1973चं अरब-इस्रायल युद्ध, सौदी अरेबियानं अमेरिकेच्या नाकी नऊ कसे आणले होते?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1973 च्या युद्धात अनेक अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला होता
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

इस्रायलच्या हवाई दलानं 1967 मध्ये झालेल्या 6 दिवसांच्या युद्धाच्या पहिल्या 6 तासांमध्येच इजिप्तच्या हवाई दलाचं इतकं नुकसान केलं होतं की ते त्यातून सावरूच शकले नाहीत.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी 5 जूनच्या सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी इजिप्तच्या अनेक हवाई तळांवर एकाच वेळी हल्ला चढवला. इजिप्तचे वैमानिक विमानांपर्यंत पोहोचायच्या आतच इजिप्तची बहुतांश लढाऊ विमान धावपट्ट्यांवरच नष्ट झाली.

थोड्याच वेळाच इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आणखी एक हल्ला केला. त्यांनी इजिप्तच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. या हल्ल्यातून इजिप्तचं हवाई दल सावरू शकलं नाही आणि या युद्धात त्यांचा मोठा पराभव झाला.

इतकंच नाही तर, इस्रायलच्या भूदलानं सिनाईच्या वाळवंटातील मोठा प्रदेश आणि सीरियातील गोलान टेकड्यांवर देखील कब्जा केला. या हल्ल्यात इस्रायलला निर्णायक विजय मिळाल्यानंतर इजिप्त आणि सीरियाला त्यांचा गमावलेला प्रदेश परत घ्यायचा होता. यासाठी त्यांनी 6 ऑक्टोबर 1973 चा दिवस निवडला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मेयर (उजवीकडे)

एलेनोर बर्केट या पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या अमेरिकन पत्रकार आहेत आणि इतिहासाच्या शिक्षिका आहेत. बर्केट यांनी इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या 'गोल्डा' या चरित्रात महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिलं आहे, "इस्रायलला त्यांच्यावर इजिप्त आणि सीरियाकडून होणाऱ्या हल्ल्याची चिन्हं दिसली होती. इस्रायलच्या लष्करी गुप्तचर विभागानं, केजीबी या सोव्हिएत युनियनच्या गुप्तहेर यंत्रणेचे रेडिओ संदेश पकडले होते."

"या संदेशांमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की सोव्हिएत युनियनच्या तज्ज्ञांच्या कुटुंबांना इजिप्त आणि सीरियातून तत्काळ बाहेर काढण्यात यावं. त्यातून इस्रायलला या हल्ल्याचा वास आला होता. महाकाय सोव्हिएत अँटेनोव 22 एस विमान त्या लोकांना नेण्यासाठी आल्यानंतर इस्रायली लोकांच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली होती."

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

"पंतप्रधान गोल्डा मेयर यांना ही माहिती मिळताच त्यांना याची चिंता वाटली. मात्र त्यांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. दरम्यान इस्रायलच्या गुप्तहेरांनी माहिती दिली की इजिप्तच्या सैन्याचं एक डिव्हिजन सुएझ कालव्याच्या दिशेनं पुढे सरकत आहे."

"त्यांनी जवळपास 1 लाख 20 हजार राखीव सैनिकांना ड्युटीवर बोलावलं आहे. असं असूनही इस्रायलचे संरक्षण मंत्री मोशे दायान यांना वाटत होतं की इजिप्त फक्त एक सामान्य लष्करी सराव करतो आहे."

तो 6 ऑक्टोबर 1973 चा योम किप्पुरचा दिवस होता. योम किप्पुर हा ज्यू समुदायामध्ये वर्षातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. त्या दिवशी संपूर्ण इस्रायलमध्ये सुट्टी होती. इतकंच काय रेडिओ आणि टीव्ही स्टेशनला देखील सुट्टी होती. इस्रायलच्या सैन्यातील तीन-चतुर्थांश सैनिक रजा घेऊन घरी गेलेले होते.

