You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टी 20 विश्वचषक : भारताला सलग दुसऱ्यांदा जगज्जेता बनवणारे टीम इंडियाचे 7 हिरो
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 11 मिनिटे
क्रिकेट हा टीम गेम आहे असं म्हटलं जातं. त्यात तथ्यही आहे. कारण एखाद्या खेळाडूनं केलेल्या मोठ्या खेळीच्या किंवा चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर संघ जिंकत असला तरी त्यासाठी इतर खेळाडूंची साथही हवीच असते. मग ती फिल्डिंगमध्ये असो वा फलंदाजी आणि गोलंदाजीही.
त्यामुळेच खेळाडू स्वतः विजयाचा श्रेय घेण्यापेक्षा संपूर्ण संघाचे श्रेय आहे, असं नेहमीच सांगत असतात. यंदाच्या विश्वचषकातही भारतीय संघाकडून किंवा भारतीय संघातील खेळाडूंच्या अशाच सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. भारताचा हा तिसरा टी ट्वेंटी विश्वचषक विजय ठरला.
ज्यावेळी गरज असेल तेव्हा एखादा फलंदाज, गोलंदाज अगदी फिल्डर आणि कर्णधार यांनी मोक्याच्या क्षणी जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विश्वचषक विजयासाठी संपूर्ण प्रयत्न पणाला लावले.
या संपूर्ण स्पर्धेचा विचार करता भारतीय संघातील कोणताही एकच खेळाडू चमकला असं झालं नाही. कारण सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक विकेटच्या यादीत भारतीय क्रिकेटपटू आघाडीवर दिसत नाही.
पण तसं असलं तरी, भारतीय संघाकडून प्रत्येक सामन्यात कुणीतरी जबाबदारी उचलली आणि त्या सामन्याची धुरा वाहत इतरांच्या मदतीने भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळंच या संपूर्ण स्पर्धेत एक सामना वगळता भारतानं कोणत्याही सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पाहिलं नाही.
पण तसं असलं तरी सगळ्याच अकरा खेळाडूंनी चांगलीच कामगिरी केली का? तर तसंही नाही.
या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या सात खेळाडूंनी वेगवेगळ्या क्षणी पुढं येत मोलाची भूमिका बजावली. इतरांनीही त्यांना चांगली साथ दिली. पण विजयाचे हिरो हे सात जण ठरले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
जाणून घेऊया ते सात खेळाडू कोण? आणि त्यांनी केलेल्या कामगिरी विषयी.
सूर्यकुमार यादव
या यादीची सुरुवात करायची झाली तर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पासून करुया. आता सुरुवात केली म्हणजे सूर्यकुमार भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा क्रिकेटपटू आहे, असं नाही.
पण एवढ्या मोठ्या स्पर्धेत, घरच्या चाहत्यांसमोर खेळण्याच्या दबावात संघाचं नेतृत्व त्यानं केलं. अत्यंत उत्तमपणे त्यानं ही जबाबदारी पार पाडली. शिवाय, फलंदाज म्हणूनही त्यानं गरज असताना विजयासाठी मोलाचा हातभार लावला.
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी आणि सोबतच संघाचं नेतृत्व अशी दुहेरी जबाबदारी सूर्यकुमार यादववर होती.
फलंदाजीचा विचार करता स्पर्धेपूर्वी सूर्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. पण न्यूझीलंडबरोबर झालेल्या स्पर्धेत सूर्याला फॉर्म गवसला आणि त्याच फॉर्मसह तो विश्वचषक स्पर्धेत उतरला.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या विरुद्ध भारतीय संघाची फलंदाजीची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या धावसंख्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना हैराण केलं.
अभिषेक, ईशान आणि तिलक अत्यंत स्वस्तात बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव पुढं आला आणि 84 धावांची नाबाद खेळी करत त्यांनी भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली.
सूर्यकुमारच्या 84 धावा नसत्या तर भारतीय संघाला कदाचित पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकालाचं तोंडही पाहावं लागू शकलं असतं.
सूर्याच्या फलंदाजीचा जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर नामिबियाविरुद्ध सूर्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, पाकिस्तान विरोधातल्या सामन्यात त्यांना 32 धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड विरुद्धही 34 धावा केल्या.
