You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मध्यरात्री बिर्याणी खाणं योग्य आहे का? नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी योग्य आहार कोणता?
- Author, के. शुभगुणम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मध्यरात्र झाली आहे, साडेबारा - एकची वेळ आहे. तुम्ही अजूनही जागे आहात. आणि नेमकं त्याचवेळी तुम्हाला भूकही लागली आहे.
ऑनलाइन अॅपवरून तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट किंवा फूड काउंटरवरून बिर्याणी ऑर्डर केली आहे. आणि अर्ध्या तासांत गरमागरम बिर्याणी तुमच्या हातात येते.
हैदराबादसह देशातील मेट्रो शहरांमध्ये रात्री काम करणाऱ्यांसाठी ही गोष्ट खूपच सामान्य आहे.
मध्यरात्री फूड आउटलेटवर जाऊन गरमागरम बिर्याणी खातानाचे व्हीडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करणारे लोक हल्ली खूप दिसतात.
मध्यरात्री काहीतरी खावं अस वाटणाऱ्यांसाठी फूड डिलिव्हरी अॅप्स खूप उपयोगी ठरत आहेत.
यामुळे बिर्याणी, फास्ट फूड आणि इतर अनेक पदार्थ हव्या त्या ठिकाणी सहज पोहोचत आहेत.
पण बिर्याणीसारखं जड अन्न रात्री उशिरा खाल्लं, तर आपल्या शरीरात नेमकं काय घडतं? मध्यरात्री खाणं खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का?
'आपल्या शरीरातही एक नैसर्गिक घड्याळ असतं'
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, माणसाचं शरीर सर्कॅडियन ऱ्हिदम नावाच्या जैविक घड्याळानुसार काम करतं.
"हे आपल्या शरीरात 24 तास चालणारं एक घड्याळ आहे. ते आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांनुसार काम करते. झोप येणं, जाग येणं, भूक लागणं, उत्साही वाटणं किंवा थकवा येणं- हे सगळं हेच घड्याळ नियंत्रित करतं," असं बसुमणी सांगतात.
ते पुढे सांगतात की, आपला मेंदू दिवस आणि रात्रीनुसार शरीरातील या घड्याळाचे नियंत्रण करतो.
ते म्हणतात, "दिवसा आपण जास्त सक्रिय असतो. पण रात्री हृदय, फुफ्फुसांसारखे काही अवयव वगळता शरीरातील बहुतेक भागांना विश्रांतीची गरज असते."
"एखादा व्यक्ती रात्री जेवल्यानंतर ते अन्न पचण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. जर रात्री 7 वाजता जेवून 10 वाजता झोपल्यास पुढील 8 तास पोट-आतडी विश्रांती घेतात आणि स्वतःला स्वच्छही करतात."
पण जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली त्याच्या जैविक घड्याळाशी जुळणारी नसेल, तर शरीरातील संतुलन बिघडतं. याचा थेट परिणाम शरीराच्या कार्यावर होतो, असं गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट अरुल प्रकाश सांगतात.
'मध्यरात्री बिर्याणी खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?'
"मध्यरात्री जास्त कॅलरीचं अन्न खाल्लं, तर शरीराची पचनसंस्था ते नीट पचवू शकत नाही," असं डॉ. अरुल प्रकाश सांगतात.
ते पुढे सांगतात, "बिर्याणीत कार्बोहायड्रेट्स, चरबी, मीठ आणि तेल खूप जास्त असतं. मध्यरात्री पोट-आतड्यांनी विश्रांती घ्यायला हवी असते. अशा वेळी बिर्याणीसारखं जड अन्न खाल्लं, तर शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो."
"पचन प्रक्रिया हळू झाल्यामुळे अन्न पोटात जास्त वेळ राहतं. त्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं, छातीत किंवा पोटात जळजळ आणि इतर त्रास होऊ शकतात," असं अरुल प्रकाश स्पष्ट करतात.
एका दिवसात शरीराला जितकं आवश्यक आहे, तितकंच अन्न खाणं सर्वात चांगलं. वेळेचं भान न ठेवता, मनाला येईल तसं वारंवार खाल्लं, तर शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते, लठ्ठपणा येऊ शकतो आणि इतरही अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असा इशाराही ते देतात.
"दिवसा आपण अनेक कामं करतो, त्यामुळे अन्न लवकर पचतं. पण रात्री तसं होत नाही," असं बसुमणी म्हणतात.
