नाशिकच्या खंडणी प्रकरणाला ट्विस्ट, 121 अश्लील व्हीडिओ जप्त, फिर्यादीलाच अटक; नेमकं काय घडलं?

- Author, प्रविण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नाशिकमधील सातपूर खंडणी प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. खंडणीची फिर्याद देणाऱ्यावरच लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत.
सदर महिलेने 63 वर्षीय आरोपी रवींद्र एरंडे विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आयटी ॲक्ट आणि ॲट्रोसिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी 3 एप्रिलला आरोपीला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींच्या वकिलांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली.

नेमकं काय घडलं?
2 एप्रिल रोजी एरंडेने खंडणी प्रकरणसंदर्भातील तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली होती.
या आरोपींकडून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. त्यांची तपासणी करताना पोलिसांना 121 अश्लील व्हीडिओ क्लिप्स सापडल्या.
या सर्व व्हीडिओंमध्ये खंडणी प्रकरणातील फिर्यादी विविध महिलांसोबत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, खंडणी प्रकरणाचा तपास सुरू असताना एक महिलेनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि तिने खंडणी प्रकरणातील फिर्यादीवर (सचिन एरंडे) लैंगिक शोषणाची तक्रार केली.
संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, "सातपूर येथील रहिवाशी 63 वर्षीय रविंद्र एरंडे याने 'तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचे भविष्य उज्ज्वल करतो' असे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. तसेच मी अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनही त्याचा गैरफायदा घेतला आणि नाशिक परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले."

या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी रवींद्र एरंडे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 69, 77, आयटी ॲक्ट कलम 67(अ) तसेच ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत कलम 3(1)(W), 3(2)(V), 3(2)(VA) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपी एरंडेने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हीडिओ शूट केल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त केलेल्या पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे म्हणाले, "रवींद्र एरंडे याला 4 व्यक्ती अश्लील व्हीडिओची धमकी देत खंडणी मागत होते. त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली."
"पोलिसांनी खंडणीखोरांना पकडत अधिक तपास केला असता आरोपींकडून मिळालेल्या हार्ड डिस्क व पेनड्राइव्हमध्ये 121 व्हीडिओ आढळून आले. हे व्हीडिओ 2003 पासून आतापर्यंतचे आहेत."
"आम्ही याचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणात सध्या एक पीडिता समोर आली आहे. तिच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी हे करत आहेत," अशी माहिती उपायुक्त काळे यांनी दिली.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांशी प्रतिक्रीयेसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली.
न्यायालयात काय घडलं?
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी डिजिटल पुरावे शोधणे, पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तपास करणे यासाठी 7 दिवसांची कोठडी मागितली.
यावर बचाव पक्षाने म्हटलं की, आरोपी स्वतः पोलिसांकडे आला होता. व्हीडिओ संबंधीची माहितीही त्यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी न देताही तपास होऊ शकतो.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पोलिसांचे आवाहन व संपर्क क्रमांक
या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
आरोपीविरोधात कोणतीही तक्रार असल्यास ती सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवावी. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संपर्क क्रमांक:
- सचिन बारी (सहा पोलीस आयुक्त, अंबड विभाग): 9049872822
- प्रकाश अहिरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर): 9823234176
- स्वप्नाली पलांडे (पोलीस निरीक्षक): 7774002710
तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























