मन पिशाच : घरच्या कॉम्प्युटरवर बनलेला जवळजवळ शून्य बजेटचा चित्रपट, AI ने कसा बदलेल सिनेमा?

फोटो स्रोत, @rahianilbarve/Instagram
- Author, गौरव सोमवंशी
- Role, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट
- वाचन वेळ: 7 मिनिटे
'तुंबाड' सिनेमाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या 'मन-पिशाच' या नवीन चित्रपटाचे पहिले स्क्रीनिंग पाहण्याची संधी मला मिळाली. चित्रपट संपल्यानंतर मी काही मिनिटे पूर्णपणे नि:शब्द झालो होतो. त्यामागे तीन कारणे होती.
1. आपण चित्रपट पाहतो ते मुख्यतः कथा-कथनाच्या कलेसाठी. त्याबाबतीत या चित्रपटाने अगदी अचूक लक्ष्य साधले आहे. एखाद्या चित्रपटासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते प्रेक्षकाला गुंतवून ठेवणे. विशेषतः अशा काळात, जेव्हा आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आपले लक्ष खेचण्यासाठी बनवलेली असते. दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे अशी कथा सांगणे की, जी पाहिल्यानंतर प्रेक्षक काहीतरी विचार करत राहतो. माझ्यासाठी एक प्रेक्षक म्हणून 'मन-पिशाच' हे दोन्ही साध्य करतो.
2. दुसरी जाणीव अशी की हा चित्रपट जवळजवळ शून्य बजेटमध्ये, घरच्या संगणकावर बनवला आहे. पारंपरिक चित्रनिर्मिती कौशल्यात पारंगत असलेल्या एका दिग्दर्शकाने स्वतःहून AI ची साधने शिकून सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण चित्रपट उभा केला आहे
3. चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये राहींनी हा चित्रपट कसा बनवला आणि त्यामागची विचारसरणी काय होती, हेही दाखवले आहे. म्हणजे ते ज्ञान किंवा कौशल्य स्वतःपुरते ठेवत नाहीत.
उलट इतरांसाठी एक मार्गदर्शनच देत आहेत. कारण महत्त्वाच्या ओळखी, शिफारस किंवा भरपूर भांडवल नसताना एखाद्याला असा चित्रपट काढणे नेहमी कितपत शक्य असते, हा प्रश्न इथे उभाच राहतो.
प्रयोग म्हणून हा सिनेमा कसा ठरला?
या 'गेटकीपिंग'च्या मुद्द्याकडे थोड्या वेळाने परत येऊ. पण एक प्रयोग म्हणून 'मन-पिशाच' कसा ठरला, हे आपण राहींच्याच शब्दांत समजून घेऊ. प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा अभ्यास करून राही यांनी आपल्या सोशल मीडियावर याबद्दल सविस्तर लिहिले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, 'मन-पिशाच' या प्रयोगातून एक गोष्ट स्पष्ट होते की, खूप कमी पैशांत एकट्या व्यक्तीलाही AIच्या मदतीने पूर्ण चित्रपट बनवता येतो. पण याचा अर्थ असा होत नाही की प्रेक्षक त्या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडले जातीलच.
त्यांच्या निरीक्षणानुसार चित्रपटाबद्दल उत्सुकता मोठी होती. पण AI मधील दृश्यांची अस्थिरता, चेहऱ्यांतील विसंगती आणि हालचालीतील कृत्रिमपणा यामुळे अनेक प्रेक्षक लवकर बाहेर पडले.
त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की AI ही जादूची कांडी नाही. फक्त प्रॉम्प्टस देऊन चित्रपट तयार होत नाही. त्यासाठी आधी लेखन, शॉट डिझाइन, स्टोरीबोर्ड आणि टायमिंग पक्के असणे गरजेचे आहे.
तसेच AI मुळे चित्रपट निर्मितीची नवी दारे उघडली असली, तरी तिची खरी भाषा अजून सापडलेली नाही. त्यामुळं भविष्यातील AI फिल्ममेकरना एकटेपणा, थकवा आणि व्यसनासारख्या धोक्यांपासून सावध राहावे लागेल.
राहींचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, या दिशेने प्रयोग थांबणार नाहीत. ते जगभर वाढतच राहतील.