आकडा पाहता या धावा खूप नसल्या तरी भारतीय संघाला विकेट पडल्यानंतर फलंदाजीमध्ये स्थैर्य देण्याचं काम सूर्यानं करुन दाखवलं. झिम्बाब्वेच्या विरुद्धही सूर्यानं 33 धावा केल्या. त्यामुळं फार मोठे यश नसलं तरी फलंदाजीच्या दृष्टीने विचार करता सूर्याचा हा विश्वचषक बरा राहिला.
त्यानंतर सूर्याच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण स्पर्धेत संघाला बांधून ठेवण्याची कामगिरी सूर्याने चांगलीच केली.
भारतीय संघाची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टी या स्पर्धेमध्ये उच्च कामगिरीच्या ठरल्या, असं नाही. अनेक वेळा भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली तर फलंदाजांचे फलंदाजांनाही अपयश आल्याचे पाहायला मिळालं.
क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही भारतीय संघ फारसं चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र, तसं असलं तरीही सांघिक कामगिरीच्या जोरावर भारत सामने जिंकत राहिला.
त्याचं श्रेय सूर्याच्या नेतृत्वाला द्यायला द्यावेच लागेल
गोलंदाजीत वेळोवेळी करावे लागणारे बदल असतील किंवा फलंदाजांना यशापयशानंतर दिलं जाणारा प्रोत्साहन आणि संघ निवडताना संतुलन ठेवत घ्यावे लागणारे कठोर निर्णय हे सर्व सूर्यानं त्याच्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यानं केलं.
अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांचा वापर त्यानं केला. बुमरा, हार्दिक पांड्या यांच्या ओव्हरच्या शिल्लक ठेवत शेवटी ज्याप्रकारे त्यांचा वापर केला त्यामुळं सूर्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणाची झलक पुन्हा एकदा दिसली.
एकूणच, या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी जे हिरो ठरले त्यात सूर्याचंही नाव नक्कीच आहे.
जसप्रीत बुमरा
टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीच्या यशाचं वर्णन करायचं झालं तर त्यासाठी जसप्रीत बुमरा एवढंच नाव पुरेसं आहे.
जगातील या सर्वोत्तम गोलंदाजानं स्पर्धेत वेळोवेळी मोक्याच्या क्षणी भारताला सामन्यात पुनरागमनाची संधी उपलब्ध करून दिली आणि विजयाचा मार्ग खुला करून दिला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं होतं.
तंदुरुस्त नसल्यानं बुमरा अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळला नाही. नामिबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा दिल्या.
पाकिस्तान विरोधात त्यानं दोनच ओव्हर टाकल्या आणि त्यातही साईम अयुब आणि सलमान आगा या दोन महत्त्वाच्या विकेट एकाच ओव्हरमध्ये घेत पाकिस्तानला भगदाड पाडलं. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी चांगलीच ढेपाळली.
नेदरलँड विरोधातील सामन्यातही बुमराहनं फक्त तीन ओव्हर टाकत एक विकेट घेतली. या सर्वच सामन्यातील गोलंदाजीचा त्याचा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्याचा इकॉनॉमी रेट. सेमिफायनलपर्यंतचे आकडे पाहता, त्यानं 6.60 च्या इकॉनॉमि रेटनं 10 विकेट घेतल्या.
फायनलमध्येही त्याच्या पहिल्याच चेंडूवर बुमरानं रचिन रविंद्रला बाद करत भारताला यश मिळवून दिलं.
दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतानं जो सामना गमावला तो फलंदाजाच्या अपयशामुळं गमावला होता. तेव्हाही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आवर घालण्याचं काम बुमरानंच केलं.
त्यानं दक्षिण आफ्रिकेविरोधात चार ओव्हर अवघ्या 15 धावा देत तीन अत्यंत महत्त्वाच्या फलंदाजांना त्यांना बाद केलं होतं.
वेस्ट इंडीज विरोधातल्या सामन्यातही भारताची 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती होती. त्यातही वेस्टइंडीजच्या तडाखेबाज फलंदाजी करणाऱ्या आघाडीच्या दोन फलंदाजांना बुमरानं एकाच ओव्हरमध्ये परत पाठवलं होतं.
