You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅनडामध्ये गोळीबारात 9 जणांचा मृत्यू, शाळेत मिळाले 6 मृतदेह
पश्चिम कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. रॉयल कॅनेडियन पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पूर्व ब्रिटीश कोलंबियाच्या टंबलर रिज सेकंडरी स्कूलमध्ये सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत. एका व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला.
पोलिसांनी म्हटलं की, दुसऱ्या एका ठिकाणी दोन अजून मृतदेह मिळाले. या लोकांचा मृत्यूही याच गोळीबारात झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
गोळीबारात 25 लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांना अजून एक मृतदेह मिळाला असून तो गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा असावा असा अंदाज आहे.
आतापर्यंत कोणती माहिती समोर?
पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर शाळेतून जवळपास 100 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली आहे, मात्र सध्या त्याचे नाव किंवा लिंग उघड केलं नाहीये.
हल्ल्याचं नेमकं कारण अजून कळू शकलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शाळेतील गोळीबार आणि जवळच्या एका घरात घडलेली घटना यांचा परस्पर संबंध असल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी, या संबंधाबाबत तपास अधिकारी अधिक माहिती देण्यास तयार नाहीत.
पंतप्रधान मार्क कार्नी यांनी रद्द केला जर्मनी दौरा
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी टंबलर रिज इथं झालेल्या गोळीबाराच्या भयानक घटनेमुळे आपण अत्यंत व्यथित झालो असल्याचं म्हटलं आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये कार्नी यांनी म्हटलं की, "या भीषण हिंसक कृत्यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या कुटुंबीयांप्रती आणि मित्रांप्रती प्रार्थना आणि मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो."
पंतप्रधानांनी म्हटलं की, या दुःखाच्या काळात ते सर्व कॅनडियन नागरिकांसोबत सहभागी आहेत. या भयानक शोकांतिकेला सामोरे जात असताना आमचे सरकार ब्रिटीश कोलंबियातील सगळ्या नागरिकांसोबत ठामपणे उभं आहे.
ब्रिटिश कोलंबियामधील शाळेतील गोळीबाराच्या घटनेनंतर मार्क कार्नी यांनी त्यांचा जर्मनीचा नियोजित दौरा स्थगित केला असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली असून रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
हा दौरा म्युनिक सुरक्षा परिषदेसाठी नियोजित होता. ही परिषद साधारणपणे काही दिवस चालते आणि यामध्ये 60 हून अधिक देशांचे प्रमुख सहभागी होतात.
सर्वांत भीषण घटनांपैकी एक
टंबलर रिज इथं घडलेली घटना कॅनडाच्या इतिहासातल्या सर्वांत भीषण घटनांपैकी एक मानली जाते.
2020 मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात असलेल्या एका बंदूकधाऱ्याने नोव्हा स्कोशिया इथं दोन दिवसांच्या कालावधीत 22 जणांची हत्या केली होती.
1989 मध्ये मॉन्ट्रियल येथील एल इकोल पॉलिटेक्निक विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात 14 महिलांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या तुलनेत कॅनडामध्ये बंदूक कायदे अधिक कडक असल्यामुळे अशा प्रकारचे सामूहिक हल्ले तेथे तुलनेने फारच दुर्मिळ मानले जातात.
(ही बातमी अपडेट होत आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.