You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका मुंगीची किंमत तब्बल 21 हजार रुपये; तस्कर या मुंग्यांचं काय करतात?
- Author, विक्लीफ मुईया
- Role, नैरोबी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
एक मुंगी आणि तीही सुमारे 21 हजार रुपयांना (220 डॉलर)!
ऐकायला थोडं अजब वाटतंय ना, पण वन्यजीव तस्करीचं हे एक नवीन आणि धक्कादायक रूप समोर आलंय.
सध्या केनियामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तिथे हवेत मुंग्यांचे अक्षरशः थवे उडताना दिसत आहेत. केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये 'गिलगिल' नावाचं एक साधं, शांत आणि शेतीप्रधान शहर आहे. सध्या तिथल्या हजारो वारुळांमधून या मुंग्या बाहेर पडतायत.
पण दुर्दैव असं की, हेच शांत शहर आता एका मोठ्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय तस्करीचं केंद्र बनलं आहे.
या मुंग्यांच्या प्रजननाच्या काळात पंख असलेले नर आणि राणी मुंग्या वारुळातून बाहेर पडून हवेत उडतात. हीच वेळ हेरून तस्कर या राणी मुंग्यांना पकडतात.
या मुंग्या पुढे अशा टोळ्यांना विकल्या जातात, ज्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा काळाबाजार करतात.
सध्या जगात पाळीव प्राणी म्हणून मुंग्या पाळण्याची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. काचेच्या पारदर्शक पेटीत या मुंग्यांचं स्वतःचं साम्राज्य कसं उभं राहतं, हे पाहण्यासाठी लोक वेडे आहेत आणि याच छंदापोटी या मुंग्यांची तस्करी केली जातेय.
या तस्करीमध्ये सर्वात जास्त मागणी आहे ती 'जायंट आफ्रिकन हार्वेस्टर', म्हणजेच आफ्रिकन महाकाय धान्यवेचक जातीच्या 'राणी मुंग्यांची'.
दिसायला मोठ्या आणि लाल रंगाच्या असलेल्या या मुंग्या जगभरातील मुंग्यांच्या शौकिनांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्या आहेत.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण या एका राणी मुंगीची किंमत अवैध बाजारपेठेत सुमारे 21 हजार रुपयांपर्यंत (साधारण 220 डॉलर) असू शकते. हा सगळा काळाबाजार प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने चालवला जातो, जिथे या मुंग्यांची बोली लावली जाते.
एका गर्भवती राणी मुंगीत इतकी क्षमता असते की, ती एकटीच मुंग्यांचं संपूर्ण साम्राज्य उभं करू शकते. विशेष म्हणजे या राणी मुंग्या काही वर्षं नव्हे, तर चक्क अनेत दशकं जगू शकतात.
या तस्करीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या मुंग्यांना पोस्टाद्वारे अगदी सहजपणे कुठेही पाठवता येतं.
याचं कारण असं की, विमानतळांवर किंवा कुरिअर सेंटर्सवर असणारे स्कॅनर्स सहसा अशा सेंद्रिय पदार्थांना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे कोणत्याही तपासणीविना या मुंग्यांची जगभर तस्करी करणं तस्करांना अगदी सोपं जातं.
एका व्यक्तीने आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर BBC ला प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला, "सुरुवातीला तर मला माहीतच नव्हतं की हे बेकायदेशीर आहे."
हा व्यक्ती एकेकाळी दलाल म्हणून काम करायचा. तो परदेशी खरेदीदारांना स्थानिक पातळीवर मुंग्या गोळा करणाऱ्या नेटवर्कशी जोडून देण्याचं काम करत असे.
शास्त्रीय भाषेत 'मेसर सेफॅलोट्स' (Messor cephalotes) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंग्या मूळच्या पूर्व आफ्रिकेतील आहेत. त्यांच्या बिया गोळा करण्याच्या विशिष्ट सवयीमुळे त्या जगभरातील कीटकप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
त्या दलालाने आपला अनुभव सांगितला, "एका मित्राने मला सांगितलं की, एक परदेशी व्यक्ती राणी मुंग्यांसाठी चांगले पैसे मोजत आहे. विशेषतः त्या मोठ्या लाल रंगाच्या मुंग्या, ज्या इथे सहजपणे पाहायला मिळतात."
