मॉडेलबरोबर सेक्स करण्यासाठी एजंटनं एपस्टीनला केली होती विनवणी, एपस्टीन फाईल्समधून समोर आलं मॉडेलिंग विश्वाचं वास्तव

रॅमसे एलखोली आणि जेफ्री एपस्टीन यांनी जवळपास एक दशकभर मॉडेल्सच्या संदर्भात एकमेकांना इमेल पाठवले होते

फोटो स्रोत, Facebook/Getty Images

फोटो कॅप्शन, रॅमसे एलखोली आणि जेफ्री एपस्टीन यांनी जवळपास एक दशकभर मॉडेल्सच्या संदर्भात एकमेकांना इमेल पाठवले होते.
    • Author, अब्दिरहीम सईद
    • Role, बीबीसी अरेबिक
    • Author, बेन किंग
    • Role, बिझनेस रिपोर्टर
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.)

एपस्टीन फाईल्समधील इमेलमधून रोज नवनवीन आणि धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. एक मॉडेलिंग एजंट आणि एपस्टीन यांच्यातील असेच काही इमेल समोर आले आहेत.

या एजंटनं एका 18 वर्षांच्या तरुणीची एपस्टीनशी ओळख करून दिली होती. तसंच त्या मुलीबरोबर एपस्टीननं सेक्स करावा अशी विनंतीही त्यानं केल्याचं या इमेलमधून समोर आलंय.

रॅमसे एलखोली असं या या एजंटचं नाव होतं. जवळपास दशकभराच्या कालावधीत त्यानं एपस्टीनला शेकडो इमेल पाठवल्याचं दिसून आलं आहे.

या इमेलमध्ये रॅमसेनं महिलांचं शरीर आणि लैंगिक संबंधांबाबत त्या काय विचार करतात याबाबत चर्चा केल्याचं समोर आलं आहे. तसंच एपस्टीननं त्यांच्या साथीनं ब्राझीलमधील फॅशन आणि मॉडेलिंग व्यवसायात गुंतवणूक करून आणखी महिलांना भेटावं असंही त्यानं सुचवलं होतं.

रॅमसे एलखोलीनं 2011 मध्ये पाठवलेल्या इमेलमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणीचं वर्णन केलं होतं. तिला 'पैशांची अत्यंत गरज होती' असं त्यानं म्हटलं होतं.

"Dear Jeffrey PLEASE just try her in bed," अशी विनंतीच रॅमसेनं या इमेलमध्ये केली होती.

एलखोलीनं काही इमेलमध्ये त्यानं वापरलेली भाषा आणि एपस्टीनबरोबरचे त्याचे संबंध, याबद्दल त्याला पश्चाताप वाटतो, असं बीबीसीला सांगितलं. एपस्टीन महिलांचं शोषण करत असल्याबद्दल त्याला माहिती नव्हतं, असं तो म्हणाला.

एलखोली सध्या स्वत:ची ओळख मानववंशशास्त्रज्ञ आणि संगीतकार, तसंच मोनोट्रॉनिक बँडचा संस्थापक अशी करून देतो. मात्र 2010 च्या दशकात तो मॉडेलिंग एजंट होता.

अमेरिकेतील न्याय विभागानं अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या फाईल्समधून दिसून येतं की त्याची 2009 पासून ते 2019 मध्ये एपस्टीनचा मृत्यू होण्याच्या काही काळ आधीपर्यंत एपस्टीनबरोबर इमेलची देवाणघेवाण झाली होती. यातील बराचसा भाग महिला मॉडेल्सपर्यंत पोहोचण्यासंदर्भात होता.

एपस्टीनचं मॉडेलिंग विश्वातील जाळं

एपस्टीननं आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग उद्योगात कसे व्यापक स्वरुपात संपर्क निर्माण केले होते, यावर या इमेलमएपस्टीनधून प्रकाश पडतो. यातील काही संपर्कांचा वापर एपस्टीननं महिला आणि मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी केला होता. एपस्टीननं लैंगिक शोषण, छळ केलेल्या महिलांमध्ये मॉडेल्सचाही समावेश होता. एफबीआयच्या अंदाजानुसार, यात एकूण 1,000 महिला आणि मुली असू शकतात.