फोटो स्रोत, @Rahi Anil Barve/Facebook
पण याचा अर्थ सर्वच गोष्टी पूर्णपणे बदलतील, असे नाही. जसे OTT प्लॅटफॉर्म्स आल्यामुळे थिएटर आणि नाट्यगृहांतील गर्दी काही प्रमाणात कमी झाली, तरी मोठ्या पडद्यावरचा अनुभव पूर्णपणे संपला नाही. त्यात झाला तो बदल मल्टिप्लेक्समुळे अधिक मोठा होता.
उंबरतो इको या विचारवंताने एकदा लिहिलं होतं की, "पुस्तक हे चमचा, कात्री, हातोडा आणि चाक यांसारखे आहे. एकदा त्यांचा शोध लागला की त्यात मूलभूत सुधारणा करता येत नाही. तुम्ही चमच्यापेक्षा अधिक चांगला चमचा बनवू शकत नाही."
त्याचप्रमाणे काही विशिष्ट चित्रपटांचा आणि सिनेमाप्रेमींचा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्याचा आग्रह, प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी कथेमध्ये लेखकाचा जीव आणि दृश्यांमध्ये दिग्दर्शकाचा आत्मा असण्याची पूर्वअट, या गोष्टी काही AI मुळे सहज बदलणार नाहीत.
AI मुळे सिनेमा नेमका कसा बदलेल?
पण ज्या गोष्टी AI मुळे बदलतील, त्या फक्त सिनेमा किंवा सर्जनशीलता लागणाऱ्या कार्यक्षेत्रांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. मुस्तफा सुलेमान हे सध्या मायक्रोसॉफ्टच्या AI डिव्हीजनचे प्रमुख आहेत.
त्यांच्या 'द कमिंग वेव्ह' या पुस्तकात ते स्पष्ट लिहितात की, AI ही आधीच्या तांत्रिक लाटांसारखी केवळ आणखी एक नवी तंत्रक्रांती नाही. ती इतकी व्यापक आणि शक्तिशाली आहे की उद्योग, समाजरचना, अर्थव्यवस्था, युद्ध, राज्यकारभार, कामगारविश्व आणि मानवी दैनंदिन जीवन या सगळ्यांनाच एकाच वेळी बदलू शकते.
त्यामुळे त्यांच्या मते AI ची लाट ही आधीच्या औद्योगिक किंवा डिजिटल क्रांतींपेक्षा कितीतरी मोठी, वेगवान आणि अधिक खोलवर परिणाम करणारी आहे.
अशा वेळी AI हे केवळ आणखी एक नवे तंत्रज्ञान म्हणून राहत नाही. ते अनेक मूलभूत गृहीतकांना पुन्हा तपासून पाहण्याचे निमित्त ठरते. जसे कलाकाराचा आपल्या कलाकृतीशी आणि पारंपरिक इकोसिस्टिमशी असलेला संबंध, माणूस म्हणून आपल्या समाजाशी असलेला संबंध, नागरिक म्हणून देशाशी असलेला संबंध, आणि मानव जातीने निर्माण केलेल्या कष्टाचा प्रतिनिधी म्हणून त्या कष्टाचे रूप समोर येतांना एक योगदानकरता म्हणून असलेला संबंध. म्हणून आता आपण थोडे पुढे जाऊन चित्रनिर्मितीच्या तत्त्वज्ञानाकडे आणि AIच्या भूमिकेकडे पाहूया.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात किती लोकांमध्ये उत्तम कथाकथनाची नैसर्गिक क्षमता आहे आणि ते मोठे चित्रपट दिग्दर्शक होऊ शकतात, हे आपल्याला अचूक माहीत नाही. पण एवढे नक्की आहे की प्रत्यक्ष उद्योगात प्रवेश मिळवणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. अगदी सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो उमेदवार आणि मोजक्या जागा असतात, तशी परिस्थिती इथेही दिसते.
मग हा मार्ग अडवला जातो कसा? अनेक कारणांनी. जात, वर्ग, विचारसरणी, भांडवलाची उपलब्धता, घराणेशाही आणि इतर अनेक गोष्टी. आणि ही परिस्थिती फक्त चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नाही. अनेक क्षेत्रांत ती दिसते.
इथे AI येते तेव्हा ते एक सकारात्मक काम करते. प्रवेशाचे अडथळे फोडून, संधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवते. मन-पिशाच हे त्याचेच एक उदाहरण आहे. पण जर आपण प्रवेशाचे दरवाजे उघडत आहोत, तर त्या प्रक्रियेत काही नुकसानही होऊ शकते का?