इजिप्त आणि सीरियाचा संयुक्त हल्ला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एलेनोर बर्केट यांनी गोल्डा मेयर यांच्या चरित्रात लिहिलं आहे, "सकाळी 8 वाजता गोल्डा त्यांच्या कार्यालयात आल्या होत्या. गोल्डा त्यांचे लष्करप्रमुख डेव्हिड 'डाडो' एलाजार आणि संरक्षण मंत्री मोशे दायान यांच्यातील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. डाडो यांना वाटत होतं की इजिप्तनं इस्रायलवर हल्ला करण्याआधीच इस्रायलनं त्यांच्यावर हवाई हल्ला करून त्यांची योजना धुळीस मिळवावी."

"दुसऱ्या बाजूला मोशे दायान यांना हे युद्ध होणारच आहे याची खात्री नव्हती. त्यांनी आधी हवाई हल्ला करण्याची कल्पना फेटाळली. कारण त्यांना वाटत होतं की अमेरिकेला इस्रायलची ही कारवाई आवडणार नाही."

"राखीव सैनिकांना परत बोलावण्याची जनरल डाडो यांची विनंतीदेखील अनावश्यक असल्याचं दायान यांचं म्हणणं होतं. त्यांना वाटत होतं की तुम्ही राखीव सैनिकांना तेव्हाच बोलावता, जेव्हा पहिली गोळी झाडली जाते. समजा जर युद्ध झालंच नाही, तर आपण त्या राखीव सैनिकांकडून काम करवून घेणार आहोत? गोल्डा मेयर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना पाठिंबा दिला. त्यांनी आधी हल्ला करण्याची कल्पना नाकारली होती."

फोटो स्रोत, Harper

दुपारी 2 वाजता अचानक संपूर्ण इस्रायलमध्ये धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले. उत्तरेत सीरियाच्या सैन्याच्या 5 डिव्हिजननं, 1400 रणगाडे आणि 1000 तोफांनिशी इस्रायलच्या गोलान टेकड्यांवर तैनात असलेल्या 2 ब्रिगेडवर हल्ला चढवला.

यूरी बार जोजेफ यांनी 'द एंजेल' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "त्यावेळेस त्या ठिकाणी इस्रायलचे फक्त 177 रणगाडे होते. तर दक्षिणेत इजिप्तचे 1 लाख सैनिक 1300 रणगाड्यांसह सिनाईच्या वाळवंटात शिरले होते. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात इजिप्तच्या 32,000 सैनिकांनी 6 तासांमध्ये 720 बोटींद्वारे सुएझ कालवा ओलांडला."

"प्रत्येक बोटीनं 12 वेळा राऊंड ट्रिप केली. इजिप्तच्या सैनिकांनी सुएझ कालवा ओलांडला, तेव्हा इस्रायलच्या सैनिकांनी त्यांना थोडादेखील प्रतिकार केला नाही. तसंच प्रत्युत्तरासाठीचा हल्लाही केला नाही."

इजिप्तला सुरुवातीला मिळालं यश

इजिप्तच्या सैनिकांच्या आगेकूच रोखण्यासाठी इस्रायल त्यांच्या वायुदलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता.

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या टीममध्ये राहिलेले मायकल डोरान यांनी 'द हिडन कॅल्क्युलेशन बिहाईंड योम किप्पुर वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "जमिनीवरून हवेत मारा केल्या जाणाऱ्या सॅम क्षेपणास्त्रांसाठी इस्रायलचे वैमानिक अजिबात सज्ज नव्हते. इस्रायलच्या वैमानिकांचं 1967 मध्ये इजिप्तच्या हवाई क्षेत्रावर पूर्ण वर्चस्व होतं. मात्र 6 वर्षांनंतर परिस्थिती प्रचंड बदलली होती. इतकी की पहिल्या 24 तासांमध्येच त्यांची 10 ते 30 टक्के लढाऊ विमानं नष्ट झाली होती. इस्रायलचं लष्करी नेतृत्व यामुळे पूर्णपणे हादरलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योम किप्पूर युद्धातील इजिप्तचा रणगाडा (फाइल फोटो)

