You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तब्बल 2,000 'राणी मुंग्यां'ची तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या चिनी नागरिकावर गुन्हा दाखल; काय घडलं?
- Author, वायक्लिफ मुईया
- Role, नैरोबी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सुमारे 2000 हून अधिक 'क्वीन गार्डन अँट' (राणी मुंग्या) देशाबाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चिनी नागरिकाला केनियाच्या मुख्य विमानतळावरून अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी त्याच्यासह त्याच्या केनियन सहकाऱ्यावर वन्यजीव प्रजातींची अवैधरीत्या तस्करी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
त्या दोघांवर गंभीर गुन्हा करण्याच्या कटाचा आरोपही ठेवण्यात आला आहे.
झांग केकून असं या चिनी नागरिकाचं नाव आहे. त्याने चार्ल्स म्वांगी नामक केनियन सहकाऱ्याकडून या मुंग्या प्रती शेकडा 10 हजार केनियन शिलिंग (77 डॉलर; 58 पाउंड) दराने विकत घेतल्या होत्या.
नैरोबीतील प्रसारमाध्यमांनुसार, झांग आणि म्वांगी या दोघांनीही त्यांच्यावरील आरोप नकारले आहेत.
झांगचे वकील डेव्हिड लुस्वेती याबाबत बोलताना म्हणाले की, त्या दोघांना ते कायद्याचे उल्लंघन करत आहेत याबाबत कल्पना नव्हती.
ते असोसिएटेड प्रेससोबत बोलताना म्हणाले, "या मुंग्यांची देशाबाहेर विक्री करून कमाई करता येईल, असं त्यांना वाटलं होतं."
दरम्यान, झांग आणि म्वांगी या दोघांना 27 मार्च रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहेत.
प्रकरण काय?
चिनी नागरिक झांग केकून याला राजधानी नैरोबीमधील जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (जेकेआयए) सुरक्षा तपासणी दरम्यान अडवलं गेलं. त्याच्या सामानात चीनला पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिवंत मुंग्या आढळून आल्या होत्या.
या आरोपावर त्याने त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, तो केनियामध्ये मागील वर्षी उघडकीस आलेल्या मुंग्यांच्या तस्करीच्या नेटवर्कशी संबंधित असू शकतो, असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.
या मुंग्यांना आंतरराष्ट्रीय जैवविविधता करारांद्वारे संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची खरेदी-विक्री आणि व्यापारावर कडक नियम लागू आहेत.
'या' मुंग्यांचा पाळीव प्राण्यासारखा वापर
मागील वर्षी केनिया वन्यजीव सेवेने (केडब्ल्यूएस) बागेतील मुंग्यांची मागणी वाढत आहे, असा इशारा दिला होता. या मुंग्यांना शास्त्रीय भाषेत 'मेसल सेफॅलोट्स' असं म्हणतात.
युरोप आणि आशियातील काही लोक या मुंग्या पाळीव प्राण्यांसारख्या ठेवतात. त्यामुळे त्यांची मागणी वाढत आहे.
सरकारी वकिलांनी बुधवारी (11 मार्च) न्यायालयात सांगितलं की, झांग केकूनने काही मुंग्या टेस्ट ट्यूबमध्ये भरल्या होत्या. तर काही मुंग्या टिश्यू पेपरच्या रोलमध्ये लपवून सामानात ठेवल्या होत्या.
त्याच्या वैयक्तिक सामानात खास टेस्ट ट्यूबमध्ये भरलेल्या 1948 बागेतील मुंग्या (गार्डन अँट) आढळून आल्या, असं सरकारी वकील ॲलन मुलामा यांनी न्यायालयात सांगितलं.
"त्याचबरोबर सामानात ठेवलेल्या टिश्यू पेपरच्या 3 रोलमध्ये लपवलेल्या आणखी 300 जिवंत मुंग्याही सापडल्या," असंही त्यांनी नमूद केलं.
सरकारी वकिलांनी न्यायालयाला संशयित व्यक्तीचा मोबाइल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
गेल्यावर्षी 4 जणांना झाली होती शिक्षा
या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असं केडब्ल्यूएसचे वरिष्ठ अधिकारी डंकन जुमा यांनी बीबीसीला सांगितलं. कारण तपास अधिकारी केनियातील इतर शहरांमध्येही मुंग्या गोळा करून तस्करी केली जात असल्याचा संशय असल्याने खोलवर तपास करत आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात केनियामधील एका न्यायालयाने चार जणांना देशाबाहेर हजारो जिवंत 'राणी मुंग्या' तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणात त्यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा सुमारे 7 हजार 700 डॉलर (सुमारे 7 लाख 13 हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला होता. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण होते.
या प्रकरणातील 4 संशयितांमध्ये 2 बेल्जियमचे, 1 व्हिएतनामचा आणि 1 केनियाचा नागरिक होता. अटकेनंतर त्यांनी आरोप मान्य केले होते.
ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे आखलेल्या संयुक्त ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात आली होती, अशी माहिती केडब्ल्यूएसने दिली होती.
बेल्जियमच्या त्या दोघांनी ते छंद म्हणून या दुर्मिळ मुंग्या गोळा करत होते आणि हे बेकायदेशीर आहे असे त्यांना वाटलं नव्हतं, असं न्यायालयाला सांगितलं होतं.
चिनी नागरिक सूत्रधार असण्याची शक्यता
झांग हा या तस्करी नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असू शकतो, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र गेल्या वर्षी तो वेगळ्या पासपोर्टचा वापर करून केनियातून पळून गेला होता, असंही तपासात समोर आलं आहे.
बुधवारी (11 मार्च) न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी मान्य करत त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली. तपास अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
केडब्ल्यूएस साधारणपणे सिंह आणि हत्तींसारख्या मोठ्या प्राण्यांचे संरक्षण करणारी संस्था आहे. त्यांनी मागील वर्षीचा हा निकाल अतिशय महत्त्वाचा म्हणजेच 'लँडमार्क' प्रकरण असल्याचे वर्णन केले होते.
गेल्या वर्षी जप्त केलेल्या मुंग्या जायंट आफ्रिकन हार्वेस्टर मुंग्या होत्या. केडब्ल्यूएसच्या मते, या मुंग्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या निसर्गातून (इकोसिस्टिम) काढून टाकल्या तर मातीचे आरोग्य आणि जैवविविधता बिघडू शकते.
या मुंग्या युरोप आणि आशियातील विदेशी पाळीव प्राण्यांच्या बाजारात विकण्यासाठी नेल्या जाणार होत्या, असा अंदाज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)