची 30 वर्षं झटत आहे त्याच्यावरच इतकी मेहेरबानी का केली जात आहे? असा प्रश्नही यानिमित्तानं जनतेकडून उपस्थित केला जात होता.

200 संशयितांची यादी

उनाबॉम्बरची ओळख पटवण्यासाठी मदतगार ठरेल अशी कोणतीही माहिती दिल्यास त्याला / तिला तब्बल 10 लाख डॉलर्सचं बक्षीस एफबीआयनं 1993 साली जाहीर केलं होतं. त्यानंतर एफबीआयला उनाबॉम्बरची संभाव्य ओळख पटवण्यासाठी माहिती पुरवणारे तब्बल 50 हजारपेक्षा जास्त फोन आले.

देशभरात फक्त उनाबॉम्बरचा खरा चेहरा काय? याचीच चर्चा सुरू होती. मागच्या तीन दशकांत ठिकठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याबरोबरच थिओडोर टेड केझेन्स्कीनं आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी अनेक वैज्ञानिकांशी वेळोवेळी पत्र व्यवहार देखील केला होता.

जाहीरनाम्याबरोबरच या त्याच्या पत्रव्यवहाराचाही अभ्यास केला गेला आणि या हल्लेखोराची पार्श्वभूमी समजावून घेण्याचा प्रयत्न झाला.

उनाबॉम्बरची ओळख पटवण्यासाठी एफबीआयनं एक विशेष पथकच नेमलेलं होतं. या पथकानं फोन कॉल्स, जाहीरनामा आणि पत्रव्यवहार इत्यादींमधून जेवढी काही माहिती जमवली होती त्यावरून 200 संभाव्य संशयतांची यादी बनवली गेली. या संशयितांवर एफबीआयची कायम करडी नजर असायची.

त्यांच्या प्रत्येक हालचालीची निगराणी पोलिसांकडून केली जायची. आपल्याला हवा असलेला हा उनाबॉम्बर उत्तर कॅलिफोर्नियातच कुठेतरी दडून बसलेला आहे, असा एफबीआयचा अंदाज होता.

या तपासाला शेवटी अगदी अनपेक्षितरित्या यश आलं. लिंडा पॅट्रिक ही महिला उनाबॉम्बरची शोधमोहीम यशस्वी ठरण्याचं कारण बनली.

टेड केझेन्स्कीचा लहान भाऊ असलेल्या डेव्हिड केझेन्स्कीची ती पत्नी होती. अमेरिकेचे नागरिक असलेले डेव्हिड केझेन्स्की आणि लिंडा पॅट्रिक त्यावेळी फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. लिंडा पॅट्रिक या पेशाने तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या.

वृत्तपत्रांमधून उनाबॉम्बरविषयी अनेक बातम्या आणि लेख त्या वाचत होत्या. त्यामुळे या विषयात त्यांना रस निर्माण झाला होता. फ्रान्समध्ये प्रसिद्ध होणाऱ्या इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये सुद्धा उनाबॉम्बरचा जाहीरनामा आणि इतर लिखाण प्रसिद्ध झालं होतं.

2016 साली बीबीसीशी बोलताना लिंडा पॅट्रिक म्हणाल्या, "वृत्तपत्रांमधून उनाबॉम्बरविषयी बातम्या आणि लेख वाचून हा आपल्या डेव्हिडचा भाऊ तर नाही ना? अशी शंका मला सारखी यायची. वेगवेगळ्या लेख आणि बातम्यांमधून उनाबॉम्बरची जी वर्णनं होती ती टेडशी जुळणारी होती."

"उदाहरणार्थ हा उनाबॉम्बर लाकूड कामामध्ये निष्णात होता आणि त्याला तंत्रज्ञानाचा तिटकारा होता, असा उल्लेख काही ठिखाणी केला गेला होता. माझा पती डेव्हिड आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून मी टेड विषयी असंच काहीसं ऐकलं होतं."

"ज्या ज्या शहरांमध्ये उनाबॉम्बरनं हल्ले केले होते तिथं टेड कधी ना कधी नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्तानं राहायला होता. मी जेवढं या विषयात घुसत केले तसंतसं एकापाठोपाठ एक योगायोग माझ्यासमोर येत गेले."