अशा सर्वच सामन्यांमध्ये बुमराची जादू चालल्याचं पाहायला मिळालं. विशेषतः सेमी फायनल सामन्यांमध्ये.
भारताने सेमी फायनल मध्ये इंग्लंडला 254 मोठं आव्हान दिलं. पण, इंग्लंडची फलंदाजी पाहता शेवटी तेही पुरेसं वाटेना. बेथलनं शतकी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेलं. त्यामुळं इंग्लंड विक्रमी धावसंख्या करत भारताचा पराभव करणार असं वाटू लागलं.
त्याचवेळी सूर्यानं त्याच्या ताफ्यातलं सर्वात महत्त्वाचं शस्त्र काढलं, ते म्हणजे जसप्रीत बुमरा. बुमराच्या ओव्हर शिल्लक ठेवायच्या आणि शेवटी वापरायच्या हा हा सूर्यकुमारचा या संपूर्ण स्पर्धेतला हातखंडा राहिला. इथंही त्यानं तेच केलं.
इंग्लंडला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये विजयासाठी 69 धावा हव्या होत्या. टी 20 चा विचार करता 30 चेंडू मध्ये 69 धावा कधीही अशक्य नसतात. त्यात बेथल ज्या पद्धतीनं फलंदाजी करत होता त्यामुळं हे अगदीच सहज शक्य वाटू लागलं. मात्र, इंग्लंडच्या विजयात अडथळा बनून उभा होता बुमरा.
त्याच्या दोन ओव्हर शिल्लक होत्या. सूर्यानं त्याच्या हातात चेंडू दिला आणि 16 वी ओव्हर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत त्यानं अवघ्या आठ धावा दिल्या. त्यामुळं इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव वाढण्यास सुरुवात झाली. नंतर पुन्हा 18 वी ओव्हर बुमरानं टाकली. त्यात तर त्यानं सहाही चेंडू अचूक टप्प्यावर एकापाठोपाठ एक यॉर्कर टाकले आणि अवघ्या सहा धावा दिल्या.
इंग्लंडच्या फलंदाजांनीही बुमरासमोर असल्याचं पाहिलं आणि धावा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हीच त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली दहशत आहे. परिणामी, इंग्लंडचा हवा असलेला रनरेट प्रचंड वाढला. नंतर पांड्या आणि दुबेनं औपचारिकता पूर्ण केली.
एकूणच या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत जरी बुमरा आघाडीवर नसला, तरी भारतीय संघाला अडचणीत असताना मार्ग दाखवण्याचा काम त्यांनं केलं आणि विजयाचा शिल्पकार ठरला.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 14 विकेटसह बुमरा पहिल्या स्थानी राहिला.
संजू सॅमसन
संजू सॅमसन या स्पर्धेतच नाही तर गेली काही वर्ष सातत्यानं प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. संजूला मिळणारी किंवा न मिळणारी संधी, त्याचा केला जाणारा वापर यावरून अनेक टीका केल्या जात होत्या.
संजूचे चाहते नाराज होते त्यामुळे संजूवर या स्पर्धेत सर्वांचंच लक्ष होतं. गंभीरनं अत्यंत विश्वास दाखवत त्याला संघात घेतलं होतं.
पण, या स्पर्धेतही संजू पहिला सामना खेळला नाही. टीम कॉम्बिनेशनच्या नावाने त्याला अनेकदा अशाच प्रकारे डगआऊटमध्ये बसावं लागलं. दुसऱ्या सामन्यात तो खेळला, पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 22 धावा केल्या. पाकिस्तान विरोधात आणि नंतर अगदी सुपर 8 च्या पहिल्या सामन्यापर्यंतही संजूला संधी मिळाली नाही.
पण आघाडीच्या जोडीचं अपयश, रिंकू नसणं यामुळं संजूला झिम्बाब्वेविरुद्ध सुपर 8 च्या सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. तिथं संजून 24 धावा केल्या. या धावा जरी कमी असल्या तरी त्यांनं ज्या पद्धतीची फटकेबाजी केली होती त्यामुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली आणि त्याचा संघाला फायदा झाला.
