कोकणच्या हापूस आंब्यावर संकट, यंदा उत्पादनात 80 टक्के घट, कृषी विद्यापीठाची माहिती; हे प्रमाण इतकं का घसरलं?

कैऱ्या

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन, रत्नागिरीत हापूसच्या झाडांवर कैऱ्या तर लागल्या आहेत, पण त्यांचं प्रमाण बरंच कमी आहे.
    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"माझ्याकडे या बागेत सातशे ते आठशे पेटी माल होतो. आज मी याच्यात शंभर पेटीच माल काढणार आहे. ही एवढी प्रचंड बिकट परिस्थिती आहे."

रत्नागिरीचे राजन कदम गेली 38 वर्षे आंब्याची बागायती शेती करतायत. पण आजवर कधी आंब्याचं इतकं नुकसान झालेलं पाहिलं नव्हतं, असं ते सांगतात.

एरवी मार्चच्या मध्यावर कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूसची पहिली फळं हाती येण्यास सुरुवात होते. पुढचे उन्हाळ्याचे दिवस तर खास आंब्याचेच दिवस.

पण यावेळी झाडांवर कैऱ्या अगदी कमी प्रमाणात दिसतायत आणि कोकणचे खास हापूस आंबे आवडणाऱ्या लोकांना यावेळी या फळाची चव चाखायला मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दापोलीतील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार यंदा हापूसचं उत्पादन तब्बल 80 टक्क्यानी घटलं आहे आणि हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वयस्कर झालेली झाडं, खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर अशा गोष्टींचा परिणाम आंब्यावर झाला आहे. पण यावेळी तीव्र हवामानाचा चांगलाच फटका या पिकाला बसला आहे.

राजन सांगतात, "2011 मध्ये आंबा थोडा कमी होता, पण त्यावेळी पण एवढ्या प्रचंड प्रमाणात कमी नव्हता," राजन नमूद करतात.

'मोहोर आला, पण फळं धरलीच नाहीत'

राजन कदम यांच्याकडे रत्नागिरी परिसरातल्या वेगवेगळ्या बागा मिळून साधारण हजार एक झाडं आहेत. त्यात बहुतांश झाडं हापूसची आहेत.

"आमच्याकडे बघा, पायरी, केसर आणि इतर काही प्रकारची झाडंही आहेत. पण हापूसला जी मागणी आहे, ती या बाकीच्या आंब्यांना नसते."

मिरजोळे गावातल्या टेकडीच्या उतारावर त्यांच्या एका बागेत आम्ही गेलो, तेव्हा झाडांवर पालवी फुटू लागली होती. आंब्याच्या झाडांना मोहोर येण्यापूर्वी किंवा फळ काढणीनंतर पालवी लागते.

राजन कदम यांनी आम्हाला त्या परिसरातल्या हापूस आंब्याचं नैसर्गिक चक्र कसं असतं, ते समजावून सांगितलं.

राजन कदम, बागेतल्या झाडांची पाहणी करताना

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन, राजन कदम, बागेतल्या झाडांची पाहणी करताना

नैसर्गिकरीत्या हापूसचं पीक दरवर्षी नाही, तर एक वर्षाआड येतं. म्हणजे बागेतल्या ज्या झाडांना यावर्षी मोहोर आला आहे, त्यांना पुढचा मोहोर दोन वर्षांनी येतो.

"अनेक ठिकाणी औषधांनी हे चित्र बदललं आहे आणि काही झाडांना दरवर्षी फळं लागू शकतात.

"पण साधारणपणे ऑक्टोबर हीटचा काळ गेला, की झाडांना पालवी फुटू लागते. मग ज्या झाडांना यंदा फळ धरलं नव्हतं, त्यांना मोहोर येऊ लागतो.

"यंदा मात्र तो प्रकार न होता, नोव्हेंबर पर्यंत पाऊसच राहिला,"

साधारण पाच नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहिला आणि नंतर थंडी सुरू झाली, असं राजन नमूद करतात.. थंडी सुरू होताच मोहोर यायला एरवी सुरुवात होते.

"मोहोर एवढ्या प्रचंड प्रमाणात आला, की की आम्हाला वाटलं यावर्षी मुबलक पीक येणार. परागीकरण करणारे कीटकही आले, पण फुलोरा आला, तरी फळधारणा झाली नाही त्याच्यामध्ये."

अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेतला मोहोर करपला आहे, म्हणजेच सुकून गेला आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन, अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेतला मोहोर करपला आहे, म्हणजेच सुकून गेला आहे.

असं का झालं, याविषयी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे माहिती देतात. यंदा तीव्र थंडीमुळे परागीभवनाच्या या प्रक्रियेवरच परिणाम झाला.

"यावेळी जवळपास दोन ते तीन महिने, तापमान तेरा अंशांच्या खाली राहिलं. त्यामुळे मादी फुलांपेक्षा नर फुलं जास्त प्रमाणात आली. त्याचवेळी परागीभवन करणारे कीडे-मुंग्या थंडीमुळे फारसं बाहेरच पडले नाहीत."