"इतक्या सगळ्या गोष्टी जुळून येत असताना त्याकडे दुर्लक्ष करणं मला शक्यच नव्हतं. त्यामुळे एके दिवशी मी हिंमत करून डेव्हिडला हा कठीण प्रश्न विचारला. कदाचित तुझा भाऊच तर उनाबॉम्बर नसेल ना?"

लिंडा पॅट्रिकनं जेव्हा पहिल्यांदा आपल्या मनातली शंका आपल्या पतीला बोलून दाखवली तेव्हा डेव्हिडचा त्यावर विश्वासच बसला नाही. त्याने तात्काळ लिंडाची शंका अनाठायी ठरवली.

पण लिंडाच्या आग्रहाखातर जेव्हा डेव्हिडनं उनाबॉम्बरचा जाहीरनामा आणि इतर लिखाण वाचायला घेतलं तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

लिंडा सांगते, "पहिल्यांदा तर डेव्हिडनं मला झिडकारून लावलं. नंतर मी त्याला संबंधित लिखाण वाचायला दिलं. पहिली काही पानं वाचल्यानंतरच त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. उनाबॉम्बर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला सख्खा भाऊच आहे, याची त्यालाही आता खात्री पटली होती."

बीबीसीशी बोलताना डेव्हिड केझेन्स्कीनं आपल्या मनातील वेदनेला वाट मोकळी करून दिली.

ते म्हणाले, "अमेरिकेतील किंबहुना जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी आपला भाऊ असावा, या शक्यतेनंच मी उडालो. आमच्या कुटुंबासमोरच मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला. आमच्या समोरील या नैतिक पेचानं आमचं जगणंच मुष्किल करून टाकलं."

"जर आम्ही शांत बसून राहिलो तर उनाबॉम्बरच्या दहशतीत आणखी लोक मारले जाण्याची भीती होती. शिवाय जर टेडची माहिती घेऊन पोलिसांकडे गेलो तर पकडला गेल्यानंतर त्याला मृत्युदंडाची शिक्षा होणार, हे देखील नक्की होतं."

"माझा भाऊ माझ्यामुळे मारला गेला, ही बोचरी जाणीव घेऊन उर्वरित आयुष्य जगण्याची कल्पनाच मला असह्य झाली. जणू काही माझे हात कायमचे माझ्या भावाच्या रक्ताने माखले जाणार होते."

तब्बल 17 वर्षं उनाबॉम्बरचा शोध घेण्याची मोहीम तपास यंत्रणेनं अव्याहतपणे चालवली होती. जितके काही संभाव्य संशियत तपास यंत्रणेनं हेरले होते त्यात थिओडोर केझेन्स्की 2 हजार 416 व्या क्रमांकावर होता. म्हणजे कदाचित लिंडाच्या वाचनात तो लेख आला नसता, तर उनाबॉम्बरचा शोध कधीच लागला नसता.

उनाबॉम्बर टेड केझेंन्स्की असू शकतो, हे पोलिसांच्या खिजगणतीत नव्हतं. कारण टेड केझेंन्स्की इतका चाणाक्ष होता की, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतील असे कुठलेच पुरावे त्याने गुन्हा करताना मागे ठेवले नव्हते. उलट तो तपासाची दिशा भरकटावी म्हणून चुकीचे पुरावे मुद्दाम पोलिसांसमोर पेरून ठेवायचा.

अपवाद फक्त त्या लेखाचा. जो त्यानं स्वतः मुद्दाम प्रसिद्ध केला होता. शेवटी हाच अति आत्मविश्वास त्याला नडला.

एफबीआयचे विशेष तपास अधिकारी डॉक्टर केथलीन पकेट 2025 साली बीबीसीच्या विटनेस हिस्टरी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "डेव्हिड आणि लिंडाने ओळख पटवल्यानंतर आम्ही त्यांच्या शिकागोतील घरी गेलो. या घरातच टेड केझेंन्स्की लहानाचा मोठा झाला होता."

"त्याच्या आईने एका जुन्या कपाटात टेडच्या अनेक वस्तू जपून ठेवल्या होत्या. त्यात आम्हाला काही कागदपत्रं सापडली. त्यावर हाताने लिहिलेला मजकूर होता. हा मजकूर म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हे तर उनोबॉम्बरच्या जाहीरनाम्याचा कच्चा मसुदा होता."

