व्हॉएजर 2 : सूर्यमालेच्या पलीकडे पोहचलं नासाचं यान

फोटो स्रोत, Science Photo Library

    • Author, व्हिक्टोरिया गिल
    • Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन डी.सी.
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अथांग अवकाश मानवी मनासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे. पृथ्वीबाहेरच विश्व कसं आहे, सौरमालेचे गुपित काय आहेत, याचं अव्याहतपणे संशोधन सुरूच आहे. या संशोधनातील सर्वांत महत्त्वाची मोहीम मानली जाते ती म्हणजे व्हॉएजर 1 आणि व्हॉएजर 2. आता व्हॉएजर 2नं सूर्यमालाही ओलांडली आहे. त्यामुळे एका नव्या विश्वाचा वेध या मोहिमेतून घेता येईल, असा विश्वास संशोधकांना वाटतो.

1977 साली पृथ्वीवरून प्रक्षेपित झालेलं व्हॉएजर 2 सूर्यमाला ओलांडणारी दुसरी मानवनिर्मित वस्तू आहे. यापूर्वी व्हॉएजर 1ने ऑगस्ट 2012ला सूर्यमाला ओलांडली होती. व्होएजर या मोहिमेला 40 वर्षं पूर्ण झाली आहेत. हे दोन्ही यानं कार्यरत असून जेव्हा व्हॉएजर 1 वरून संदेश येतो, तेव्हा तो पृथ्वीवर सर्वांत दुरून आलेला मानवनिर्मिती यंत्रातील संदेश असतो.

व्हॉएजर 2ने 5 नोव्हेंबर 2018 रोजी सौरमाला ओलांडली, असे या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ प्रा. एडवर्ड स्टोन यांनी सांगितले. अमेरिकन जिओफिजिकल युनियन (एजीयू)च्या वॉशिंग्टन येथे झालेल्या बैठकीत हे जाहीर करण्यात आले.

या दिवशी व्हॉएजर 2ने सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या स्थीर प्रवाही कणांच्या शोधात अचानक घसरण झाली. व्हॉएजर 2ने हेलिओपोज ओलांडल्याचे ते निदर्शक आहे. हेलिओपोज ही सूर्याच्या परमाणू व चुंबकीय क्षेत्राची शेवटची मर्यादा असते.

व्हॉएजर 2चं सध्याचे स्थान पृथ्वीपासून 18 अब्ज किमी (11 अब्ज मैल) इतकं आहे. प्रतितास 54 हजार किमी (34 हजार मैल) वेगाने ते प्रवास करत आहे. व्हॉएजर 1 हे त्याहून पुढे गेले असून ते अधिक वेगवान आहे. व्हॉएजर -1 यान 22 अब्ज किमी अंतरावर असून ते ताशी 61 हजार किमी वेगाने प्रवास करत आहे.

फोटो स्रोत, NASA

सौरमालेच्या बाहेरील जगाचा संशोधन करण्याचा विचार ?

दोन्ही व्हॉएजर बाह्य ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आली होती. मात्र ती पुढे जात राहिली. या मोहिमेच्या सुरुवातीला ही दोन्ही याने हेलिओस्फीअरपर्यंत पोहोचतील याची संशोधकांना कल्पना नव्हती, असं प्रा. स्टोन यांनी सांगितले.

हेलिओस्फीअर किती मोठे आहे, यान तेथेपर्यंत कधी पोहोचेल आणि तेथेपर्यंत ते पोहोचू शकेल का याची कल्पना नव्हती. व्हॉएजरच्या ४१ वर्षांच्या प्रवासातली ही सर्वांत रोमांचक वेळ आहे, असेही ते म्हणाले.

सौरमालेची व्याख्या शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यामुळे या यानाने सौरमाला सोडली असा शब्दप्रयोग प्रा. स्टोन काळजीपूर्वक वापरतात. नासाच्या यानांनी ओर्ट क्लाऊड अजूनही पार केलेला नाही. या क्षेत्रांतील धूमकेतूंवर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो.

फोटो स्रोत, NASA

दोन्ही व्हॉएजर नव्या आणि कधीच संशोधन न झालेल्या क्षेत्रात आहेत हे निश्चित, असं ते म्हणाले.

या प्रवासाला किती काळ लागला?

अनेक दशके आणि किलोमीटर्सचा हा प्रवास आहे. व्हॉएजर २ प्रक्षेपित झाल्यानंतर काही दिवसांनी ५ सप्टेंबर १९७७ रोजी व्हॉएजर १ प्रक्षेपित झाले. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती आणि १९८९ मध्ये त्यांनी आपले काम पूर्णही केले. त्यानंतर ते अवकाशात पुढे गेले. काही काळानंतर त्यांचे प्लुटोनियम ऊर्जास्रोत बंद पडतील आणि एका क्षणी त्यांचे ट्रान्समिटर्स व सर्व काम बंद होईल अशी अपेक्षा होती.

फोटो स्रोत, NASA

ही दोन्ही यान २०२७ पर्यंत पुढेपुढे जात राहावीत, असे व्हॉएजर प्रकल्पाच्या व्यवस्थापर सूझेन डोड यांनी बीबीसी न्यूजला सांगितले.

"ही दोन्ही यानं इंटरस्टेलरमध्ये जाणारी आद्य यानं आहेत. ५० वर्षं ही मोहीम चालणं अत्यंत रोमांचक असेल. दरवेळेस ती घरी फोन केल्यासारखी कळवतात, मी पुढे जात आहे, मला विसरू नका!" अशा शब्दांमध्ये सूझेन यांनी हा प्रवास सांगितला.

फोटो स्रोत, NASA

इतक्या वेगाने प्रवास करत असले तरी व्हॉएजर १ यान जवळच्या ताऱ्यावर ४० हजार वर्षांमध्ये पोहोचू शकणार नाही. मात्र ते आकाशगंगेत इतर ताऱ्यांसमवेत अब्जावधी वर्षे राहील.

केसरबाईंची भैरवी आणि व्हॉएजर - 1

व्हॉएजर 1 सोबत नासानं संदेश कोरलेली एक ग्रामोफोनची तबकडी पाठवली आहे. जर कुठं परग्रहवासी असतील तर त्यांच्यासाठी हा संदेश आहे. खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी ही तबकडी बनवली आहे. कला आणि विज्ञानाचा संगम साधणाऱ्या या सोनेरी तबकडीवर पृथ्वीवरचे आवाज, जगभरातील ५५ भाषांमध्ये रेकॉर्ड केलेले खास संदेश, छायाचित्रं आणि निवडक संगीताचा समावेश आहे.

त्यात मोझार्ट, बीथोवन, बाक या दिग्गजांसह केसरबाई केरकर यांनी गायलेल्या 'जात कहाँ हो अकेली गोरी' या एकमेव भारतीय गीताला स्थान मिळालं. या संदर्भातील बातमी तुम्ही इथं वाचू शकता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)