"आम्ही मोकळ्या मैदानात, जिथे वारूळ आहेत, तिथे जायचो. सहसा ऊन वाढण्याआधी, पहाटेच हे काम चालायचं. ते परदेशी लोक कधीच स्वतः शेतात किंवा मैदानात फिरायला येत नसत. ते शहरात एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये किंवा गाडीत आमची वाट बघत थांबायचे. मग आम्ही त्यांना त्यांनीच दिलेल्या लहान नळ्यांमध्ये किंवा इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये या मुंग्या भरून नेऊन द्यायचो."
केनियामधील या काळ्याबाजाराची भीषणता गेल्याच वर्षी सर्वांसमोर आली. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि सरोवराच्या काठी वसलेल्या जवळच्याच 'नायवाशा' शहरातील एका गेस्ट हाऊसमध्ये चक्क 5,000 जिवंत राणी मुंग्या सापडल्या.
या सर्व मुंग्या प्रामुख्याने गिलगिल परिसरातून गोळा करण्यात आल्या होत्या.
केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसने (KWS) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बेल्जियम, व्हिएतनाम आणि केनियामधील संशयित आरोपींचा समावेश होता. त्यांनी टेस्ट ट्यूब आणि इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये ओला कापूस भरला होता. त्यामुळे प्रत्येक मुंगी 2 महिने जिवंत राहू शकत होती.
त्यांचा प्लॅन या मुंग्यांना युरोप आणि आशियामध्ये नेऊन विकायचा होता. मुंग्यांच्या या अजब व्यापारामुळे तिथले शास्त्रज्ञ आणि प्रशासन चक्रावून गेले आहे.
कारण आजवर हा देश हस्तिदंत आणि गेंड्यांच्या शिंगांच्या मोठ्या तस्करीचा सामना करत होता. एका छोट्याशा मुंगीचीही अशी आंतरराष्ट्रीय तस्करी होऊ शकते, याची त्यांना कल्पनाच नव्हती.
ब्रिटनस्थित 'अँट्स आर अस' (Ants R Us) या विक्रेत्याने 'जायंट आफ्रिकन हार्वेस्टर' मुंगीचे वर्णन अनेकांच्या 'स्वप्नातील प्रजाती' असे केले आहे.
सध्या या राणी मुंग्या त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. ही वेबसाइट असे स्पष्ट करते की, विक्रेत्यांसाठी या मुंग्या मिळवणे सध्या अत्यंत कठीण झाले आहे.
केनियामध्ये राहणारे जीवशास्त्रज्ञ डिनो मार्टिन्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "केनियात मुंग्यांच्या जवळपास 600 प्रजाती आढळतात. मी स्वतः एक कीटकशास्त्रज्ञ असूनही या व्यापाराचा आवाका पाहून मला धक्काच बसला आहे."
तरीही पूर्व आफ्रिकेतील या 'हार्वेस्टर' मुंग्यांचं लोकांना इतकं वेड का आहे, हे त्यांना समजू शकतं. या मुंग्यांचं अख्खं साम्राज्य एका मुख्य राणी मुंगीमुळे तयार होतं. ही राणी साधारण जवळपास 1 इंचापर्यंत (25 मिमी) मोठी असू शकते आणि ती आयुष्यभर अंडी घालत राहते.
या मुंग्या सर्वात गूढ आणि रहस्यमयी प्रजातींपैकी एक आहेत. त्या मोठी साम्राज्ये तयार करतात. त्यांचं वर्तन खूपच रंजक असतं आणि त्यांना पाळणेही तसे सोपे असते. विशेष म्हणजे या मुंग्या स्वभावाने अजिबात आक्रमक नसतात.
जेव्हा मुंग्यांचे हे थवे हवेत उडतात, तेव्हा त्यातील राणी मुंग्या अनेक नर मुंग्यांसोबत मिलन करतात.
त्यानंतर नर मुंग्यांचं काम संपतं. त्यातील बहुतेक नरांना शिकार करणारे इतर प्राणी खाऊन टाकतात किंवा ते मरून जातात.
मग राणी मुंगी जमिनीखाली एक लहान बोगदं तयार करते. तिथे ती अंडी घालायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे तिच्या स्वतःच्या साम्राज्याची पायाभरणी होते.
तिच्या साम्राज्यातील या कामगार मुंग्या आणि वारुळाचे रक्षण करणाऱ्या सैनिक मुंग्या सर्व मादी असतात. पुढे जाऊन त्यांची संख्या लाखोच्या घरात पोहोचते.