इजिप्तच्या सैनिकांनी कोणत्याही प्रतिरोधाशिवाय सुएझ कालवा ओलांडला. त्यांचा एकही सैनिक मारला गेला नाही. इस्रायलचे रणगाडे 'स्विम फिंस' या त्यांच्या पोझिशनवर पोहोचले. तिथून त्यांना प्रत्युत्तराचा हल्ला करायचा होता. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यावर इजिप्तच्या कमांडोंनी ताबा मिळवला होता. इस्रायलचे रणगाडे पाहताच त्यांनी त्यांच्यावर अँटी टँक मिसाईल म्हणजे रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रांचा हल्ला केला.

रविवारी पहाटेपर्यंत इजिप्तच्या सैनिकांनी सुएझ कालव्याच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांची मोर्चेबांधणी केली होती. त्यांचा एकही सैनिक मारला गेला नव्हता. त्याचबरोबर इजिप्तच्या 222 लढाऊ विमानांनी सुएझ कालवा ओलांडत इस्रायलच्या तळांवर आणि रडार स्टेशनवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली.

एलेनोर बर्केट यांनी लिहिलं आहे, "इस्रायलचे सैनिक आश्चर्यचकित होऊन हा हल्ला पाहत होते. इस्रायलचे रणगाडे जेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा इजिप्तच्या सैनिकांनी खांद्यावरून नेता येणाऱ्या रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड लॉंचर्सचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही, तर त्यांनी काही अशा शस्त्रांस्त्रांचा वापर केला, ज्याचा सामना इस्रायलच्या सैनिकांनी आधी कधीच केला नव्हता. युद्धाला 24 तास पूर्ण होण्याआधीच आधीच्या युद्धाबद्दलची इस्रायलची प्रत्येक जुनी धारणा मोडून निघाली होती."

अण्वस्त्रांचा वापर करण्याबद्दल विचार

इजिप्तच्या या हल्ल्यामुळे इस्रायलचे वॉर हिरो राहिलेले संरक्षण मंत्री इतके विचलित झाले की त्यांचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. त्यांनी पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्यासमोर कबुली दिली की परिस्थिती समजण्यात त्यांच्याकडून मोठी चूक झाली आहे.

त्यांनी राजीनामा देऊ केला. मात्र गोल्डा यांनी तो विचारात देखील घेतला नाही.

मायकल डोरान यांनी लिहिलं आहे, "मोशे दायान यांनी तर पंतप्रधानांना सुचवलं की इजिप्त आणि सीरियाला रोखण्यासाठी इस्रायलनं अण्वस्त्रांचा वापर करण्याबद्दल विचार करावा."

याची पुष्टी करत गोल्डा मेयर यांच्या चरित्रकार एलेनोर बर्केट यांनी लिहिलं आहे, "काही सूत्रांनुसार, काही काळासाठी गोल्डादेखील अतिशय अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी दायान यांच्या विनंतीवरून अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलचे तत्कालीन संरक्षण मंत्री मोशे दायान (डावीकडे) आणि पंतप्रधान गोल्डा मेयर (उजवीकडे)

योम किप्पूर युद्धात इस्रायलच्या टँक डिव्हिजनचं नेतृत्व करणारे आणि नंतर इस्रायलचे पंतप्रधान झालेले एरियल शेरॉन यांनी 'वॉरियर' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

यात त्यांनी लिहिलं आहे, "मी पहिल्यांदा इस्रायलच्या सैनिकांच्या चेहऱ्यावर भीती नाही तर आश्चर्याची झलक पाहिली होती. त्यांनी जी गोष्ट कधीही अनुभवली नव्हती, ते सर्वकाही अचानक त्यांच्या बाबतीत घडत होतं. त्यांचं सर्व लष्करी आयुष्य जिंकण्याच्या अनुभवातून गेलं होतं. इजिप्तचे सैनिक त्यांच्या डोळ्यासमोर सुएझ कालवा ओलांडत आहेत, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता."