त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात संजूनं त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम म्हणावी अशी खेळी केली. संजूनं नाबाद 97 धावा करत कठिण परिस्थितीत भारतीय संघाला एक हाती विजय मिळवून दिला. त्या जोरावरच भारतीय संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचला आणि खेळीनं संजूचं चौफेर कौतुकही झालं.
एवढंच नाही संजूनं नाबाद 97 धावा करत जो फॉर्म दाखवला होता, त्याच फॉर्मसह तो इंग्लंड विरुद्ध सेमी फायनल सामन्यात उतरला आणि प्रथम फलंदाजी करताना अगदी तडाखेबाज खेळत 42 चेंडू मध्ये 89 धावा ठोकल्या. त्यामुळं भारतीय संघाला 250 धावांच्या पुढे जाण्यात यश मिळालं.
या दोन्ही सामन्यांमध्ये संजू 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरला. म्हणजे भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन नॉक आऊट सामन्यांमध्ये संजूनं विजयात मोलाचा वाटा असलेली कामगिरी केली.
त्यानंतर फायनलमध्येही सलामीला येत 89 धावांची खेळी करत संजूनं सलग तिन अर्धशतकी खेळी केल्या.
संजू सॅमसन याखेळीनं स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. त्यानं 321 धावा केल्या आहेत. या धावा त्यानं 5 सामन्यांतच केल्या. कदाचित सगळे सामने खेळले असते तर त्याला सर्वोत्तम कामगिरीही करता आली असती.
पण या कामगिरीच्या जोरावर तो विश्वचषक स्पर्धेत मालिकावीर ठरला.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सतत संघात आत-बाहेर होणाऱ्या आणि कामगिरी मध्ये सातत्य नसल्याचा ठपका लागलेल्या संजूला चांगलाच दिलासा मिळाला असणार.
पण भारतीय संघासाठीही रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत संजूला असा सूर गवसणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि खास आहे.
ईशान किशन
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघांमध्ये ज्यांचा समावेश होणार याचे अंदाज बांधले जात होते, त्यामध्ये कधीही ईशान किशनचं नाव समोर येत नव्हतं.
ईशान किशन बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघाबाहेर होता. त्यामुळं त्याला संधी मिळेल असा विचारही कोणी केला नव्हता. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशान किशनने सातत्याने चांगली आणि तडाखेबाज फलंदाजी करत त्याच्या नावाचा विचार करण्यास निवड समितीला भाग पाडलं.
त्यामुळं निवड समितीने ईशानच्या नावाचा विचार केला आणि विश्वचषक सुरू होण्यापूर्वी झालेल्या मालिकांमध्ये ईशानं त्याची निवड सार्थ असल्याचं दाखवूनही दिलं.
या मालिकांमध्ये केलेल्या कामगिरीच्या आत्मविश्वासासह ईशान विश्वचषक स्पर्धेत उतरला. पहिल्या सामन्यांच ईशानला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात ईशान किशननं 61 धावांची खेळी करत निवड सार्थ असल्याचं दाखवून दिल.
त्यानंतर पाकिस्तान विरोधातही ईशान किशननं 40 चेंडू मध्ये 77 धावा करत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. सलामीच्या जोडीमध्ये अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत असताना ईशान किशन मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करत ती कमतरता भरून काढत होता.
सेमिफायनलपर्यंत आकड्यांचा विचार करता फक्त दोन अर्धशतकी खेळी असल्या तरी ईशान किशननं झिम्बाब्वे विरोधात केलेल्या 38 धावा आणि इंग्लंड विरोधात सेमी फायनलमध्ये केलेल्या 18 चेंडूतील 39 धावाही महत्त्वाच्या ठरला. त्यामुळं पॉवर प्लेमध्ये भारताला सामन्यात अगदी पुढे नेण्यासाठी त्याची मदत झाली.
शिवाय फायनलमध्ये केलेल्या तडाखेबाज अर्धशतकामुळं न्यूझीलंडसमोर दबाव टाकणारी 255 धावसंख्या उभारण्यात भारताला यश मिळालं होतं.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाज म्हणून भारताकडून सातत्याने सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये ईशान किशनचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला.
त्यानं स्पर्धेत 317 धावा केल्या आहेत.
हार्दिक पांड्या
एखाद्या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू कशी कामगिरी करतात त्यावर त्या संपूर्ण संघाची कामगिरी ठरत असते. याच दृष्टीने विचार केला तर हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी अत्यंत मोलाचा क्रिकेटपटू ठरतो.