"आपला जो जाहीरनामा उनोबॉम्बरनं 1995 साली जगासमोर प्रसिद्ध केला तो टेड केझेन्स्कीनं कच्च्या स्वरुपात 1971 सालीच लिहून ठेवला होता. केझेन्स्कीच्या घरातून आम्हाला इतरही काही पुरावे मिळाले."

"मोंटानोच्या जंगलातील टेडच्या झोपडीवर धाड टाकून तपास करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवण्यासाठी हे पुरावे पुरेसे होते. तशी परवानगी आम्हाला मिळाली आणि आम्ही टेडच्या जंगलातील घरात जाऊन पोहोचलो."

"तिथे टेड नळाचं पाणी आणि वीजपुरवठ्याशिवाय अगदी आदिमानवाप्रमाणे राहत असल्याचं आम्हाला दिसलं. जंगलातील त्याची केबिन म्हणजे टेड हाच उनाबॉम्बर आहे, हे सरळ सिद्ध करणाऱ्या पुराव्यांचा खजिनाच होता."

"तिथे आम्हाला बॉम्ब बनवण्यासाठी कामी येणाऱ्या वस्तू मिळाल्या. यासोबतच उनाबॉम्बरनं आत्तापर्यंत काय काय प्रयोग करून ठेवलेत याची नोंदवहीच आम्हाला मिळाली. नोंदवही काय तो तर तब्बल 40 हजार पानांचा हाताने लिहिलेला थरकाप उडवणारा मजकूर होता. सोबतच आणखी स्फोट घडवून आणण्यासाठी सज्ज असलेला एक नवीन पार्सल बॉम्बही आम्हाला तिथे सापडला."

हार्वर्डपासून जंगलापर्यंतची वाटचाल

आपला भाऊ आता पकडला जाणार हे माहिती असताना देखील टेडच्या अटकेची बातमी टीव्हीवर पाहिल्यावर डेव्हिड केझेन्स्कीला धक्का बसला.

2006 साली बीबीसीवर बोलताना तो म्हणाला, "जंगलातील त्याच्या झोपडीतून अटक करून पोलीस जेव्हा त्याला घेऊन जात होते ते चित्र अतिशय भयाण होतं. मोठा भाऊ म्हणून टेडची लहानपणीची जी काही प्रतिमा माझ्या मनात होती त्याच्याशी पूर्णतः विसंगत हा नजारा होता."

"पोलिसांनी पकडलेला टेड खरंच खूप अस्ताव्यस्त आणि भकास दिसत होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हे तर पोते गुंडाळलेले आहेत, असं वाटत होतं. त्याच्याकडे बघून त्याने बऱ्याच दिवसांपासून आंघोळही केलेली नसावी वाटण्याइतपत त्याचा भणंग अवतार होता."

"टीव्हीवर त्याचा उल्लेख सिरियल किलर व मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अशा शब्दांमध्ये केला जात होता. ज्याच्यासोबत आपण लहानाचे मोठे झालो असा शांत, सुशील आणि प्रचंड हुशार असलेला माझा मोठा भाऊ हाच आहे का? हा प्रश्न मला ते चित्र पाहिल्यानंतर पडला."

लवकरच थिओडोर टेड केझेन्स्कीची सगळी इत्यंभूत माहिती जगासमोर आली. तरुणपणीचा त्याचा एक फोटो आणि विद्यार्थी व नोकरी असतानाची त्याची सगळी पार्श्वभूमी जगासमोर माध्यमांनी मांडली. इतकी वर्षं देशभरात दहशत निर्माण केलेला हा उनाबॉम्बर नेमका आहे तरी कोण हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

टेड हा लहानपणापासून वर्गातील अव्वल विद्यार्थी होता. गणितात तर त्याला प्रचंड वेग होता. त्याचा बुद्ध्यांक किंवा बुद्धी गुणांक (Intelligent Quotient) हा साधारण व्यक्तीपेक्षा बराच जास्त म्हणजे 167 होता. अभ्यासात तो इतका हुशार होता की, शालेय शिक्षण 2 वर्ष आधीच संपवून त्यानं वयाच्या 16 व्या वर्षी थेट हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला.

हार्वडमध्ये देखील त्यानं आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. विसाव्या वर्षी हार्वर्डमधील गणितातील पदवीचं शिक्षण पूर्ण करून तो उच्च शिक्षण घ्यायला मिशिगन विद्यापीठात गेला.