एपस्टीनबरोबर देवाणघेवाण झालेल्या संदेशांमध्ये एलखोलीनं फॅशन उद्योगातील एपस्टीनच्या संपर्कांबरोबर मॉडेल्सच्या गाठीभेटी आयोजित करण्याबद्दल चर्चा केल्याचं दिसून येतं. त्यात व्हिक्टोरिया सिक्रेटचा समावेश आहे. त्यावेळी हा ब्रँड एपस्टीनचे सर्वांत मोठे क्लाएंट लेक्स वेक्सनर यांच्याकडे होता तसेच व्हेरा वँग लेबलबाबतही चर्चा झाली होती.

जेफ्री एपस्टीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेफ्री एपस्टीन

एलखोली हा जीन-ल्युक ब्रुनेल या फ्रेंच मॉडेल एजंटच्या संपर्कात होता, असंही अमेरिकेच्या न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या फाईल्समधून दिसून येतं.

जीन ब्रुनेल एपस्टीनच्या संपर्कातील किंवा परिचयातील व्यक्ती होता. त्यानं एपस्टीनच्या या लैंगिक शोषणासाठी तरुणी, मुलींची भरती केल्याचा आरोप ब्राझीलच्या महिलांनी बीबीसीबरोबर बोलताना केला होता.

ब्रुनेल 2022 मध्ये पॅरिसमधील तुरुंगाच्या कोठडीत मृत अवस्थेत सापडला होता. त्यावेळी ब्रुनेलची अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि लैंगिक शोषणासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या संशयावरून चौकशी सुरू होती.

एपस्टिनवर कौतुकाचा वर्षाव

एलखोली यानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, तो जेफ्री एपस्टीनच्या जवळचा नव्हता. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाईटवर एलखोलीच्या आडनावानं सर्च केल्यास 2,000 हून अधिक रिझल्ट्स समोर येतात. अर्थात त्यात अनेक पुनरावृत्ती आहेत. पण 10 वर्षांच्या कालावधीत एपस्टीनला फक्त 10 ते 12 वेळाच भेटल्याचं फाईल्सवरून दिसतं असं एलखोली म्हणाला.

एलखोलीनं 2009 मध्ये एपस्टीनला एक इमेल पाठवला होता. त्यावेळी एका अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याच्या आरोपातून एपस्टीनची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी एलखोलीनं हा इमेल पाठवला होता.

"तुझी मैत्री माझ्यासाठी महत्त्वाची आहे, हे मला तुला सांगण्याची गरज नाही. तुझी मॉडेल्सबरोबर भेट घालून देण्याच्या मोबदल्यात मी तुझ्याकडे कधीही काही मागत नाही, कारण मी ते माझ्याकडून तुला केलेलं सहकार्य समजतो. मला माहिती आहे की, तूही असं सहकार्य करतोस," असं त्यात म्हटलं होतं.

एपस्टीनच्या घरातील एक क्रेडेंझा डेस्कचा एक ड्रॉवर उघडा असून त्यात इतर फोटो ठेवलेले दिसत आहेत, हा फोटो आधी हटवण्यात आला आणि पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

फोटो स्रोत, US Department of Justice

फोटो कॅप्शन, एपस्टीनच्या घरातील एक क्रेडेंझा डेस्कचा एक ड्रॉवर उघडा असून त्यात इतर फोटो ठेवलेले दिसत आहेत, हा फोटो आधी हटवण्यात आला आणि पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

एलखोलीनं पुढे लिहिलं होतं, "जेफ्री, तू एक खास व्यक्ती आहेस."

एलखोलीनं एका 'पैशांची अत्यंत निकड असलेल्या' महिलेबद्दल एपस्टीनला सांगितल्यानंतर, दोन दिवसांनी एलखोली म्हणाला की, त्याला आशा होती की न्यूयॉर्कमध्ये 'एकटी' असलेल्या त्या महिलेच्या परिस्थितीचा एपस्टीन 'पुरेपूर फायदा घेत असेल.'

या इमेलला एपस्टीननं फक्त एकाच शब्दात उत्तर दिलं होतं, 'झिरो'.

