You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पीयूष जैन: कानपूरच्या अत्तर व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपये कसे जमा केले?
कानपूरच्या पीयूष जैन या अत्तर व्यापाऱ्याच्या घरात अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने चार दिवसांपूर्वी छापा घातला. या छाप्यात 177 कोटी रूपये सापडले.
पैशांची मोजणी करायला खास मशीन आणाव्या लागल्या या बातम्या एव्हाना तुमच्यापर्यंत आल्या असतीलच.
यानंतर पीयूष जैनांच्या कंपन्या, मुंबईतली कार्यालंय अशा ठिकाणी छापे पडले. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार वेगवेगळ्या छाप्यांमधून सापडलेली त्यांची संपत्ती 250 कोटींपेक्षा जास्त आहे.
पैशांची मोजणी करायला खास मशीन आणाव्या लागल्या या बातम्या एव्हाना तुमच्यापर्यंत आल्या असतीलच.
पण या लेखात हे शोधण्याचा प्रयत्न करू की या व्यापाऱ्याने इतकी माया जमवली कशी?
कोण आहेत पीयूष जैन?
पीयूष जैन मूळचे उत्तर प्रदेशातल्या कन्नोजचे आहेत. कन्नोजमध्ये त्यांच्याकडे एक घर, एक परफ्युम बनवायचा कारखाना, एक कोल्ड स्टोरेज आणि एक पेट्रोल पंप आहे.
याशिवाय त्यांच्याकडे मुंबईत एक घर आहे आणि एक शोरूमही आहे. त्यांच्या कंपन्या मुंबईतही रजिस्टर आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीयूष जैन जवळपास 40 कंपन्यांचे मालक आहेत, ज्यातल्या दोन कंपन्या मध्यपूर्वेत आहेत. पण त्यांची मुख्य ओळख अत्तराचे व्यापारी हीच आहे.
एनडीटीव्हीने आपल्या बातमीत म्हटलंय की सुत्रांनुसार पीयूष जैन यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी आपलं पिढीजात सोनं विकून इतकी रोख रक्कम जमा केली. त्यांना पैशाची आवश्यकता होती कारण त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा होता.
पण ते पिढीजात सोनं नक्की कोणाला विकलं याची माहिती जैन देऊ शकले नाहीत. त्यांच्या दोन मुलांचीही चौकशी सरकारी अधिकारी करत आहेत.
इतक्या संपत्तीचा मालक आपल्या गावात फिरताना मात्र एक जूनी स्कुटर घेऊन फिरतो. त्यांच्या कन्नोजच्या घरी एक जुनी क्वालिस गाडी आणि मारूती कार आहे.
एनडीटीव्हीने म्हटलंय की ते अतिशय साधेपणाने राहायचे. गल्लीतल्या कोणाशी विशेष बोलत नव्हते. त्यांचे वडील महेशचंद्र जैन व्यवसायाने केमिस्ट होते. अत्तर बनवण्याची कला पीयूष आणि त्यांचे भाऊ अंबरीश आपल्या वडिलांकडून शिकले.
15 वर्षांत वाढवला व्यवसाय
गेल्या 15 वर्षांत पियूष यांच्याकडची संपत्ती वाढत गेली. कानपूर, मुंबई, गुजरात अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय पसरवला. पैसा आला तसा त्यांनी कन्नोजच्या मूळ घराच्या आसपासची आणखी दोन घरं विकत घेऊन एक आलिशान घर बांधलं.
हे घर अशा पद्धतीने बांधलंय की आसपास राहाणाऱ्या लोकांना फक्त बाल्कनी सोडून काहीच दिसत नाही.
इथे आता पीयूष यांचे वडील महेंद्र चंद्र जैन आणि त्यांचे कर्मचारी राहातात.
पीयूष आणि त्यांचे बंधू अंबरिश इथे येऊन-जाऊन असतात. दोन्ही भावांना मिळून 6 मुलं आहे आणि सगळे कानपूरमध्ये शिकतात.
कशी जमवली माया?
आपल्याकडे सापडलेली रोख रक्कम ही आपलं पिढीजात सोनं विकून आली असल्याचं पीयूष जैन यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं असलं तरी अधिकाऱ्यांना वेगळाच संशय आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी म्हटलं की खोटी बिलं आणि क्रेडिट कार्ड बनवून इतका पैसा गोळा केला आहे.
ते म्हणाले, "यात दोन-तीन लोक गुंतले असल्याचा संशय आहे. हे लोक खोटी बिलं बनवायचे आणि वस्तूची किंमत कमी दाखवायचे. कोणत्याही बिलाशिवाय माल पाठवायचे. आम्हाला सापडलेली सगळी बिलं खोटी आहेत."
विवेक जोहरी म्हणले की त्यांना माहिती मिळाली होती की पान मसाला आणि जी कंपनी त्रिमूर्ती फ्रॅग्ररन्स कर दिल्याशिवाय मालाची देवाण-घेवाण करत आहेत.
ते म्हणाले की पीयूष जैन यांनी मान्य केलं की त्यांनी टॅक्स दिल्याशिवाय व्यवहार केलं आणि बिलंही बनवली नाहीत.
पीयूष यांच्या घरी धाड टाकण्याआधी अधिकाऱ्यांनी पान-मसाला व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली होती आणि त्यातूनच त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली.
समाजवादी पक्षाशी संबंधित असण्याचा आरोप
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये पीयूष जैन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत असंही म्हटलं जातंय.
उत्तर प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून समाजवादी पक्षाला लक्ष्य करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलंय, "तुमच्या पापांचा दुर्गंध अत्तराने जाणार नाही."
पण समाजवादी पक्षाचे मीडिया कन्सलटंट आशिष यादव यांनी हे आरोप खोडून काढलेत.
त्यांनी लिहिलं, "कानपूरमध्ये ज्या व्यापाऱ्याच्या घरी धाडी पडल्या त्यांचा समाजवादी पक्षाशी काहीही संबंध नाही."
अटक
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 27 डिसेंबरला म्हटलं की कानपूरचे अत्तर व्यापारी पीयूष जैन यांना जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
त्यांच्या घरातून 177 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मंत्रालयाने एक प्रेस नोट काढून म्हटलं की पीयूष जैन यांचे कन्नोजचे कारखाने आणि घरात अजूनही झडती चालू आहे. तिथून आतापर्यंत 17 कोटी रूपये सापडले आहेत.
याशिवाय त्यांच्याकडे 23 किलो सोनंही सापडलं आहे.
जैन यांच्या कन्नोजच्या कारखान्यात अत्तर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल सापडला आहे. यात 600 किलो चंदनाचं तेलं आणि इतर पदार्थ अगणित प्रमाणात सापडलेत.
या सगळ्या कच्च्या मालाची किंमत बाजारभावानुसार जवळपास 6 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.
न्यायालयाने पीयूष जैन यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)