कोरोना : पुण्यातल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये मारामारी, हे केंद्र वारंवार वादात का येतंय?

  • वाचन वेळ: 5 मिनिटे

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. आता वादाचा विषय ठरलाय येथे काम करणाऱ्या नर्सेसचा पगार.

पगाराची पूर्ण रक्कम वेळेवर मिळत नसल्याने कोव्हिड सेंटरमधील नर्सेसने काही दिवसांपासून आंदोलन केले होते. त्यानंतर त्यातील काही रक्कम देण्यात आली होती.

काल (24 डिसेंबर) या नर्सेस उर्वरित पैशांबाबत चौकशीसाठी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये गेल्या असता वादावादी झाली. यादरम्यान बाऊन्सर्स आणि नर्सेसमध्ये धक्काबुक्की झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून योग्य पगार मिळत नसल्याने काही नर्सेस संपावर आहेत.

राज्य सरकार, पुणे महापालिका आणि पीएमआरडीए अशा तीन संस्था जम्बो कोव्हिड सेंटर प्रकल्पात सहभागी आहेत. आता पीएमसी ने त्यांच्या काही वाट्याचे पैसे दिले आहेत. काही रक्कम राज्य सरकारकडून येणे अपेक्षित आहे. हे पैसे घेऊन पीएमआरडीए कोव्हिड सेंटरला सर्व्हिस देणाऱ्या विविध संस्थांना पैसे देते.

राज्य सरकारकडून आलेली रक्कम इतर इन्फ्रास्ट्रक्चरची बिले देण्यात खर्च झाली. आमच्याकडे पैसे आले की आम्ही देऊ, असं पीएमआरडीए सांगत आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडे यांचे पगार करण्यासाठी पूर्ण निधी नसल्याने नर्सेस चे पगार थकले आहेत

दरम्यान, बीबीसी मराठीने काही दिवसांपूर्वी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा आढावा घेतला होता. त्याचे संपूर्ण वृत्तांकन खालीलप्रमाणे :

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर घाईघाईने सुरू केलं का?

पुण्यातील सीओईपी कोव्हिड सेंटरमध्ये आपल्या नातेवाईकाला दाखल करण्यात आल्यावर अनुभव कसा होता हे एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं.

त्या सांगतात "रविवारी वडिलांना बरं न वाटल्याने कोव्हिडची तपासणी केली. त्यानंतर बुधवारी त्यांना जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये आणण्यात आलं. सुरुवातीला त्यांची एन्ट्री वेगळ्या वॉर्डमध्ये केली तर त्यांना दुसऱ्याच वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.

आम्ही कोव्हिड सेंटरमध्ये जाणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना त्यांचा फोटो दाखवून ते कुठे आहेत हे पाहाण्यास सांगितले. त्यांचा आतील व्हिडिओ देखील आम्हाला कर्मचाऱ्यामार्फत मिळाला.

"परंतु आज संध्याकाळी ते गेल्याचे आम्हाला सांगण्यात आलं. त्यांना योग्य उपचार मिळाले की नाही याबाबत आम्हाला काहीच सांगण्यात आले नाही. त्यांना इतर व्याधी होत्या त्याची औषधे आम्ही आत पाठवली होती ती त्यांना मिळाली की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. केवळ आज दुपारी ते क्रिटिकल आहेत असं सांगण्यात आलं... आणि आता ते गेल्याचे कोव्हिड सेंटरकडून सांगण्यात येत आहे." त्या सांगतात.

असाच एक अनुभव आणखी एका व्यक्तीला आला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ती व्यक्ती म्हणाली, "आमच्या एका मित्राला या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आधी बालेवाडी येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना त्रास झाल्याने इथे आणण्यात आलं.

इथे आणून आता तीन दिवस झाले आहेत परंतु त्यांची तब्येत कशी आहे?, याबाबत आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. ते आहेत की नाही हे सुद्धा आम्हाला कळायला तयार नाही. आम्ही त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाऊ म्हटलं तरी त्यासाठी मोठी प्रोसिजर करावी लागेल असं आम्हाला सांगितलं जातंय."

पुण्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे आता पुन्हा कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. पुणे शहरात दररोज एक ते दीड हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणा तोकडी पडत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यातील सीओईपी मैदानावर जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आलं.

त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 23 ऑगस्ट रोजी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखिल उपस्थित होते.

पुण्यात उभारलेल्या जम्बो हॉस्पिटलममुळे पुण्यात वाढणाऱ्या रुग्णांना उपचार मिळतील तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल असं सांगण्यात आलं होतं.