नेमकं किती नुकसान झालं आहे?

डॉ. भावे पुढे सांगतात की कोकणात आंब्यांना दोन ते तीनदा मोहोर धरतो, पण आता पुढच्या बहरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

"पण मार्च महिन्यामध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात 25 पेक्षा जास्त अंशांचा फरक पडतोय. उष्णता वाढली की तयार झालेला छोटा आंबा गळतो.

"बरं, या बहरात टिकलेली फळं 15 मे नंतर येणार आहेत. जर जोरदार पाऊस किंवा वारा त्यावेळी आला तर त्याही फळांचा उपयोग होणार नाही.

"त्यामुळे नेमकं किती लॉस आहे हे सांगणं कठीण आहे. पण 80 टक्के जो आम्ही म्हणतो, तर 80 टक्के लॉस नाही, तो 90 टक्क्याच्या नक्की पुढे आहे असं मला वाटतं.

आंबा

कृषी विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार कोकणात एकूण 1,31,000 हेक्टरवर आंब्याची लागवड आहे.

गेल्या वर्षी 2,88,661 मेट्रिक टन हापूस आंब्याचं उत्पादन झालं. यंदा त्यात 80 टक्के घट म्हणजे केवळ 50,000 ते 60,000 मेट्रिक टन एवढं कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.

हे नुकसान किती मोठं आहे, याचा अंदाज मुंबई APMC मध्ये दरवर्षी आंब्याची पहिली आवक होते, तेव्हाच्या आकडेवारीवरून दिसून येतो.

2023 साली 15 मार्चला इथे महाराष्ट्रातून म्हणजे कोकणातून 26,019 पेट्या आल्या होत्या.

त्यानंतर 2024 मध्ये 18 मार्च रोजी पहिल्या पेट्या आल्या, त्यांची संख्या होती 39,424 आणि 2025 मध्ये 26,126 (17 मार्च 2025) पेट्यांची आवक झाली.

पण यंदा 17 मार्चला कोकणातून केवळ 5,728 पेट्या मुंबईत आल्या आहेत.

हापूसचं पीक वर्षाआड येतं, हे लक्षात घेतलं तरी त्यात एवढी मोठी घसरण क्वचितच पाहायला मिळते.

कामगारांवरही परिणाम

एकंदरीत, वाढती उष्णता आणि तीव्र हवामानाचा फटका हापूसला बसतो आहे.

आंबा बागायतींमध्ये काम करणाऱ्या नेपाळी कामगारांनाही याची झळ बसते आहे. आंबेच नाही, तर काम नाही. त्यामुळे रोजंदारी सुरू राहावी, म्हणून राजन यांनी कामगारांना दुसरी कामं दिली आहेत.

अब्दुल करीम नाकाडे

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन, अब्दुल करीम नाकाडे

रत्नागिरीतच अब्दुल करीम नाकाडे यांच्या बागेतही मोहोर साफ करपलेला आहे, आंबे डागाळले आहेत आणि फळगळतीही होते आहे. फवारणी करून झाडांवर असलेला आंबा वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नाकाडे सांगतात, "कामगार लोकांचा पैसा कसा निघेल? मेहनत तर बाजूलाच राहिली आमची… आता औषधाचा पैसा निघाला तरी भरपूर आहे."

अनेकजण गुढीपाडव्याला बाजारात पहिली पेटी पाठवतात. सोमेश्वर इथेही आंबा व्यवसायात काम करणारे गणेश नागवेकर यांच्याकडे आंबे काढून पेटी बांधण्याचं काम सुरू होतं.

ते सांगतात, "आमचं कुटुंब 25 वर्ष या व्यवसायात आहे. दरवर्षी पहिल्या काढणीच्या वेळी पाचशे-सहाशे तरी आंबे यायचे आणि दहा बारा पेट्या तरी व्हायच्या. यावेळी जेमतेम दीडशे आंबे मिळाले. म्हणजे जेमतेम तीनच पेट्या आणि तिसरी पूर्ण नाहीच."

सोमेश्वरला गणेश नागवेकरांकडे पहिल्या पाडणीच्या वेळेस जेमतेम दोन पेटी आंबे निघाले आहेत.
फोटो कॅप्शन, सोमेश्वरला गणेश नागवेकरांकडे पहिल्या पाडणीच्या वेळेस जेमतेम दोन पेटी आंबे निघाले आहेत.

कोकणातले बागायतदार, आंबा व्यापारी, पेटी बांधणारे यांच्याप्रमाणेच आंब्यावर प्रक्रिया करणाऱ्या कॅनिंग, लोणची, जॅम बनवणे अशा उद्योगांनाही याचा फटका बसतो आहे.

त्यातच इराण युद्धामुळे आंब्याच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.

त्यामुळेच बागायतदारांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. त्यावर विशेष नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

कमी आवक आणि वाढलेल्या किंमती पाहता हापूसचा आस्वाद घ्यायचा, तर सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)