त्यानंतर काही दिवसांनी एलखोलीनं पुन्हा एपस्टीनला इमेल पाठवला. "जेफ्री, कृपया तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवून बघ. मला मनापासून समाधान वाटेल. कारण ती महिला म्हणजे डोकेदुखी आहे. तसंच तिला हा अनुभव कसा असतो हे समजायला हवं (इथं आक्षेपार्ह शब्द वापरलेला होता ) असं मला वाटतं," असंही त्यानं लिहिलं होतं.

एलखोलीनं दावा केला की, त्यानं हा इमेल त्या महिलेच्या परवानगीनं पाठवला होता.

'मला वाटतं तुला ती आवडेल'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एलखोलीच्या संदर्भात 18 वर्षांखालील मुलींचा कोणताही उल्लेख बीबीसीला आढळलेला नाही.

एलखोलीनं 2010 मध्ये पाठवलेल्या एका मेसेजमध्ये प्रस्ताव दिला होता की एपस्टीननं एका 18 वर्षांच्या 'अतिशय सुंदर' रशियन विद्यार्थिनीला भेटलं पाहिजे. ही मुलगी एलखोलीला एका दुकानात अचानक भेटली होती.

एलखोलीनं लिहिलं होतं, "मला वाटतं तुला ती आवडेल."

याला एपस्टीनच्या सहायकाने उत्तर देत म्हटलं होतं की, त्याला तिला भेटायचं आहे.

एलखोलीनं बीबीसीला सांगितलं की, त्यानं एपस्टीनची त्या तरुणीशी भेट घालून दिली होती. त्याला आशा होती की, एपस्टीन त्या तरुणीला मॉडेलिंगच्या संधी मिळवून देण्यास मदत करेल.

एलखोलीनं ज्यांच्याबद्दल चर्चा केली होती, अशा अनेक तरुणी 19 वर्षांच्या होत्या. एपस्टीनला तरुण मुलींबद्दल असलेल्या विशेष आकर्षणाची एलखोलीला कल्पना होती, असं जाणवतं.

एलखोलीनं 2009 मध्ये पाठवलेल्या एका इमेलमध्ये 'सोनेरी केसांच्या अतिशय आकर्षक मुलीचा' उल्लेख केला होता. त्यात त्यानं म्हटलं होतं, "मला माहीत आहे की 23 वर्षे हे तुझ्या दृष्टीनं जास्त वय आहे." एपस्टीन त्यावेळेस 56 वर्षांचा होता.

रुस्लाना कोर्शुनोव्हा तिच्या मृत्यूच्या दोन वर्षे आधी एपस्टीनच्या कॅरेबियन बेटावर गेली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुस्लाना कोर्शुनोव्हा तिच्या मृत्यूच्या दोन वर्षे आधी एपस्टीनच्या कॅरेबियन बेटावर गेली होती

एलखोलीनं एपस्टीनला महिलांबाबत जे अनेक मेसेज पाठवले होते, त्यात त्यानं त्यांच्या शरीराबद्दल आणि सेक्सबाबत त्या काय विचार करतात यावर चर्चा केली होती. यातील एका संदेशात एक महिला "व्यवसायावर अतिशय लक्ष केंद्रित असलेली आणि लैंगिक संबंधांविषयी अतिशय बिनधास्त असल्याचं म्हटलं होतं."

एलखोलीनं 2010 मध्ये एका तरुणीबाबत लिहिलं होतं. "19 वर्षांची असली तरी ती कट्टर ख्रिश्चन आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हे जुळून येईल. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ती 5 फूट 11 इंच उंचीची बार्बी डॉल आहे," असं त्यानं म्हटलं होतं.

या इमेलमधून असंही दिसून येतं की एलखोलीनं रुस्लाना कोर्शुनोव्हा या कझाकस्तानच्या मॉडेलसाठी एजंट म्हणून काम केलं होतं. ती 2006 मध्ये एपस्टीनच्या कॅरेबियन बेटावर फक्त 18 वर्षांची असताना गेली होती, असं प्रसिद्ध झालेल्या फ्लाईट लॉग म्हणजे उड्डाणांविषयीच्या तपशीलातून समोर आलं आहे.

या मॉडेलचा 2008 मध्ये न्यूयॉर्कमध्ये नवव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी हा मृत्यू आत्महत्या असल्याचं ठरवलं होतं.