फलंदाजीमध्ये धावांची गती वाढवायची असेल आणि हार्दिक पांड्या मैदानावर असेल तर भारतीय संघाला निश्चित राहता येतं. तसंच त्याच्या हाती चेंडू असेल तेव्हाही चाहत्यांना विश्वास असतो.
पांड्याची या स्पर्धेत सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात त्याला फार धावा करता आल्या नसल्या तरी नामीबियाविरुद्ध खेळताना 52 धावांची अर्धशतकी खेळी करत हार्दिकनं दम दाखवून दिला होता. त्यानंतर नेदरलँड विरुद्धच्या 30 धावा आणि सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेच्या विरोधात आणखी एक अर्धशतकी खेळीही त्यानं केली.
सेमी फायनलमध्येही इंग्लंडच्या विरोधात पांड्यांनं तडाखेबाज फलंदाजी केल्याचा पाहायला मिळालं. 12 चेंडूमध्ये 27 धावांवर खेळत असताना तो धावबाद झाला. त्यामुळं फलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केलीच. शिवाय गोलंदाजीतही पूर्ण वेळ गोलंदाज म्हणून अत्यंत सक्षमपणे हार्दिक पांड्यानं जबाबदारी निभावली.
सूर्याला गरज असेल त्यावेळी विकेट मिळवून देण्याची आणि समोरच्या संघाला दबावात आणण्याची कामगिरी त्यानं अनेकदा केली. सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा संघ विजयी होईल की काय अशी शक्यता वाटत असतानाच, बुमरानंतर महत्त्वाची 19 वी ओव्हर टाकत हार्दिक पांड्यानं काम सोपं केलं.
पांड्यानं स्पर्धेत 217 धावांसह 9 विकेटही (फायनलपूर्वीचे आकडे) घेतल्या.
शिवम दुबे
भारतीय संघाच्या ताफ्यात असलेला आणखी एक अष्टपैलू म्हणजे शिवम दुबे. शिवम खऱ्या अर्थानं डार्क हॉर्स म्हणावा अशी कामगिरी करून दाखवणारा क्रिकेटपटू ठरला आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये संघासाठी त्यानं महत्त्वाच्या क्षणी कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.
फलंदाजीचा विचार करता शिवम खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यानं, ऐनवेळी जाऊन फटकेबाजी करणं हीच कामगिरी त्याल बहुतांश वेळा पार पाडावी लागते. या अपेक्षा त्यानं पूर्णही केल्या आहेत.
नामिबियाविरुद्ध खेळताना त्यांना सोळा चेंडूमध्ये 23 धावा करत फटकेबाजी केली. तर पाकिस्तान विरोधातही 17 चेंडूमध्ये 27 धावा करण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर नेदरलँड विरुद्ध 31 चेंडूमध्ये तडाखेबाज 66 धावांची अर्धशतकी खेळी करत शिवम दुबेनं फलंदाजीची क्षमताही दाखवून दिली.
दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताने गमावलेल्या एकमेव सामन्यात भारताकडून एकाच फलंदाजांना लढा दिला होता, तो होता शिवम दुबे. शिवमनं या सामन्यात 37 चेंडूमध्ये 42 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्टइंडीज विरोधातील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात शिवम फक्त चार चेंडू खेळला आणि पण त्यात त्याने लागवलेले दोन चौकार भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
भारतीय संघाला हार्दिक बाद झाला तेव्हा 10 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज होती. संजू सॅमसन दुसऱ्या बाजूला उभा होता, पण अखेरच्या ओव्हरमध्ये जास्त धावांचा दबावही धोकादायक ठरणारा होता. शिवमनं मात्र येताच दोन चौकार खेचत ती चिंताच संपवली. संजूवरचा दबाव एकदम कमी झाला आणि भारतानं सहज विजय मिळवला.
इंग्लंडविरुद्ध सेमी फायनल सामन्यात संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी अत्यंत तडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघाला 13 ओव्हरमध्येच 150 च्या पुढं नेलं होतं. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल असतानाच ईशान बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमारनं स्वतः फलंदाजीला न येता शिवम दुबेला फलंदाजीला पाठवलं. फटकेबादी करत धावांची गती कायम होणे हा त्यामागचा हेतू होता.
