दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलींना छताला टांगलं; एकीचा मृत्यू, दुसरीची प्रकृती गंभीर, आईने काय सांगितलं?

मृत मुलीची आई
फोटो कॅप्शन, मृत मुलीची आई राणी यमगर यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली.
वाचन वेळ: 5 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)

मुलींनी चोरी केल्याच्या संशयावरून त्यांच्या जन्मदात्या वडिलांनीच त्यांना दोरीने बांधून घरात टांगून ठेवले आणि त्यात एक मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

या प्रकरणात आटपाडी पोलिसांनी आरोपी दादू हैबत यमगर (51) यांना अटक केली असून या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी इथली ही घटना आहे. मुलींनी चोरी केली म्हणून वडिलांनी त्यांचे हातपाय दोरीनं बांधून त्यांना घरात टांगून ठेवलं होतं.

या गावातील रहिवासी आणि दोन्ही मुलींचे वडील दादू हैबत यमगर (51 वर्षे) यांना आटपाडी पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे.

मुलींकडून वारंवार चोरीचे प्रकार घडत होते, असं कुटुंबीयांनी सांगितलं. यमगर यांच्या ऋतुजा आणि अनुजा या दोन्ही मुलींनी घराशेजारच्या एका घरातून पैसे चोरले होते.

हा प्रकार त्यांचे वडील दादू यमगर यांना समजला. त्यानंतर रागाच्या भरात दादू यांनी दोन्ही मुलींचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर घरातील लोखंडी अँगलला टांगून ठेवलं.

रात्रभर मुली तशाच अवस्थेत होत्या. यातून सकाळी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आटपाडी पोलिसांनी दादू हैबत यमगर यांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

दादू यमगर, बनपुरी गावातील यमगर वस्तीत राहतात. दादू मजूरी करतात. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा अशी 5 अपत्यं आहेत.

त्यातील 11 वर्षांची अनुजा आणि 9 वर्षांची ऋतुजा या दोघी बहिणी यमगर वस्तीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या.

अनुजा पाचवीत तर ऋतुजा चौथीत शिकत होती. या दोन्ही मुली खोडकर असल्यामुळे शाळेत तसंच घरात आणि इतर ठिकाणीदेखील गेल्या काही महिन्यांपासून चोरी करत होत्या.

बुधवारी (25 मार्च) अनुजा आणि ऋतुजा या दोन्ही बहिणींनी त्यांच्या घराशेजारच्याच एका घरातून पैसे चोरले.

ही गोष्ट लक्षात येताच संबंधित कुटुंबानं ऋतुजा आणि अनुजा यांच्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. या मुलींचे वडील दादू यमगर संध्याकाळी दारूच्या नशेत घरी आले, त्यानंतर त्यांना याबाबत समजलं.

आरोपी दादू यमगर.
फोटो कॅप्शन, आरोपी दादू यमगर.

चोरीच्या घटनेबद्दल माहीत झाल्यावर त्यांनी रागाच्या भरात अनुजा आणि ऋतुजा या दोन्ही मुलींचे हातपाय बांधले आणि त्यांना घरातील छताला असलेल्या लोखंडी अँगलला टांगून ठेवलं.

या प्रकाराला दादू यमगर यांच्या पत्नी, आई आणि वडिलांनी विरोधही केला. मात्र संतापलेल्या दादू यमगर यांनी मध्ये पडल्यास या सगळ्यांना मारण्याची धमकी दिली.

या दोन्ही मुली रात्रभर या टांगलेल्या अवस्थेतच होत्या. त्या रडत होत्या. त्यांना तहानदेखील लागत होती. त्यानंतर वडील दादू यमगर यांनी त्यांना दोन वेळा पाणी पाजलं. मात्र त्यांनी मुलींना मात्र खाली आणलं नाही.

दोन्ही मुली रात्रभर टांगलेल्या स्थितीतच होत्या. सकाळी मुलींना खाली उतरवण्यात आलं आणि नंतर हॉस्पिटलला नेण्यात आलं.

पंढरपूरला हॉस्पिटलला नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेतच ऋतुजाचा मृत्यू झाला, तर अनुजा गंभीर आहे. तिच्यावर सध्या आटपाडीत उपचार सुरू आहेत.

कुटुंबीय काय म्हणाले?

मुलींची आई, राणी यमगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या मुलींनी चोरी केली होती. त्या अशाच चोरी करायच्या. शाळेत किंव इतरत्र त्या किरकोळ चोरी करत राहायच्या. त्यामुळे वडील चिडलेले असायचे. ते दारूच्या नशेत आले होते. त्यांनी मुलींचे हातपाय बांधून त्यांना टांगलं."

"त्या दिवशी मुलींनी शेजारच्यांचे पैसे चोरले होते. चोरलेल्या पैशांतील 500 रुपये मुलींनी खर्च केले होते. तर उरलेले 1450 रुपये त्यांच्याकडे सापडले होते. मग ते पैसे शेजाऱ्यांना परत केले होते.