इस्रायलनं राखीव सैनिक केले तैनात

संध्याकाळ होईपर्यंत इस्रायलमध्ये राखीव सैनिकांच्या घरी लष्करी मुख्यालयातून फोन येण्यास सुरुवात झाली होती.

जेरुसलेममधील आपल्या अनुभवांवर लिहिणाऱ्या आणि हॉलोकॉस्टवर संशोधन करणाऱ्या डॅबी शपीरो यांनी 'रिमेंबरिंग योम किप्पूर वॉर' हा लेख लिहिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "अजूनही ते दृश्य आठवल्यावर माझं हृदय हादरून जातं. अनेक लोक गुडख्यापर्यंत पांढरा 'कितेल' घालून त्यांच्या युनिटपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांवरून धावत होते. त्यांच्या मागे सँडविच आणि थर्मासमध्ये गरम कॉफी घेऊन त्यांच्या पत्नीदेखील पळत होत्या."

"त्यांना आदेश देण्यात आला होता की त्यांनी तत्काळ त्यांचा उपवास सोडावा आणि त्यांच्या तळांकडे रवाना व्हावं."

"महिलांना सांगण्यात आलं होतं की त्यांनी घरी जाऊन त्यांच्या पतींसाठी जेवण तयार करावं, जेणेकरून ते जेव्हा युद्ध आघाडीवर जातील तेव्हा उपाशी राहणार नाहीत. यादरम्यान गडद हिरव्या रंगाच्या लष्करी जीप रस्त्यावरून वेगानं जात होत्या. राखीव सैनिकांना शूल (ज्यू प्रार्थनास्थळ) मधून थेट युद्ध आघाडीवर त्या घेऊन जात होत्या. या सैनिकांपैकी बरेचसे लोक कधीही त्यांच्या घरी परतले नाहीत."

सीरियाच्या आघाडीवर इस्रायलचा प्रत्युत्तराचा हल्ला

तिकडे गोलान हाईट्सच्या आघाडीवर सीरियाचं सैन्यदेखील इस्रायलवर हल्ला करत होतं. गोलान टेकड्या पूर्णपणे नियंत्रणात याव्यात यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी इस्रायलनं सीरियावर प्रत्युत्तराचा हल्ला सुरू केला. त्याचा परिणाम म्हणून 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत इस्रायलनं सीरियाची पहिली संरक्षण फळी भेदली होती.

इस्रायलच्या हवाई दलानं सीरियातील हवाई तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. यात सीरियाची राजधानी असलेल्या दमिश्कचा विमानतळदेखील होता. मग 9 ऑक्टोबर येत-येत इस्रायलच्या सैन्याला सीरियाच्या सैनिकांना 1967 च्या शस्त्रसंधीच्या रेषेच्या मागे रेटण्यात यश आलं.

अखेरीस 10 ऑक्टोबर संपेपर्यंत इस्रायलनं सीरियाच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या युद्धात सीरियन सैनिकांनी शरणागती पत्करली

ऑड्री शुल यांनी 'द योम किप्पूर वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "सीरियानं घाबरून, इराक, कुवेत आणि मोरक्को या इतर अरब देशांना लष्करी मदतीचं आवाहन केलं होतं. दुसऱ्या दिवशी ही मदत पोहोचलीदेखील होती. मात्र तरीदेखील गोलान हाईट्सच्या आघाडीवर इस्रायलच्या सैनिकांची आगेकूच सुरू राहिली."

