You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थकलेली प्रेयसी, उंच पर्वत आणि प्रियकराला झालेली शिक्षा; मदत न करता पळून गेलेल्या गिर्यारोहकाचं हे प्रकरण नक्की काय?
- Author, बेथनी बेल
- Role, बीबीसी प्रतिनिधी, व्हिएन्ना
- वाचन वेळ: 5 मिनिटे
ऑस्ट्रियातील सर्वात उंच पर्वतावर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं संपूर्ण गिर्यारोहण विश्वात खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या मृत्यूप्रकरणी एका गिर्यारोहकाला दोषी ठरवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रियातील सर्वोच्च पर्वतावर 33 वर्षांची एक महिला थंडीने गोठून मरण पावली होती. ही घटना घडून गेल्यानंतर साधारण वर्षभराने, न्यायालयाने तिच्या प्रियकराला त्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूस दोषी ठरवलं.
ग्रॉसग्लॉकनर पर्वतावर गिर्यारोहण करताना हायपोथर्मियामुळे केर्स्टिन जी. हिचा थंडीने मृत्यू झाला होता. परंतु, नंतर हे कारण चुकीचं ठरलं.
19 जानेवारी 2025 च्या पहाटे वादळ सुरू असताना, शिखराच्या जवळ तिला थकलेल्या आणि असहाय अवस्थेत सोडून तो गेला, असा प्रियकरावर आरोप होता.
19 फेब्रुवारीच्या या खटल्याकडे केवळ ऑस्ट्रियाच नव्हे, तर इतर देशातील गिर्यारोहकांमध्येही मोठी चर्चा होती आणि निकालाबाबत उत्सुकताही निर्माण झाली होती.
ऑस्ट्रियाच्या गोपनीयता कायद्यामुळे फक्त 'थॉमस पी.' असं नाव सांगितलेल्या या व्यक्तीला न्यायालयाने 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेची लगेच अंमलबजावणी होणार नाही. (याला ऑस्ट्रियात 'सस्पेंडेड सेटेंस' म्हणतात. यात गुन्हेगाराला सुधारण्याची एक संधी दिली जाते. दोषी व्यक्ती तुरुंगाबाहेर राहून चांगली वर्तणूक ठेवण्याची हमी देतो. त्याने ती हमी पाळली नाही, तर ठोठावलेला तुरुंगवास भोगावा लागतो).
याशिवाय दोषीला सुमारे 11,300 अमेरिकन डॉलर (सुमारे 10 लाख 25 हजार रुपये) दंडही ठोठावला आहे.
न्यायालयाने बीबीसीला पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, निकाल देताना थॉमस पी. याचं पूर्वीचं कोणतंही गुन्हेगारी रेकॉर्ड नसणं आणि जवळची व्यक्ती गमावणं या बाबी विचारात घेतल्या आहेत.
सरकारी वकिलांनी सांगितलं की, तो अनुभवी गिर्यारोहक असल्याने या ट्रेकचा जबाबदार मार्गदर्शक तोच होता. तरीही त्यानं वेळेत मदत मागितली नाही किंवा परत जाऊन आपल्या प्रेयसीला मदतही केली नाही.
थॉमसने आपल्यावरचे सर्व आरोप नाकारले. त्याचे वकील, कर्ट जेलिनेक यांनी या महिलेचा मृत्यू 'एक दुर्दैवी अपघात' असल्याचं म्हटलं.
'घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली'
3 हजार 798 मीटर उंच असलेल्या ग्रॉसग्लॉकनर पर्वतावर चढाई सुरू केल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.
सरकारी वकिलांनी थॉमसने सुरुवातीपासूनच चुका केल्याचा आरोप केला. त्यांनी अशा 9 चुका नमूद केल्या.
स्वतः घेतलेला निर्णय आणि घेतलेला धोका कधी कायद्याने गुन्हा मानला जातो, हा प्रश्न या खटल्यामुळे निर्माण झाला आहे.
गिर्यारोहक दोषी ठरला, तर पर्वतीय खेळांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, असं निकाल येण्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रियाच्या डेर स्टँडर्ड या वृत्तपत्रानं म्हटलं होतं.
या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा असा होता की, इन्सब्रुकच्या सरकारी वकिलांनी थॉमसला 'या ट्रेकचा जबाबदार मार्गदर्शक' मानलं जावं, असं सांगितलं. कारण त्याच्या प्रेयसीपेक्षा त्याला उंच पर्वतांवरील ट्रेकचा मोठा अनुभव होता आणि ट्रेकची योजना त्यानेच आखली होती.
प्रेयसीला अनुभव नसतानाही आणि हिवाळ्यातील कठीण परिस्थिती असतानाही, त्यानं ही चढाई केली, असा सरकारी वकिलांचा आरोप होता.
सरकारी वकिलांनी असाही दावा केला की, ते 2 तास उशिरा निघाले होते आणि आपत्कालीन 'बिव्होक'साठी लागणारं पुरेसं साहित्य त्याच्याकडे नव्हतं. बिव्होक म्हणजे तंबू न वापरता मोकळ्या जागेत रात्री थांबण्यासाठी लागणारं हलकं आणि कमी जागा व्यापणारं साहित्य.
