कंगना राणावत: अनिल देशमुख यांचा केंद्रावर वाय सेक्युरिटीहून निशाणा #5मोठ्याबातम्या

वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मुंबईचा अपमान करणाऱ्यांना केंद्राकडून सुरक्षा मिळणं हे दुःखद- अनिल देशमुख

मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना राणावतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

'महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा,' असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं. 'मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा,' असं आव्हानही कंगनाने दिलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ज्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले.

2. देश मोदीनिर्मित संकटाच्या चक्रव्यूहात- राहुल गांधी

सध्याच्या घडीला आपला देश हा मोदीनिर्मित संकटांच्या चक्रव्युहात अडकला आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. सध्याच्या घडीला आपला देश हा अनेक मोदी निर्मित संकटांनी घेरला गेला आहे. त्यापैकी एक मोठं संकट आहे ते म्हणजे खासगीकरण.

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

'मोदी सरकार PSUs चं खासगीकरण करुन रोजगार आणि जमा असलेला खजिना रिता करतं आहे यामध्ये फायदा होतो आहे तो फक्त मोदींच्या काही मित्रांचा. विकास होतोय मोदींच्या मित्रांचा जे त्यांचे खास आहेत,' या आशयाचं ट्वीट करुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

एवढंच नाही तर खासगीकरण थांबवा आणि सरकारी नोकऱ्या वाचवा असंही आवाहन त्यांनी त्यांच्या ट्वीटच्या शेवटी केलं आहे.

3. सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेर

वेगवेगळ्या मुद्यांवर भूमिका मांडणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आपल्याच पक्षाच्या आयटी सेलवर भडकले आहेत. स्वामी यांनी ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला. भाजपाचा आयटी सेल बनावट खाती तयार करून आपल्यावर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात पक्षाकडे एक मागणीही केली आहे.

भाजपाच्या आयटी सेलबद्दल पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून तक्रार केली आहे. स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "भाजपाची आयटी सेल बेकार झाली आहे. काही सदस्य बनावट आयडीचा वापर करून माझ्यावर हल्ले करत आहेत. मग माझ्या संतप्त समर्थकांनी उत्तर देण्यास सुरूवात केली, तर मी त्याला जबाबदार असणार नाही. ज्याप्रमाणे माझ्यावर होत असलेल्या हल्ल्यांना भाजपाला जबाबदार ठरवता येणार नाही," असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

'अमर उजाला'ने ही बातमी दिली आहे.

स्वामी यांच्या ट्वीटवर एका समर्थकांनं ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं. "आपण टीकेपेक्षा वरचढ आहात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपण त्यांना महत्त्व देत असाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात," असं म्हटलं आहे.

4. DRDO कडून हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचं यशस्वी परीक्षण

भारतानं सोमवारी स्वदेशी निर्मित हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकलचं यशस्वी परीक्षण केलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या भविष्यासाठी मिसाईल सिस्टम आणि एरियल प्लॅटफॉर्मसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ (DRDO) कडून विकसित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

डीआरडीओकडून सोमवारी (7 सप्टेंबर) ओडिशा समुद्रकिनाऱ्याजवळ डॉ. अब्दुल कलाम बेटाहून मानवरहित 'स्क्रॅमजेट'चं हायपरसोनिक स्पीड फ्लाइटचं यशस्वी परीक्षण पार पडलं. जे विमान 6126 ते 12251 किमी प्रतीतास वेगानं उड्डाण करू शकतं, त्यांना हायपरसोनिक विमान म्हटलं जातं. भारताच्या HSTDV चं परीक्षण 20 सेकंदाहून कमी वेळेचं होतं.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रयत्नांसाठी डीआरडीओचं कौतुक केलंय. देशाच्यादृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान असल्याचं सिंह यांनी म्हटलंय.

5. सार्वजनिक क्षेत्रातील 26 कंपन्यांचे खासगीकरण होणार

देशातील सध्याची चिंताजनक आर्थिक परिस्थिती आणि त्यातच आर्थिक विकासदरासंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीमुळे देशासमोरील आर्थिक संकट गडद होताना चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून (PSUs) सरकार आपली हिस्सेदारी विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे.

याचसंदर्भात 27 जुलै 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वाची घोषणा करताना केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितले होते. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदीलही मिळाला आहे. नेटवर्क18ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सीतारमण यांनी ही घोषणा केली तेव्हा सरकार नक्की कोणत्या कंपन्यांमधील हिस्सेदारी विकणार आहे याबद्दलची कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र आता माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या एका उत्तरामध्ये सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 नाही तर 26 कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

माहिती अधिकाराअंतर्गत सरकारकडून मागवण्यात आलेल्या माहितीत कोणत्या कंपन्यांचे खासगीकरण केलं जाणार आहे याची यादीही मागवण्यात आली होती. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये सर्व 26 कंपन्यांच्या नावाबरोबरच कंपन्यांमध्ये असणारा सरकारी मलकीचा किती हिस्सा विकला जाणार आहे हे कंपनीच्या बाजारमुल्यावर अवलंबून असणार आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)