"इस्रायलचे सैनिक 11 ऑक्टोबरला सीरियाच्या सीमेत साडे नऊ किलोमीटरपर्यंत आत शिरले होते. तर 15 ऑक्टोबरपर्यंत इस्रायलचे सैनिक दमिश्कजवळच्या सासा गावापर्यंत पोहोचले होते. तिथून दमिश्क फक्त 32 किलोमीटर अंतरावर होतं."

इस्रायलनं उलटवला डाव

इस्रायलच्या प्रतिहल्ल्यामुळे 14 ऑक्टोबरपासून युद्धाचं पारडं फिरू लागलं. कारण त्याच दिवशी अमेरिकेची शस्त्रास्त्रं इस्रायलमध्ये पोहोचू लागली.

जनरल एलाजेर यांनी त्या रात्री पंतप्रधान गोल्डा मेयर यांना संदेश पाठवला, "गोल्डा, आता परिस्थितीत सुधारणा होते आहे. आपला फॉर्म पुन्हा येतो आहे आणि अरब त्यांच्या जुन्या वळणावर परत जात आहेत."

इजिप्तच्या तिसऱ्या आर्मर्ड ब्रिगेडनं 14 ऑक्टोबरला 124 रणगाड्यांसह 'मितला पास'वर हल्ला केला. या लढाईत 8 तासांहून कमी कालावधीत त्यांचे 60 रणगाडे नष्ट झाले होते. इथूनच युद्धाचं पारडं फिरण्यास सुरुवात झाली होती.

एरियल शेरॉन यांनी इजिप्तच्या थर्ड आर्मीला सुएझ कालव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सर्व बाजूंनी घेरण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली होती. पुढील 5 दिवसांमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची रणगाड्यांची सर्वात मोठी लढाई झाली.

सर्वात भीषण लढाई 15 ऑक्टोबरच्या रात्री 'चायनीज फार्म' नावाच्या ठिकाणी झाली.

फोटो स्रोत, Simon & Schuster

एरियल शेरॉन यांनी त्या लढाईचं वर्णन करताना वॉरियर या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "लढाई इतक्या जवळून लढण्यात आली की इजिप्त आणि इस्रायलच्या सैनिकांचे मृतदेह एकमेकांच्या शेजारी पडलेले दिसत होते. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी जळत्या रणगाड्यांमधून उड्या मारल्या होत्या आणि ते सोबतच मेले होते."

शेरॉन यांनी इजिप्तच्या सैनिकांवरील दबाव कायम ठेवला. इस्रायलच्या सैन्याला सुएझ कालवा पार करण्यात यश आलं होतं.

मायकल डोरान यांनी लिहिलं आहे, "पराभवाच्या भीतीनं इजिप्तनं शस्त्रसंधीचं आवाहन केलं. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या दबावाखाली इस्रायलनं आगेकूच थांबवली. या युद्धात इजिप्त आणि सीरियाचे एकूण 15,600 सैनिक मारले गेले तर जवळपास 35,000 सैनिक जखमी झाले.

इस्रायलचे एकूण 2,569 सैनिक मारले गेले आणि त्यांचे 7,251 सैनिक जखमी झाले. या युद्धात अरब देशांची 440 लढाऊ विमानं नष्ट झाली. तर इस्रायलची 102 लढाऊ विमानं गमावली."

इजिप्त आणि इस्रायल शस्त्रसंधीसाठी झाले तयार

संयुक्त राष्ट्रसंघानं 22 ऑक्टोबरला शस्त्रसंधीची घोषणा केली. तोपर्यंत सुएझ शहरातून काहिराला जाणारा रस्ता इस्रायलच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आला होता.

ऑड्रे शुल यांनी लिहिलं आहे, "सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोघांना वाटत होतं की या लढाईत इस्रायलचा पूर्ण विजय होऊ नये. कारण त्यांना भीती वाटत होती की इस्रायलच्या विजयामुळे रागावलेले अरब देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी कपात करू शकतात.