"त्यानं आपल्या प्रेयसीला स्नोबोर्डसाठीचे मऊ बूट घालू दिले, जे अशा उंच आणि कठीण डोंगरावरील ट्रेकसाठी योग्य नव्हते,"असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
परंतु, आरोपीनं हे आरोप फेटाळले. एका निवेदनात वकील जेलिनेक यांनी या चढाईची योजना दोघांनी मिळून आखली होती, असं सांगितलं.
"दोघांनाही वाटत होतं की, त्यांच्याकडे पुरेसा अनुभव आहे, आपण नीट तयारी केली आहे आणि आपल्याकडे योग्य साधनसामुग्री आहे. दोघांनाही पर्वतावर चढाईचा अनुभव होता आणि ते दोघेही चांगल्या शारीरिक स्थितीत होते," असं वकिलांनी सांगितलं.
पर्वतावर पोहोचल्यानंतर जोरदार वारे (ताशी सुमारे 74 किमी) आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे त्यानं तेव्हाच परत फिरायला हवं होतं, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. त्या वेळी तापमान उणे 8 (-8) अंश सेल्सियस होतं, पण थंडी उणे 20 (-20) अंश सेल्सियससारखी जाणवत होती.
पण हे दोघेही परत फिरले नाहीत.
'दोन्ही बाजूंची वेगळी मतं'
त्यानंतर नेमकं काय घडलं, याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत.
आरोपीच्या वकिलांच्या मते, 18 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता ते 'फ्रुहस्टुक्सप्लॅट्झ' या ठिकाणी पोहोचले. शिखराकडे जाण्यापूर्वीचा हा असा टप्पा होता, जिथून पुढे गेल्यावर परत फिरणं शक्य नव्हतं.
दोघेही फार थकलेले नव्हते, म्हणून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असं जेलिनेक यांनी सांगितलं.
सरकारी वकिलांच्या मते, रात्री सुमारे 8.50 वाजता हे जोडपं अडकून पडलं. त्यानंतर रात्री सुमारे 10.50 वाजता पोलिसांचं हेलिकॉप्टर वरून फिरत असतानाही त्या व्यक्तीनं पोलिसांना फोन केला नाही किंवा मदतीसाठी कोणते सिग्नलही पाठवले नाहीत.
मात्र प्रियकराच्या वकिलांचं म्हणणं आहे की, त्या वेळी दोघंही व्यवस्थित होते आणि शिखर जवळ असल्यामुळे त्यांनी मदत मागितली नाही.
वेबकॅमच्या फुटेजमध्ये पर्वतावर चढाई करताना त्यांचे टॉर्च चमकताना दिसतात.
पण थोड्याच वेळात परिस्थिती पूर्णपणे बदलली, असं वकिलांनी सांगितलं. 'अचानक' आणि 'अपेक्षेबाहेर त्या महिलेला खूप थकवा जाणवू लागला'. पण तोपर्यंत परत फिरायला उशीर झाला होता, असं त्यांनी म्हटलं.
19 जानेवारीला रात्री 12.35 वाजता थॉमसने माऊंटन पोलिसांना फोन केला. त्या संभाषणात नेमकं काय बोलणं झालं, हे स्पष्ट नाही.
वकिलांनी सांगितलं की, त्यांच्या क्लायंटनं मदत मागितली होती आणि 'सर्व ठीक आहे' असं पोलिसांना सांगितल्याचं त्यानं नाकारलं. परंतु, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्यानं फोन सायलेंट केला आणि पुढील कॉल्सला उत्तर दिलं नाही.
जेलिनेक यांनी सांगितलं की, हे जोडपं ग्रॉसग्लॉकनरचं शिखर दाखवणाऱ्या क्रॉसच्या सुमारे 40 मीटर खालच्या भागापर्यंत पोहोचलं होतं.
प्रेयसी इतकी थकली होती की, ती पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे मदत आणण्यासाठी तो तिला तिथेच सोडून शिखरावर चढला आणि दुसऱ्या बाजूने खाली उतरला, असं सांगण्यात आलं. सरकारी वकिलांच्या मते, त्यानं तिला पहाटे 2 वाजता तिथे सोडलं.
शिखरावरून खाली उतरत असताना टॉर्चच्या प्रकाशात त्याची आकृती वेबकॅमच्या फुटेजमध्ये दिसते.
सरकारी वकिलांच्या मते, थॉमसने तिला थंडीपासून वाचवण्यासाठी अॅल्युमिनियमचे रेस्क्यू ब्लँकेट किंवा इतर कोणतेही साधन वापरलं नाही. तसेच त्याने पहाटे 3.30 पर्यंत आपत्कालीन सेवांना माहितीही दिली नाही.
तोपर्यंत कदाचित खूप उशीर झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे रात्री हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.
अखेर केर्स्टिन बर्फाच्छादित पर्वताच्या एका कडेला मरण पावली.
तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिला गिर्यारोहणाची खूप आवड होती, असं दिसतं. तिला रात्री ट्रेकिंग करायला खूप आवडायचं, असं तिच्या आईने जर्मन प्रसारमाध्यमांना सांगितलं.
थॉमसला आपल्या प्रेयसीच्या मृत्यूबद्दल खूप दुःख आहे, असं त्याच्या वकिलांनी सांगितलं. "मृत महिलेच्या कुटुंबाप्रती तो मनापासून संवेदना व्यक्त करतो," असं जेलिनेक यांनी म्हटलं.
या निकालाचा परिणाम पुढे इतर गिर्यारोहकांवरही होऊ शकतो. भविष्यात आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल, असा संदेश यातून जातो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)