You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींचे इस्रायल संसदेला संबोधन, काय म्हणाले पंतप्रधान?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी (बुधवार) इस्रायलच्या संसदेला (क्नेसेट) संबोधित केले. त्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पंतप्रधान मोदी यांनी हमासच्या हल्ल्याला 'दहशतवादी' कृत्य म्हटले आणि सांगितले, "भारतीय लोक ही वेदना समजू शकतात. निरपराध नागरिकांच्या हत्येला कोणतेही समर्थन देता येत नाही."
पंतप्रधान मोदी यांच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संसदेला संबोधित केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना 'मित्राहून घनिष्ट असा भाऊ' असे संबोधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय राजकीय दौऱ्यावर इस्रायलला गेले आहेत. राजधानी तेल अवीव येथे पोहोचल्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी हे 'महान भारतीय नेता' आहेत असे म्हटले.
पॅलेस्टाईन बाबत काय म्हणाले मोदी?
मोदी म्हणाले की भारत आणि इस्रायलमध्ये अनेक दृष्टीने समानता आहे. आणि दोन्ही देश एकमेकांना विविध क्षेत्रात सहकार्य करत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनी गाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली आहेत त्याचं भारत समर्थन करतो असं मोदी यांनी म्हटलं.
ते म्हणाले की आम्हाला असं वाटतं यामुळे या भागात शांतता प्रस्थापित होण्यास सहकार्य मिळेल आणि यामुळे पॅलेस्टाईनचा प्रश्न देखील सुटेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की नागरिकांच्या हत्येला कोणत्याही पद्धतीने तर्कसंगत ठरवता येऊ शकत नाही.
ते म्हणाले भारत ही गोष्ट समजू शकतो. मुंबई हल्ल्यात आमच्याही निष्पाप नागरिकांचे जीव गेले. त्यात इस्रायली नागरिकदेखील होते.
'ज्यूंचा नरसंहार जागतिक इतिहासातील काळा अध्याय'
दुसऱ्या महायुद्धावेळी झालेला ज्यू लोकांचा नरसंहार (हॉलोकास्ट) हा जगाच्या इतिहासातील सर्वांत काळा अध्याय असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
दोन्ही देशातील सांस्कृतिक परंपरांचा गौरव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की इस्रायलने संपादित केलेल्या यशाचा भारतीय लोक आदर करतात.
'ज्या दिवशी भारताने इस्रायलला मान्यता दिली होती त्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 1950 रोजी माझा जन्म झाला,' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
इस्रायली संसदेला संबोधित करताना भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी 'शलोम नमस्ते' असे अभिवादन केले.
इस्रायली संसदेत भारतीय ध्वजाच्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेच्या स्पीकरचे आभार मानले.
पंतप्रधान मोदींचे तेल अविव्ह विमानतळावर भव्य स्वागत झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी बेन गुरिअन विमानतळावर मोदींचे स्वागत केले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.