इस्रायलला ही शस्त्रसंधी आवडली नाही. कारण त्यांना वाटत होतं की ते जेव्हा निर्णायक विजय मिळवण्याच्या मार्गावर होते, तेव्हा हे युद्ध थांबवण्यात आलं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात

"इस्रायलच्या सैन्यानं 23 ऑक्टोबरला सुएझ कालव्याच्या पूर्व किनाऱ्यावर इजिप्तच्या थर्ड आर्मीला घेरलं आणि त्यांच्या हजारो सैनिकांना कैद केलं. ते इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर होते. इजिप्तनं घाबरून सोव्हिएत युनियनकडे मदत मागितली. सोव्हिएत युनियननं ती तात्काळ मान्य केली."

दोन्ही महाशक्तींच्या प्रयत्नांमुळे 26 ऑक्टोबरला इस्रायल आणि इजिप्त शस्त्रसंधीसाठी तयार झाले.

कच्च्या तेलाचा शस्त्र म्हणून वापर

अर्थात अरब-इस्रायल युद्ध 26 ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात आलं होतं. मात्र या युद्धामुळे मध्यपूर्व आणि जागतिक ऊर्जा बाजाराला पूर्णपणे बदलून टाकलं होतं.

अखेरीस या युद्धातील सर्वात मोठा विजेता ठरला सौदी अरेबिया. अमेरिकेनं या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे सौदी अरेबियानं अमेरिकेत कच्च्या तेलाची निर्यात करण्यावर बंदी घातली होती.

ब्रूस रीडल या सीआयएच्या माजी अधिकाऱ्यांनी 'फिफ्टी इयर्स अगो सौदी अरेबिया वॉज द बिगेस्ट विनर ऑफ द योम किप्पूर वॉर' हा लेख लिहिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे शाह फैसल (डावीकडे) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन (उजवीकडे)

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "ब्रिटननं 1814 मध्ये वॉशिंग्टन पेटवून दिल्यापासून इतर कोणत्याही देशानं अमेरिकेचं इतकं मोठं आर्थिक नुकसान केलं होतं, जितकं सौदी अरेबियानं केलं होतं."

"अरब-इस्रायल युद्ध सुरू होण्याआधी एका गुप्त बैठकीत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांनी सौदी शाह फैसल यांना सल्ला दिला होता की आवश्यकता भासल्यास कच्च्या तेलाचा वापर शस्त्राप्रमाणे करण्यासाठी त्यांनी तयार राहावं."

"सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्य मंत्री ओमर सक्काफ यांनी 17 ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची भेट घेऊन शाह फैसल यांचं पत्र त्यांना दिलं. त्यात म्हटलं होतं की जर अमेरिकेनं इस्रायलला शस्त्रं पुरवणं दोन दिवसात बंद केलं नाही, तर सौदी अरेबिया अमेरिकेला केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर बंदी घालेल."

"निक्सन यांनी तसं करण्यास नकार दिला. मग सौदी अरेबियानं आधी त्यांच्या उत्पादनात 10 टक्क्यांची कपात केली आणि नंतर अमेरिकेला कच्चे तेल निर्यात करणं बंद केलं."

जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा

अमेरिकेला निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी घातल्याचे दूरगामी परिणाम दिसून आले.

जुलै, 1973 मध्ये कच्च्या तेलाचा भाव 2.90 डॉलर प्रति बॅरल होता. तो वाढून डिसेंबर, 1973 मध्ये 11.65 डॉलर प्रति बॅरल झाला होता.

या बंदीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली. त्याचा अमेरिकेतील लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला.

भारतालादेखील याचा फटका बसला. पाकिस्तानबरोबरच्या 1971 च्या युद्धाचा भारतावर आर्थिक परिणाम झाला होता. त्याला तोंड देत असलेल्या भारताचं कच्च्या तेलाच्या आयातीसाठीचं बजेट जवळपास तिप्पट झालं.

महागाई वाढल्यामुळे सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. त्याचा भारताच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.