जखमेवर कुत्र्यानं चाटलं म्हणून झाला 'हा' आजार, दोन्ही हात आणि पाय गमावण्याची आली वेळ

फोटो कॅप्शन, मनजीत संघा यांना हॉस्पिटलमध्ये 7 महिने उपचार घेतल्यानंतर सेप्सिसबद्दल जागरुकता निर्माण करायची आहे
    • Author, जोश सँडीफोर्ड
    • Role, वुलव्हरहॅम्पटनमध्ये
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(इशारा: या लेखात वाचकांना अस्वस्थ करणारे फोटो आहेत.)

त्यांचं नाव मनजीत संघा आहे. त्या तब्बल 32 आठवडे हॉस्पिटलमध्ये राहिल्या. ह्रदयविकाराचे अनेक झटके आल्यानंतर, तसंच दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावल्यावर, अखेर सेप्सिसमधून बचावल्यानंतर 56 वर्षांच्या मनजीत संघा घरी परतल्या आहेत.

सेप्सिस हा आजार असून त्यात कोणत्याही संसर्गामुळे जीवाला धोका निर्माण होतो. यात ऊतीं नष्ट होणं, अवयव निकामी होण्याचा तसंच मृत्यू होण्याचा धोका असतो.

डॉक्टरांनाही भीती वाटत होती की, मनजीत संघा यांचा जीव वाचवणं फार कठीण आहे. मात्र प्रत्यक्षात मनजीत यांनी ही जीवन मरणाची लढाई जिंकली आणि त्या बुधवारी (18 फेब्रुवारी) बर्मिंगहॅममधील मोसेली हॉल या हॉस्पिटलमधील वॉर्ड 9 मधून घरी परतल्या. तेव्हा वोल्व्हरहॅम्प्टन/स्टॅफोर्डशायर सीमेवरील पेन इथल्या त्यांच्या कुटुंबानं त्यांचं एखाद्या हिरोसारखं स्वागत करण्यात आलं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

कुत्र्यानं ओरखड्यावर चाटल्यामुळे सेप्सिस झाल्याची शक्यता

डॉक्टरांना वाटतं की मनजीत यांना झालेला सेप्सिस हा आजार कदाचित त्यांच्या कुत्र्यानं त्यांचा छोटासा ओरखडा किंवा किंचित कापलेलं चाटल्यामुळे झाला असावा. या एका साधारण निरागस कृतीमुळे मनजीत यांना सेप्सिस झाला असावा.

आता त्या बऱ्या होत आहेत आणि त्यांच्या आयुष्याची पुन्हा नव्यानं सुरुवात करत आहेत. असं असतानाच 'हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं', असं वाटून त्या इतरांना सेप्सिसच्या धोक्याबद्दल सावध करू इच्छितात.

फोटो कॅप्शन, मोसेली हॉल हॉस्पिटलमध्ये मनजित संघा, बुधवारी त्या हॉस्पिटलमधून घरी गेल्या

"या अनुभवाबद्दल सांगणं ही कठीण गोष्ट आहे. खूप थोड्या कालावधीत तुमचे हात आणि तुमचे पाय गमावणं ही खूप मोठी गोष्ट आहे," असं मनजीत म्हणतात.

त्या म्हणतात, "हे अतिशय गंभीर आहे आणि ते हलकेपणानं घेऊ नये."

सेप्सिस काय असतो? त्यात काय होतं?

सेप्सिस हा एक दुर्मिळ मात्र गंभीर आजार आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजार आणि संसर्गांविरुद्ध लढण्यासाठी असते. मात्र जेव्हा तुमची हीच रोगप्रतिकारक शक्ती, तुमच्याच शरीरातील ऊती आणि अवयवांवर हल्ला करू लागते, तेव्हा सेप्सिस होतो.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस)चं म्हणणं आहे की हा एक जीवघेणा आजार आहे आणि त्याचं निदान होणं कठीण असू शकतं. तर युके सेप्सिस ट्रस्टचं म्हणणं आहे की युकेमध्ये दरवर्षी सेप्सिसमुळे जवळपास 50,000 मृत्यू होतात.

प्रौढांमध्ये सेप्सिसची पुढील लक्षणं आढळतात. यात अस्पष्ट बोलणं, अतिशय थरथरणं किंवा स्नायू दुखणं, तीव्र धाप लागणं आणि त्वचेवर डाग येणं किंवा रंग फिकट होणं यांचा समावेश असतो. मात्र ही लक्षणं एवढ्यापुरतीच मर्यादित नसतात.

फोटो स्रोत, Kam Sangha

फोटो कॅप्शन, आता बरं होत असलेल्या मनजीत संघा म्हणाल्या की एका आठवड्यात त्यांचं आयुष्य बदललं

मनजीत यांच्याबाबतीत नेमकं काय झालं होतं?