मार्टिन्स यांनी या मुंग्यांच्या साम्राज्याबद्दल एक थक्क करणारी गोष्ट सांगितली.
ते सांगतात, "मुंग्यांची ही वारुळं 50 वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात. कदाचित 70 वर्षांपर्यंतही. नैरोबीजवळची अशी काही वारुळं मला स्वतःला माहीत आहेत, जी किमान 40 वर्षं जुनी आहेत. कारण मी इतक्या वर्षांपासून तिथे नियमितपणे जात आहे."
याचाच अर्थ असा की, ती राणी मुंगी सुद्धा तितकी वर्षं जगते. कारण जशी ही राणी मरते, तसं तिचं अख्खं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. मग जे काही कामगार उरतात, ते बिचारे आपलं हक्काचं घर सोडून दुसऱ्या वारुळाच्या शोधात निघून जातात.
ज्यांच्या शेतीवर या मुंग्यांनी डल्ला मारलाय किंवा ज्यांच्या घरात या मुंग्यांनी शिरकाव केलाय, अशा केनियातील लोकांना याचं चांगलंच ज्ञान आहे.
एकदा का मुंग्यांचं हे साम्राज्य हटवायचं ठरलं, की मग एका खास माणसाला बोलावलं जातं. त्याचं मुख्य काम असतं त्या राणीला शोधणं. ती मुंगी वारुळाच्या खोलवर असलेल्या एखाद्या बोगद्यात किंवा गुप्त खोलीत दडून बसलेली असते. तिला हुडकून काढल्याशिवाय या मुंग्यांचा हैदोस थांबत नाही, हे तिथल्या लोकांना पक्कं ठाऊक असतं.
त्या दलालाने मुंग्या पकडण्याची आणखी एक सोपी पद्धत सांगितली, "मुंग्या गोळा करण्यासाठी वारुळाला फक्त हलकासा धक्का द्यायचा, मग जीव वाचवण्यासाठी बाहेर पळणाऱ्या मुंग्यांना अगदी अलगद पकडून जमा करायचं.
"जेव्हा मी टीव्हीवर बातम्यांमध्ये त्या अटकेचे सत्र पाहिले, तेव्हा कुठे मला जाणीव झाली की, मी नेमक्या कोणत्या गंभीर कटाचा भाग होतो आणि मी त्याच क्षणी हे काम कायमचे सोडून दिले."
ज्यांना अटक झाली होती, त्यांच्यावर बायोपायरेसी म्हणजेच जैव-तस्करीचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना दोषी ठरवण्यात आले.
कोर्टाने त्यांना दंड भरण्याचा किंवा 12 महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगण्याचा आदेश दिला. त्यांनी तुरुंगात जाण्याऐवजी 7,700 डॉलर (सुमारे 6.5 लाख रुपये) दंड भरला आणि ते परदेशी नागरिक तातडीने देश सोडून निघून गेले.
2 आठवड्यांपूर्वी नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (JKIA) एका चिनी नागरिकाला बेड्या ठोकण्यात आल्या. हा माणूस म्हणजे गेल्या वर्षीच्या त्या संपूर्ण तस्करीच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे.
असं म्हटलं जातं की, गेल्या वेळी तो दुसऱ्याच पासपोर्टचा वापर करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता.
पण जेव्हा त्याला पकडलं, तेव्हा त्याच्याकडे चक्क 2,000 राणी मुंग्या होत्या. या मुंग्या त्याने मोठ्या चलाखीने टेस्ट ट्युब्स आणि टिश्यू रोल्समध्ये लपवून पॅक केल्या होत्या.
2023 मध्ये चीनमधील मुंग्यांच्या व्यापारावर संशोधन करणाऱ्या पथकातील तज्ज्ञ झेंगयांग वांग यांच्या मते, ही अतिशय चिंतेची बाब आहे, कारण या तस्करीमुळे स्थानिक निसर्गचक्राचे अतोनात नुकसान होऊ शकते.
सिचुआन विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक वांग यांनी बीबीसीला सांगितलं, "सुरुवातीला आम्हाला खूप आनंद झाला. अनेक लोक आता मुंग्या पाळण्याकडे वळत आहेत आणि त्यांना ते आवडत आहे."