उदाहरणार्थ, चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांचे काय? हा प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. आणि हा प्रश्न मला चांगलाच समजतो. कारण मी IT क्षेत्रात आहे आणि माझ्यासारख्या टेक-स्टार्टअपसाठी AIमुळे अस्तित्वाचा धोका इतर अनेकांपेक्षा अधिक असू शकतो. म्हणून हा प्रश्न आपण अधिक व्यापक पद्धतीने समजून घ्यायला हवा.
AI कडून नेमकी काय अपेक्षा ठेवायला हवी?
समोर उभ्या ठाकलेल्या AI रुपी यक्षप्रश्नाला मी 'नवीन नोकऱ्या निर्माण होतील' किंवा 'लोकांना नव्याने कौशल्ये शिकावी लागतील' असे उथळ दिलासादायक उत्तर देणार नाही. त्या गोष्टी काही अंशी खऱ्या असू शकतात. पण पूर्ण उत्तर नाहीत. कारण AI सारख्या प्रचंड मोठ्या बदलासाठी आपण अनेकदा चुकीचा प्रश्न विचारतो.
खरा प्रश्न असा नाही की, AI मुळे धोक्यात आलेल्या नोकऱ्यांचे काय होईल. खरा प्रश्न असा आहे की समाज म्हणून आपण जगण्याची मूलभूत संसाधने सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी काय करत आहोत? आरोग्य, शिक्षण आणि जगण्यासाठी आवश्यक किमान साधने याबद्दल आपण काय विचार करतो?
AI अशा जगासाठी असायला हवे, जिथे संपत्तीचे अधिक न्याय्य वाटप होईल आणि मूलभूत हक्क सर्वांना मिळतील. किमान कागदावर तरी बहुतेक देशांचा हा उद्देश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
AI स्वतः अस्तित्वात येऊ शकले कारण अनेक पिढ्यांनी निर्माण केलेले ज्ञान, गाळलेला घाम, सर्जनशील काम आणि यावर आधारित डेटावर ते उभे आहे. मग अशा सामूहिक ज्ञानातून तयार झालेल्या तंत्रज्ञानाचे फायदे काही मोजक्या खाजगी कंपन्यांनाच का मिळावेत, हा प्रश्न विचारायलाच हवा.
म्हणून एका बाजूला या मोठ्या सामाजिक प्रश्नांवर विचार करणे आवश्यक आहे, आणि दुसऱ्या बाजूला राही अनिल बर्वे यांनी केलेल्या या धाडसी आणि जुन्या मर्यादा तोडणाऱ्या कामाचे कौतुकही करायला हवे.
उद्या AI मुळे एखाद्या लहान शहरातील किंवा गावातील व्यक्तीला मुंबई किंवा बेंगळुरूतील मोठ्या स्टार्टअपसारखी साधने वापरून व्यवसाय उभा करता येईल. मग आपण त्या व्यक्तीला विचारणार आहोत का की, तू इथपर्यंत कसा आलास, हे क्षेत्र तर तुझ्यासारख्यांसाठी नव्हतेच? किंवा आज जसे आपण इंग्रजी येणे आणि अक्कल असणे यांतील फरक विसरून जातो, त्या स्थितीत अनेक जण AIचा वापर करून त्या भीतीवर मात करत असतील, तर आपण त्यांना सांगणार आहोत का की, 'तू मराठी माध्यमातून शिकला आहेस, तू इतके पुढे जाऊ नकोस?'
AI ची दोन समांतर सत्य
याचा अर्थ असा नाही की AI ला घाबरून सर्व साधने फेकून द्यायची. उलट, राही अनिल बर्वे यांच्यासारख्या प्रयोगांकडून आपण एक प्रकारची आशा शिकली पाहिजे. कारण ते आपल्याला दाखवतात की AI सारखी शिडी वापरून मोठ्या भिंती ओलांडून काहीतरी निर्माण करता येते.
पण त्याच वेळी त्या आशेचा अर्थ केवळ एखादी वैयक्तिक यशोगाथा किंवा मार्यादित लोकांपुरता सीमित पर्याय, असा नसावा. नाहीतर पुन्हा तेच होईल.