"जर मध्यरात्री 12 वाजता बिर्याणी खाल्ली, तर ती पचायला 3 ते 4 तास लागतात. तोपर्यंत पोट आणि आतड्यांना विश्रांती मिळत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी ती नीट काम करत नाहीत. त्याचा थेट परिणाम शरीराच्या मेटाबॉलिझमवर (चयापचय क्रिया) होतो आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होतो," असं डॉ. बसुमणी स्पष्ट करतात.
'रोज मध्यरात्री जेवण केल्यास बिघडू शकतं आरोग्य'
रात्री उशिरा जेवण केल्यामुळे शरीरात कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात, याबाबत 2024 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात माहिती देण्यात आली आहे.
या अभ्यासासाठी संशोधन पथकाने वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा सरासरी 8.7 वर्षे अभ्यास केला.
रात्री दहा वाजण्यापूर्वी जेवण करणारे आणि दहा नंतर जेवण करणारे लोक यांची तुलना केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली.
अभ्यासात असं आढळलं की, जे लोक रात्री उशिरा जेवतात, त्यांना मधुमेह होण्याचा धोका खूप जास्त असतो. विशेषतः रात्री 11 ते 12 आणि 12 ते 1 या वेळेत जेवण करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.
मात्र अभ्यासात असंही दिसून आलं की, रात्री 11 नंतर थोडं उशिरा जेवण करणाऱ्यांमध्ये हा धोका तितका तीव्र नव्हता.
या अभ्यासानुसार रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांना मधुमेहासह विविध कारणांमुळे मृत्यूचा धोका अधिक असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अभ्यासात असं दिसून आलं की, रात्री खाल्ल्या जाणाऱ्या अन्नात जर कॅलरी जास्त असतील - म्हणजे तेलकट पदार्थ, तळलेलं अन्न, साखर आणि चरबी अधिक असेल - तर मधुमेह होण्याचा धोका आणखी वाढतो.
संशोधकांना असं आढळून आलं की, रात्री हलकं आणि कमी कॅलरीचं जेवण केल्यास आरोग्याचा धोका तुलनेने कमी होतो.
"वारंवार मध्यरात्री जेवण केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि मधुमेहसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अॅसिडिटी, अपचन आणि पचनाशी संबंधित इतर त्रासही होऊ शकतात," असं अरुल प्रकाश सांगतात.
ते पुढे इशारा देतात की, "आपलं शरीर ठराविक प्रमाणातच चरबी पचवू शकतं. उरलेली चरबी शरीरात साठून राहते. दीर्घकाळात यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो."
'नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी काय करायला हवं?'
रात्री उशिरा जेवल्यामुळे कोणताही फायदा होत नाही.
डॉ. अरुल प्रकाश सांगतात की, शक्य तितक्या वेळा शरीराच्या जैविक घड्याळानुसार जेवणाचं नियोजन करावं.
सध्याच्या परिस्थितीत अनेकांना नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, कारखान्यातील कामगार, आयटी कर्मचारी, माध्यमांतील कर्मचारी हे रात्रीही कामापासून दूर राहू शकत नाहीत.
काहीही न खाता रात्रभर जागं राहून काम करणं खूप कठीण असतं.
नाईट शिफ्टमध्ये काम करणारे लोक बहुतेकदा दिवसाच्या वेळेत झोप घेतात. त्यांच्याबाबतीत त्यांचं जैविक घड्याळ वेगळं काम करतं का आणि मध्यरात्री जेवण करणं चुकीचं आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो.
या संदर्भात बीबीसीने डॉ. अरुल यांना प्रश्न विचारला.
ते सांगतात, "जर कोणी रात्री काम करून दिवसा विश्रांती घेत असेल, तर शरीराचं सर्केडियन ऱ्हिदम त्यानुसार जुळेल असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. काही लोक आठवड्यात पाच दिवस रात्री काम करतात आणि शनिवार-रविवारी ते रात्री झोप घेतात."
डॉ. अरुल म्हणतात, "जर आठवडाभर झोप आणि जागरणाच्या वेळा बदलत राहिल्या तर शरीराचं जैविक घड्याळ बिघडतं. झोपण्याचं, काम करण्याचं आणि खाण्याचं वेळापत्रक गोंधळलेलं असेल, तर याचा थेट परिणाम शरीराच्या कामावर होतो."
"रात्रभर जागणाऱ्यांसाठी रात्रीचं जेवण टाळणं अशक्य आहे," असं डॉ. बसुमणी यांनी म्हटलं.
मध्यरात्री जेवण केलं तरी बिर्याणी, नूडल्ससारखे जास्त कॅलरीचे अन्न न खाता, फळं, ज्यूस आणि भाज्या यांसारखं साधं अन्न खाणं चांगलं राहील, असा सल्ला त्यांनी दिला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.