"या पाळीव मुंग्यांच्या साम्राज्याला एका 'फॉर्मिकारियम'मध्ये ठेवलं जातं. हे म्हणजे एक काचेचा किंवा प्लास्टिकचा पारदर्शक डबा असतो. मुंग्यांच्या शोमध्ये लोक त्यांना काम करताना, बोगदे खोदताना, जेवण गोळा करताना आणि आपल्या राणीचं रक्षण करताना अगदी जवळून पाहू शकतात.
हे सगळं पाहायला खूपच छान आणि मोहक दिसतं. मुंग्यांचं हे छोटं जग कसं चालतं, त्या कशा वागतात, हे लोकांना शिकवण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरू शकतं.
पण मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला आणि आम्ही विचार केला की, दुसऱ्या देशातून आलेल्या आक्रमक प्रजातींना अशा प्रकारे पाळणं प्रचंड धोकादायक ठरू शकतं."
दुसरीकडे संशोधकांनी जेव्हा चीनमधील ऑनलाइन मार्केटवर 6 महिने नजर ठेवली, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं.
या विक्रीतल्या 25 टक्क्यांहून अधिक मुंग्यांच्या प्रजाती या मुळच्या चीनमधील नव्हत्याच. चीनमध्ये अशा बाहेरच्या देशांतील मुंग्या आणणं कायद्याने गुन्हा असूनही मोठ्या प्रमाणावर त्यांची बेकायदेशीर तस्करी सुरू होती.
वांग यांनी म्हटलं, "जर या बाहेरच्या देशांतून येणाऱ्या आक्रमक मुंग्यांचा काळाबाजार असाच वाढत राहिला, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा यातील काही मुंग्या त्या काचेच्या पेटीतून निसटतील आणि बाहेरच्या जगात धुमाकूळ घालायला लागतील. एकदा का त्या निसर्गात स्थिरावल्या, की त्यांना रोखणं अशक्य होईल."
'बायोलॉजिकल कन्झर्व्हेशन' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात वांग आणि त्यांच्या टीमने या संकटाचं भयाण चित्र मांडलं आहे. त्यांनी चीनमध्ये प्रचंड विक्री होणाऱ्या 'मोठ्या आफ्रिकन मुंग्यां'च्या प्रजातीचं उदाहरण दिलंय.
"समजा, पूर्व आफ्रिकेत आढळणारी 'मेसोर सेफलोट्स' (Messor cephalotes) या मुंगीचा चीनमध्ये प्रसार झाला, तर काय होईल?
ही जगातली सर्वात मोठी बिया गोळा करणारी मुंगी आहे. जर ही मुंगी चीनच्या दक्षिण-पूर्व भागात शिरली, तर तिथली धान्य शेतीसाठी अक्षरशः संकट ठरेल. विचार करा, जिथे धान्याची शेती होते, तिथे या मुंग्यांचं आक्रमण म्हणजे शेतकऱ्यांसाठी एखाद्या महाभयंकर संकटापेक्षा कमी नसेल."
या मुंग्या म्हणजे निसर्गचक्राचे मुख्य आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचे खरे रचनाकार आहेत," असं मार्टिन्स यांनी या मोठ्या आफ्रिकन मुंग्यांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे.
त्या गवत आणि इतर झाडांच्या बिया जमा करतात आणि असं करताना त्या नकळतपणे त्या बिया दूरवर पेरण्याचं काम करतात. थोडक्यात सांगायचं तर, या मुंग्या आपल्या गवताळ प्रदेशाला अधिक बहारदार आणि जिवंत ठेवण्याचं काम करतात.
केनियाच्या वाइल्डलाईफ रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मुकोन्यी वताई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "निसर्गाचा विचार न करता होणारी ही मुंग्यांची तस्करी आणि त्यातही खास करून त्या राणी मुंग्यांना पळवून नेणं म्हणजे एका मोठ्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकू शकतं. यामुळे आपल्या पर्यावरणाचं पूर्ण चक्र विस्कळीत होईल आणि निसर्गातील विविधता कायमची धोक्यात येईल."
केनियामध्ये मुंग्या जमा करणं कायदेशीररित्या शक्य आहे. यासाठी तुम्हाला खास सरकारी परवानगी तर लागतेच, पण सोबतीला एक नफा वाटणीचा करारही करावा लागतो.
म्हणजे काय? तर या धंद्यातून तुम्ही जेवढी कमाई कराल, त्यातला हिस्सा तिथल्या स्थानिक लोकांनाही द्यावा लागतो.
पण केडब्ल्यूएसच्या (Kenya Wildlife Service) मते, आतापर्यंत एकानेही अशा परवान्यासाठी अर्ज केलेला नाही.
