You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशात पंतप्रधानांसह 50 जणांचं नवं मंत्रिमंडळ; एकच हिंदू मंत्री, कोण आहेत ते?
बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) तारिक रहमान यांचं सरकार सत्तेवर आलं आहे.
मंगळवारी (17 फेब्रुवारी) नवीन खासदारांनी आणि तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळाने पदाची शपथ घेतली.
13व्या राष्ट्रीय संसद निवडणुकीत दोन तृतीयांश जागा जिंकल्यानंतर बीएनपीने मंगळवारी सरकार स्थापन केले. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तारिक रहमान यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.
त्याचवेळी, मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिरुद्दीन यांनी नवनिर्वाचित संसद सदस्यांना शपथ दिली.
सार्वत्रिक निवडणुकीत 299 पैकी बीएनपीने एकट्याने 209 जागा जिंकल्या आणि त्याच्या आघाडीने एकूण 212 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आहे.
तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळातील एकूण 50 सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशिवाय 25 जणांनी कॅबिनेट आणि 24 जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
या मंत्रिमंडळात दोन सदस्य बांगलादेशच्या अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. निताई रॉय चौधरी हिंदू समुदायातून आणि दीपेन दीवाण बौद्ध समाजातून येतात. दोघांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
बीबीसी न्यूज बांगलानुसार, निताई रॉय चौधरी यांना सांस्कृतिक मंत्रालय देण्यात आले आहे, तर दीपेन दीवाण यांना चटगाव पर्वतीय क्षेत्र कार्य मंत्रालय मिळाले आहे.
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाचे चार जण विजयी झाले आहेत. हे सर्व जण सत्ताधारी बीएनपीचे उमेदवार होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार हिंदू समाजातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. गोयेश्वर चंद्र रॉय आणि निताई रॉय चौधरी अशी त्यांची नावे आहेत.
बांगलादेशचे प्रमुख वर्तमानपत्र ढाका ट्रिब्यूननुसार, 77 वर्षीय निताई रॉय चौधरी व्यवसायाने वकील आहेत. आणि त्यांचा राजकारणाशी जुना संबंध आहे. ते बीएनपीचे उपाध्यक्षही आहेत.
याशिवाय, निताई रॉय चौधरी यांनी पूर्वी युवा आणि क्रीडा विभागाचे मंत्रिपद सांभाळले आहे.
या निवडणुकीत त्यांनी मागूर-2 मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी जमात-ए-इस्लामीच्या उमेदवाराला 30 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केलं आहे.
2024 मध्ये शेख हसीना सरकारला सत्तेवरून हटवल्यानंतर अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
भारताने या प्रकरणांवर तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलावीत, असं आवाहनही बांगलादेशकडे केलं होतं.
ढाका ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत निताई रॉय चौधरी यांना भविष्यात जर बीएनपीचे सरकार सत्तेवर आलं, तर त्यांच्याकडून अल्पसंख्याकांसाठी कोणती विशेष पावले उचलली जातील, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं होतं की, "बीएनपी धार्मिक अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या विचारसणीवर विश्वास ठेवत नाही. आम्ही बांगलादेशमध्ये सर्वांसाठी समान हक्क आणि अधिकारांवर विश्वास ठेवतो."
"एका मुसलमानाचे हक्क हिंदूच्या अधिकारांपेक्षा वेगळे नाहीत. बीएनपी सर्वांच्या समान हक्क आणि अधिकारांसाठी ठामपणे उभी आहे."
"बांगलादेशमध्ये बहुतांश लोक ग्रामीण भागात राहतात, जिथे जातीयवाद कमी आहे. शहरी भागांमध्येही जातीयवाद खूप कमी आहे. तरीही, आम्ही पाहिलं आहे की, अवामी लीग विविध मार्गांनी जातीयता वाढवत आहे."
"जर बीएनपी सत्तेत आली, तर आम्ही धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध कोणताही भेदभाव होऊ नये, याची काळजी घेऊ. कारण आम्ही कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचे समर्थन करत नाही."
व्यवसायाने वकील असलेले दीपेन दिवाण हे बीएनपीच्या तिकिटावर रंगामाटी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
दीवाण यांनी निकराच्या लढतीत एका अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. ते रंगामाटीचे बीएनपी जिल्हाध्यक्ष ही होते.
चकमा समुदायातून येणारे 62 वर्षीय दीवाण यांना चटगाव पर्वतीय क्षेत्र कार्य मंत्रालय देण्यात आले आहे.
मातृभूमी या वेबसाइटनुसार, दीवाण हे बौद्ध समुदायातून आले आहेत, पण काही लोक त्यांची धार्मिक ओळख हिंदू मानतात.
रंगामाटी जिल्हा आता चटगाव डोंगराळ भागात येतो आणि त्याची जबाबदारी दीवाण यांच्याकडे देण्यात आली आहे.
निवडणुकीतील विजयानंतर न्यू एज मीडिया समूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धार्मिक सलोखा राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना सोबत घेऊन काम करू असं आश्वासन दिलं होतं.
जिल्ह्यातील विकास आणि महिला सक्षमीकरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
विकासाच्या प्रयत्नांमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही. शिक्षण, आरोग्य, शेती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.