एलखोलीनं 2009 मध्ये एपस्टीनला सांगितलं होतं की तो लक्झेंबर्गमध्ये 'रुस्लानाच्या मालमत्ते'शी संबंधित कागदपत्रं हाताळत होता.

'या तरुणींना विमानानं कुठेही पाठवा'

एलखोली नियमितपणे प्रवास करत होता. तो थायलंड, लाटव्हिया, प्राग आणि मियामीमधून एपस्टीनला इमेल पाठवत होता. एलखोली 2016 मध्ये ब्राझीलला गेला होता. तिथून त्यानं एपस्टीनसमोर गुंतवणुकीचे अनेक संभाव्य पर्याय ठेवले. यात मॉडेलिंग एजन्सी, मासिकं आणि एका स्पर्धेचा समावेश होता.

एलखोलीनं एका एजन्सीमध्ये गुंतवणूक करण्याविषयी सुचवताना, एका इमेलमध्ये म्हटलं होतं की त्याच्या मते एपस्टीनला 'तरुणींपर्यंत पोहोचण्यात अधिक रस होता'. यासाठी त्यानं 'महिला' या शब्दाऐवजी इमोजीचा वापर केला.

मॉडेलिंगच्या एका स्पर्धेच्या कल्पनेबाबत तो म्हणाला की त्यात 9 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या शहरांमधून '2 लाख तरुणी' सहभागी होतील.

तो म्हणाला की त्याला ही कल्पना एपस्टीनसाठी आवडली. कारण स्पर्धेची विजेती सहसा 'दुर्लक्षित राहिलेली मुलगी' असायची आणि तो 'या मुलींना अमेरिका, पॅरिस किंवा कॅरिबियन बेटांवर कुठेही विमानानं नेऊ शकणार होता'.

त्याच वर्षी, एलखोलीनं ब्राझीलमधील एक फॅशन मासिक विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ते दोघे मिळून ते मासिक विकत घेऊ शकतील, असं एपस्टीनला सुचवलं.

एलखोलीनं त्या इमेलमध्ये पुढे लिहिलं, "दर महिन्याला या मासिकाच्या मुखपृष्ठावर येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 20-30 मुली तुला सहज मिळू शकतील. ही फक्त एक कल्पना आहे."

एपस्टीनला त्यात फारसा रस नव्हता. त्यानं एलखोलीलाही एका फ्रेंच मासिकाच्या अमेरिकेतील प्रकाशनासाठी गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला होता.

त्यावर खंत व्यक्त करत एलखोलीनं म्हटलं की, जर आपण हे केलं असतं, तर त्याला 'सर्व तरुणींशी' लैंगिक संबंध ठेवता आले असते. त्यानं सुचवलं की तरुणींचा 'सतत पुरवठा' होत राहावा यासाठी त्याला 'काही लाखांना' त्या मासिकाची ब्राझीलमधील आवृत्ती विकत घेता येईल. यासाठी त्यानं महिलांच्या गुप्तांगांसाठी वापरला जाणारा एक आक्षेपार्ह अपशब्द वापरला होता.

एपस्टीनला अटक होईपर्यंत एलखोली करत होता तरुणींना आणण्याबाबत चर्चा

एलखोलीची एपस्टीनबरोबरची इमेलची देवाणघेवाण 2019 पर्यंत सुरू राहिली. तोपर्यंत एपस्टीनभोवती कायद्याचा फास आवळला जाण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली होती.

एपस्टीन फाईल्समधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या दोघांमधील शेवटच्या संदेशांमध्ये, हे दोघेही एका रशियन महिलेला अमेरिकेत आणण्याबद्दल चर्चा करत होते.

"जर तुला तिला इथं आणायचं असेल तर ती लंडनमध्ये असेल," असं एलखोलीनं इमेलमध्ये लिहिलं होतं. एपस्टीन म्हणाला होता की अमेरिकेचा व्हिसा मिळणं कठीण आहे.

एलखोली सुचवलं होतं, "तिला कदाचित विद्यार्थी व्हिसासाठी प्रयत्न करता येतील?" एपस्टीननं यासाठी दुबईमध्ये प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता.

तीन महिन्यांनी, एपस्टीनला दुसऱ्यांदा अटक झाली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.