खरे तर या कायदेशीर प्रक्रियेत अगदी बारकाईने माहिती द्यावी लागते, जसे की तुम्ही नक्की किती मुंग्या जमा करणार आहात आणि त्या नेमक्या कोणत्या देशात नेल्या जाणार आहेत.
काही पर्यावरणप्रेमी मागणी करत आहेत की, सर्व प्रकारच्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या मुंग्यांच्या प्रजातींना 'सायटिस' (CITES) या जागतिक वन्यजीव व्यापार करारांतर्गत अधिक कडक सुरक्षा मिळायला हवी.
"खरी परिस्थिती अशी आहे की, सध्या जगातल्या एकाही मुंगीच्या जातीचा समावेश 'सायटिस'च्या संरक्षण यादीत करण्यात आलेला नाही," असं जगभरातील मुंग्यांच्या व्यापारावर संशोधन करणारे सर्जिओ हेन्रिक्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
जोपर्यंत जागतिक पातळीवर या व्यवहारांवर नजर ठेवणारी यंत्रणा तयार होत नाही, तोपर्यंत मुंग्यांची ही तस्करी म्हणजे न दिसणारं संकट असेल. नियम बनवणारे सरकार आणि जागतिक समुदाय यांपासून हा अवाढव्य व्यापार अक्षरशः गुपित राहील, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
पण केनिया वाईल्डलाईफ सर्विस समोरचं खरं संकट म्हणजे नजरचुकीने होणारी या कीटकांची तस्करी कशी थांबवायची?
या तस्करीची कुठेही अधिकृत नोंद नसते. त्यामुळे त्यावर लगाम घालणं कठीण जातंय. यावर उपाय म्हणून विमानतळांवर आणि देशाच्या सीमांवर अत्याधुनिक देखरेख उपकरणं बसवणं, ही एका चांगल्या सुरुवातीची पहिली पायरी ठरेल, असं या संस्थेनं सुचवलं आहे.
मार्टिन्स यांचंही हेच मत आहे की, सध्या जेवढी तस्करी पकडली जातेय, तो तर खऱ्या व्यापाराचा फक्त एक छोटासा तुकडा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा मुंग्यांचा बाजार किती अवाढव्य असेल, याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही.
पण पत्रकार चार्ल्स यांच्या मते, केनिया जागतिक स्तरावर मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नाच्या संधीकडे साफ दुर्लक्ष करत आहे.
त्यांनी केनियाच्या 'डेली नेशन' वृत्तपत्रात मत मांडलं. ते म्हणाले, "मुंग्या म्हणजे काही सोनं किंवा हिऱ्यासारख्या मर्यादित वस्तू नाहीत, ज्या एकदा संपल्या की संपल्या. त्या तर जिवंत मालमत्ता आहेत."
"आपण त्यांची पैदास करू शकतो, त्यांची शेती करू शकतो आणि दिवसाला हजारो मुंग्यांचं उत्पादनही वाढवू शकतो. तरीही आपण त्यांच्याकडे एखाद्या चोरलेल्या प्राचीन वस्तूंसारखं बघतोय आणि हातातली संधी घालवतोय."
खरे तर, गेल्या वर्षीच केनियाच्या मंत्रिमंडळाने मुंग्यांच्या व्यापारासह वन्यजीव अर्थव्यवस्थेचे व्यापारीकरण करण्याच्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे.
वताई म्हणतात, "या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश मुंग्यांसारख्या वन्य प्रजातींचा निसर्गाचा समतोल राखून वापर करणे आणि व्यापार वाढवणे हा आहे, जेणेकरून सर्व जिल्ह्यांमध्ये नोकऱ्या, संपत्ती आणि लोकांचा उदरनिर्वाह निर्माण होईल."
जर योग्य देखरेख ठेवली, तर भविष्यात 'गिलगिल' परिसरातील शेतकरी आपल्या शेतात किंवा फळबागांमध्ये मुंग्यांसाठी खास काचेची घरे तयार करतील.
यामुळे त्यांच्या शेतातल्या भाजीपाला आणि फळांच्या उत्पन्नासोबतच त्यांना महागड्या राणी मुंग्यांच्या विक्रीतून मोठी कमाईही करता येईल.
पण जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतील मुंग्या पाळण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी या मुंग्यांची निर्यात करणं किती धोकादायक ठरू शकतं, यावरचा वाद अजूनही मिटलेला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)