मनजीत आजारी पडण्यापूर्वी आठवड्याचे सातही दिवस काम करायच्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यातील एका रविवारी दुपारी त्या जेव्हा घरी परतल्या, तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांचे हात आणि पाय बर्फासारखे थंड पडले होते. त्यांचे ओठ जांभळे झाले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

फोटो कॅप्शन, आता घरी परतल्यावर, मनजीत संघा यांना त्यांचे पती काम आधार देत आहेत, ते कायम त्यांच्या पाठीशी आहेत

मनजीत यांचे पती काम संघा म्हणाले, "तुमचं मन सैरभैर असतं, तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असता. तुमच्या मनात विचार येतो की 24 तासांपेक्षा कमी वेळात हे कसं घडू शकतं?"

ते पुढे म्हणाले, "शनिवारी एक मिनिटभर ती कुत्र्याशी खेळत होती. रविवारी ती कामावर गेली आणि सोमवारी रात्री ती कोमामध्ये होती."

मनजीत संघा वुल्व्हरहॅम्पटनमधील न्यू क्रॉस हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात असताना, त्याचं ह्रदय 6 वेळा बंद पडलं होतं.

दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावले

शेजारच्या डुडलीमधील रसेल्स हॉल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सना आजार पसरल्यामुळे, नंतर मनजीत यांचे दोन्ही पाय गुडख्याखाली कापावे लागले. तसंच दोन्ही हातही कापावे लागले.

या माजी फार्मसी कर्मचाऱ्याला त्यांचा प्लीहादेखील (स्प्लीन) (पोटातील अवयव) गमवावा लागला. त्यानं न्युमोनिया झाला आणि पित्ताशयाचे खडेदेखील झाले. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना पुढील शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असं त्यांना सांगण्यात आलं.

त्या म्हणाल्या, "मला काय होतं, हे मला माहित नव्हतं. पहिल्या महिन्यात काय झालं ते मला काहीही आठवत नाही."

फोटो स्रोत, Kam Sangha

फोटो कॅप्शन, या फार्मसी कर्मचाऱ्यानं सांगितलं की त्यांचे हात कापण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये घालावलेल्या पहिल्या महिन्याचं त्यांना काहीही आठवत नाही

काम संघा 60 वर्षांचे असून ते स्क्रूफिक्समध्ये वितरण कर्मचारी आहेत. पत्नीला आधार देण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी ते गेल्या 7 महिन्यांपासून कामावर गेलेले नाहीत. ते म्हणाले की त्यांना पत्नीचा अतिशय अभिमान वाटतो.

ते पुढे म्हणाले, "ती खूप खंबीर आहे."

"प्रत्येक दिवशी असं वाटत होतं की, 'ती आज जाणार आहे'. मात्र दररोज प्रचंड अडचणींना तोंड देऊन तिनं आम्हाला चुकीचं सिद्ध केलं."

या जोडप्यानं त्यांच्या लग्नाचा 37 वा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच साजरा केला. तसंच मनजीत संघाचा वाढदिवस ख्रिसमसच्या सुमारास साजरा केला.

आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठी पती-पत्नीची धडपड

फोटो स्रोत, Kam Sangha

फोटो कॅप्शन, मनजीत संघा त्यांचं आयुष्य नव्यानं उभं करत असताना, त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांच्यासाठी 22,000 पौंडांपेक्षा (अंदाजे 27 लाख रुपये) अधिक निधी जमा केला आहे

हे जोडपं आता ॲडव्हान्स प्रोस्थेटिक्ससाठी निधी उभारत आहेत. यात संभाव्यपणे रोबोटिक हातांचा समावेश आहे. ते म्हणतात की यासाठी हजारो पौंडांचा खर्च येऊ शकतो.

आतापर्यंत त्यांनी, गोफंडमी या वेबपेज आणि स्क्रूफिक्समध्ये निधी गोळा करून 22,000 पौंडापेक्षा (अंदाजे 27 लाख रुपये) अधिक पैसे उभारले आहेत. स्क्रूफिक्समध्ये मनजीत संघा यांनी त्यांच्या फार्मसीच्या कामासोबत वीकेंड शिफ्टमध्ये काम केलं.

पुढचा मार्ग कठीण आहे, हे त्यांना माहित असलं तरीदेखील त्यांनी सांगितलं की त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी त्यांचा दृढनिश्चय आहे.

त्या म्हणाल्या, "मला चालायचं आहे. मला माझे प्रोस्थेटिक्स मिळवयाचे आहेत आणि पुन्हा कामावर जायचं आहे."

"मी माझ्या खुर्चीवर आणि माझ्या पलंगावर भरपूर बसले आहे. आता चालण्याची वेळ आली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)