"थिओडोर केझेन्स्की अभ्यासात फारच हुशार होता. गणितातील त्याने लिहिलेले प्रबंध इतके मूलगामी आणि मर्मग्राही होते की, या प्रबंधाच्या जोरावरच त्याला बर्कले विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी अगदी सहज मिळाली."

"इतक्या कमी वयात इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक बनल्यानंतर पुढे जाऊन तो विख्यात गणित तज्ज्ञ होईल याबाबत कोणालाच शंका नव्हती," अशी त्याची आठवण विद्यापीठातील टेडचे शिक्षक पीटर डुरेन यांनी सांगितली.

पत्रकार गुरु मूर्ती सांगतात की, यानंतरच सगळं काही बिघडायला सुरुवात झाली. शिक्षण पूर्ण करून प्राध्यापकी करायला लागल्यानंतर टेडच्या विचारांमध्ये मूलगामी बदल झाला. यातूनच पुढे वाढून ठेवलेल्या यशस्वी कारकीर्दीला झिडकारून टेडने एक अलिप्त आयुष्य जगायचं निर्णय घेतला.

त्याला शिक्षण व्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि एकूणातच आधुनिक जीवन पद्धती फोल वाटली आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. इथूनच त्याचा विद्रोह सुरू झाला.

थिओडोर काझिन्स्की

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, थिओडोर काझिन्स्की यांचा 1964 मधला फोटो, नोकरी सोडून समाजापासून अलिप्त होण्यापूर्वी ते एक अत्यंत आश्वासक गणितज्ञ होते.

आपलं सुखासीन जीवन व यशस्वी कारकीर्दीचा त्याग करून तो मोंटानाच्या जंगलात राहायला गेला. शहरी औद्योगिक जीवन नाकारून आदिवासींसारखं नैसर्गिक अधिवासातील जीवन तो जगू लागला.

मग तंत्रज्ञान, उद्योग आणि यांत्रिकीकरण या त्याला पटणाऱ्या क्षेत्रातील आघाडीच्या लोकांची हेरून हत्या करायला त्याने सुरुवात केली. गुरु मूर्ती यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास, "थिओडोर केझेन्स्की हा अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला मनुष्य होता. कदाचित ही असामान्य बुद्धिमत्ताच त्यानं दहशतवादाचा विनाशकारी मार्ग स्वीकारायला कारणीभूत ठरली.

कारण प्रतिभावान टेडला शिक्षण आणि नोकरीपुरतं मर्यादीत ठेवणाऱ्या आधुनिक जीवनशैलीतील विषण्णता व विरोधाभास लक्षात आला असावा. त्यामुळे आतापर्यंत तो जगत आलेल्या स्थिरस्थावर आयुष्याविरोधातच त्यानं हे बंड पुकारलं.

अटक झाल्यानंतर थिओडोर केझेन्स्कीला 1996 साली अमेरिकन न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर पुढची तीन दशकं त्यानं अमेरिकेतील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये व्यतित केली. यातला बहुतांश काळ त्यानं कोलोरॅडो फ्लोरेसमधील फेडरल सुपरमॅक्स तुरुंगात घालवला.

तुरुंगवासात असताना एका मानसोपचारतज्ज्ञाने थिओडोर टेड केझेन्स्कीची मुलाखत घेतली आणि तो मानसिक रोगी असल्याचं सांगितलं.

टेड केझेन्स्की हा अतार्किक, भयग्रस्त आणि काल्पनिक जगात वावरणारा वेडसर मनुष्य असल्याचा शिक्का डॉक्टरांकडून मारला गेला. पण आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे हे सगळे दावे टेड केझेन्स्कीने फेटाळले.

तुरुंगात असताना 1999 साली टाईम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत "मी मानसिकदृष्ट्या अगदी सक्षम असून पहिल्यापासून मला मी काय करतो आहे आणि कशासाठी करतो आहे, याची पूर्ण जाणीव आहे. मी सगळी कृत्य विचारपूर्वक आणि सुज्ञ मनाने केली. मला कधीच कुठलाही मानसिक आजार नव्हता आणि नाही," असा दावा टेडने केला.

पुढे त्याची तब्येत बिघडत गेली आणि त्याने 10 जून 2023 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी तुरुंगातच आत्महत्या केली.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)