800 खाटांच्या या सेंटरमध्ये 600 खाटा या ऑक्सिजनच्या तर 200 खाटा या आयसीयुच्या आहेत. प्रत्यक्षात यातील केवळ 400 खाटाच सध्या सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सेंटर चालविण्याची जबाबदारी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या संस्थेला देण्यात आली आहे. या सेंटरमध्ये असुविधा असल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

2 सप्टेंबरला टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. या निमित्ताने पुण्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

पुणे जिल्ह्यातील कोव्हिड बेड्सची सद्यस्थिती

पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत विविध रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या सर्वसामान्यांना समजण्यासाठी वेबसाईट तयार केली असून त्यावरील डॅशबोर्डवर त्याबाबतची माहिती भरण्यात येते.

प्रत्येक रुग्णालयाने आपल्या इथे कोव्हिड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती भरणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा ही माहिती वेळेवर अपडेट केली जात नसल्याचे समोर आलं आहे.

4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत या डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीनुसार पुणे जिलह्यात एकूण 19592 खाटा या कोव्हि़ड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील 6512 इतक्या खाटा सध्या रिकाम्या आहेत. तर आयसोलेशनच्या 5544, ऑक्सिजनच्या 751, आयसीयू परंतु व्हेंटिलेटर नसलेल्या 175 आणि व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या 42 खाटा रिकाम्या असल्याचे दाखविण्यात आलं आहे.

पांडुरंग रायकर यांना योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप का झाला?

टीव्ही 9 या वृत्तवाहिनेचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर सीओईपीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांकडून घेण्यात आला होता.

परंतु त्यांची वैद्यकीय परिस्थिती पाहता त्यांना कार्डिअॅक अॅम्ब्युलन्समधून घेऊन जाणे गरजेचे होते. अशी अॅम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेता आले नाही. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांच्या बहिणीकडून करण्यात आला होता.

"एक कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही, किती हा निष्काळजीपणा आहे, दुसऱ्या दिवशी खूप भूक लागली म्हणून दादाने मला फोन केला. मला घरचा डबा घेऊन ये असं तो बोलला. म्हणून मी 8 वाजता त्याला डबा पाठवला. बाहेरच्या लोकांच्या हातात डबा दिला. पण तो शेवटपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. औषधंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचली नाहीत," असं पांडुरंग यांच्या बहिणीनं सांगितलं.

यावर पुणे महानगरपालिकेकडून प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून रायकर यांना कोव्हिड 19 मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार करण्यात येत होते असे सांगण्यात आलं होतं. तसंच त्यांना देण्यात आलेल्या उपचाराबाबत चौकशी करण्याची विनंती ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना करण्यात आली आहे.

कोव्हिड- 19 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच केले उपचार

जम्बो कोव्हिड सेंटर चालविण्यास देण्यात आलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे डॉ. सुजित पाटकर यांच्याशी बीबीसीने संपर्क केला.

''पाटकर म्हणाले, 800 पैकी सध्या 400 खाटा सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने याची क्षमता आम्ही वाढवणार आहोत. घाई करुन मृत्यूसंख्या वाढविणे योग्य नाही. रुग्णांना योग्य जेवण आणि औषधे वेळेवर दिली जात असून ते मॉनिटरदेखील करत आहोत.

रायकर यांच्या नातेवाईकांनी दिलेला डबा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला होता तसेच त्यांनी जेवण देखील केले होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच उपचार करण्यात आले.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आणि इतर त्रुटींचा उल्लेख आहे. कोव्हिड सेंटरमध्ये कर्मचारी वर्गासह अनेक सुविधा नसल्याचं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.

यावर काय उपाययोजना आणि तरतुदी होणार आहेत असं विचारण्यासाठी बीबीसी मराठीने विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट करण्यात येईल.

तात्काळ कारवाई करण्याचे आदेश

कोरोनाबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात घेतली. त्यावेळी ते म्हणाले "पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तेथील व्यवस्थापन पाहण्यास दिले आहे त्यांना जर ते व्यवस्थित जमत नसेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी.

तसेच गरज पडल्यास नवीन डॉक्टरांची टीम तैनात करावी. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या तब्येतेची माहिती मिळावी यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये कॅमेरा बसवून बाहेरच्या बाजूला स्क्रीन लावण्यात यावा असे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशी सोय करण्यात येत आहे."जम्बो सेंटर सुरू करण्यास घाई झाली का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "जम्बो कोविड सेंटर सुरू केल्यानंतर काहींना वाटलं की टप्प्याटप्प्याने तेथे रुग्ण दाखल होतील. परंतु तेथे दोन तीन दिवसांमध्ये 300 ते 400 रुग्ण दाखल झाले. ससूनमध्ये देखील कोरोनासाठीची इमारत टप्याटप्याने सुरू केली.

तेथे पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल झाल्यानंतर ऑक्सिजनबाबत काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेऊन तेथील काही रुग्ण जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)