You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलीला खऱ्या नावाने शाळेत घातलं आणि 'हा' ड्रग्ज माफिया पकडला गेला
इटलीच्या मोस्ट वाँटेड माफियाला ब्राझीलमध्ये अटक झाली आणि त्याला आता इटलीत आणलं आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे अशा गोष्टी होत असतात, यात काय नवीन?
पण ज्या पद्धतीने या माफियाचा शोध लागला, ती गोष्ट ऐकाल तर नवल वाटल्याखेरीज राहाणार नाही.
रोको मोराबितो असं या माफिया किंगचं नाव. पण त्याला सगळे ओळखायचे ते 'मिलानचा कोकेन किंग' याच नावाने. त्याला मागच्या वर्षी ब्राझील आणि इटालियन पोलिसांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत अटक झाली.
कोण होता हा माफिया किंग?
रोको मोराबितो आपली ओळख लपवून अनेक वर्षं दक्षिण अमेरिकेत राहात होता. इटलीतल्या आफ्रिको प्रांतातल्या कलाब्रिन शहरात त्याचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबाचे माफिया डॉन गिउसेपे मोराबितोशी चांगले संबंध होते.
या 55-वर्षीय डॉनला आता ड्रग्जची ने-आण करण्याच्या आरोपाखाली 30 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
याच गिउसेपे मोरोबितोच्या वरदहस्ताखाली रोको इटलीतल्या ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कमधला महत्त्वाचा शिलेदार बनला.
तो अनेकदा महागडे सुट घालून मिलानच्या श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांबरोबर फिरताना दिसायचा. लवकरच पोलिसांच्या नजरेत आला आणि त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
जवळपास एक टन कोकेनच्या व्यवहार करताना त्याचं बोलणं पोलिसांनी रेकॉर्ड केलं होतं. हे कोकेन दक्षिण अमेरिकेतून इटलीत येणार होतं. यानंतर थोड्या दिवसांतच तो गायब झाला.
पोलिसांना संशय होता की तो ब्राझीलमध्ये पळून गेला आहे आणि फ्रान्सिस्को कॅपेलेटो या खोट्या नावाने राहातोय. त्यानंतर तो शेजारच्या उरुग्वे देशात गेला. तिथे तो जवळपास 13 वर्षं राहिला.
पकडला कसा गेला?
उरुग्वेमध्ये दो पुंटा डेल इस्टे या भागात राहायचा. त्याने एक आलिशान घर भाड्याने घेतलं होतं. तिथे महागड्या कलाकृती लावल्या. पण तो कार मात्र साधीच चालवायचा. त्याच्या शेजारचे म्हणतात की त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला त्याने भव्य पार्टी दिली तेव्हा त्यांना कळलं की हा माणूस श्रीमंत आहे.
पण तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हताच. एक चुकीने पोलिसांना तो सापडला. त्याने आपल्या मुलीला तिच्या खऱ्या नावाने शाळेत घातलं.
पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याच्या कुटुंबाची माहिती होतीच. ही मुलगी खरंच रोकोची आहे का याची त्यांनी चौकशी केली आणि ती रोकोचीच मुलगी आहे हे कळल्यावर त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.
2017 साली त्याचं आपल्या बायकोशी भांडण झालं आणि तो घर सोडून एका हॉटेलमध्ये जाऊन राहायला लागला. तिथून त्याला पोलिसांनी पोलिसांनी उचललं.
तेव्हा त्याच्याकडे एक बंदूक, 13 मोबाईल फोन्स आणि स्वतःचे वेगवेगळ्या वेशातले 150 पासपोर्ट साईज फोटो होते.
पण दोनच वर्षांनी तो तुरुंगाच्या छताला भोक पाडून तिथून निसटला. त्याच्यासोबत आणखी तीन कैदीही पळून गेले.
पोलीस पुन्हा त्याचा शोध घ्यायला लागले. वर्षभर शोधल्यानंतर 2021 मध्ये रोको अखेरीस ईशान्य ब्राझीलच्या एका समुद्राजवळच्या गावात सापडला. त्याला अटक झाली तेव्हा नांद्रघेता या माफिया गँगचा आणखी एक सदस्य त्याच्यासोबत होता. त्याचं नाव पास्किनो. या व्यक्तीला 17 वर्षांच्या कैदेची शिक्षा झालेली आहे.
त्याच्या अटकेमुळे तसंच जेव्हा तो इटलीत परत येईल तेव्हा इटालियन पोलिसांच्या दशकाहून अधिक काळ चाललेल्या एका मोहिमेचा अंत होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)