शिवम दुबेनंही हा विश्वास सार्थ ठरवत 25 चेंडूमध्ये 43 धावा करत भारतीय संघाची धावसंख्या अडीचशे पार नेण्यात मोलाची मदत केली. एका चुकीच्या कॉलनं तो धावबाद झाला. नसता धावसंख्या कदाचित 270 वरही जाऊ शकली असती.
त्यानंतर फायनलमध्येही शेवटच्या ओव्हरमध्ये भारताच्या एकापाठोपाठ विकेट गेल्यानं धावा कमी होणार असं वाटत होतं. पण दुबेनं शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा कुटत भारताला 255 पर्यंत पोहोचवलं. त्याने दोन षटकार आणि 3 चौकार खेचत 8 चेंडूमध्ये 26 धावा केल्या.
त्यानं स्पर्धेमध्ये 235 धावा करण्याबरोबरच 5 विकेटही घेतल्यात. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करत असतील तर पर्याय म्हणून गोलंदाजी करताना शिवम अनेकदा चांगली कामगिरी करतो. एकूणच वेळोवेळी त्याच्यावर टाकलेली जबाबदारी फलंदाजी अन् गोलंदाजीतूनही पार पाडत शिवम दुबेनं स्पर्धेतला हिरो ठरला.
अक्षर पटेल
भारतीय संघातला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाचा उपकर्णधार अक्षर पटेल. अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीचा भारतीय संघाला या स्पर्धेत चांगलाच फायदा झाल्याचा पाहायला मिळालं. फलंदाज म्हणून अक्षर पटेल ची कामगिरी फारशी चांगली झालेली नसली तरी गोलंदाज म्हणूननं चांगली कामगिरी केली.
पण भारतीय संघाच्या विश्वचषकातील हिरोंच्या यादीत त्याचा समावेश होण्याचं कारण म्हणजे, सेमिफायनल सामन्यात त्यानं क्षेत्ररक्षणातून दाखवलेली अष्टपैलू कामगिरी.
कदाचित याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडच्या हातातून सेमी फायनलचा सामना खेचून आणला असं म्हणणं अगदीच वावगं ठरणार नाही.
भारताने दिलेलं 254 धावांचा आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांची जोरदार फटकेबाजी सुरू होती. तेव्हा अक्षर पटेलने बुमराच्या घेतलेला इंग्लंडचा कर्णधार ब्रूकचा झेल, सामन्याची दिशा पटवणारा ठरला.
उलट्या दिशेला धावत जात अत्यंत शेवटपर्यंत चेंडूवर नजर खिळवून ठेवत अक्षरनं ज्या पद्धतीनं हा झेल घेतला त्यामुळं इंग्लंडला मोठा धक्का बसला आणि सामन्यात भारतीय संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
हा एकच नव्हे तर विल जॅक्सचाही झेल घेण्यासाठी अक्षरनं जे प्रयत्न केले त्याचंही प्रचंड कौतुक झालं. अक्षर पटेलनं सीमारेषेवर लांबून धावत येत हा झेल घेतला, पण तोल जाऊन सीमेच्या पलिकडे पडण्याची शक्यता वाटताच, त्यानं समोर उभ्या शिवमकडं चेंडू सोपवला, आणि जॅक्स बाद झाला. नोंदीमध्ये हा झेल शिवमच्या नावावर असला, तरी त्याचं श्रेय पूर्णपणे अक्षरलाच आहे.
विशेष म्हणजे, गोलंदाजी करताना अक्षर पटेलनं स्पर्धेमध्ये 11 विकेटही घेतल्या आहेत. अनेकदा मोक्याच्या क्षणी त्यानं भारताला विकेट मिळवून दिल्या. फायनलमध्ये 3 विकेट घेत त्यानं विजयात मोलाची भूमिका बजावली.
हे 7 विश्वचषक स्पर्धेतील विजयाचे हिरो असले तरी, तिलक, अभिषेक, अर्शदीप, सुंदर, वरुण, कुलदीप, सिराज या सर्वांनीही नक्कीच चांगली कामगिरी केली, हेही नाकारता येणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)