काही जण वर जातील, बाकीचे त्यांची प्रेरणादायी कथा ऐकत राहतील. तंत्रज्ञानाच्या प्रत्येक लाटेनंतर जर संपत्ती अधिक केंद्रित होत असेल, तर त्या लाटेला प्रगती म्हणता येत नाही.
माझ्या दृष्टीने AI आपल्यासमोर दोन समांतर सत्ये ठेवते. पहिलं सत्य म्हणजे हे मानवी ज्ञानाच्या सामूहिक इतिहासातून जन्मलेले एक प्रचंड यश आहे. दुसरे सत्य म्हणजे या यशाचे फायदे समाजात कसे वाटले जातील, यावरच त्याचे नैतिक मूल्य ठरणार आहे.
जर AIमुळे एखाद्या लहान शहरातील, खेड्यातील, मराठी माध्यमात शिकलेल्या, इंग्रजीचे प्रभुत्व नसलेल्या, पण बुद्धिमत्ता आणि जिद्द असलेल्या व्यक्तीला मोठ्या शहरातील भांडवलशाही परिसंस्थेशी दोन हात करता येत असतील, तर ही गोष्ट स्वागतार्ह आहे. पण त्याच वेळी AIच्या नावाखाली लाखो लोक अधिक असुरक्षित होत असतील, तर तो सामाजिक न्यायाचा प्रश्न देखील बनतो.

फोटो स्रोत, Getty Images
AI मुळे पुढे अनेक संधी निर्माण होऊ शकतात. पण त्याच वेळी नोकऱ्या आणि उपजीविकेबाबतचे प्रश्नही वास्तव आहेत. माझ्यासारख्या स्टार्टअपसाठीसुद्धा. म्हणून आपण दोन गोष्टी वेगळ्या ओळखायला हव्यात.
एक म्हणजे AI हे मानवी ज्ञानाच्या सामूहिक प्रयत्नांचे मोठे यश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या यशाचे फायदे समाजात कसे वाटले जाणार, हा प्रश्न.
कदाचित म्हणूनच, AI बद्दलचा खरा वाद तांत्रिक नसून नैतिक आणि राजकीय आहे. प्रश्न फक्त एवढाच नाही की मशीन काय करू शकते. प्रश्न हा आहे की समाज काय करणार आहे.
आपण असे समाज उभारणार आहोत का, जिथे उत्पादकता वाढली की मानवी जीवन सर्वांसाठीच अधिक वैभवशाली होते? की असे समाज, जिथे उत्पादकता वाढली की नफा काही मोजक्यांकडे साठतो आणि बाकीच्यांनी अधिक स्पर्धा, अधिक असुरक्षितता आणि अधिक लाचारी सहन करायची?
मन-पिशाच पाहताना मला त्यामुळे मला एक चित्रपटसोबतच एक दार उघडताना दिसले. त्याचवेळी, त्या दाराच्या पलीकडे उभे असलेले अनेक बेचैन प्रश्नही दिसले.
हा चित्रपट महत्त्वाचा आहे कारण तो एक सीमा ओलांडतो. तो दाखवतो की जुन्या बंद रचनांना तडे जाऊ शकतात. पण तो तितक्याच जोरात आपल्याला हेही आठवण करून देतो की, साधने बदलली म्हणून समाज आपोआप समान होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मन-पिशाचची पटकथा जाई गुलमोहर यांनी एका AI सिनेमाच्या विशिष्ट गरजांना अनुसरून लिहिली आहे, अभिनेता यानिया भारद्वाज आणि दीपक दामले यांच्या योगदानासह, आणि राही अनिल बर्वे यांच्या धाडसी प्रयोगशीलतेतून हा चित्रपट उभा राहतो.
हा चित्रपट पाहताना स्वतःलाही विचारा: जर AI मुळे निर्माण करण्याची साधने अधिक लोकांच्या हातात येणार असतील, तर जगण्याची साधनेही येणार का? आणि जर नाही, तर मग आपल्या समाजरचनेतील खरा दोष नेमका कुठे आहे?
शेवटी राहींच्याच शब्दांत:
"जर या प्रयोगामुळे एखाद्या गरीब, निराश कलाकारालाही जवळजवळ काहीच नसताना काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली, आणि त्याला त्या प्रक्रियेत आनंद मिळाला, तर हा प्रयोग यशस्वी झाला असे समजावे."
(लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