तसंच मुलींनी खर्च केलेले पैसेही त्यांना दिले. मुली अशाच चोरी करायच्या. त्यांचे वडील दारू पिऊन आलेले होते. त्यांनी रागाच्या भरात मुलींना घरातच हातपाय बांधून टांगलं," असं राणी सांगत होत्या.

"या रोजच चोरी करतात. रोज कुठून त्याची भरपाई करायची, असं मुलींच्या वडिलांंचं म्हणणं होतं. आम्ही त्यावेळेस इथेच होतो. पण त्यांनी आम्हाला जवळ येऊ दिलं नाही, " असं त्या म्हणाल्या.

मुलींची आई राणी यमगर आणि मुलीचे आजी आजोबा.
फोटो कॅप्शन, मुलींची आई राणी यमगर आणि मुलीचे आजी आजोबा.

मुलींना रात्रभर टांगूनच ठेवलं होतं. सकाळी मुलींच्या आजोबांनी मुलींना सोडलं. त्यावेळेस अनुजा बोलत होती, ऋतुजा मात्र बोलत नव्हती.

"त्यांना पाणी पाजलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. आम्ही तिच्या वडिलांना आवरत होतो. मात्र ते आमच्यावर चिडून जवळ येऊ देत नव्हते. मुली नेहमी चोरी करतात म्हणून ते संतापलेले होते. त्या रात्रीच्याही केव्हाही निघून जायच्या आणि चोरी करायच्या," असं राणी म्हणाल्या.

मुलींना टांगलं तेव्हा, मी घरात नव्हतो, असं प्रकराबाबात मुलींचे आजोबा यांनी सांगितलं. गुरुवारी (26 मार्च) पहाटे 5 वाजता दादू यमगर घराबाहेर पडले, त्यानंतर त्यांनी टांगलेल्या स्थितीतील मुलींना खाली काढलं.

दोन्ही मुलींना पाणी पाजलं. त्यावेळेस ऋतुजाची अवस्था चिंताजनक होती. तर अनुजा बेशुद्ध होती. मग घरातल्या लोकांनी या दोन्ही मलुींना पंढरपूरच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं. दोन्ही मुलींना रुग्णवाहिकेतून पंढरपूरला नेत असतानाच, रस्त्यातच ऋतुजाचा मृत्यू झाला, असं ते म्हणाले.

आजोबांनी सकाळी मुलींना सोडवल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र एका मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.
फोटो कॅप्शन, आजोबांनी सकाळी मुलींना सोडवल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र एका मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

घटनेनंतर अनुजा बेशुद्ध असल्यानं तिला आटपाडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर मृत अनुजावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात येत होती.

दरम्यान उपचार घेत असलेली अनुजा शुद्धीवर आली. तिने डॉक्टरांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आटपाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

आटपाडी पोलिसांनी बनपुरीमध्ये जाऊन या घटनेची माहिती घेतली. त्यावेळेस त्यांना तिथे ऋतुजाचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी ऋतुजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच दादू यमगर यांना ताब्यात घेण्यात आलं.

"मुली चोरी करायच्या, त्यामुळे लोक आम्हाला नावं ठेवायची की, तुम्ही मुलींना कसं वाढवत आहात. त्या रात्रीदेखील घरीच यायच्या नाहीत, बाहेरच झोपायच्या. कोणाचे पैसे चोरले की त्याच्या वस्तू घ्यायच्या. कधी एकमेकींना घड्याळ आणायच्या. तर कधी खायला घेऊन यायच्या," असं मुलींच्या आजी म्हणाल्या,

"त्या दिवशीही चोरीवरूनच हे घडलं. आम्ही आल्यावर सोडवायला गेलो, तर तो आम्हाला म्हणाला जो मध्ये पडले त्या मारून टाकेन. मग आम्ही सर्व गप्प बसलो. रात्रभर मुली आम्हाला हाका मारत होत्या. मुलींनी वडिलांना हाका मारल्या. त्यानं दोनदा त्यांना पाणी पाजलं," असंही त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

मुलींनी चोरी केली म्हणून बापानं दोन्ही मुलींनी छताला टांगलं, एकीचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरी चिंताजनक स्थितीत

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणाबाबत आटपाडीचे पोलीस निरीक्षक, विनय बहीर यांनी माहिती दिली.

"आम्हाला ऋतुजा नावाची मुलगी मृत हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे, अशी माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता, आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दादू हैबत यमगर यानं त्याच्या दोन मुली, अनुजा (11 वर्षे) आणि ऋतुजा (9 वर्षे) यांना काल रात्री (27 मार्च) घरगुती कारणानं हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवलं होतं, असं समजलं.

"यात अनुजा गंभीर झाली असून तिच्यावर आटपाडी इथं उपचार सुरू आहेत. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे तिच्यावर आटपाडी इथं उपचार सुरू आहेत. तर ऋतुजा हिला हातपाय बांधून टांगल्यानं तिची हत्या केलेली असल्यामुळे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत," असं पोलिसांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)